संक्रांतिविज्ञान : (सायबरनेटिक्स). सर्वप्रकारचे प्राणी, मानव, यंत्रे व संघटना यांच्या संबंधातील संदेशवहन आणि नियंत्रणासंबंधातील आंतरशास्त्रीय अभ्यासाला संक्रांतिविज्ञान अशी संज्ञा वापरतात किंवा सजीव प्राणी आणि यंत्रे यांच्या संबंधातील संदेशवहन व नियंत्रणाच्या अभ्यासाबाबतचा सिद्धांत म्हणजे संक्रांतिविज्ञान होय. ही संज्ञा बर्याच वेळा कार्यक्रम नियंत्रक संगणकाच्या विकासाच्या साहाय्याने बहुविध प्रकारचे विशेष शास्त्रीय व तांत्रिक स्वरूपाचे जैविक व अवगमीय गुंतागुंतीचे प्रश्न वा समस्यांचे अभ्यासपूर्वक विश्लेषण करून सोडविण्याच्या विज्ञान व तंत्रविदया शाखेचे निर्देशन करण्यासाठी वापरतात [अवगमीय प्रश्न म्हणजे माहिती, ज्ञान जाणीवसंबंधातील समस्या ⟶ अवगम सिद्धांत]. संक्रांतिविज्ञानाची व्याख्या निरनिराळे विचारवंत, लेखक व विद्वानांनी निरनिराळ्या पद्धतींनी केली असली, तरी एका बाबीपुरते सर्वांचे एकमत आहे. ह्या सर्वांच्या मतानुसार संक्रांतिविज्ञान हा जसा जैवविज्ञान व समाजशास्त्राचा सैद्धांतिक भाग आहे तसाच तो अवगम सिद्धांताच्या गणितीय साधनाचा भाग आहे. सामान्यत: त्यामध्ये अध्ययन यंत्रे, टूरिंग यंत्रे (टूरिंग यंत्र म्हणजे स्वयंचलित संगणकाची गणितीय प्रतिकृती) यांचा जसा समावेश केलेला असतो, तसाच अवगम मानसशास्त्र, अवगम सौंदर्यशास्त्र यांसंबंधातील अवगम सिद्धांताच्या प्रत्यक्षातील उपयोगाचा देखील समावेश केला जातो. तात्त्विक दृष्टिकोनातून संक्रांतिविज्ञानाचा संबंध एखादया प्रणालीतील जैविक वा तांत्रिक जाणीवेतून नकळतपणे केल्या जात असलेल्या पुनरावर्ती प्रक्रियांशी जोडला जातो. तसेच त्याचा संबंध अन्वेषण प्रणालीमध्ये अजाणतेपणे होणाऱ्या व म्हणून फारशी मान्यता नसलेल्या कल्पित क्रियांशी व त्यासाठी निर्मिलेल्या परिभाषेशी जोडला जातो.
ऐतिहासिक दृष्टीने संक्रांतिविज्ञानाची बीजे पुढील दोन गंथांमधील वैचारिक संघर्षामधून निर्माण झालेल्या चर्चेत आढळतात : मॅन नॉट अ मशीन : ए स्टडी ऑफ फायनॅलिस्टिक अस्पेक्ट्स ऑफ लाइफ (लंडन, १९२०) आणि मॅन अ मशीन (न्यूयॉर्क, १९२८). मात्र असे असले, तरी संक्रांतिविज्ञानाची सुरूवात खऱ्या अर्थाने १९४०-५० या दशकातील तंत्रविद्येतील महत्वाच्या प्रगतीमुळे झाली. इलोक्ट्रॉनीय संगणक व पुनःप्रदाय पद्धती हे या प्रगतीतल दोन मुख्य घटक होत. संक्रांतिविज्ञानाच्या प्रारंभाचे श्रेय ⇨ नोरबर्ट वीनर यांना देतात. वीनर यांच्या जोडीने एच्. श्मिट यांनी संक्रांतिविज्ञान हे विज्ञान न मानता एक तंत्र म्हणून त्याचा विचार केला होता. त्यांच्या मते विभिन्न क्रियांचे नियंत्रण करण्याचे साधन म्हणजे संक्रांतिविज्ञान होय तर वीनर यांच्या मते संक्रांतिविज्ञान म्हणजे विशिष्ट क्रियांसाठी दिशानियंत्रणक्रिया, दिशादिग्दर्शन असून हे दिग्दर्शनाचे कार्य नियंत्रक पार पाडतो. समजण्यास कठीण वाटणाऱ्या या दोन्ही संकल्पन- नियंत्रक आणि दिशादर्शक-अधिक स्पष्ट करण्यासाठी या जोन्ही शास्त्रज्ञांनी अनुक्रमे प्रशीतक व मोटारीच्या दिशानियंत्रक चाकाची उदाहरणे दिली आहेत. प्रशीतकाचे तापमान ठराविक अंशांच्या सीमेमध्ये सिमित रहावे यासाठी तपयुग्म प्रशीतकाच्या विद्युत् यंत्रणेत जोडलेला असतो. हा तपयुग्म प्रशीतकाच्या तापमान नियंत्रणाचे कार्य स्वयंचलित रीतीने जसे करतो, जवळजवळ तसेच मानव देखील स्वतःच्या शारीरिक हालचाली देखील नकळतपणे करतो. जसे, एखादी वस्तू उचलण्याची क्रिया करण्यासाठी कोणीही व्यक्ती स्वतःच्या हाताची बोटे नकलतपणे उघडमीट करण्याची क्रिया सहजपणे करते. मोटरचालक मोटर चालविताना समोरच्या रस्त्याकडे लक्ष ठेवून मोटार योग्य दिशेत वळविण्यासाठी तिचे दिशानियंत्रक चाक डावी-उजवीकडे योग्य तितक्या प्रमाणात सहजपणे वळवून योग्य तेवढे वळण घेतल्यावर तितक्याच सहजपणे मोटारीची दिशा सरळरेषेत धावणारी करतो. म्हणूनच ‘मोटारचालक’ हा एका वेगळ्याअर्थाने दिशानियंत्रक म्हणून मानता येईल.
संक्रांतिविज्ञान या संकल्पनेचा उपयोग एखादया कारखान्यातील कार्याची रचना म्हणजे कार्यरचना करण्यासाठी खास करून करतात. तसेच या संकल्पनेचा उपयोग ⇨ मानव – यंत्र अभियांत्रिकी व अवगमतंत्र विद्येसाठीदेखील केला जातो. मानव – यंत्र अभियांत्रिकी हे मानव व यंत्रयांचा परस्परावलंबी संबंध स्पष्ट करणारे आधुनिक शास्त्र आहे. याच्या साहाय्याने यंत्र आणि मानवातील आंतरपृष्ठ नेमक्या प्रमाणात स्पष्ट करता येत असल्याने विशिष्ट अशा कोणत्या कामासाठी मानवी हालचाली कशा व कोणत्या केल्यास मानवी मनाचे संतुलन कायम राखता येईल ते ठरविता येते. यांशिवाय क्रांति विज्ञानाचा उपयोग सेवा प्रणालीसाठी करतात. तिच्या साहाय्याने नियंत्रण तंत्रविद्येत सुधारणा घडवून आणता येते संगणकाच्या सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये आणि स्वसंवेदीयंत्र चालक निर्मितीसाठी ही संक्रांतिविज्ञानाचा उपयोग होतो. १९९० पासून संक्रांतिविज्ञानाचा काही प्रमाणात रोगविज्ञानांतर्गत मानवी बोधन, रोग निदान इत्यादींसाठी उपयोग केला जात आहे. संक्रांतिविज्ञानाचा अनुकूली, पुन: प्रदायी स्वरूपाच्या स्वाभाविकपणे केल्या जाणाऱ्यास हेतुक अस्थायी वाचल क्रियांशी संबंध येत असतो. मानवी मेंदूव्दारे संदेश ग्रहण, संदेशछानन व संदेशवहन क्रिया केल्या जातात. मेंदूने दिलेल्या आदेशानुसार ज्ञानेंद्रियांच्या व कर्मेंद्रियांच्या क्रिया होत असल्याने संदेशवहन व क्रिया नियंत्रण या दोन्ही क्रियांचा विशेष प्रमाणात अभ्यास संक्रांतिविज्ञानांतर्गत केला जातो. त्यामुळे सैन्यदलामध्ये लढाऊ सैनिकांची भरती व प्रशिक्षण करण्यासाठी तसेच रेडिओ, दूरचित्रवाणी, घड्याळ निर्मिती कारखाने, संगणक उदयोगासाठी आवश्यक असलेले मायक्रो चिप (सूक्ष्म चिप) निर्मितीचे कारखाने अशा अत्याधुनिक कारखान्यांतील कामगारांच्या प्रशिक्षणासाठी देखील संक्रांतिविज्ञान उपयुक्त असल्याचे मानले जाते. संक्रांतिविज्ञानातील महत्त्वाची संकल्पना म्हणजे ऋण पुन:प्रदाय होय. मानवी अथवा यांत्रिक प्रणालीच्या कार्यात्मक दिशेमध्ये विशिष्ट असा कोणाताही बदल करावयाचा झाल्यास त्या संबंधीची पूर्व सूचना मिळण्याची वादेण्याची सोय त्या प्रणालीमध्ये अंगभूत असावी लागते. तरच, यांत्रिक वा मानवीप्रणालीमध्ये कार्यात्मक दिशा बदल घडवून आणता येतो. जसे, एखादे दुचाकी वा चारचाकी वाहन चालविताना ते जास्त प्रमाणात डावीकडे जात असेल, तर त्याला किंचित उजवीकडे वळविण्यासाठी वाहनाचे हँडल वा चाक उजवीकडे वळविण्याची क्रिया करावी लागते. ही क्रिया योग्यत्यावेळी व योग्यतेवढी होण्यासाठी वाहनचालकाच्या मेंदूमध्ये आवश्यक त्या संदेशवहनाच्या क्रिया होणे जरूरीचे असते. या संदेशवहनाच्या क्रियां मध्ये ‘कायन केल्याने कसे व कोणते दुष्परिणाम होऊ शकतात ते आगाऊ ओळखण्याची क्रिया’ अत्यंत महत्त्वाची असते. अती महत्त्वाच्या अशाया ‘कारण – परिणाम प्रक्रियेला’ ऋण पुन:प्रदाय असे म्हणतात. वर – वर पाहता क्षुल्लक वाटणाऱ्या या संकल्पनेचा उपयोग सर्वप्रकारच्या यांत्रिक अवजारांमध्ये, यंत्रोपकरणांमध्ये, आधुनिक काळातील संगणक प्रणालींमध्ये, तसेच केवळ मानवी बळावर केल्या जाणाऱ्या कुठल्याही उत्पादनात वा निर्मितीमध्ये व यंत्र – मानवाच्या कार्यप्रणालीमध्ये केला जातो. आधुनिक युगात सर्वत्र वापरात असलेली बऱ्याच प्रकारची चालकरहित विमाने, क्षेपणास्त्रे, पाणबुड्या, वैयक्तिक संगणकयांमध्ये अत्यावश्यक असलेल्या हार्डवेअर प्रणालींमध्ये ऋण पुन:प्रदाय अती व महत्त्वाचा मानला जातो.
रासायनिक उदयोग, रंग निर्मिती, मद्य निर्मिती व औषध निर्मिती या उदयोगांमध्ये निरनिराळ्या प्रकारचा कच्चा माल ठराविक प्रमाणात एकत्र करून विक्री योग्य पक्का माल तयार करतात. या प्रक्रियेमध्ये बऱ्याच वेळा मिश्रण गरम करावे लागते, मिश्रणाला योग्यतेवढी श्यानता (दाटपणा) असावी लागते. मिश्रणाच्या तापमानात, श्यानतेमध्ये काही कारणाने किंचितसा फरक पडला, तरी त्यामुळे संबंधित उत्पादगट निरूपयोगी ठरण्याचा धोका असतो व त्यामुळे लक्षावधी रूपयांचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच अशा कारखान्यांमध्ये प्रत्यक्षात मालाची निर्मिती करण्यापूर्वी तयार करावयाच्या पक्क्या मालाचा चाचणीगट तयार करतात. या चाचणी गटातील मालाची १००% चाचणी (परीक्षा) अत्यंत काटेकोरपणे केली जाते. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळता येते. अशाप्रकारे मालाच्या ⇨ गुणवत्ता नियंत्रणासाठी देखील ऋण पुन:प्रदाय या संकल्पनेचा उपयोग होतो. वर उल्लेखिलेल्या कारखान्यांतून तयार केल्या जाणाऱ्या मालाच्या आवेष्टनाची क्रिया करण्यासाठी पुष्कळदा काच, प्लॅस्टिक, टेट्रा पॅकच्या कुप्या, बाटल्या यांचा उपयोग करतात. या कुप्यांत वा बाटल्यांत द्रव्य/द्रव पुरेशाप्रमाणात भरले आहे वा नाही, कुप्यांवर व बाटल्यांवर चिकटविलेली परिचय चिठ्ठी (लेबल) योग्य जागी व योग्यरीतीने (म्हणजे उलट – सुलट) चिकटविलेली आहे काय ? या बाबींची निश्चिती करण्यासाठी यांत्रिक डोळ्याचा (वायांत्रिकदृष्टीचा) उपयोग मोठ्याप्रमाणावर करतात. सदर यांत्रिक डोळ्याच्या मेंदूमध्ये आवेष्टनामध्ये भरावयाच्या मालाचे प्रमाण किती हवे त्याची नेमकी माहिती, परिचय चिठ्ठी वरील मजकुराच्या अक्षरांची उंची, जाडी, प्रकार, भाषा व लिपी यासंबंधी माहिती तसेच परिचय चिठ्ठीचे वेष्टनावरील नेमके स्थान, परिचय चिठ्ठीचे माप, रंग इ. सर्वप्रकारची माहिती म्हणजेच प्रदत्तांचे (आधारमाहितीचे) भरण केले जाते. भरण केलेल्या माहिती नुसार वेष्टनाच्या आतद्रव्य/द्रव आहे वा नाही तसेच परिचय चिठ्ठीसंबंधातील सर्व बाबी अपेक्षेनुसार आहेत वा नाहीत ते काटेकोरपणे ‘पाहण्याचे काम’ यांत्रिक डोळा करतो. यांत्रिक डोळ्याच्या या ‘पाहण्याच्या कामामुळे’ अस्वीकार्य ठरलेल्या कुप्या व बाटल्या उत्पादन साखळीतून काढून घेण्यासाठी यांत्रिक हाताची योजना केलेली असते. परिचय चिठ्ठी तपासणीकरण्याच्या या तंत्राला प्रतिरूप – प्रतिबोधन असे म्हणतात. या तंत्रामुळे आवेष्टन क्रियांचा वेग फार मोठ्या प्रमाणात वाढविता येतो. या प्रतिरूप – प्रतिबोधनक्रिये मध्ये ‘यंत्र विचार करू शकते’. यंत्राची विचारकरण्याची क्रिया निगामी तर्कशास्त्रीय व विगामी तर्कशास्त्रीय अशी दोन्ही प्रकारांनी होऊ शकते. अशाप्रकारे प्रतिरूप – प्रतिबोधन क्रिया संवेदनात्मक असो वा संकल्पनात्मक असो कशीही असली तरी ⇨ संश्लेषित बुद्घिमत्ता ही विचारकरण्याचे कार्य मानवी मदतीविना करू शकते. त्यासाठी संश्लेषित बुद्धिमत्तेला गणित, चिन्हांकित तर्कशास्त्र, सांख्यिकी, वैश्लेषिक मीमांसा (युक्तिवाद) प्रणाली, संभाव्यता यांसारख्या इतर/अन्य पद्धतींचा उपयोग करावा लागतो. प्रतिरूप – प्रतिबोधन तंत्राचा वापर यांत्रिक डोळ्यामध्ये करून अमेरिका, इंग्लंड व यूरोपीय देशांतील डाक कार्यालयांत पत्रांचा तसेच पार्सलांचा बट वडा करण्यासाठी इलेक्ट्रॉनीय क्रमवीक्षण यंत्रे १९४५ पासून वापरली जात आहेत. भारतीय डाक विभागाने अशा यंत्रांचा वापर १९९५ मध्ये मुंबई, दिल्ली, चेन्नई व कोलकाता ह्या चार महानगरांपासून सुरू केला तेव्हा पासून त्याची व्याप्ती सातत्याने वाढविली जात आहे. या यंत्राचा यांत्रिक डोळा प्रत्येक पत्र, पाकीट वा पार्सलवर लिहिलेले शहराचे वा गावाचे नाव व पिनकोड क्रमांक वाचतो व त्यानुसार डाकवर्गीकरण क्रिया केली जाते. ह्या विधेचा वापर सर्रासपणे होऊन डाक बटवड्याचा वेग वाढण्यासाठी पत्ता व पिनकोड लिहिण्याच्या पध्दतीचे मानकीकरण तसेच पत्ता व पिनकोड लिहिण्याच्या जागा व पध्दती ह्यांचे एकसूत्रीकरण करणे आवश्यक असते. प्रतिरूप – प्रतिबोधन तंत्राचा वापर मुद्रण व्यवसायातील अक्षरांकन जुळणी, चित्रमुद्रांकनासाठी देखील केला जातो. पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या मुद्रण व्यवसायामध्ये अक्षर जुळणीचे खिळे (म्हणजे टाईप) व इतर साहित्यासाठी एखादया छोट्या मुद्रणालयाला मोठी गुंतवणूक त्यासाठी करावी लागे. तसेच काम आता नव्या पद्धतीने एक संगणक, दोन – तीन तबकड्या (सीडी) व एकमुद्रण यंत्र एवढ्या वर कितीतरी प्रमाणात स्वस्त व अधिक चांगले करता येते. त्यामुळे मुद्रण व्यवसायाची उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असे आढळते.
प्राचीन काळापासून भारतातील सर्वच प्रांतांत राजे रजवाडे आणि श्रीमंत लोकांमध्ये द्यूत म्हणजे सोंगटी पटाचा खेळ, सारीपाट आणि बुद्धिबळ हे खेळ खेळले जात. या तिन्ही प्रकारच्या खेळांमध्ये खेळाडूंचाभर तर्कशास्त्र आणि बुद्धि कौशल्यावरच असतो. जगातील इतर सर्व देशांमध्ये ही हे खेळ खेळले जातात. संगणक युगाचा उदय होईपर्यंत हे खेळ केवळ मानवी बुद्धिनेच खेळले जात असत. तथापि संगणकाचे आकारमान लहान होऊन त्याची किंमत सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात येऊ लागल्यावर १९६० मध्ये प्रथम संगणकावर खेळ खेळण्याची शक्यता निर्माण झाली. सुरूवातीस केवळ फुटबॉल व बेस बॉल हेच खेळ संगणकावर खेळता येत. १९७० पासून बास्केट बॉल, बुद्धिबळ हे खेळ तसेच अंकीय खेळ, स्पेलिंगचे खेळ हे ही संगणकावर खेळले जाऊ लागले. सोंगटी पटाचा खेळ, सारीपाट आणि बुद्धिबळाचे खेळ संगणकाच्या साहाय्याने खेळण्याची क्रिया आता बरीच लोकप्रिय झाली असून राज्य स्तरावर तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे सामनेही खेळले जातात. या संबंधात महत्त्वाची बाब म्हणजे ⇨ खेळ सिद्धांताचा संगणकाच्या साहाय्याने उपयोग करून शेअरबाजार, वायदे बाजार, युद्धातील डावपेच लढविणे इत्यादींसाठी ही संक्रांतिविज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. कारण या सर्वच बाबी तर्कशास्त्रावर आधारित असतात. मानवाचे सर्व दैनंदिन व्यवहार किंवा तार्किक क्रिया ह्या शरीरांतर्गत असलेल्या मेंदू व मनाच्या साहाय्याने मज्जातंतूं व्दारे होत असतात. मेंदू व मन या दोन्ही महत्त्वाच्या माध्यमातून मानव प्राणी कोणताही निर्णय घेत असतो आणि या निर्णयानुसारच स्वत:च्या सर्व क्रिया म्हणजेच कामे पार पाडीत असतो. संगणकातील सॉफ्टवेअर प्रणालीकडून होणारे हे काम जवळपास मानवाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रिये प्रमाणेच असते. मानव आणि संगणकाची निर्णय घेण्याची प्रकिया ‘जवळपास’ समान असते असे म्हणण्याचे कारण हे असते की, मानव निर्णयघेण्याच्या प्रक्रियेमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या स्थल – कालसापेक्ष असलेल्या बऱ्याच प्रकारच्या आंकिक, शाब्दिक व चित्रमय भाषेतील प्रदत्तांच्या बरोबरच जाणीवेचाही उपयोग करतो. संगणकातील सॉफ्टवेअर प्रणालीला मात्र जाणीवेचा स्पर्श अद्यापतरी न झाल्याने संगणकाची निर्णय प्रक्रिया स्थल – कालसापेक्ष असली, तरी ‘परिस्थिती सापेक्ष असत नाही’ असे म्हणता येईल. जाणीवेचे महत्त्व किती हे दाखविण्यासाठी पुढील उदाहरण उपयुक्त ठरेल. मानवा विरूध्द बुध्दिबळ खेळण्यासाठी संगणकाचा उपयोग करता यावा यासाठी सॉफ्टवेअर विकसित केली जातात. अति उच्च दर्जाच्या (विश्व विजेत्या) खेळाडूविरूध्द लढण्यासाठी एक महा संगणकच कित्येक वर्षे विकसित केला जात आहे. त्यात आतापर्यंत खेळले गेलेले सर्व चांगले डाव संदर्भासाठी साठवणुकीत ठेवले आहेत. नवे डावही सातत्याने साठविले जातात. मानवाची प्रत्येक खेळी झाल्यानंतर पटत्या संदर्भाशीताडून पूर्वीची विजयी खेळी वापरतो. त्या नंतर संगणक गणकीय वेगाने पटावरील प्रत्येक मोहरे – प्यादे कोणकोणत्या खेळी खेळू शकतील, त्यांची व त्याच पध्दतीने पुढील अनेक खेळ्यांची जोडणी करून होणाऱ्या लक्षावेधी स्थान – विनिमयी संयोगातून (परम्युटेशन्स ॲन्ड कॉम्बिनेशन्स करून) पुढची विजयी खेळी शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्यासाठी विश्वविजेत्या खेळाडू विरूध्द लढण्याचे सॉफ्टवेअर घेऊ शकणारा, प्रचंड स्मृतिकोश असणारा व प्रति सेकंद अब्जावधी गणिती क्रिया करणारा महासंगणक आणि ते सॉफ्टवेअर लिहिण्यासाठी शेकडो बुध्दिमान मानवांचे सहस्रावधी तास वापरावे लागतात. त्या उलट विश्वविजेता एकच मानव जाणीवपूर्वक फक्त ४ किंवा ६ मोहऱ्या – प्याद्यांच्याच चाली जोखून त्याची खेळी करतो.
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन वायुदलासाठी निर्माण करावयाच्या विमानाच्या पंखाच्या वातपर्णाची पार्श्वरेखा पेषण यंत्रावर तंतोतंत यंत्रण करण्याच्या निमित्ताने पहिले फीतनियामक यंत्रतयार केले गेले. त्यानंतर कालांतराने संगणक नियामक यंत्राचा अवतार झाला. सुरूवातीस संगणक नियामक यंत्रे केवळ धातू यंत्रणाच्या कामापुरतीच तयार केली जात असत. काही काळानंतर जस जशा प्रमाणात तंत्रविद्येचा विकास होऊ लागला तस तशा प्रमाणात संगणकाचे आकारमान व किंमत कमी होऊ लागून संगणकाचा प्रसार धातू यंत्रणाच्या क्षेत्रापुरताच मर्यादित न राहता रासायनिक निर्मिती, वस्त्रोद्योग, वाहतूक व्यवसाय, जलसिंचन, वायुवितरण, औषध निर्मिती, अणुऊर्जा केंद्रे, अवकाशयान निर्मिती उदयोगासारख्या इतर कित्येक प्रकारच्या निर्मिती क्षेत्रांत होऊ लागल्याने त्या त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये संगणकाबरोबर संक्रांतिविज्ञानानेदेखील पदार्पण केले. ही परिस्थिती विशेषत: विकसित राष्ट्रांतच खास करून होती. भारतामध्ये मात्र संगणकाचा प्रवेश इतर प्रगत देशांच्या तुलनेत बराच उशिरा झाल्याने अद्यापही बऱ्याच औदयोगिक कारखान्यांच्या कार्यालयीन वा प्रशासकीय कामांत त्यांचा पूर्ण वापर केला जात नाही. तथापिही परिस्थिती दीर्घकाळ टिकणारी नसून कारखाना पातळीवर संगणकाचा वापर वेगाने वाढत आहे. भारतातील कारखान्यांच्या कार्यात्मक पातळीवर संगणकाचा उपयोग वेगाने न होण्यामागे अनेक कारणे होती पण त्यातील सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे मानव – यंत्र आंतर पृष्ठ हे होय. वर्तमानकाळात भारतातील ज्या कारखान्यांत स्वयंचलित यंत्रांच्या साहाय्याने मालाची निर्मिती केली जाते, तेथे अभियांत्रिकी संक्रांतिविज्ञानातील एक महत्त्वाची समस्या बऱ्याचवेळा उद्भवते. ही समस्या मानव – यंत्र आंतर पृष्ठ समस्या म्हणून मानली जाते. ज्यावेळी विशिष्ट व्यक्ती कारखान्यातील स्वयंचलित यंत्रांवर काम करतात, त्यावेळी सर्वांना सारख्या प्रमाणात काम करावे लागावे अशी सर्वांची साहजिकपणे अपेक्षा असते. तथापि कोणत्याही कारखान्यातील प्रत्येक यंत्रावर तयार होत असलेल्या घटकांचा प्रत्येकी संकलित चक्रजकाळ नेहमी वेग वेगळा (असमान) असतो. यांखेरीज ही यंत्रे जितक्या प्रमाणात स्वयंचलित असतात, तितक्या प्रमाणात यंत्रावर काम करणाऱ्या व्यक्तीचा यंत्राशी प्रत्यक्षातला शारीरिक संबंध कमी होत असतो. या संबंधात असे आढळून आले आहे की, यंत्रा वर मालाची चढ – उतार करण्या पुरता, यंत्र चालू – बंद करण्या पुरता, यंत्राची स्वच्छता व दुरूस्ती करण्यापुरता व यंत्राची वंगण क्रिया करण्यापुरता इतका मर्यादित प्रमाणात व्यक्तीचा यंत्राशी प्रत्यक्षातला शारीरिक संबंध असतो. हा शारीरिक संबंध एका पाळीच्या ४८० मिनिटांपैकी जेमतेम दहा टक्के म्हणजे ४८ मिनिटे इतक्या अल्प प्रमाणातच असल्याने व्यक्तीच्या मनात कामा बाबत आपुलकीची भावना घटत जाऊन तिची जागा परकेपणा घेतो. अशाप्रकारे ज्यावेळी आपलेपणाचे परकेपणात रूपांतर होते त्यावेळी व्यक्ती यंत्राचा, कामाचा व सभोवतालच्या वातावरणाचा, वरिष्ठांचा तसेच काहीप्रमाणात स्वत:च्या सहकाऱ्यांचा हळूहळू तिरस्कार, दुस्वास करू लागते. कालांतराने याचा कारखान्याच्या उत्पादकतेवर, उत्पादनावर दुष्परिणाम होऊन एकूण कारखान्याचे अस्तित्व धोक्यात येते. यावर इलाज म्हणून कार्यसमृद्धी करण करतात. कार्य समृद्धी करणामुळे व्यक्तीचा कामातील सहभाग वाढतो. व्यक्तीचा कामातील सहभाग जसजसा वाढतो, तसतसा कामा बाबतचा परकेपणा हळूहळू कमी होत जातो.
कार्य समृद्धीकरनाची महत्त्वाची संकल्पना पुढील प्रकारे थोडक्यात स्पष्ट करता येईल. समजा, एक व्यक्ती स्वयंचलित ⇨ लेथवर विशिष्ट अशा एका घटकाचे यंत्रण करण्याचे काम करते. या घटकाच्या यंत्रणाचा संकलित चक्र जकाल दीड ते दोन मिनिटे इतकाच आहे. अशाच प्रकारची स्वयंचलित यंत्रे या कारखान्यात असल्यास प्रत्येक यंत्रावरील घटकाचा संकलित चक्र जकाल असमान राहील. तसेच उत्पादन जास्त व्हावे म्हणून प्रत्येक यंत्राचे यंत्रप्रस्थापन करण्यासाठी केवळ एकच व्यक्ती यंत्र प्रस्थापक म्हणून काम करते. अशावेळी काही यंत्रांचा खोळंबा होतो. अशा परिस्थितीत काही व्यक्तींना यंत्र प्रस्थापना करण्याचे प्रशिक्षण दिल्यास व्यक्तीचे कार्य – कौशल्य वाढून त्याला कामाबाबत परकेपणा वाटण्याची शक्यता कमी होते.
भारतातील चार चाकी वाहन (मोटार) निर्मिती करणाऱ्या एका चांगल्या कारखान्यात मोटारीची दंतचक्रपेटी जुळणी विभागात प्रत्येक दंत चक्रपेटीच्या जुळणीसाठी सु. सात ते आठ मिनिटे लागतात. नंतर प्रत्येक जुळणी अपेक्षेनुसार झाली किंवा नाही त्याची खात्री करण्यासाठी ती चाचणी पटलावर लावून मानदंड म्हणून निश्चित केलेल्या गतींमध्ये ठराविक काळपर्यंत चालवून जोखून पाहिली जाते. प्रत्येक दंतचक्रपेटीची चाचणी पटलापर्यंत वाहतूक करण्यात वेगळी दोन – तीन मिनिटे जातात. प्रत्यक्ष चाचणी साठी फक्त तीन मिनिटेच लागतात. अशा प्रकारे प्रती दंतचक्रपेटीचा संकलित चक्र जजुळणीकाल, प्रतीक्षेचा कालावधी धरून सु. पंधरा ते वीस मिनिटांचा असतो. इंग्लंड मधील ब्रिटिश ले लँड कारखान्यात या चक्रियेसाठी केवळ अडीच ते तीन मिनिटे पुरतात.
विकासाच्या विविध अवस्थांमध्ये समायोजी व अर्थपूर्ण शिक्षणाच्या विविध कालखंडांत जीवाचे (म्हणजेच मानवाचे वा मानवेतराचे) वर्तन बहुधा विशेष प्रकारचे असते. ही बाब लक्षात घेऊन शास्त्रज्ञांनी प्रशिक्षणासाठी पुढील महत्त्वपूर्ण दोन सिद्धांतांची शिफारस केली आहे : (१) शिक्षण व प्रशिक्षणाचे अभिकल्प (आराखडे) पूर्व प्राप्त नियंत्रण स्तराशी समायोजन करावेत आणि कालमानाने प्राप्त होणाऱ्या परिपक्वतेमुळे निर्माण होणाऱ्या भावी काळातील बदलांबाबत संवेदी असावे. (२) प्रत्येक व्यक्तीने सर्वच स्तरांवर सभोवतीच्या परिसरावर नियंत्रण ठेवता येण्याइतपत स्वत:च्या क्रियांवर ताबा ठेवावा म्हणून व्यक्तीला मदत केलीच पाहिजे.
जीवाच्या प्रशिक्षण कार्यापुरता संक्रांतिविज्ञानाचा उपयोग करण्यासंबंधात असे आढळून आले आहे की, विशिष्ट जीव स्वत:च्या संक्रांतिप्रणालीच्या गुणधर्मांवर नियंत्रण ठेवू शकतात त्याबरोबरच नियंत्रण पद्धतीत बदलही घडवूनआणू शकतात. या संपूर्ण वर्तनशील संक्रांतीप्रणालीचे मूलभूत गुणधर्म असे लिहिता येतील : (१) जीवसंवेदनात्मक हालचाली सुव्यवस्थित रीतीने दैशिक पद्धतीने म्हणजे दिशेनुसार करू शकतात. (२) जीव स्वनिर्मितक्रिया आणि विशिष्ट उद्दिष्टवामानक यांतील अंतर, फरकाचे प्रतिबोधन करू शकतात. (३) जीव प्रतिसंभरण नियमनाव्दारे नियंत्रणाचे गतिशील नियंत्रण पुनर्दिशाकरण करू शकतात. (४) आकलक प्रणालींचे एकात्मीकरण आणि बहु दिशसंवेदना प्रतिसाद या दोन्ही बाबी गतिशील नियंत्रणाने साध्य होतात. (५) संवेदी प्रतिसंभरणाचे ऐहिक, दैशिक, गतिक, प्रतिदर्शी आणि रूपांतरणीय गुणविशेष विशेषज्ञतेने असतात.
पहा : अवगम सिद्धांत नियंत्रण प्रणाली मानव – यंत्र अभियांत्रिकी वीनर, नोरबर्ट.
संदर्भ : 1. Kohonen, T. Self-Organization and Associative Memory, 1988.
2. McCulloch, W. Embodiments of Mind, 1965.
3. Singh, M. (Ed.) Systems and Control Encyclopedia, 1987.
4. Wiener, N. Cybernetics, 1961.
5. Wiener, N. Extrapolation : Interpolation and Smoothing of Stationary Time Series with Engineering Applications, 1949.
भिडे,शं.गो.
“