संकल्प : (विल). संकल्प म्हणजे निर्णय. माणसाच्या ठिकाणी ज्या विविधक्षमता आहेत, त्यांत संकल्प म्हणजे निर्णय करण्याच्या क्षमतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संकल्प एखादया कृतीविषयी असू शकतो. ही कृती एखादा उपक्र म, उद्दिष्ट वा ध्येयप्राप्ती ह्यांच्याशी निगडित असते. असे संकल्प फक्त माणसे करू शकतात कारण संकल्प करण्याचे आणि ते अंमलात आणण्याचे सामर्थ्य विचार करू शकणाऱ्या प्राण्यातच असू शकते. किंबहुना संकल्पक्षमता असणे, हे माणसाला मानवेतर प्राण्यांपासून वेगळे करणारे व्यवच्छेदक लक्षण आहे. माणसालाही ही संकल्पक्षमता विचारपूर्वक विकसित करावी लागते. एखादी विशिष्ट कृती निर्धाराने करून संकल्पसिद्धिचा अपेक्षित परिणाम माणूस घडवून आणू शकतो. उदा., एखादा अशक्त मनुष्य नियमित व्यायाम करणे, पौष्टिक आहार घेणे, अशा कृती करून सशक्त होण्याचा संकल्प सिद्धिला नेऊ शकतो. एखादया घटनेचे होऊ घातलेले वाईट परिणाम ही संकल्पशक्तीच्या जोरावर आपण टाळू शकतो. उदा., एखादा शल्यविशारद अपघातात बेशुद्ध आणि मरणोन्मुख झालेल्या एखादया रूग्णावर कुशल शस्त्रक्रिया करून, त्याचे प्राण वाचवू शकतो जो एरव्ही निश्चितपणे मृत झाला असता.
माणसांप्रमाणे संस्थाही संकल्प करतात पण खरे म्हणजे हे संकल्प त्या संस्थांत काम करणाऱ्या माणसांचेच असतात. त्या संस्थांची निर्मितीही सुद्धा माणसांच्या संकल्प शक्तीचाच आविष्कार असते.
संकल्प आणि कृती ह्यांचा अन्योन्य संबंध असा आहे की, संकल्पाशिवाय कोणत्याही कृतीचा आपण विचार करू शकत नाही आणि कोणत्याही कृतीचे उपपादन वा स्पष्टीकरण तिच्या मागील संकल्पप्रक्रियेशिवाय होऊ शकत नाही.
संकल्पशक्ती ही प्राणिजगतातील कोट्यावधी वर्षांच्या उत्क्रांतीप्रक्रियेत मानवाच्याच ठायी निर्माण झाली. ⇨चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीविषयक सिद्धांत एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पुढे येण्यापूर्वी संकल्पशक्तीचे जनकत्व तत्त्ववेत्ते हे ईश्वर, ब्र ह्म ह्यांसारख्या निसर्गातीत तत्त्वांकडे देत होते तथापि आता विज्ञान आणि ह्या विश्वात निसर्गातीत पदार्थ नसतात, अशी भूमिका घेणारा निसर्गवाद, ह्यांच्या आधारे संकल्पशक्तीचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न ते करू लागले.
मानवेतर प्राण्यांचे जीवन हे नैसर्गिक प्रेरणा आणि सहजप्रवृत्ती ह्यांनी घडणाऱ्या वर्तनाच्या स्वरूपाचे असते. मानसशास्त्राला विशुद्ध वैज्ञानिक स्वरूप देण्याची भूमिका घेणारे वर्तनवादी प्राण्यांचे वर्तन S-R(स्टिम्यूलस-रिस्पॉन्स) म्हणजेच उद्दीपक-प्रतिसाद ह्या सूत्रात मांडून त्यांच्या वर्तनाचे कार्यकारण-नियम प्रतिपादितात तथापि ह्या नियमांच्या आधारे मानवप्राण्याच्या सर्व वर्तनाचा उलगडा होऊ शकत नाही. केवळ वर्तनाच्या रूपात संकल्पशक्तीच्या आविष्काराचे निश्चित व सर्वगामी असे नियम बनविता येणे शक्य नाही.
विसाव्या शतकात तत्त्वज्ञानाच्या प्रांतात भाषिक विश्लेषण, ⇨रूपविवेचनवाद (फिनॉमिनॉलॉजी), ⇨अस्तित्ववाद, आधुनिकोत्तर समीक्षा आणि अमेरिकेत आता रूढ झालेला ⇨ व्यवहारवाद ही सर्व तत्त्वज्ञाने माणसाच्या ठायी असलेल्या संकल्पशक्तीचे जे निरूपण करतात, त्यांत एकवाक्यता दिसत नाही. तथापि असे असले, तरी एक गोष्ट स्पष्ट आहे: माणूस जो स्वतंत्र आहे, तो संकल्पशक्तीमुळे. वर म्हटल्याप्रमाणे प्राण्यांचे जीवन नैसर्गिक प्रेरणा आणि सहज प्रवृत्ती ह्यांनी घडणाऱ्या वर्तनाच्या स्वरूपाचे असल्यामुळे तहान लागली की, प्राणी पाण्याचाच शोध घेतात. माणूस मात्र पाण्याला अनेक पर्यायही -उदा., लिंबू सरबत, थम्स अप इत्यादी- शोधू शकतो. अगदी पाणीच घ्यावयाचे झाले, तरी फ्री जमधील पाणी बंद बाटल्यांतले ‘मिनरल’ पाणी अशी पसंती तो व्यक्त करू शकतो आणि पाहिजे त्या प्रकारचे पाणी पिऊ शकतो.
संकल्पशक्तीच्या जोरावर माणूस त्याला हव्याहव्याशा गोष्टी अनेकदा मिळवितो परंतु त्याच्या संकल्पशक्तीची कसोटी लागेल, असे प्रसंगही-विशेषत: नीतीच्या क्षेत्रात –त्याच्या समोर अनेकदा येतात. शिवाय आपली संकल्पक्षमता माणूस चांगल्या गोष्टींची निवड करण्यासाठीच वापरेल असे नाही.
संकल्पशक्तीच्या कार्यप्रवणतेवरच शुद्घ नैतिक विचार जन्माला येत असला, तरी कोणत्याही कृतीचे नैतिक मूल्यमापन करताना कर्त्याने ती कृती करीत असता त्याच्या संकल्पशक्तीचा वापर केला होता, की नाही म्हणजेच ती कृती पूर्णपणे स्वेच्छेने, पूर्ण विचारांती, हेतुत: केली होती, की नाही हे लक्षात घ्यावे लागते. तसे केल्याखेरीज नैतिक जबाबदारीही संकल्पना स्पष्ट होऊ शकत नाही.
संकल्पशक्तीचा रोख वर्तमानकाळ व भविष्यकाळ ह्यांच्याकडे असतो. भूतकाळ हा अपरिवर्तनीय असल्यामुळे त्याच्याबाबतीत संकल्प करणे अशक्य असते. ‘टूबी’ ह्या इंग्रजी भाषेतील क्रियापदाचे भविष्यकालदर्शी व्याकरणीय रूप ‘विल’ असे आहे व ते प्रथमपुरूषी ‘आय’ या सर्वनामाच्या संदर्भात कृतिनिश्चय वा निर्धार दाखविणारे, असे आहे. जीवन आणि भविष्य ह्यांच्यातील अतूट संबंध अशा उदाहरणांतून स्पष्ट होतो.
पहा : संकल्पस्वातंत्र्य.
बोकील, श्री. व्यं.