श्रीकंठय्या, बी. एम्. : (३ जानेवारी १८८६५ जानेवारी १९४६). कन्नड कवी. ‘ श्री’ या टोपणनावाने अधिक परिचित. बेळ्ळूर  गावच्या मैलार यांचे पुत्र. त्यांचे पूर्ण नाव बेळ्ळूर मैलार श्रीकंठय्या. बेळ्ळूर जिल्ह्यातील नागमंगल येथे मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात जन्म. सेंट्रल कॉलेज, बंगलोर येथून पदवी (१९०३) व नंतर चेन्नई (मद्रास ) येथून बी.एल्. (१९०६) आणि एम्.ए. (१९०७) या पदव्या घेतल्या. म्हैसूर येथील महाराजा महाविदयालयात इंग्रजीचे अधिव्याख्याता म्हणून व पुढे साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले (१९१४). त्याच सुमारास अ हँडबुक ऑफ ऱ्हेटरिक हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यांनी केलेले साठ इंग्रजी स्वच्छंदतावादी भावकवितांचे अनुवाद इंग्लिश गीतगळु या काव्यसंगहात प्रसिद्ध झाले (१९२६). म्हैसूर विदयापीठाचे कुलसचिव असताना त्यांनी एम्.ए. ला कन्नड भाषावाङ्‌मय हा विषय सुरू केला. बंगलोरच्या सेंट्रल कॉलेजमधून ते १९४२ मध्ये सेवानिवृत्त झाले.

आधुनिक कन्नड काव्यात इंग्लिश गीतगळुच्या प्रभावाने नवोदय युग ( आधुनिक युग ) सुरू झाले. इंग्लिश गीतगळु मध्ये त्यांच्या तीन स्वतंत्र कविता व द गोल्डन ट्रेझरी च्या चौथ्या खंडातील प्रणयपर आणि देशभक्तिपर अशा एकूण साठ कवितांचे स्वैर भावानुवाद संगहीत आहेत. इंग्लिश गीतगळु ने अनेक उदयोन्मुख तरूण कवींना प्रेरणा दिली आणि त्यायोगे कन्नडमधील नव्या वळणाच्या भावकाव्याचा पाया रचला गेला. ‘ श्री ’ यांनी स्वत:च्या स्वतंत्र कवितांमध्ये छंद व शैली यांचे नवनवे प्रयोग केले. होंगनसुगळु (१९४३, म. शी. ‘ सोनेरी स्वप्ने’ ) हा त्यांच्या स्वतंत्र कवितांचा संग्रह. त्यातून त्यांची विशिष्ट जीवनदृष्टी व मातृभूमीचे गाढ प्रेम यांचा प्रत्यय येतो. त्यांच्या ‘ शुक्रगीते’ या कवितेत सत्य, ज्ञान व ‘विश्वभारती ’ ( विश्वात्मक दृष्टी असलेली भारतमाता ) यांविषयीच्या त्यांच्या जीवनदृष्टीचे दर्शन घडते.

‘ श्री ’ यांनी गदायुद्ध नाटक (१९२५), अश्वत्थामन् (१९२९) व पारसिकारू (१९३५) ही तीन नाटके लिहून काव्यनाटय या प्रकाराला चालना दिली. ही तिन्ही गीक शोकात्मिकेच्या धर्तीवरची शोकनाटये आहेत, त्यांच्या रूपाने कन्नड रंगभूमीवर शोकांतिका प्रथमत:च अवतरल्या. गदायुद्ध नाटक हे कवी ⇨रन्न च्या साहसभीमविजय अथवा गदायुद्घ या ⇨चंपूकाव्या वर आधारलेले आहे. अश्वत्थामन् हे ⇨सॉफोक्लीझ च्या अंजॅक्स या शोकात्मिकेवर आधारित असून या नाटकाने कन्नड रंगभूमीवर पौराणिक शोकनाटयाची परंपरा रूजवली. पारसिकारू हे ⇨एस्किलस च्या पेर्से ( इं. शी. ‘द पर्शियन्स ’ ) या नाटकाचे स्वैर रूपांतर आहे. ग्रीकांनी पर्शियनांचा केलेला पराभव, हे या नाटकाचे आशयसूत्र. जरी हे रूपांतर असले, तरी जुनी कन्नड शैली व आधुनिक जीवनदृष्टी यांची सांगड घालणारे स्वतंत्र नाटकच वाटते.

‘श्री ’ यांच्या अन्य वाङ्‌मयनिर्मितीत कन्नड छंदांचा इतिहास (१९३६)  व कन्नड साहित्याचा इतिहास (अपूर्ण, १९४७) हे उल्लेखनीय आहेत. ते कन्नड कैपिडी चे ( खंड १ व २) भाग म्हणून त्यात समाविष्ट केले आहेत. कन्नडिगरिगॅ ऑळ्ळॅय साहित्य (१९४८, म. शी. ‘कन्नड भाषिकांसाठी उत्तम साहित्य ’) हे त्यांची भाषणे, प्रस्तावना, गंथपरीक्षणे आदींचे संकलन आहे. गुलबर्गा येथे भरलेल्या समग कर्नाटक साहित्य परिषदेचे ते चौदावे अध्यक्ष होते. म्हैसूरच्या महाराजांनी त्यांना ‘राजसेवासक्त’ हा   किताब देऊन गौरविले (१९३८). त्यांनी कन्नड नुडी ( म. शी. ‘कन्नडचा आवाज’) हे परिषदेचे मुखपत्र प्रथम साप्ताहिकरूपात ( सध्याचे मासिक ) सुरू केले. परिषदेच्या वतीने त्यांनी कन्नड साहित्य-परीक्षा सुरू केल्या. कन्नडदा बव्हुता ( कन्नड कोरीव लेख, प्राचीन अभिजात साहित्य, लोकगीते व आधुनिक कविता यांचे निवडक संकलन ) हा गंथ संपादित व प्रकाशित केला. कन्नड लिपीमध्ये त्यांनी सुचविलेल्या सुधारणा, हे या गंथाचे लक्षणीय वैशिष्टय होय. संभावने हा त्यांच्याविषयीचा गौरवगंथ प्रसिद्ध झाला आहे.

धारवाड येथे त्यांचे निधन झाले.

इनामदार, श्री. दे.