श्रोणि : पोटातील सर्व इंद्रियांना समाविष्ट करणाऱ्या उदरगुहा या पोकळीच्या सर्वांत खालच्या भागाला श्रोणी असे नाव आहे [⟶ उदर]. चारी बाजूंनी अस्थिमय रचना आणि तळाला स्नायूंचे व अस्थिबंधांचे मजबूत पटल असलेला हा प्रदेश एखादया खोलगट तसराळ्यासारखा असतो. मूत्राशय, त्यातून निघणाऱ्या मूत्रमार्गाचा सुरूवातीचा भाग, पुरूषांत अष्ठीला (पुरस्थ) गंथी व रेताशय आणि स्त्रीमध्ये गर्भाशयाचा बहुतांश भाग व अंडकोश तसेच स्त्री-पुरूषांमध्ये अन्नमार्गाचा अंतिम भाग (मलाशय व गुदमार्ग) यांसारख्या इंद्रियांना श्रोणीत नैसर्गिक स्थान असते. यांखेरीज उदरगुहेच्या वरच्या भागातील विस्थापित इंद्रिये उदा., आतडी, आंत्रपुच्छ आणि विकारजन्य द्रव खाली येऊन श्रोणीत साचू शकतात. उलट श्रोणीतील वाढलेली अर्बुदे (शरीराला निरूपयोगी गाठी) आणि गर्भिणी अवस्थेतील गर्भाशय खालून वर आल्यामुळे उदरगुहेमधील जागा व्यापतात. त्यामुळे मूत्रवैदयक, प्रसूतिशास्त्र आणि जननेंद्रियांची शल्यचिकित्सा यांच्या दृष्टीने श्रोणीला महत्त्व असते.
पाठीच्या कण्यातील कटिप्रदेशाचा पाचवा मणका संपल्यावर त्याच्या खाली असलेले त्रिकोणी हाड- त्रिकास्थी – हे श्रोणीची मागील बाजू तयार करते. पाच लहान मणके एकसंध होऊन निर्माण झालेल्या या हाडात असलेल्या मध्यवर्ती पोकळ नलिकेत मेरूरज्जूचा अखेरचा भाग (मेरूपुच्छ व अंत्यसूत्र) असतो. पृष्ठभागावरील छिद्रांच्या चार जोडयंमधून मेरूरज्जूच्या त्रिकास्थीय शाखांपैकी १ ते ४ क्रमांकाच्या तंत्रिका (मज्जातंतू) बाहेर पडतात. नलिकेच्या खालील द्वारातून पाचवी त्रिकास्थीय तंत्रिकांची जोडी आणि अंत्यसूत्रातील इतर सर्व तंत्रिका तंतू (अनुत्रिकीय तंत्रिकांची जोडी) बाहेर येतात. त्रिकास्थीचा श्रोणीय पृष्ठभाग काहीसा अंतर्गोल असतो आणि त्याची वरची कड (त्रिकास्थीचे प्रोत्तुंग) श्रोणीत पुढे आलेली असते. त्रिकास्थीच्या खालच्या टोकाला (अग्राला) असलेल्या चपट्या पृष्ठभागाशी अनुत्रिकास्थी (माकडहाड) जोडणारा सांधा असतो. [⟶ कणा व मणका ]
अनुत्रिकास्थी हे चार अल्पविकसित मणक्यांच्या एकसंधनातून निर्माण झालेले लहानसे त्रिकोणी हाड असते. कधीकधी त्यातील पहिला मणका स्वतंत्रपणे ओळखता येतो. बाकीचे तीन मात्र केवळ छोट्या मण्यांसारखे दिसतात. त्रिकास्थीशी असलेल्या सांध्यात या माकडहाडाची अत्यल्प हालचाल होऊ शकते. उतारवयात हा सांधा नाममात्र राहून दोन्ही हाडे एकसंध होतात. वानर वर्गातील शेपटीच्या हाडांचा अवशेष म्हणून शिल्लक असलेली अनुत्रिकास्थी अनेक महत्त्वाच्या स्नायूंच्या आणि अस्थिबंधांच्या बंधनाचे महत्त्वाचे कार्य करते.
त्रिकास्थीच्या दोन्ही बाजूंना कंबरेची हाडे जोडलेली असतात. प्रत्येक हाड तीन घटक एकसंध होऊन तयार झालेले असते. त्यांपैकी श्रोणिफलक त्रिकास्थीशी एका अत्यंत मजबूत श्लेषकसंधीने बद्घ असतो. आसनास्थी खालच्या बाजूस असल्यामुळे तिचे एक टोक बसल्यावर जमिनीस टेकते. तिसरे जंघास्थी हे पुढील बाजूस असल्याने विरूद्घ बाजूच्या जंघास्थीला टेकून श्रोणिमेखला पूर्ण करते. ‘त्रिक्-फलक संधी ’मध्ये मर्यादित हालचाल होत असते परंतु त्याचे मुख्य कार्य पाठीच्या कण्याकडून येणारा संपूर्ण शरीराचा भार श्रोणिमेखलेव्दारे, खुब्याच्या सांध्यावाटे मांडीच्या हाडाकडे पोहोचविण्याचे असते. पुढील बाजूचा जंघास्थी जोडणारा सांधा कूर्चा आणि तंतुमय ऊतकांच्या (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या पेशींच्या - समूहांच्या) मदतीने पूर्णपणे अचल झालेला असतो. गर्भिणी अवस्थेत हॉर्मोनांच्या प्रभावामुळे हे सर्व सांधे आणि त्यांना बांधणारे अस्थिबंध शिथिल होतात. त्यामुळे श्रोणीचे आकारमान वाढते व प्रसूतिमार्ग रूंदावतो. कंबरेच्या तीन हाडांचे स्वतंत्र अस्तित्व त्यांच्या एकसंधत्वामुळे लक्षात येत नाही. मांडीच्या हाडाचे शीर्ष ज्या खोलगट खाचेत फिरत असते त्या खोबणीच्या रचनेत या तीनही हाडांचा जवळजवळ समान वाटा असतो. [⟶ कंकाल तंत्र].
अस्थिमय श्रोणीच्या परिघापासून केंद्राकडे जाणाऱ्या पातळ चपट्या स्नायूंनी श्रोणीचा तळ तयार होतो. गुदद्वार उत्थापक, नासपतीरूप व अनुत्रिकास्थिजन्य या नावाने त्यातील तीन मुख्य स्नायुसमूह ओळखले जातात. हे स्नायू व त्यांवर पसरलेले प्रावरणी ऊतकाचे दोन थर यांमुळे तळाला मजबुती येते. उदरातील दाब वाढला, तरी ढकलल्यामुळे श्रोणीतील इंद्रिये खाली मूलाधाराच्या क्षेत्रात ओघळण्याची शक्यता त्यामुळे टळते. प्रावरणीच्या दोन थरांपैकी वरचा थर थोडा सैल असतो व श्रोणीतील इंद्रियांभोवती लपेटलेला असतो. ठिकठिकाणी त्याचे दाट ऊतकांत रूपांतर होऊन त्यापासून आधारदायक रज्जू तयार झालेले आढळतात. स्नायुपटलमय तळातून गुदमार्ग, मूत्रमार्ग व योनिमार्ग आरपार जाऊन मूलाधार प्रदेशात प्रवेश करतात. या प्रत्येक मार्गामधील पदार्थ शरीराबाहेर टाकते वेळी तळाचे स्नायू आकुंचित होऊन श्रोणीला आधार देतात संबंधित इंद्रियांचे आकुंचन व मार्गाचे विस्फारण होऊन के वळ तेवढाच पदार्थ बाहेर जाऊ शकतो.
वर उल्लेख केलेल्या इंद्रियांशिवाय श्रोणीमध्ये त्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या रोहिण्या, नीला, लसीका वाहिन्या व लसीका गंथी [⟶ लसीका तंत्र] तसेच मूलाधार आणि मांडी, पाय इत्यादींकडे जाणाऱ्या वाहिन्या व तंत्रिका आढळतात. अनुकंपी, परानुकंपी आणि ऐच्छिक हालचाली घडविणाऱ्या अशा सर्व प्रकारच्या तंत्रिकांची [⟶ तंत्रिका तंत्र] जाळी श्रोणीमध्ये प्रावरणीच्या थरांखाली आढळतात. गर्भिणी अवस्थेत किंवा श्रोणीतील इंद्रियांच्या विकारांमध्ये अशा तंत्रिका व विविध वाहिन्यांवर दाब येऊन वेदना, सूज, रक्तपुरवठ्यात बाधा येणे यांसारखे परिणाम दिसून येतात.
श्रोणीच्या मापनासाठी आणि प्रसूतिशास्त्राच्या दृष्टीने अधिक विस्तृत अभ्यासासाठी अस्थिमय श्रोणीचे विविध पातळ्यांमध्ये विभाजन केले जाते. पुढील बाजूस जघनसंधीची वरची कडा, मध्यबिंदू आणि खालची कडा असे तीन बिंदू घेतले आणि त्यांना अनुक्रमे त्रिकास्थीची वरची कडा, त्रिकास्थीच्या तिसऱ्या मणक्याचा पुढील पृष्ठभाग आणि अनुत्रिकास्थीचे खालचे टोक यांना जोडणाऱ्या रेषा काढल्या, तर या रेषांमधून जाणारी तीन प्रतले कल्पिता येतात. त्यांना अनुकमे श्रोणिप्रवेश (श्रोणी आगम), श्रोणिगुहिकामध्य आणि श्रोणिनिर्गम असे म्हणता येईल. सर्वांत वरच्या पतलाच्या वरील भागाचा कृतक श्रोणी किंवा बृहत् श्रोणी असा कधीकधी उल्लेख केला जातो. त्याखालचा श्रोणीच्या तळापर्यंतचा भाग म्हणजेच श्रोणिगुहिका होय. या सर्व भागांचे आणि प्रतलांचे अग्रपश्च व्यास, वामदक्षिण व्यास व तिर्यक् व्यास मोजण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्वचेच्या पृष्ठभागावरील विशिष्ट बिंदूंचा उपयोग, गर्भिणीच्या योनिमार्गाची परीक्षा व क्ष-किरण अथवा अन्य पद्धतींनी केलेली प्रतिमानिर्मिती यांचा अवलंब मापनासाठी यथोचित निर्णय घेऊन केला जातो [⟶ प्रसवपूर्व परिचर्या].
पुरूषाच्या श्रोणीपेक्षा स्त्रीच्या श्रोणीमध्ये अधिक मोठे आगम व निर्गम दिसून येते. त्रिकास्थी अधिक रूंद व तिचे प्रोत्तुंग लहान असते. अनुत्रिकास्थीचे टोकही फार पुढे आलेले नसते. जघनसंधीच्या खालील कोन मोठा असतो. श्रोणिगुहिकेची उंची कमी असून ती शंकूसारखी न दिसता दंडगोलाकृती असते. या सर्व लिंगविशिष्ट भेदांचा प्रसूतिकियेत उपयोग होतो. तसेच, अज्ञात व्यक्तीचा सांगाडा सापडल्यास ती स्त्री का पुरूष होती, हे ठरविण्यास न्यायवैदयकात मदत होते.
श्रोणीच्या तळाखालील म्हणजेच निर्गमापासून त्वचेपर्यंतचे क्षेत्र मूलाधार (परिगुहा) म्हणून ओळखले जाते. त्याच्या पृष्ठभागाचे आडव्या रेषेने दोन त्रिकोणांत विभाजन केले, तर पुढच्या त्रिकोणात गुदद्वार व त्याच्या दोन्ही बाजूंस आसनास्थींच्या उंचवट्यांपर्यंत वसाऊतकाने व्यापलेल्या गुहिका असतात. मूळव्याध, भगंदर यांसारख्या विकारांचा उद्भव मूलाधार क्षेत्रात होत असल्याने त्याला महत्त्व आहे. प्रसूतीनंतर, उतारवयात, मूत्रमार्गावरील किंवा अन्य शस्त्रकियांमुळे श्रोणीच्या तळास इजा झाल्यास मूत्राशय, गर्भाशय, मलाशय यांसारख्या श्रोणीय इंद्रियांचे स्खलन होऊन ती मूलाधार क्षेत्रात येऊ शकतात [⟶ अंतर्गळ]. गर्भिणीतील ⇨अपस्फीत नीला, श्रोणिसंधी स्थानभ्रंश [उदा., काही लहान मुलांतील जन्मजात विकृती ⟶ मांडी] वगैरे विकार श्रोणीशी निगडित आहेत.
पहा : उदर कंकाल तंत्र कणा व मणका.
संदर्भ : 1. Moffat, D. B. Lecture Notes on Anatomy, London, 1993.
2. Singh, I., Ed., B. D. Chaurasia’s Human Anatomy : Regional and Applied, New Delhi, 1995.
3. Warwick, R. Williams, P., Eds., Gray’s Anatomy, London, 1989.
श्रोत्री, दि. शं.
“