श्रीनाथ : (सु. १३८० – सु. १४५०). मध्ययुगीन तेलुगू महाकवी. त्यांचे जन्मस्थळ व काय यांविषयी विव्दांनात मतभेद आहेत. काहींच्या मते तो काविपट्टनम (कलपटम, जि. कृष्णा) येथे, तर काहींच्या मते नेल्लोर येथे जन्मला असावा. विख्यात कवी कमलनाभामात्य यांचा तो नातू असून वडील मारयामात्य व आई पोतंबा या दांपत्यापोटी त्याचा जन्म झाला. त्याच्यावर बालपणापासूनच वाङ्‌मयीन संस्कार झाले. संस्कृत-प्राकृत व तेलुगू भाषांमध्ये तो पारंगत होता. वेद-वाङ्‌मय व षड्‌दर्शनातील अधिकारी पुरूष म्हणून त्याला मान्यता लाभली होती. त्याच्या विव्दत्तेमुळे कोंडाविडूच्या रेड्डी राजांचा त्याला राजाश्रय लाभला. पेद कोमटी वेमा रेड्डी (१४००-२०) याच्या दरबारात तो विदयाधिकारी होता. शास्त्रीपंडितांबरोबर विव्दत्तापूर्ण चर्चा करणे, तसेच दरबारात काव्य सादर करणाऱ्या कवींची चाचणी घेणे, ही कामे त्याला नेमून दिली होती. त्याच्या कर्तृत्वामुळे ‘कवि-सार्वभौम’ हा मानाचा किताब देऊन त्याला गौरविण्यात आले. कोंडाविडू राजवटीच्या पाडावानंतर राजमहेंद्रीच्या (राजमुंद्री) रेड्डींनी त्याला आश्रय दिला. त्याने राज्यात सर्वदूर संचार करून तत्कालीन भल्याबुऱ्या वास्तवावर संकीर्ण पदयरचना केल्या. राजाश्रय, ऐहिक सुखे व सन्मान यांनी समृद्ध असे आयुष्य तो तरूणपणी जगला पण उत्तर आयुष्यात मात्र राजाश्रय नाहीसा झाल्यावर त्याला शेती करून कष्टप्रद जीवन कंठावे लागले. तो शिवभक्त होता.

श्रीनाथ याने लहान वयातच मरूत्तराट्चरित्र व किशोरवयात शालिवाहन  सप्तशती ही काव्यरचना केली पण ही दोन्ही काव्ये उपलब्ध नाहीत. ⇨श्रीहर्षाच्या ⇨नैषधीयचरित या संस्कृत महाकाव्याचे त्याने तेलुगूमध्ये शृंगारनैषध या नावाने इ. स. १४०५-१० दरम्यान स्वैर रूपांतर केले. नल-दमयंतीच्या प्रणयकथेवर आधारलेले, आठ सर्गांचे हे काव्य ही त्याची सर्वोत्कृष्ट निर्मिती मानली जाते. हे तेलुगूतील पंचमहाकाव्यांपैकी एक मानले   जाते. या काव्यात ‘ सीस ’ या तेलुगू छंदाचा त्याने समर्थपणे वापर केलेला आहे. श्रीनाथाच्या अन्य काव्यरचनांमध्ये हरविलासवीथिनाटक, भीमखंड (भीमेश्वर पुराणम् या नावानेही परिचित ), काशीखंड, शिवरात्रिमाहात्म्यमु इ. उल्लेखनीय आहेत. यांतून शिवाच्या पवित्र तीर्थस्थानांची माहिती आढळते. याशिवाय पल्नाटिवीरचरितमु हे वीरगीत व कीडाभिरामम् हे विधिनाटक ही त्याची निर्मितीही लक्षणीय आहे. पल्नाटिवीरचरितमु मध्ये पालनाडच्या दोन राज्यकर्त्यांमधील युद्ध व त्यातील भातृहत्येचे चित्रण आहे, तर कीडा-भिरामम् मध्ये आंध प्रदेशातील भिन्न जमातींतील स्त्रीपुरूषांचे औपरोधिक चित्रण आहे. तेलुगूमधील उपरोधपर वाङ्मयाचा आदय नमुना म्हणून, तसेच पंधराव्या शतकातील सामाजिक इतिहासाचा दस्तऐवज म्हणूनही त्यास महत्त्व आहे.

श्रीनाथाच्या काव्यनिर्मितीत विविधतेचे दर्शन घडते. प्राचीन तेलुगू काव्याला त्याने कथनपर वळण दिले. तेलुगू जीवनावर व इतिहासावर   इहलोकपर काव्यलेखन करण्याचा पायंडा त्यानेच पाडला. संस्कृत व तेलुगू यांचे मिश्रण असलेली, अभिजात डौलदार शैली त्याने निर्माण केली. त्याची भाषा प्राय: ⇨नन्नय-परंपरेतील आहे. त्याच्या शृंगारनैषध काव्याने प्रबंध काव्यशैलीचा विकास घडवून आणला. कीडाभिरामम् सारख्या रचनेत त्याने प्रचलित लोककथा, लोकगीते, देशी शब्दकळा यांचा प्राधान्याने वापर केला. प्राचीन तेलुगू काव्याचा आदय युगप्रवर्तक म्हणून तेलुगू साहित्यात त्याचे स्थान मोठे आहे.

संदर्भ : 1. Lakshikantam, Pingali, Andhra Sahitya Charitra, Hyderabad, 1976.

            2. Sarma, C. R. Landmarks in Telugu Litrecture, Madras, 1975.

           ३. रेड्डी, बालशौरी, तेलुगू साहित्य का इतिहास, लखनऊ, १९६४.

टिळक, व्यं. द. इनामदार, श्री. दे.