संकेश्वर-३ : गुजरात राज्याच्या मेहसाणा जिल्ह्यातील एक प्राचीन स्थळ व तीर्थक्षेत्र. हे सामी तालुक्याचे मुख्यालय असून सामीच्या दक्षिणेस सु. २२ किमी. व पंचसारच्या उत्तरेस आठ किमी.वर वसले आहे. याच्या नावाविषयी काही कथा प्रचलित आहेत. जरासंध व श्रीकृष्ण यांमध्ये येथे युद्ध होऊन त्यात श्रीकृष्णाचा विजय झाला. त्याप्रसंगी मोठा शंखध्वनी करण्यात आला व तेव्हापासून ‘शंखपूर’ या नावाने हे स्थळ प्रसिद्ध झाले. पुढे मात्र हे संकेश्वर नावाने ओळखले जाऊ लागले. ७४६ पासून हे जैनांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी महामंत्री सज्जनशाह याने १०९९ मध्ये शंखेश्वराचे सुरेख मंदिर बांधले होते. अलाउद्दीन खल्जी (१२६६-१३१६) याने ते उद्ध्वस्त केले. शाहजहान बादशाहाने हे गाव अहमदाबादच्या शेठ शांतिदास नावाच्या सावकारास १६५६-५७ मध्ये काही कराराने दिल्याची नोंद तत्कालीन एका फर्मानात आढळते. एका आख्यायिकेप्रमाणे सु.३०० वर्षांपूर्वी योगायोगाने गावकऱ्यांनी गावातील तलावाजवळून पार्श्वनाथाची मूर्ती बाहेर काढली. त्यावेळी या गावावर ठाकुरांची सत्ता होती. ते प्रवाशांकडून मूर्तीच्या दर्शनाकरिता कर वसूल करीत. पुढे जैन साधू उदयसूरी महाराज यांच्या भेटीनंतर तो परिसर जैनांच्या नियंत्रणाखाली आला आणि जैनांचे तीर्थस्थान म्हणून त्यास पालिताणाच्या खालोखाल महत्त्व प्राप्त झाले. येथील मुख्य मंदिर नव्याने उभारण्यात आले आहे. मंदिरातील प्राचीन मूर्ती शंखेश्वर-पार्श्वनाथ या नावाने ओळखली जाते. मुख्य मंदिराजवळच अन्य मंदिरांचा समूह असून त्यांत विभिन्न तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत. यांशिवाय रामजीमंदिर, नीलकंठ महादेव मंदिर इ. प्रसिद्ध आहेत. येथे चैत्र पौर्णिमा, कार्तिकपौर्णिमा आणि मार्गशीर्ष वद्य दशमीला मोठी यात्रा भरते. गावात धर्मशाळा असून अन्य नागरी सुविधा नगरपालिकेव्दारे पुरविल्या जातात. येथे प्राथमिक, माध्यमिक व महाविदयालयीन शिक्षणाच्या सोयी आहेत. स्वामी श्री जैन विजयजी यांनी या तीर्थाविषयी माहिती देणाराशंखेश्वर महातीर्थ नावाचा स्वतंत्र ग्रंथ लिहिला आहे (१९४७).
देशपांडे, सु. र.