श्टार्क, योहानेस : (१५ एप्रिल १८७४ – २१ जून १९५७). जर्मन भौतिकीविज्ञ. दीप्तिमान द्रव्यातून बाहेर पडलेल्या प्रकाशाच्या वर्णपटातील रेषांचे तीव्र विद्युत् क्षेत्रामुळे निरनिराळ्या घटकरेषांमध्ये विच्छेदन होते, हा शोध १९१३ मध्ये त्यांनी लावला. ⇨ श्टार्क परिणाम म्हणून तो ओळखला जातो. या शोधाबद्दल त्यांना १९१९ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक मिळाले.
श्टार्क यांचा जन्म शिकेनहॉफ (बव्हेरिया) येथे झाला. म्यूनिक विदयापीठात त्यांनी रसायनशास्त्र, भौतिकी, गणित आणि स्फटिकविज्ञान या विषयांचे अध्ययन केले (१८९४). ‘ दिव्याच्या काजळीचे अन्वेषण ’ या प्रबंधाबद्दल त्यांना पीएच्.डी. पदवी मिळाली (१८९७). गटिंगेन विदयापीठ तसेच हॅनोव्हर, आखेन व ग्राइफसव्हाल्ट येथील तांत्रिक महाविदयालयांत व वुर्ट्सबर्ग विदयापीठात त्यांनी अध्यापनाचे काम केले (१९००-१९२२).
⇨ क्रिस्टिआन योहान डॉप्लर या ऑस्ट्रियन भौतिकीविज्ञांनी १८४२ मध्ये असे दाखवून दिले की, तरंग गतीच्या उगमात व ते तरंग गहण करणाऱ्या निरीक्षकास, परस्पर सापेक्ष वेगामुळे तरंगांच्या कंप्रतेत किंवा तरंगलांबीत फरक पडतो, असे भासते. पुढे हा आविष्कार ⇨ डॉप्लर परिणाम म्हणून ओळखला गेला. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत विद्युत् चुंबकीय प्रारण करणाऱ्या भूचर उगमाबाबत हा परिणाम आढळून आला नव्हता. कारण अशा उगमाला पुरेसा वेग देणे अशक्य होते. १९०२ मध्ये श्टार्क यांनी भाकीत केले की, धन किरणांच्या बाबतीत डॉप्लर परिणाम प्रत्ययास येणे शक्य आहे. १९५० मध्ये त्यांनी हायड्रोजन अणू असलेल्या धन किरणांच्या कंप्रतांमधील स्थानच्युती ओळखण्यात यश मिळविले.
चुंबकीय झीमान परिणामाशी विद्युत् सदृशता शोधून काढण्याकरिता व्होल्डेमार फोख्ट यांनी श्टार्क यांना प्रेरणा दिली. १९१३ मध्ये श्टार्क यांनी आवश्यक असलेली सर्व सामग्री मिळविल्यानंतर धन किरण नलिकेमध्ये १०,००० ते ३१,००० व्होल्ट प्रती सेंमी. या दरम्यान विद्युत् क्षेत्र निर्माण केले आणि प्रकाशाच्या वर्णपटाचे छायाचित्र घेतले. त्यावेळेस त्यांना नेहमीच्या वर्णपट रेषांचे निरनिराळ्या घटकरेषांमध्ये विभाजन होते असा शोध लागला. त्यांना एकाच वेळी हायड्रोजन आणि हीलियम रेषांमध्ये हा परिणाम आढळला.
⇨ ॲल्बर्ट आइन्स्टाइन यांनी १९०६ मध्ये सुचविलेल्या प्रकाश सममूल्यता नियमाचे श्टार्क यांनी १९१२ मध्ये रूपांतर केले. श्टार्क-आइन्स्टाइन नियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नियमाने असे कळते की, प्रकाश रासायनिक विक्रियेमध्ये भाग घेणारा प्रत्येक रेणू प्रारणातील एक पुंज शोषून घेतो आणि विक्रिया घडवून आणतो. श्टार्क परिणामामुळे ⇨ पुंज सिद्धांताला मोठी बळकटी मिळाली.
वायूतील विद्युत् संवहन, रासायनिक अणूंचे वर्णपटीय विश्लेषण, रासायनिक संयुजा इ. विषयांसंबंधी त्यांचे सु. ३०० निबंध आणि काही गंथ प्रसिद्ध आहेत. Jahrbuch der Radioaktivitat und Elektronik हे नियतकालिक सुरू करून त्याचे बराच काळ त्यांनी संपादनही केले.
श्टार्क नाझी मतप्रणालीचे कट्टर समर्थक होते. त्यांच्या ज्यू-विरोधी हालचाली आणि हिटलरवादी लेखनामुळे त्यांना १९४७ मध्ये नाझी व्यक्तींची चौकशी करणाऱ्या न्यायालयाने चार वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली.
ते ट्राऊनश्टाइन (प. जर्मनी) येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग. सूर्यवंशी, वि. ल.