संकेश्वर -१ : [संकेश्वर, संकासूर; हिं. गुलतुरा सं. संकेश्वर; इं. पीकॉक फ्लॉवर (क्रेस्ट), बार्बेडोस प्राइड; लॅ. सीसॅल्पिनिया पल्चेरिमा, कुल-लेग्युमिनोजी,उपकुल-सीसॅल्पिनिऑइडी]. फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग]. ⇨ सागरगोटा व ⇨ लिबी डिबी यांच्या सीसॅल्पिनिया ह्या प्रजातीतील हे एक शिंबावंत (शेंगा येणारे), शोभिवंत व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) ⇨ क्षुप (झुडूप) आहे. पूर्वीशास्त्रज्ञ पॉइंकियाना प्र जातीत याचा अंतर्भाव करीत परंतु हल्ली या प्रजातीतील सर्वच जातींचा अंतर्भाव सीसॅल्पिनिया प्रजातीत करतात. याच्या शंभराहून अधिक जाती असून भारतात नऊ जाती आढळतात. संकेश्वरही त्यांपैकी एक जात आहे. ह्या झुडपाची काही लक्षणे ⇨ वाकेरी, ⇨ गुलमोहर व ⇨ चिंच यांसारखी व त्यांचा अंतर्भाव असलेल्या ⇨ लेग्युमिनोजी (शिंबावंत) कुलात आणि सीसॅल्पिनिऑइडी (संकेश्वर) उपकुलात वर्णन केल्याप्रमाणे आहेत.
संकेश्वर झुडपाची लागवड उष्ण कटिबंधात व भारतात सर्वत्र बागेतून केलेली आढळते पण याचे मूलस्थान अनिश्चित आहे. बहुधा हे दक्षिण अमेरिकेतून आलेले असावे. हॉलंडमध्ये ते १६७० मध्ये आणले गेले असून भारतात १६८० साली बागेत असल्याची नोंद झाली आहे. बियांपासून लागवड करणे सोपे असते. काही तास बी पाण्यात भिजत ठेवल्यास उगवण चांगली होते. रोपे मध्यमप्रतीच्या व पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत अगर कुंडीत तशी माती भरून बी लावून करणे चांगले असते. रोपे २५-३० सेंमी. अंतराने कायम ठिकाणी लावतात. एकदा झाडे जगली म्हणजे फार पाणी देण्याची गरज नसते. हलकी जमीन असल्यास मधूनमधून पाणी देतात. ७-८ महिन्यांतच रोपे बरीच मोठी होतात व पुढे लवकरच त्याला फुले येऊ लागतात. याचे जातिवाचक गुणनाम सौंदर्यनिदर्शक या अर्थाचे आहे बागेला त्यामुळे शोभा येते. पिवळा व लाल रंग जवळजवळ असले म्हणजे त्यांना हळद-कुंकवाची उपमा शोभते. लाल रंगाच्या फुलांत प्रथम लाल पाकळ्यांवर पिवळी किनार असते, नंतर पाकळ्या पूर्ण लाल होतात.
संकेश्वर झुडपाची उंची सु. २-३ मी. व कधी थोडी अधिक असून याच्या फांद्यांवर तुरळकपणे नरम काटे असतात. याची पाने एका आड एक, संयुक्त व पिसासारखी, दोनदा विभागलेली, ४५सेंमी. लांब असून त्यांवर दलांच्या ६-१२ जोड्या असतात, प्रत्येक दल सु. ७.५० सेंमी. असून त्यावर ८-१२ दलकांच्या जोड्या असतात. फुलोरे [मंजऱ्या ⟶ पुष्पबंध] बहुधा फांद्यांच्या टोकांस असून त्यांवर लांब देठाची लाल किंवा पिवळी फुले साधारणपणे वर्षभर येतात, ती मध्यम आकारमानाची असून संदले व प्रदले (पाकळ्या) रंगीत व प्रत्येकी पाच असतात, फुलातील एक संदल व एक प्रदल इतरांहून भिन्न असते. केसरदले (पुं-केसर) दहा, लांब, ठळक, सुटी व रंगीत लाल किंवा पिवळी असतात, किंजदल (स्त्री-केसर) एक असून फळ (शिंबा वा शेंग) ५-८ x १.८ सेंमी., अरूंद, पातळ, पिंगट, सरळ, सपाट व टोकदार असते. तडकताना तिची दोन्ही शकले स्वत:भोवती पिळवटतात व त्यामुळे बिया निसटून काही अंतरावर फेकल्या जातात, त्या चपट्या, पिंगट व ५-१० असतात.
कुटलेल्या मुळांचा विषारी रस तान्ह्या मुलांना आचक्यांवर (सूक्ष्म प्रमाणात) देतात. फुले जंतविकार, ज्वर व जुनाट खोकल्यावर गुणकारी असतात. साल व पाने रेचक (पोट साफ करणारी) व आर्तवजनक (विटाळ साफ करणारी) आणि पौष्टिक, फुलांचा फांट (गरम पाणी ओतून काढलेला रस) श्वसनसंबंधित विकार व तापनाशक असतो. फुलांत गॅलिक अम्ल, रेझिने, बेंझॉइक अम्ल, टॅनीन व एक लाल रंगाचे द्रव्य असते फळांतही टॅनीन असते. संकेश्वराची फुले श्री शिवाला प्रिय असून हिंदूंनी हा लहान वृक्ष पवित्र मानला आहे. याच्या लाकडाचा कोळसा शाई तयार करण्यासाठी वापरीत असत.
परांडेकर, शं. आ.