कंदमुळे : या शीर्षकाखाली ज्यांची मुळे जमिनीत पोसून मांसल बनतात, उदा., मुळे, गाजरे, बीट, टॅपिओका, रताळे वगैरे आणि ज्यांच्या खोडांचे रूपांतर होऊन त्यांचे कंद किंवा गड्डे बनतात, उदा., सुरण, बटाटा, हळद, आले, कोनफळ वगैरे अशा वनस्पतींचा समावेश केला जातो.

या दोन्ही प्रकारांतील वनस्पतींची पिके म्हणून लागवड माणसांच्या खाद्यासाठी किंवा जनावरांच्या चाऱ्यासाठी आणि काहींच्या बाबतीत त्यांच्यामधील व्यापारोपयोगी उत्पादनासाठी केली जाते. हळद, आले यांच्यापासून औषधिद्रव्ये आणि बटाटा, रताळी यांच्यापासून चेहऱ्याला लावण्याचे सौंदर्यवर्धक पिष्ट बनवितात. टॅपिओकाच्या मुळापासून बनविलेल्या खाद्यपिष्ठापासून साबुदाणा तयार करतात. बीटपासून साखर बनवितात. भारतामध्ये कंदमुळांपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवितात.

भारतात कंदमुळांपैकी जनावरांच्या वैरणीसाठी विशेषतः रताळ्याचे वेल, पाल्यासह गाजरे व सलगम वापरतात. ही वैरण जनावरांना चांगली पचते व त्यांच्या कोठ्यावर सौम्य रेचकासारखा परिणाम होतो. तिच्यामध्ये पोषणशक्ती कमी दर्जाची असते म्हणून ती स्वतंत्रपणे न चारता सुक्या वैरणीबरोबर किंवा खुराका बरोबर जनावरांना खाऊ घातल्यास खास फायदा होतो.

पहा : आले कोनफळ गाजर टॅपिओका बटाटा बीट मुळा रताळे सुरण हळद.

पाटील, ह. चिं.