श्रीनगर-१ : भारतातील एक निसर्गरम्य आरोग्यधाम व जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ. ‘ सरोवरांचे शहर ’ म्हणून प्रसिद्ध असलेले हे जम्मू व काश्मीर राज्यातील ठिकाण राज्याच्या उन्हाळी राजधानीचे शहर असून श्रीनगर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. ते काश्मीर खोऱ्यात एका विस्तृत पठारावर, झेलम नदीच्या दोन्ही काठांवर सस.पासून सु. १,७३० मी. उंचीवर वसले आहे. शहराचे क्षेत्रफळ ४१.४४ चौ. किमी. असून लोकसंख्या ८,९८,४४० (उपनगरांसह ९,८८,२१०) होती (२००१). यास ‘ सूर्यनगर ’ असेही म्हणतात.
श्रीनगरचा प्राचीन इतिहास फारसा ज्ञात नाही परंतु त्याचा उल्लेख ह्यूएनत्संग या चिनी प्रवाशाने केला आहे तसेच विकमांकदेवचरित व राजतरंगिणी यांसारख्या गंथांतून त्याचे निर्देश आढळतात. मध्ययुगातील बर्निअर यासारख्या प्रवाशांचे वृत्तांत, मोगल काळातील तवारिखा यांत श्रीनगरसंबंधी माहिती मिळते. येथील गोनर्द वंशातील प्रवरसेन याने प्रवरपूर ( सहाव्या शतकातील काश्मीरची राजधानी प्रवरसेनपूर ) नावाचे नगर वसविले. त्यालाच पुढे श्री म्हणजे लक्ष्मी हिचे वास्तव्य असलेले म्हणून श्रीनगर हे नाव प्राप्त झाले, असे राजतरंगिणीत म्हटले आहे. तत्पूर्वी या भागात सम्राट अशोकाने ( इ. स. पू. २८४-२३२) एक नगर उभारून तेथे बौद्ध मठ बांधला होता, पण ते ठिकाण श्रीनगरपासून काही अंतरावर असावे. त्याचा उल्लेख पंद्रेठण (पुराणाधिष्ठान ) असा आढळतो. प्रवरसेनानंतर लोहर घराण्यातील अनंतदेव ( कार. इ. स. १०२८-१०३४) या राजाचा अंमल येथे होता. त्यानंतर मोगल बादशहांनी येथे सुरेख वास्तू व उद्याने बांधून, तसेच येथील कुटिरोदयोगांना चालना देऊन निसर्गसुंदर श्रीनगरच्या वैभवात भर घातली. त्यांनी बांधलेली उद्याने, कबरी, मशिदी, प्रासाद यांचे अवशेष अवशिष्ट आहेत. मोगलांनंतर १८१९ पर्यंत अफगाणांच्या आधिपत्याखाली श्रीनगर होते. पुढे शिखांनी एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात त्यावर अंमल गाजविला. त्यानंतर ते ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली १९४७ पर्यंत होते. त्या काळातील तेथील राजे अमरसिंग, रणवीरसिंग, हरिसिंग यांनी ब्रिटिशांचे मांडलिकत्व मान्य केले होते. अफगाण, शीख व ब्रिटिश यांच्या काळात श्रीनगरमधील शाली, गालिचे व कलाकुसरींच्या वस्तू यांना इराण, इराक आणि यूरोप-अमेरिकेत बाजारपेठ उपलब्ध झाली.
शहरातील दळणवळण झेलम नदीवर बांधलेल्या सात लाकडी पुलांवरून होते. नदीच्या दोन्ही बाजूंस घाट व धक्के बांधलेले आहेत. घाटांच्या वरच्या बाजूस नदी प्रवाहाला समांतर रस्ते असून बाजूला राजवाडे, मंदिरे, मशिदी, घरे व दुकाने अशी शहराची रचना आहे. ‘ शेरगडी ’ नामक विस्तीर्ण जागेत अमीर कदल या पुलाच्या वरच्या बाजूस, शहरातील जुना किल्ल व राजवाडा या वास्तू आहेत. किल्ल्यात दोन पाण्याच्या टाक्या व एक मंदिर असून फार्सी भाषेत एक कोरीव लेख आहे. अकबराने हा किल्ल इ. स. १५९० मध्ये बांधला. जुन्या जवाडयाजवळच महाराजका मंदिर नावाचे राम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती असलेले एक मंदिर आहे. त्याचे शिखर सोन्याच्या पत्र्याने मढविले आहे. यापासून जवळच लालमंडी नावाचा भव्य राजवाडा आहे. या दोन्ही राजवाडयांतील भित्तिचित्रे तसेच छतांवरील वेलबुटी व नक्षीकाम सुरेख आहे. इंग्रज अंमलदारांसाठी शेख बागेच्या समोर बारादरी नावाचे निवासस्थान बांधले होते. त्याचेही छतकाम नक्षीदार आहे. शहरात महाराजगंज नावाची प्रमुख बाजारपेठ आहे. याशिवाय राघवदास व गदाधर ही सारख्याच वास्तुशैलीची मंदिरे आहेत. श्रीनगरच्या उत्तरेस हरिपर्वतावर प्रदयूम्न हे ठिकाण आणि सारिका मंदिर आहे. कश्यप ऋषींनी या स्थळी तपश्चर्या केली होती व सारिका देवी त्यांना प्रसन्न झाली, अशी पारंपरिक कथा आहे.
मोगलकाळात श्रीनगरमध्ये मशिदी, उद्याने व इतर भव्य वास्तूंचे बांधकाम मोठया प्रमाणात झाले. येथील शाह हमादान नावाची सर्वांत जुनी मशीद झेलमच्या फत्त फत्ते कदल पुलाजवळ आहे. तिच्या आतील बाजूस एक शिलालेख असून मशिदीत बादशाह जैनुल्लबदिनची कबर आहे. त्याच्या जवळच शाहजहानने बांधलेली सर्वांत मोठी जुम्मा मशीद आहे. येथील हजरतबाल मशीद पवित्र मानली जाते, तीत मुहंमद पैगंबरांचा केस जपून ठेवला आहे.
श्रीनगरमध्ये व त्याच्या परिसरात अनेक रमणीय खासगी व शासकीय उद्याने आहेत. अकबराने बांधलेले चष्मशाही उद्यानही त्यातील कृत्रिम धबधबे व कारंजी यांमुळे लक्षणीय आहे. शालिमार (मदनगृह) हे उद्यान दल सरोवराकाठी असून ते जहांगीराने नूरजहान ह्या आपल्या पट्टराणीसाठी १६२९ मध्ये बांधले. दुसरे निशात उद्यानही जहांगीरनेच दल सरोवराच्या पूर्वेस बांधलेले आहे. यांशिवाय पेरिमहल, नसीमबाग, हजारीबाग, वसंतबाग इ. उद्याने प्रसिद्ध आहेत. येथील दल सरोवर व त्यातील शिकारे हे प्रवाशांचे मोठे आकर्षण आहे. सरोवरात काही तरत्या बागा असून चिनार वृक्षांसाठी सर्व उद्याने प्रसिद्ध आहेत.
श्रीनगर ही शाली, गालिचे, कलाकुसरीच्या वस्तू , केशर, सफरचंदे यांची मोठी बाजारपेठ आहे. येथील पश्मीना लोकरीच्या शालींना यूरोप-अमेरिकेत मोठी मागणी असते. शहरात हातमाग व्यवसाय असून येथील चितारी, कातारी व सुतारी यांसारख्या कारागिरी प्रसिद्ध आहेत. नौशिरा भागात कागद तयार करण्याचा मोठा शासकीय कारखाना आहे. स्वातंत्र्योत्तर काळात येथे काश्मीर विदयापीठ (१९४८) स्थापण्यात आले. व्दिसदनी विधिमंडळाची भव्य इमारतही येथे आहे.
श्रीनगरच्या जवळच गुलमर्ग हे फुलांचे नंदनवन २,५९० मी. उंचीवरील पर्वतश्रेणीत असून तेथून काश्मीर खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते.
देशपांडे, सु. र.
“