शोफ : (ईडीमा). समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या (पेशींच्या) समूहाला ऊतक व कार्यकारी कोशिकांना जोडणाऱ्या ऊतकाला संयोजी ऊतक म्हणतात. संयोजी ऊतकातील आंतरकोशिकीय मोकळ्या जागा आणि शरीरातील गुहा (पोकळ्या) या ठिकाणी अप्राकृतपणे वाजवीपेक्षा जास्त जलयुक्त द्रव साचून राहण्याच्या स्थितीला शोफ म्हणतात. खुद्द शोफ हा रोग नसून बहुधा तो काही रोगांचे लक्षण असतो. शरीराच्या विशिष्ट भागात वा पोकळ्यांत शोफ उद्‌भवतो, तेव्हा त्याव्दारे गंभीर रोग सूचित होऊ शकतो. उदा., फुप्फुसशोफाने सामान्यपणे हृदयाच्या कार्याची निष्फलता, तर वृक्क (मूत्रपिंड) शोफाने वृक्कशोथ सूचित होतो. उदराच्या पोकळीत (पोटात) द्रव साचण्याला ⇨ जलोदर म्हणतात. पुष्कळदा यकृत-सूत्रण-रोग, रक्ताभिसरण तंत्राचे विकार किंवा वृक्काच्या कार्याची निष्फलता या रोगांचे जलोदर हे लक्षण असते.

ठेचणे, कापणे, अस्थिभंग, कीटकदंश, सूर्यदाह, हिमदाह, संसर्ग, मुरगळणे व रसायनांनी होणारा क्षोभ यांच्यामुळे पुष्कळदा स्थानिक शोफ होतो. प्रत्येक बाबतीत गस्त वा जखम झालेली जागा सुजते, फुगीर होते व तेथे द्रव साचतो. सार्वदेहिक किंवा सर्वांगी शोफात शरीराच्या एकाहून अधिक भागांत सूज आलेली दिसते. शरीराच्या पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेमुळे सर्वांगशोफ होऊ शकतो. उदा., वृक्कविकारात व बृयाचदा गर्भारपणात अशी स्थिती उद्‌भवू शकते.

प्राकृत अवस्थेतही फार वेळ एकसारखे उभे राहण्याने किंवा पुष्कळ अंतर चालण्याने घोट्यापाशी थोडा शोफ दिसतो. तसेच गरोदरपणी गर्भाच्या भाराने पायांना थोडा शोफ होऊ शकतो.प्रौढ व्यक्तीच्या शरीराच्या एकूण वजनापैकी ४० ते ६०% वजन पाण्याचेच असते. त्यापैकी कोशिकांतर्गत सु. ७०%, आंतरकोशिकीय अवकाशात सु. २२.५ %आणि रक्त व लसीका वाहिन्यांत सु. ७.५% पाणी असते.

सर्वसाधारण वर्णन : प्राकृत अवस्थेत कोशिका, त्यांच्या बाहेरचा अवकाश आणि रक्तवाहिन्या यांच्यात द्रवाची देवाणघेवाण सतत चालू असते. या द्रवामार्फत कोशिकांना अन्नद्रव्ये पुरविली जातात व निरूपयोगी द्रव्ये परत रक्तात येतात. ही देवाणघेवाण सूक्ष्मवाहिन्या (केशिका) व कोशिका यांच्या भित्तींमधून होत असते. दोन्ही ठिकाणी होणाऱ्या द्रवाच्या (व पदार्थांच्या) देवाणघेवाणीत अत्यंत काटेकोरपणे समतोल राखला जातो. त्यामुळे कोठेही अतिरिक्त द्रव साठून राहत नाही. परिणामी (कोशिकांतर्गत व) आंतरकोशिकीय अवकाशातील द्रवाचे प्रमाण आणि रासायनिक संघटन हे काटेकोरपणे संतुलित राखले जातात. अतिरिक्त द्रव (व पदार्थ) रक्तात मिसळून रक्तामार्फत वृक्कांव्दारे मूत्रावाटे शरीराबाहेर टाकला जातो. अशा रीतीने शरीरातील द्रवाचे योग्य नियंत्रण करणे हे वृक्कांचे कार्य असते.

विकृतावस्थेत द्रवाच्या देवाणघेवाणीचा हा समतोल बिघडतो व त्यामुळे द्रव शरीरात साठून राहतो. द्रव साठून राहण्याची किया स्थानिक किंवा सार्वदेहिक असू शकते. असा साठून राहणारा द्रव ऊतकांत मुक्त किंवा मिश्रित रूपात असू शकतो. तो मुक्त स्वरूपात असताना शोफ झालेल्या भागावर बोटाने दाबल्यास द्रव एका जागेकडून दुसरीकडे सरकतो व मूळ जागी खळगा पडल्यासारखा दिसतो. या खळग्याला दाबगर्त म्हणतात. मिश्रित शोफद्रवाच्या बाबतीत दाबगर्त दिसत नाही.

शरीराच्या विविध भागांत द्रव साठल्यास स्थानपरत्वे त्याला निरनिराळी नावे दिली जातात. उदा., परिफुप्फुसीय पोकळीत साठल्यास द्रववक्ष [→ परिफुप्फुसशोथ], परिहृदयपोकळीत साठल्यास परिहृदयशोफ [→ परिहृदयशोथ ] व पर्युदरगुहेत साठल्यास त्याला ⇨ जलोदर म्हणतात. शोफ सर्व शरीरभर असल्यास त्याला ⇨ सर्वांगशोफ म्हणतात.

शोफगस्त फुगीर भागाला छिद्र पाडल्यास त्यातून द्रव स्रवतो. हा द्रव म्हणजे रक्तद्रवाचे निस्यंदन असते. शोफाशी निगडित विकारानुसार या द्रवाचे रासायनिक संघटन काही प्रमाणात भिन्न असू शकते. शोफद्रवाचे रासायनिक संघटन जवळजवळ लसीका द्रवासारखे असते. मात्र रक्तापेक्षा यात प्रथिनाचे प्रमाण पुष्कळ कमी असून त्याचे वि. गु. १.००६ ते १.०१२ इतके असते. हा द्रव शरीरात साखळू शकत नाही. त्याला पारस्राव म्हणतात. शोथजन्य शोफद्रवातील प्रथिनांचे प्रमाण अधिक म्हणजे ४ टक्क्यांहून जास्त असून त्याचे वि. गु. १.०१८ पेक्षा जास्त असते. त्याला नि:स्राव म्हणतात. नि:स्राव साखळू शकतो.

कारणे : कारणांनुसार शोफाचे शोथजन्य, रोधजन्य, हृदयविकारजन्य व वृक्कविकारजन्य हे मुख्य प्रकार केले जातात. यांशिवाय वाहिकातंत्रिकाजन्य व कुपोषणजन्य हे गौण प्रकारही आहेत. यांपैकी प्रत्येक प्रकाराला खाली वर्णन केलेल्या चार कारणांपैकी एक किंवा अधिक कारणे कमी-अधिक प्रमाणात कारणीभूत असतात.

केशिकाभित्तींची पारगम्यता, रक्तातील कलिलांमुळे उत्पन्न होणारा तर्षण दाब कमी होणे व द्रवाचा द्रवस्थितिक दाब वाढणे ही सर्वांगशोफाची तीन प्रमुख कारणे असून स्थानिक शोफ मुख्यतः लसीका प्रवाहातील रोधामुळे उत्पन्न होतो.

वृक्क, हृदय, नीला वा लसीका तंत्र यांचे रोग, कुपोषण किंवा ॲलर्जीशी निगडित प्रतिक्रिया यामुळेही शोफ होतो. ठराविक औषधे व विषे यांच्या विषारी परिणामांमुळेही ऊतकांत द्रव साचू शकतो.

केशिकांच्या भित्तींची पारगम्यता : पाणी, लवणे व विरघळलेले वायू केशिकेच्या भित्तींमधून सामान्यपणे मुक्तपणे पलीकडे जाऊ शकतात मात्र त्यांच्यामधून प्रथिने (रेणू मोठे असल्याने) अशी पलीकडे जाऊ शकत नाहीत. विषे, ऑक्सिजन-न्यूनता किंवा अंगघातजन्य विस्तारण यांची बाधा झाल्याने नलिकाभित्तींना बाधा होते. अशा वेळी केशिकांचा अंत:स्तर प्रथिनांना पारगम्य होतो. अशा प्रकारे प्रथिनांचे ऊतकात विसरण झाल्यास रक्तद्रवाचा ⇨ तर्षण दाब कमी होतो व ऊतकाचा तर्षण दाब वाढतो. परिणामी रक्तद्रव अधिक प्रमाणात बाहेर पडू शकतो व तो ऊतकातील मोकळ्या जागांमध्ये गोळा होतो.

शोथजन्य शोफात तसेच हृदयविकारात रक्तपुरवठा नीट न झाल्यामुळे या प्रकारचा शोफ होतो. गंभीर संसर्ग, शरीरात सतत चालणाऱ्या भौतिकी व रासायनिक क्रियांतील म्हणजे चयापचयातील बिघाड, श्वासरोध, अपायिता, प्रतिकिया, गौण अवसाद व तीव्र मूत्रपिंडदाह यांच्याशी निगडित असलेल्या शोफाला हेही एक कारण असू शकते. रक्तद्रवातील प्रथिनांचे प्रमाण घटल्यावर उद्‌भवणाऱ्या शोफसदृश स्थितीमागेही हे कारण असते.


रक्तातील व संयोजी ऊतकांतील तर्षण दाबातील बदल : रक्तातील प्रथिने व इतर ⇨ कलिलांमुळे रक्तवाहिन्यांत द्रव ओढून धरला जातो. या क्रियेला तर्षण दाब म्हणतात [→ तर्षण]. रक्तातील प्रथिनांचे प्रमाण घटल्यास हा दाब कमी होऊन रक्तद्रव बाहेर पडू शकतो. कारण नलिकांतील द्रव शोषणाऱ्या व धरून ठेवणाऱ्या प्रेरणा दुर्बल होतात. या बाबतीत अल्ब्युमीन हे सर्वांत महत्त्वपूर्ण प्रथिन आहे. रक्तद्रवातील प्रथिनाचे प्रमाण दर १०० लिटरमागे ३ गॅ.पेक्षा कमी झाल्यावर कलिल तर्षण दाब कमी होतो व तो रक्ताच्या जलस्थितिक दाबाला तोलून धरण्या-एवढा राहत नाही. रक्ताच्या जलस्थितिक दाबामुळे द्रव ऊतकात बाहेर लोटला जात असतो. परिणामी रक्तातील अधिक द्रव ऊतकात जातो व नवीन समतोल प्रस्थापित होईपर्यंत तेथेच राहतो. वृक्कविकारांत रक्तातील प्रथिने (मुख्यतः अल्ब्युमीन) मूत्रावाटे बाहेर पडल्याने तर्षण दाब कमी होऊन शोफ होतो. पोषणाच्या किंवा चयापचयाच्या दोषाशी, तसेच दुष्काळाशी निगडित असलेल्या दीर्घकालीन कुपोषणामध्ये अन्नघटक कमी पडल्याने तर्षण दाब घटून या प्रकारचा पोषणविषयक शोफ आढळतो.

शरीरातील अतिरिक्त मीठ व इतर लवणे वृक्कांमार्फत मूत्रावाटे शरीराबाहेर टाकली जातात. ही क्रिया⇨ पोष गंथीं च्या ⇨ हॉर्मोनां मुळे नियंत्रित होते. वृक्कविकारांत व पोष गंथींच्या काही विकारांत या क्रियेत बिघाड झाल्यास शोफ होतो. लवणे शरीरात मुख्यतः संयोजी ऊतकांत, अतिरिक्त प्रमाणात साठल्यास ऊतकांतील तर्षण दाब वाढतो. त्यामुळे द्रव ऊतकांत साठविलेला राहून शोफ होतो आणि रक्तद्रवाचा तर्षण दाब घटतो. परिणामी पाणी व त्याच्याबरोबर स्फटिकाभ पदार्थ ऊतकांत जातात. ही द्रव्ये (विशेषतः मीठ) ऊतकांतच धरून ठेवली जातात. अशा रीतीने पाणी आत घेतले जाते व ते ऊतकात राहते म्हणजे मूत्रावाटे त्वरेने बाहेर काढून टाकले जात नाही.

कोशिकांतील जलस्थितिक दाब वाढणे : हृदयाच्या स्पंदनामुळे रक्तावर दाब पडून ते पुढे पुढे ढकलले जाते. या दाबाला द्रवस्थितिक दाब म्हणतात. हृदयाचे स्पंदन दुर्बल झाल्यास हा दाब कमी पडतो व नीलांवाटे रक्त हृदयात परत जाण्याची क्रिया मंदावते. परिणामी रक्त नीलांमध्ये साचत जाऊन तेथील द्रवस्थितिक दाब वाढतो. त्याचा कोशिकांवरही परिणाम होऊन रक्तद्रव बाहेर पडू शकतो. याच कारणामुळे कोशिकांच्या अंत:स्तराला ऑक्सिजन कमी पडतो व त्यामुळे त्याची पारगम्यता वाढून शोफ होतो. या कारणाने हृदयविकारात शोफ होतो. तसेच यकृतविकारात उत्पन्न झालेल्या तंतूंचा दाब यकृत नीलांवर पडल्याने नीलांत रक्त साठून त्या नीलांच्या आगत शाखांतून पर्युदरात रक्त साठते.

प्राकृत अवस्थेत केशिकेच्या धमनीटोकातील जलस्थितिक दाब हा रक्तद्रवाचा तर्षण दाब तोलून धरण्यास पुरेसा असतो. त्याच्यामुळे द्रव केशिकेतून बाहेर ऊतकांतील मोकळ्या जागांत ढकलला जातो. केशिकेतील प्रवासात हा दाब पुरेसा घटतो. परिणामी प्रथिनांच्या तर्षण दाबाने द्रव नलिकेतील मोकळ्या भागांत परत ओढला जातो. केशिकेच्या नीलाटोकाशी जलस्थितिक दाब वाढला म्हणजे संतुलन बिघडते आणि रक्तद्रवातील प्रथिनांच्या तर्षण दाबाव्दारे होणारे ऊतक द्रवाचे शोषण कमी होते. अशा परिस्थितीत वाढलेला द्रव लसीका तंत्रामार्फत परत जातो परंतु ही परिस्थिती प्रगत होत गेल्यावर शोफ उद्‌भवतो.

हृदयाच्या निष्फलतेनंतर होणारा हृदीय शोफ हा या प्रकारचा सर्वांत सामान्य शोफ आहे. ऊतकांतील मोकळ्या जागांत साचलेल्या द्रवावर स्थानातील बदलांचा परिणाम होतो. शरीराच्या अवलंबी भागांत हा परिणाम अधिक लक्षणीय असतो. लसीका पोकळ्यांतही द्रव गोळा होतो. याचे शोफनिर्मितीला साहाय्य होते. ताणल्या गेलेल्या केशिकाभित्ती अधिक पारगम्य होतात. हृदीय शोफात हृदयाचे प्रदान कार्य कमी होऊन वृक्कीय रक्तप्रवाह व केशिकागुच्छाची गाळण्याची त्वरा कमी होते आणि लवण व पाणी यांचे उत्सर्जनही कमी होते. यामुळे कोशिकाबाह्य द्रव व रक्तद्रव यांचे प्रमाण वाढू शकते. पर्यायाने यानंतर नीलांमधील दाब वाढतो. फुप्फुसांतर्गत शोफ हा बहुधा हृदीय शोफाचा एक गौण प्रकार असतो. कोशिकांतील वाढलेल्या दाबाने अंगस्थिती शोफ उद्‌भवतो. हालचाल न करता व्यक्ती दिर्घकाळ उभी राहिल्यास अशी परिस्थिती उद्‌भवते आणि पाय व घोटे यांच्या अधस्त्वचीय ऊतकांत द्रव साचतो.

लसीका प्रवाहात रोध उत्पन्न होणे : ऊतकांतील आंतरकोशिकीय द्रवाचा काही भाग लसीका प्रणालीमार्फत परत रक्ताभिसरणात येतो. या मार्गात रोध उत्पन्न झाल्यावर स्थानिक शोफ होतो. उदा., विशेषतः उष्णकटिबंधात फायलेरियासारख्या कृमींमुळे लसीकावाहिन्यांमधील लसीकाप्रवाह बंद पडून ऊतकांत सूज निर्माण होते व शोफ उद्भवतो (उदा., हत्तीरोग). लसीकावाहिन्यांतील मारक अर्बुदाने अथवा अर्बुदादिकांचा लसीकावाहिन्यांवर बाहेरून दाब पडल्याने, शस्त्रकियेने लसीकावाहिन्या नष्ट झाल्याने किंवा रोखल्या गेल्याने स्थानिकीकृत शोफ होतो. मिलरॉय विकार हा चिरकारी आनुवंशिक शोफ लसीकारोधाने होतो, असे मानतात.

ॲलर्जीमध्ये हिस्टामीन एकाएकी बाहेर पडल्याने शोफ उत्पन्न होतो व त्याला ‘ वाहिकातंत्रिकाजन्य शोफ ’हे नाव आहे. कृमिकीटकांच्या दंशाने व पित्तामुळे त्वचेवर उठणाऱ्या गांधी हाही शोफाचा प्रकार आहे. पित्तामुळे त्वचा व श्लेष्मल (बुळबुळीत) स्तरावर तीव्र खाज येणारे फुगीर, शोफसदृश चट्टे (गांधी) पडून पूर्णपणे स्थानिक असा शोफ होतो तर वृक्कशोथजन्य शोफ हा सार्वदेहिक असतो आणि अवयव, चेहरा किंवा शरीराचा इतर भाग सुजण्याला सर्वांगशोफ असे संबोधतात.

उपचार : शोफ हे अनेक रोगांचे लक्षण असून वर वर्णन केल्याप्रमाणे शोफ निर्माण होण्यामागे अनेक प्रकिया कमी-अधिक प्रमाणात घडलेल्या असतात. म्हणून शोफाला कारणीभूत असणाऱ्या मूळ रोगाचे निदान करून त्याच्यावर विशिष्ट उपचार केले जातात. लक्षणानुसारी उपचार म्हणून आणि मुख्यतः हृदयविकारजन्य व वृक्कविकारजन्य शोफावर मूत्रवर्धक औषधे देतात. शरीरातील संयोजी ऊतकांत अतिरिक्त प्रमाणात साचलेला द्रव रक्तात शोषून वृक्कांमार्फत मूत्रावाटे बाहेर टाकण्याचे काम ही औषधे करतात.

पहा : अपपोषण जलोदर मीठ.

ढमढेरे, वा. रा.