श्टेटीन : श्टेट्सीन. पोलंडमधील याच नावाच्या प्रांताची राजधानी, एक प्रमुख बंदर व औदयोगिक शहर. बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावरील पॉमरेनीअ या भूतपूर्व प्रशियन प्रदेशाची हीच राजधानी होती. दुसऱ्या महायुद्धापर्यंत हे शहर श्टेटीन या जर्मन नावाने ओळखले जाई. त्यानंतरचे नामांतर श्टेट्सीन. लोकसंख्या ४,१७,००० (१९९९). पोलंडच्या वायव्य भागातील श्टेटीन उपसागराच्या ओडर खारकच्छला मिळणाऱ्या ओडर नदीच्या मुखाजवळ, पश्चिम काठावर हे वसले आहे. बाल्टिक समुद्रापासून आत ६५ किमी.वर हे शहर आहे.
सुमारे २,५०० वर्षांपूर्वी येथे दर्यावर्दी लोकांची वस्ती असल्याचे पुरावे मिळतात. आठव्या व नवव्या शतकांत मासेमारी व व्यापार करणाऱ्या स्लाव्ह लोकांची वस्ती येथे होती. दहाव्या शतकात ते पोलंडला जोडण्यात आले. बाराव्या शतकात पॉमरेनीअ प्रदेशातील हे सर्वांत मोठे नगर होते. बाराव्या ते सतराव्या शतकांपर्यंत पॉमरेनीअच्या ड्यूकचे येथे वास्तव्य होते. इ. स. १३६० मध्ये हॅन्सीॲटिक लीगचे हे प्रमुख सदस्यनगर बनले. १५७० मधील श्टेटीन शांतता करारानुसार डेन्मार्क व स्वीडन यांच्यातील सप्तवार्षिक युद्ध समाप्त झाले. १६४८ मधील वेस्टफेलिया शांतता करारानुसार तीस वर्षीय युद्घ समाप्त होऊन हे नगर स्वीडनला देण्यात आले. १७२० मध्ये ते प्रशियाच्या ताब्यात आले. दुसऱ्या महायुद्धानंतर पोलंडकडे हस्तांतरण होईपर्यंत ते जर्मनीच्या अखत्यारीत होते.
ओडरमधून नियमित जलवाहतूक १८२६ मध्ये सुरू झाली, तेव्हापासून या बंदराचा विकास होत गेला. १९१४ मध्ये बर्लिनपर्यंत काढण्यात आलेल्या कालव्यामुळे एक व्यापारी बंदर म्हणून त्याला महत्त्व प्राप्त झाले. १९२६-२७ मध्ये श्टेटीनपासून बाल्टिक समुद्रापर्यंतचा जलमार्ग खोल करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धकाळात झालेल्या सततच्या बाँबवर्षावांमुळे या नगराची बरीच हानी झाली. १९४५ मधील पॉट्सडॅम परिषदेतील निर्णयानुसार श्टेटीन पोलंडला देण्यात आले. श्टेटीनमध्ये जहाजबांधणी, पोलाद, कोक, रसायने, खते, धातू व खाद्यपदार्थ-निर्मितीचे कारखाने आहेत. आज श्टेटीन हे बाल्टिक समुद्रावरील प्रमुख, तर पोलंडमधील सर्वांत मोठे बंदर आहे. श्फीनूईश्च हे श्टेटीनचे बाह्य बंदर आहे. या बंदरातून प्रामुख्याने कोळशाची निर्यात व लोहखनिजाची आयात केली जाते. सांस्कृतिक दृष्ट्याही हे शहर महत्त्वाचे आहे. येथे चार उच्च शिक्षणसंस्था, काही रंगमंदिरे, वादयवृंद, गंथालये, वस्तुसंग्रहालय इ. संस्था आहेत. श्टेटीन हे एक सुंदर शहर असून तेथे अनेक उद्याने व छोटी सरोवरे आहेत.
चौधरी, वसंत