शोषण १ : (एक्स्प्लॉयटेशन). जे दुसऱ्याचे व त्याच्या हक्काचे आहे, ते त्याच्या कळत-नकळत ओरबाडून घेणे, त्याला मिळू न देणे म्हणजे शोषण होय. ‘ बळी तो कान पिळी ’या म्हणीतून ते काहीसे व्यक्त होते. शोषणाची संकल्पना, विशेषतः उत्पादनकार्याच्या विश्लेषणातून पुढे आली आहे. तिचा जनक ⇨ कार्ल मार्क्स होय. त्याच्या प्रतिपादनानुसार गुलाम, भूदास, कामगार हा शोषित वर्ग, तर गुलामांना बाळगणारे, तसेच सरंजामदार, मोकासदार, भांडवलदार हा शोषक वर्ग होय. शोषण कसे होते, किती प्रमाणाने होते हे मार्क्सच्या सिद्धांतातून प्रकट झाले आहे [⟶ मार्क्सवाद].
वस्तूंचे मूल्य कसे ठरते, वितरण कसे होते, हे अर्थशास्त्रातील मूलभूत प्रश्न होत. अर्थशास्त्राचे जनक ⇨ ॲडम स्मिथ यांनी प्रथम त्यांची मांडणी केली. वस्तूंच्या निर्मितीत जेवढे श्रम वेचले जातात, त्यावरून त्यांचे मूल्य ठरते. याचे जे उदाहरण त्यांनी नमूद केले आहे, ते असे : हरणाचा शोध घेऊन पकडण्यात जेवढा वेळ (व श्रम) मोडतो, त्याच्या दुप्पट वेळ (व श्रम) जर बीव्हर (जलस्थलचल प्राणी) प्राण्याला पकडण्यासाठी लागत असेल, तर बीव्हर प्राण्याचे मूल्य हरणाच्या मूल्याच्या दुप्पट राहील. मार्क्सने हा धागा पकडला आणि त्यावर आपला सिद्धांत उभारला. वस्तूच्या उत्पादनासाठी कामगाराची जेवढी श्रमशक्ती (त्याने दिलेली सेवा नव्हे) खर्च होते, तेवढे त्या वस्तूचे मूल्य होय. ही श्रमशक्ती प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे वेचलेली असेल. उत्पादनव्यवस्थेसाठी इमारत व यंत्रे लागतात. त्यांच्या निर्मितीसाठी जी श्रमशक्ती वेचलेली असते, ती अप्रत्यक्षपणे वेचलेली श्रमशक्ती होय. श्रमशक्ती श्रमतासांत मोजली जाते. कामगारांना स्वतःच्या आवश्यक चरितार्थासाठी म्हणजे संगोपन, प्रशिक्षण, पोषण, निवास यांसाठी लागणाऱ्या वस्तू मिळवायला, आयुष्यभराच्या हिशोबात समजा रोजी चार श्रमतास पुरेसे होतात परंतु वस्तूंच्या उत्पादनात भांडवलदार, कारखानदार रोज सहा श्रमतास वेचायला भाग पाडतो तेव्हा कारखानदार कामगारांचे रोज दोन श्रमतास शोषण करीत राहतो. यालाच मार्क्सने श्रममूल्याचा सिद्धांत म्हटले आहे. कामगार आपल्या श्रमांनी सर्व मूल्ये निर्माण करतात परंतु सर्व मूल्य त्यांच्या हाती पडत नाही. त्याचा अल्प भागच येतो. उत्पादित वस्तूचे मूल्य सहा श्रमतास आणि चरितार्थासाठी लागतात चार श्रमतास. दोन श्रमतास हे अतिरिक्त मूल्य होय. व्याज, खंड व नफा म्हणजे अतिरिक्त मूल्य (S) होय. वर्षभराची जी मजुरी ती चल-भांडवल (V) होय. तेव्हा S/V हे शोषणाचे प्रमाण म्हणून सांगता येईल. कार्ल मार्क्सने हेच तत्त्व पुढील शब्दांत विशद केले आहे. श्रमाची उत्पादकता वाढवून नफा मिळविणे हेच उद्योजकाचे मुख्य उद्दिष्ट असते. कामगाराला जगण्यापुरता आणि कुटुंबनिर्वाहापुरता कामगाराच्या श्रमातून निर्माण झालेल्या संपत्तीतला भाग दिला जातो. कामगाराने निर्माण केलेल्या संपत्तीतील उरलेला भाग मालक आपल्याकडे ठेवतो, तोच नफा. नफा म्हणजे शोषण वा पिळवणूक होय”.
अतिरिक्त मूल्यातून एकीकडे भांडवलाचा साठा वाढत जातो, नफ्याचे प्रमाण कमी होत जाते. दुसरीकडे आपले शोषण होत आहे, याची कामगारांना जाणीव होत राहते. यातून भांडवलशाहीचा विनाश अटळ आहे, असा यानंतरचा मार्क्सचा सिद्धांत आहे. त्याच्या तपशिलांत जायची येथे गरज नाही.
शोषणामुळे मजूर नेहमी हलाखीत राहतात, हे मार्क्सचे भाकित होते. हे शोषण कमी करण्याचे प्रयत्न होत राहिल्याचे दिसून येते. मजुरांचे रोजचे कामाचे तास ठरविणारे तसेच कारखान्यातून हवा, प्रकाश व सुरक्षा यांची
सक्तीने व्यवस्था करावयास लावणारे कारखाना अधिनियम झाले किमान मजुरीचे दर ठरविले गेले व संघटितपणे मजुरीचे (बोनस, रजा इ.) दर ठरविण्यासाठी सामूहिक सौदा करण्याचे व तो मानला नाही, तर संप करण्याचा हक्क देणारे कायदे आले. त्यामुळे मजुरांचे शोषण कमी झालेले असले, तरी त्याचा पूर्ण लोप झाला आहे, असे म्हणता येत नाही. स्त्री-पुरूष कामगार दोघेही सारखेच श्रमतास काम करतात परंतु स्त्रियांना पुरूषांच्या मानाने साधारणपणे एकतृतीयांश इतका कमी मोबदला मिळतो. मजुरीवरील खर्च कमी व्हावा, म्हणून लहान मुलांना कामावर ठेवले जाते. शेतकरी कुटुंबातून मुलांना गुरे राखण्यासाठी पाठविले जाते, त्यास शोषण म्हणता यावयाचे नाही पण जेव्हा विटभट्ट्यांवर, सुरक्षेची कसलीच व्यवस्था व हमी नसताना मुलांना कामावर ठेवले जाते, तेव्हा ते शोषण ठरते. खुल्या व्यापारामुळे येणाऱ्या स्पर्धेची झळ प्रगत देशांतील कामगार-कारखानदारांना लागल्यावर ज्या आयात वस्तूंच्या उत्पादनात बालकामगारांचा हातभार आहे (उदा., काश्मीरी गालिचे), त्या वस्तूंची आयात रोखण्याची मुभा मिळावी, असा प्रगत देश प्रयत्न करीत आहेत म्हणजे शोषणयुक्त आयातीपासून संरक्षण मिळावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत [⟶ बालकामगार].
कायद्याने शोषण व त्याचे दुष्परिणाम कमी करता येतील पण ते पूर्णपणे थांबविता येणे कठीण आहे. न्यायीपणाने वागण्याची सगळ्या समाजाने वृत्ती जोपासणे हा यावरचा उतारा म्हणता येईल. ते अशक्य नसले, तरी महाकठीण आहे यात संशय नाही.
पहा : दास्य मध्ययुग, यूरोपीय वेठबिगार शेतमजूर.
संदर्भ : 1. Schumpeter, J. A. History of Economic Analysis, New York, 1954.
२. मार्क्स, कार्ल तुळपुळे, वसंत, अनु. भांडवल (कॅपिटल) : भांडवली उत्पादनाची मूलगामी मीमांसा, खंड १-३, पुणे, १९७०-८०.
खेर, सी. पं.
“