पाउली, व्होल्फगांग : (२५ एप्रिल १९००–१५ डिसेंबर १९५८). ऑस्ट्रियन-स्विस भौतिकीविज्ञ. आणवीय संरचना सिद्धांतात महत्त्वपूर्ण ठरलेल्या विवर्जन तत्त्वाच्या [⟶ अणु व आणवीय संरचना] शोधाकरिता त्यांना १९४५ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला. त्यांचा जन्म व्हिएन्ना येथे झाला. म्यूनिक विद्यापीठात आर्नोल्ट झोमरफेल्ट या सुप्रसिद्ध भौतिकीविज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन करून त्यांनी १९२१ मध्ये डॉक्टरेट पदवी मिळविली. त्यानंतर गटिंगेन येथे एक वर्ष माक्स बोर्न यांचे आणि कोपनहेगन येथे एक वर्ष नील्स बोर यांचे साहाय्यक म्हणून त्यांनी काम केले. १९२३–२८ या काळात हँबर्ग विद्यापीठात भौतिकीच्या प्राध्यापकपदावर काम केल्यानंतर झुरिक येथील फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत सैद्धांतिक भौतिकीच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वकाळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था सैद्धांतिक भौतिकीतील संशोधनाबाबत अग्रगण्य मानली जात होती. अमेरिकेतील प्रिन्स्टन येथील इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडी या संस्थेत (१९३५-३६) तसेच मिशिगन (१९३१ व १९४१) व पर्ड्यू (१९४२) या विद्यापीठांत त्यांनी अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले. १९४० मध्ये प्रिन्स्टन येथे त्यांची सैद्धांतिक भौतिकीच्या प्राध्यापकपदावर नेमणूक झाली व १९४६ मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्वही मिळाले. तथापि दुसऱ्या महायुद्धानंतर झुरिक येथेच कार्य करणे व स्विस नागरिकत्व स्वीकारणे त्यांनी पसंत केले.
विसाव्या शतकाच्या मध्यावधीतील असामान्य शास्त्रज्ञांत पाउली यांची गणना होते. विद्यार्थीदशेतच त्यांनी ⇨ सापेक्षता सिद्धांतावर एक उत्कृष्ट निबंध लिहिला. आणवीय वर्णपटाबाबतच्या असंगत झीमान परिणामाच्या [⟶ वर्णपटविज्ञान] स्पष्टीकरणार्थ पाउली यांनी १९२५ मध्ये आपले सुप्रसिद्ध विवर्जन तत्त्व (नंतर त्यांच्याच नावाने ओळखण्यात येणारे तत्त्व) मांडले. या तत्त्वामुळे त्या वेळी उपलब्ध असलेले आणवीय संरचनेविषयीचे ज्ञान अधिक भक्कम पायावर प्रस्थापित होण्यास व त्याची पुढील विकास होण्यास अमूल्य मदत झाली. अणुकेंद्राच्या बीटा उत्सर्जनामुळे होणाऱ्या क्षयासंबंधी [⟶ किरणोत्सर्ग] संशोधन करीत असताना १९३१ मध्ये पाउली यांनी विद्युत् भाररहित व द्रव्यमानरहित न्यूट्रिनो या मूलकणाचे अस्तित्व प्रथमतःच गृहीत धरले होते. मूलकणाची सांख्यिकी [⟶सांख्यिकीय भौतिकी] व त्यांचे परिवलन यांतील संबंध सिद्ध करून पाउली यांनी ⇨ पुंज क्षेत्र सिद्धांताचा पाया घालण्यास महत्त्वपूर्ण मदत केली. याखेरीज तरंग यामिकी [⟶पुंजयामिकी], मेसॉन या मूलकणाचे स्पष्टीकरण व समचुंबकत्व [⟶चुंबकत्व] या विषयांवरही त्यांनी संशोधन केले.
सैद्धांतिक भौतिकीविषयीचे, विशेषतः पुंजयामिकीवरील, पाउली यांचे निबंध अनेक देशांतील शास्त्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले. लंडनची रॉयल सोसायटी, स्विस फिजिकल सोसायटी, अमेरिकन फिजिकल सोसायटी इ. संस्थांचे ते सदस्य होते. १९३० साली त्यांना लोरेन्ट्स पदक मिळाले. ते झुरिक येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.