पाउल, झां : (२१ मार्च १७६३–१४ नोव्हेंबर १८२५). जर्मन कादंबरीकर. खरे नाव योहान पाउल फ्रीड्रिख रिक्टर. त्याचा जन्म व्हुंझीडल, फिक्टल्बर्ग येथे झाला. आरंभीचे काही शिक्षण श्व्हार्त्सनबाख आणि होफ येथे घेतल्यानंतर १७८३ मध्ये तो लाइपसिक विद्यापीठात ईश्वरविद्येचे शिक्षण घेण्यासाठी दाखल झाला. तथापि हे शिक्षण लवकरच सोडून देऊन तो लेखनाकडे वळला. १७८३ मध्येच त्याने लिहिलेले काही उपरोधप्रचुर निबंध पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. जॉनाथन स्विफ्ट आणि अलेक्झांडर पोप ह्यांसारख्या इंग्रज उपरोधकारांचा आदर्श ह्या वेळी पाउलसमोर होता. हे पुस्तक यशस्वी ठरले नाही परंतु त्यानंतर दहा वर्षांनी प्रसिद्ध झालेल्या डी उनझिश्टबार लोग (१७९३, इं. भा. इन्व्हिजिबल लॉज, १८८३) ह्या त्याच्या कादंबरीने लेखक म्हणून त्याला प्रकाशात आणले. लॉरेन्स स्टर्न ह्या इंग्रज कादंबरीकाराचा प्रभाव तिच्यावर जाणवतो. अत्यंत व्यक्तिनिष्ठ शैली आणि विक्षिप्त विनोद ह्या त्याच्या लेखनवैशिष्ट्यांची चुणूक ह्या कादंबरीत दिसून आली. ह्या कादंबरीनंतर हेस्पेरुस (१७९५), दस लेबेन डेस क्विंटस फिक्सलाइन (१७९६, इं. शी. द लाइफ ऑफ क्विंटस फिक्सलाइन), टिटान (१८००–०३), फ्लेगेल यार (१८०४, इं.शी. पँग्ज ऑफ ॲडलेसन्स) अशा त्याच्या अन्य उल्लेखनीय कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. 

भावविवशता हे पाउलच्या कादंबऱ्यांचे एक लक्षणीय आणि दोषार्ह असे वैशिष्ट्य होतेच परंतु त्याच्या कादंबऱ्यांना घाटही नव्हताच. घाटाची जाणीव ठेवण्याचा प्रयत्न त्याने टिटानमध्ये केला तथापि तसे करणे ही त्याची स्वाभाविक प्रवृत्ती नव्हती. तो व्यक्तिवादी असला आणि त्याच्या लेखनातून अन्य काही स्वच्छंदतावादी प्रवृत्तीची प्रचीती येत असली, तरी तो स्वच्छंदतावादी होता, असेही म्हणता येणार नाही. कोणत्याही समकालीन वाङ्मयीन संप्रदायाला अथवा चळवळीला त्याने स्वतःला बांधून घेतलेले नव्हते. व्हायमार येथे गटे आणि शिलर ह्या दोन जर्मन साहित्यश्रेष्ठींशी त्याचा परिचय झालेला होता परंतु त्यांच्याशी पाउलचे संबंध कधीच नीटसे जमले नाहीत. त्यांनी गौरविलेले आदर्श आणि प्रत्यक्ष वास्तव ह्यांच्यातील अंतर पाउलमधील चाणाक्ष वास्तववादी निरीक्षक जाणून होता. तथापि ह्या वस्तुस्थितीकडे त्याने पुरेशा सहिष्णुतेने आणि स्वतःच्या खास, विक्षिप्त विनोददृष्टीने पाहिले. त्याच्या विक्षिप्त विनोदातूनही सहृदयतेचा एक मृदू स्रोत वाहताना दिसतो आणि विस्कळीत, तऱ्हेवाईक शैलीतून अनेकदा एक उत्कट काव्यात्मता प्रत्ययास येते. सामान्य माणूस हा त्याच्या साहित्यकृतींचा विषय होता. पाउलच्या लेखनाला त्यातील नावीन्यामुळे खूप मोठी लोकप्रियता प्राप्त झालीच परंतु टॉमस कार्लाइल, श्टेफान गोओर्ग ह्यांसारख्या साहित्यिकांनीही झां पाउलच्या आकारहीन साहित्यकृतींतील वाङ्मयीन चैतन्यांशाचा गौरव केला. कार्लाइलने त्याच्या काही साहित्यकृतींचा इंग्रजी अनुवाद केलेला आहे.  

पाउलने आपले वाङ्मयीन विचार फोरशूले डेर आस्थेटिक (१८०४) ह्या ग्रंथातून मांडले. लेव्हाना (१८०७) हा त्याने लिहिलेला शैक्षणिक प्रबंध. 

हायड्लबर्ग विद्यापीठाने १८१७ साली पाउलला डॉक्टरेटची सन्माननीय पदवी बहाल केली. 

बायरॉइट येथे तो निधन पावला.  

कुलकर्णी, अ. र.