संकेश्वर-२ : कर्नाटक राज्याच्या बेळगाव जिल्ह्यातील एक धार्मिक क्षेत्र. चिकोडी तालुक्यातील हे गाव गूळ व मिरची यांची मोठी बाजारपेठ म्हणूनही प्रसिद्ध आहे. ते पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बेळगावच्या उत्तरेस सु. ४८ किमी. आणि कोल्हापूरच्या दक्षिणेस सु. ५८ किमी.वर हरिद्रा नदीकाठी वसले आहे. येथील जुने शिवमंदिर जखनाचार्यांनी बांधले असावे, असा समज आहे. यामंदिरात ११२४, ११९९ व १२०२ यातीन वर्षांतील तीन शिलालेख आहेत. महाशिवरात्रीस तीन दिवस येथे मोठी यात्रा भरते. गावात शृंगेरीच्या शंकराचार्यांचे शिष्य शंकरभारती यांनी स्थापन केलेला सोळाव्या शतकातील एक मठही आहे. तो करवीर-संकेश्वर या जोडनावाने प्रसिद्ध आहे. या मठास तीस गावे इनाम आहेत. बहमनी राजवटीच्या कागदोपत्री संकेश्वरचा उल्लेख आढळतो. त्यानुसार कोकणचा सुभेदार गिलानी याने १४८८ मध्ये बंड केले आणि बेळगाव व गोवा हे प्रदेश पादाक्रांत करून संकेश्वर हे आपले मुख्य ठाणे बनविले. शिवाजीमहाराजांनी अफजलखान-वधानंतर संकेश्वर सर केल्याचा उल्लेख मिळतो.

संकेश्वरची नगरपालिका सर्व नागरी सुविधा पुरविते. शहरात प्राथमिक-माध्यमिक शिक्षणाच्या शाळा व महाविदयालये असून पंचक्रोशीतील हुक्केरी व गोकाकही गावे अनुकमे आरोग्यवर्धक हवामान व धबधबा यांकरिता प्रसिद्ध आहेत. कापूस, सुके खोबरे यांचे हे व्यापारकेंद्र आहे. येथील ‘संकेश्वरी मिरची’ प्रसिद्ध असून तिची निर्यात महाराष्ट्र व अन्य राज्यांत होते. या भागातील एकमेव सहकारी साखर कारखाना संकेश्वरमध्ये आहे.

देशपांडे, सु. र.