शौरी : (हर्क्युलस). वीणा व उत्तरमुकुट यांच्या मधल्या तारकासमुह. हा ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक होरा १६ ता. ते १९ ता., क्रांती +५º ते +६०º असा पसरलेला विस्तिर्ण पण तेजस्वी तारे नसलेला उत्तरेकडील एक तारकासमूह आहे. हा जूनमध्ये मध्यमंडलावर येतो. यात तिसऱ्या प्रतीचे ७ आणि चौथ्या व पाचव्या प्रतीचे पुष्कळ तारे आहेत. गुडघा टेकलेल्या योद्ध्यासारखी याची आकृती आहे. हर्क्युलस या प्रसिद्ध योद्ध्यावरूनचे याचे नाव पडले आहे. यात पुष्कळ युग्मतारे व गच्छ आहेत. आल्फा शौरी प्रमुख तारा असून यो युग्मतारा आहे. तो तांबडा नारिंगी चर महातारा असून त्याचा सहचर निळसर हिरवा आहे. हा तारा ३०,००० प्रकाषवर्षे दूर व त्याचा व्यास सुर्याच्या ४०० पट आहे. तो आपली तेजस्वीतेची प्रत ३ ते ४ पट बदलतो. आल्फा शौरी व ३०-शौरी हे अनियमित आवर्तनकालाचे चर तारे आहेत. S हा चर तारा ३०० दिवस आवर्तनकालाचा आहे. पश्चिमेकडे यात एम-१३ या नावाचा सर्व गुच्छांत सुंदर असा गोलाकार गुच्छ ३०,००० प्रकाषवर्षे दूर असून त्यात ५ लक्ष तारे असावेत आणि त्यांपैकी पुष्कळ सूर्याहूनही तेजस्वी असावेत असा अंदाज आहे. ईटा व झीटा यांमध्ये नुसत्या डोळ्यांनीही कसाबसा तो दिसतो. एम-९२ हा गोलाकार गुच्छ पाय व ईटा यांच्याशी त्रिकोण करतो. बीटा व डेल्टा यांमध्ये ६२१० ही बिंबाभ्रिका आहे.
सूर्याची धाव, शौरीतील म्यू हर्क्युलस या दिशेने २० किमी. प्रती सेकंद या वेगाने सध्या आहे असे वाटते.
ठाकूर, अ. ना.