शोपेन हौअर, आर्थर : (२२ फेबुवारी १७८८-२१ सप्टेंबर १८६०). जर्मन तत्त्वज्ञ. जन्म डॅन्झिंग (पोलंड) येथे. त्याचे वडील श्रीमंत व्यापारी होते आई लेखिका होती. शोपेनहौअरला उत्तम शिक्षण मिळाले होते. यूरोपमध्ये भरपूर प्रवास करण्याची संधीही त्याला मिळाली होती. गटिंगेन आणि बर्लिन विदयापीठांत त्याचे शिक्षण झाले. ⇨ योहान गोटलीप फिक्टे, ⇨फ्रीड्रिख एर्न्स्ट श्लायरमाखर ह्या तत्त्वज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याने तत्त्वज्ञानाचा
अभ्यास केला. १८१३ मध्ये ‘ ऑन द फोरफोल्ड रूट ऑफ द प्रिन्सिपल ऑफ सफिशंट रीझन ’(इं. शी.) हा प्रबंध लिहून त्याने डॉक्टरेट मिळविली. १८१८ मध्ये ‘ द वर्ल्ड ॲज विल अँड रेपिझेंटेशन ’(४ खंड, इं. शी.) हा त्याचा सर्वश्रेष्ठ गंथ प्रसिद्घ झाला. १८४४ साली ह्या गंथाची सुधारित आवृत्ती प्रसिद्घ झाली. १८२० मध्ये ⇨ हेगेल ह्या विख्यात तत्त्वज्ञाची व्याख्याने बर्लिनमध्ये चालू असता, शोपेनहौअरनेही आपली तत्त्वज्ञानावरील व्याख्याने सुरू केली पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्याच्या गंथांचीही उपेक्षा झाली. १८३३ मध्ये फ्रॅकफुर्ट आम मेन येथे तो स्थायिक झाला आणि बरेचसे एकाकी जीवन जगू लागला. ह्या काळात ‘ ऑन द विल इन नेचर ’(१८३६, इं. शी.), ‘ द टू फंडामेंटल प्रॉब्लेम्स ऑफ एथिक्स ’(१८४१, इं. शी.), ‘पॅरेर्गा अँड पॅरालिपोमिना’(१८५१, इं. शी.) हे त्याचे गंथ प्रसिद्घ झाले.
शोपेनहौअरच्या तत्त्वज्ञानावर ⇨प्लेटो, ⇨इमॅन्युएल कांट व उपनिषदे ह्यांचा मोठा प्रभाव आहे. इंद्रियगोचर सृष्टी ही ज्ञात्याच्या ठिकाणी असणाऱ्या अनुभवपूर्व बोधतत्त्वांवर अवलंबून आहे, हा कांटचा सिद्धांत मान्य करून अनुभवातीत सद्वस्तू आणि इंद्रियगोचर सृष्टी ह्यांत त्याने भेद केला. इंद्रियगोचर सृष्टी ही ज्ञात्याने केलेली एक कल्पना (आयडिया) आहे, ह्या विचाराचे स्पष्टीकरण करताना ⇨गोटफ्रीट व्हिल्हेल्म लायप्निट्स च्या पर्याप्त कारणतत्त्वाची त्याने विस्तारपूर्वक मीमांसा केली. विश्व हे स्थल-काल-कारणतत्त्व-नियमित आहे हा नियतत्त्ववाद त्याने आपल्या मीमांसेतून सिद्घ केला. अनुभवातीत सद्वस्तू मात्र स्वतंत्र असून नियतत्त्वा- पलीकडे आहे. उपनिषदांतील बह्ममायाविचार शोपेनहौअरला मान्य असून त्याचा उपयोग त्याने आपल्या तत्त्वविवेचनात अनेकदा केलेला आहे. इंद्रियगोचर सृष्टी, जीव व जगत् हे मायारूप असून अंतिम बह्मतत्त्व हे विविधता व नामरूपविशेषता यांपलीकडे आहे, असे त्याचे प्रतिपादन आहे.
अंतिम सद्वस्तू ही अज्ञेय आहे, असे कांटचे मत आहे पण शोपेनहौअर मात्र इच्छाशक्ती (विल) हे तिचे मूलस्वरूप आहे असे प्रतिपादन करतो. अणुरेणूंपासून अत्युच्च पातळीवरील मानवी व्यवहारांपर्यंत सर्वत्र ह्याच एका इच्छाशक्तीची रूपे प्रकटतात. ह्या इच्छाशक्तीचे विवेचन करताना शोपेनहौअरने एक विचार पुन:पुन्हा मांडला आहे तो हा, की ही इच्छाशक्ती जीवनाची आदिप्रेरणा असून ती ज्ञाननिरपेक्ष यांत्रिकतेने अप्रतिहतपणे कार्य करीत आहे. क्षुधा आणि काम ह्या प्रेरणांच्या रूपाने सर्व जीवसृष्टीत ती व्यक्त होते. इच्छाशक्तीचा हा कार्यप्रपंच अनादि-अनंत आहे पण तो संघर्ष, कष्ट आणि यातना यांनी भरलेला आहे. त्यात चिरंतन सुख मिळणे शक्य नाही. प्रपंचातील सुख हे भावरूप नसून दु:खनिवृत्तीच्या स्वरूपाचे आणि म्हणून अभावात्मकच मानले पाहिजे. हा विचार विन्मुखता प्रतिपादणारा, जीवनाचे वैयर्थ्य सांगणारा, ह्या अर्थाने निराशावादी मानला जातो.
सुखासाठी इच्छाशक्तीच्या बंधनातून मुक्त झाले पाहिजे. त्यासाठी शोपेनहौअरने दोन उपाय सुचविले आहेत : एक तात्कालिक स्वरूपाचा आहे आणि तो म्हणजे कलोपासना आणि सौंदर्यसाधना. ह्या पहिल्या उपायाच्या संदर्भात शोपेनहौअरची कलामीमांसा निर्माण झाली. त्याच्या मते कलाविषयांच्या चिंतनात क्षुद्र विकारांचा लोप होतो आणि मनुष्य इच्छाशक्तीच्या स्वाभाविक प्रक्रियेपलीकडे जातो. ज्ञात्याची शुद्घ निर्विकल्प अवस्था तो काही काळ अनुभवतो. कलामीमांसा करताना नाट्यकलेचे – शोकात्मिकेचे-स्थान वरचे आहे, असे त्याने दाखविले आहे. तसेच संगीतकला ही सर्वश्रेष्ठ प्रकारची कला आहे असे तो मानतो.
प्रपंचातून सुटका होण्यासाठी दुसरा खरा उपाय म्हणजे वैराग्य. इच्छा-शक्तीच्या प्रवाहाला थोपवून धरणे, ह्या भूमिकेतून शोपेनहौअरने आपला नीतिविचार मांडला आहे. नामरूपात्मक मायेपलीकडे असलेले सद्वस्तूचे एकत्व जाणले, म्हणजे अहंभाव नष्ट होतो स्वार्थ लोप पावतो. विश्वव्यापक करूणेने हृदय भरते सर्व सृष्टीवर माणूस प्रेम करू लागतो. स्वार्थ आणि असूया ह्या प्रेरणा मानवी प्रकृतीत आहेत व त्या मानवी जीवन अधिकच दु:खमय करतात. करूणा ही प्रेरणा वरील दोन प्रेरणांना छेद देणारी आहे. दु:ख भोगणाऱ्या जीवाच्या जागी स्वतःला पाहणे, म्हणजे त्या जीवाविषयी करूणा वाटणे होय. असूयेमुळे माणसे एकमेकांना निष्कारण दु:खी करतात. उलट करूणा जेव्हा जागृत होते तेव्हा वासना नष्ट होते, अहंभाव लोपतो. बुद्ध वा ख्रिस्त ह्यांच्या रहस्याचा आपल्याला उलगडा होतो.
शोपेनहौअरच्या तत्त्वज्ञानावर भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रभाव आहे. उपनिषदे आणि बौद्ध विचारपरंपरांचा ठसा त्यावर उमटलेला आहे. ‘ उपनिषदे हे माझे जीवनमरणाचे सोबती आहेत ’ह्या आशयाचे त्याचे वचन प्रसिद्ध आहे. त्याच्या लेखनामुळे जर्मनीत पौर्वात्य विचारदर्शनांबद्दल जागृती निर्माण झाली.
फ्रॅकफुर्ट आम मेन येथे त्याचे निधन झाले.
संदर्भ : 1. Atwell, J. E. Schopenhauer : The Human Character, Philadelphia, 1990.
2. Fox, M. Ed. Schopenhauer : His Philosophical Achievement, Brighton, 1980.
3. Gardiner, P. Schopenhauer, Harmondsworth, 1997.
4. Hamlyn. D. W. Schopenhauer, London, 1980.
5. Jacquette, D. Ed., Schopenhauer, Philosophy and the Arts, Cambridge, 1996.
6. Luft, E. Son der, Ed., Schopenhauer : New Essays in Honor of his 200th Birthday, Lewiston (N. Y.), 1988
7. Young, J. Willing and Unwilling : A Study in the Philosophy of Arthur Schopenhauer, Dordrecht, 1987.
दामले, प्र. रा.
“