श्मिट, व्हिल्हेल्म : (१६ फेबुवारी १८६८ – १० फेबुवारी १९५४). जर्मन मानवशास्त्रज्ञ व रोमन कॅथलिक धर्मोपदेशक. जन्म जर्मनीतील होर्ड या गावी. शिक्षण बर्लिन व व्हिएन्ना विदयापीठांत. प्रारंभी व्हिएन्ना विदयापीठात व १९३८ पासून फ्रायबर्ग विदयापीठात अध्यापन. दक्षिण आशिया, ऑस्ट्रेंलिया आणि ओशिॲनिया यांतील आदिम जमातींच्या भाषांचाही त्याने अभ्यास केला. या काळात ⇨फँट्स बोॲस आणि ⇨एडवर्ड वेस्टरमार्क या मानवशास्त्रज्ञांचा त्याच्यावर प्रभाव पडला. पुढे फ्रिट्झ ग्रॅबनर यांच्या सांस्कृतिक अभिसरणाच्या (डिफ्यूजन) संकल्पनेने प्रभावित होऊन त्याने ग्रॅबनर यांना साहाय्य करण्याचे ठरविले. मानवशास्त्रातील संशोधनाला प्रसिद्धी देण्यासाठी अँथोपस हे नियतकालिकही त्याने सुरू केले (१९०६).
श्मिटने कुटुंब या संस्थेच्या क्रमविकासाचा आणि विविध कुटुंबप्रकारांचा अभ्यास केला. त्याचप्रमाणे ग्रॅबनर यांचे सांस्कृतिक अभिसरणाचे तत्त्व व्यापक स्तरावर आपल्या लेखनातून उपयोजित करण्याचा त्याने प्रयत्न केला. द ओरिजिन ऑफ द आयडिया ऑफ गॉड (इं. भा. १२ खंड, १९१२-१९५५), द ओरिजिन अँड ग्रोथ ऑफ रिलिजन (इं.भा. १९३१) आणि हाय गॉड्स इन नॉर्थ अमेरिका (इं. भा. १९३३) हे त्याचे उल्लेखनीय गंथ होत.
श्मिट हा ‘सोसायटी ऑफ द डिव्हाइन वर्ड ‘चा सभासद होता (१८९०). फ्रिट्झ ग्रॅबनर आणि व्हिल्हेल्म श्मिट यांनी संयुक्तपणे मांडलेल्या सांस्कृतिक समूहाच्या उपपत्तीने तत्कालीन मानवशास्त्रातील यूरोपीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. बहुसांस्कृतिक अभिसरण वा आदानप्रदान हेच विभिन्न स्थलकालातील नव्या-जुन्या संस्कृतींच्या विकासाचे बीजभूत तत्त्व होय, असे श्मिटचे प्रतिपादन आहे. या संकल्पनेविषयी नंतर अनेक मानवशास्त्रज्ञांनी मतभेद व्यक्त करून तिच्यातील काही उणिवा स्पष्ट केल्या.
फ्रायबर्ग (स्वित्झर्लंड) येथे त्याचे निधन झाले.
देशपांडे, सु. र.