श्निट्स्लर, आर्टुर : (१५ मे १८६२२१ ऑक्टोबर १९३१). ऑस्टि्नयन नाटककार आणि कादंबरीकार. जन्म व्हिएन्ना येथे एका ज्यू कुटुंबात. साहित्याकडे ओढा असतानाही वडिलांच्या इच्छेनुसार व्हिएन्ना विदयापीठात त्याने वैदयकातील पदवी घेऊन (१८८५) वैदयकीचा व्यवसायही केला. मनोदोषचिकित्सेमध्ये त्याला विशेष स्वारस्य होते. विख्यात ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ ⇨ सिग्मंड फॉइड ह्याच्याशी त्याचे निकटचे संबंध होते.
आनाटोल (१८९३, इं. भा. १९११) ह्या त्याच्या सात एकांकिकांच्या मालेमुळे तो प्रथम प्रसिद्धीस आला. नित्य नवी प्रेमप्रकरणे करणारा व्हिएन्नामधील एक लहरी तरूण ह्या एकांकिकांतून त्याने दाखविला आहे. त्यानंतर लीबेलाय (प्रयोग १८९५, इं. भा. प्लेइंग विथ लव्ह, १९१४), राइगेन (लेखन १८९७, इं. भा. मेरी गो राउंड, १९५३), डेअर ग्र्यून काकाडू (प्रयोग १८९९, इं. शी. द ग्रीन कॉकटू), पारासेल्सुस (प्रयोग १८९९), डी श्वेस्टर्न, ओडर कासानोव्हा इन श्पा (प्रकाशन १९१९, इं. शी. द सिस्टर्स ऑर कासानोव्हा इन स्पा), डेअर श्लायर डेअर बिआट्रिस (प्रयोग १९००), प्रोफेसर बेर्नहार्डी (प्रयोग १९१२) ह्यांसारखी अनेक नाटके त्याने लिहिली.
श्निट्स्लरची नाटके समकालीन समाजाचा – विशेषतः भरपूर रिकामपण असलेल्या बूर्झ्वा वर्गाचा – वेध घेतात तसेच त्या वर्गाच्या उथळ जीवनशैलीच्या तळाशी असणाऱ्या अप्रकट उदासीनतेलाही प्रभावीपणे स्पर्श करतात. अतिशय सूचक, अर्थपूर्ण संवादलेखनावर त्याचे विलक्षण प्रभुत्व होते. मनोविकृतींच्या अभ्यासातून प्राप्त झालेल्या मर्मगाही मानसशास्त्रीय दृष्टीमुळे त्याच्या नाट्यलेखनास एक परिमाण प्राप्त झाले. प्रेम आणि कामवासनेची वेगवेगळी सखोल अर्थाची सूक्ष्म रूपे त्याच्या नाटकांतून प्रकटतात. त्या दृष्टीने मेरी गो राउंड आणि पारासेल्सुस ही नाटके निर्देशनीय आहेत. माणसाच्या स्खलनशीलतेला त्याच्या अंतर्यामी वसणारे हजार आत्मे कारणीभूत असतात, हे तो जाणत होता. प्रोफेसर बेर्नहार्डी ह्या नाटकात त्याने ज्यू-द्वेष, तसेच धर्म आणि विज्ञान ह्यांच्यातील विरोध प्रत्ययकारीपणे मांडला.
नाटककार म्हणून त्याला मोठी मान्यता प्राप्त झाली तथापि १९१४ नंतर ती ओसरत गेली. त्याच्या नाटकांना आधारभूत ठरलेली व्हिएन्ना-संस्कृती पहिल्या महायुद्धानंतर हळूहळू लुप्त होत गेली.
श्निट्स्लरने काही कादंबऱ्या आणि लघुकथाही लिहिल्या. त्यांच्या लॉयटनाण्ट गुस्टल (१९०१, इं. शी. नन बट द ब्रेव्ह) व डेअर वेग इन्स फाय (१९०८, इं. भा. द रोड टू द ओपन, १९१३) ह्या आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या विशेष उल्लेखनीय होत. ज्यूंच्या अनेक समस्यांची चर्चा डेअर वेग इन्स फाय मध्ये आली आहे. त्याचे Doktor Graster (१९१७), Badearzt (१९१७), Casanovas Heimfahrt (१९१८) वगैरे लघुकथासंगह प्रसिद्ध आहेत.
व्हिएन्ना येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.