सेऊल : दक्षिण कोरियाची राजधानी आणि देशातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या १,०५,८१,७२८ (२०११). हे देशातील सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, वित्तीय, प्रशासकीय आणि सार्वजनिक कार्यांचे प्रमुख केंद्र आहे. दक्षिण कोरियाच्या वायव्य भागात हान नदीच्या काठावर पीत समुद्रकिनाऱ्यावरील इंचॉन शहराच्या पूर्वेस ३२ किमी.वर हे वसले आहे. ते पर्वतीय प्रदेशाने वेढलेल्या सखल भागात आहे.
या शहराचा प्राचीन इतिहास इ. स. पू. पहिल्या शतकापासूनचा आढळतो. त्या काळी सध्याच्या शहराच्या ईशान्य भागात वसाहत असावी व त्यानंतर दक्षिणेकडे तिचा विस्तार झाला असावा. इ. स. १०६७ मध्ये कोर्यो राजघराण्याने याला नामग्याँग (सदर्न कॅपिटल) हे नाव दिले होते. त्यानंतर काही काळ ते हानयांग नावाने ओळखले जात होते. साँगग्ये (१३३५-१४०८) या यी घराण्यातील राजाने ही आपल्या राज्याची राजधानी केली (१३९४). सेऊल म्हणजे राजधानी यावरूनच या शहराला सेऊल हे नाव पडले. जपानी राजवटीत (१९१०-४५) सेऊल हे क्याँगसाँग नावाने ओळखले जाई. कोरियन युद्धात (१९५०-५३) सेऊलमधील अनेक इमारतींचा विध्वंस झाला होता; परंतु नंतर त्यांची पुनर्बांधणी करण्यात आली. कोरियाच्या विभाजनानंतर (१९४८) सेऊल ही दक्षिण कोरियाची राजधानी बनली. येथील हवामान मॉन्सून प्रकारचे असून हिवाळे थंड व कोरडे, तर उन्हाळे उष्ण व आर्द्र असतात. ऋतूंनुसार तापमानात बरीच तफावत आढळते. जानेवारीचे सरासरी तापमान -३° से, तर ऑगस्टमध्ये ते २५° से. असते. सरासरी वृष्टिमान १३७ सेंमी. असून वृष्टी प्रामुख्याने उन्हाळ्यात होते. वसंत व शरद ऋतूंमध्ये येथील हवामान विशेष आल्हाददायक असते.
साधारणपणे १९५० नंतर सेऊलचा वेगाने विस्तार होत गेला. कारखानदारी, व्यापार व सेवा व्यवसाय ही शहरातील प्रमुख आर्थिक साधने आहेत. वस्त्रोद्योग, मोटारी, यंत्रे तयार करणे, इलेक्ट्रॉनिकी उत्पादने (उदा., रेडिओ, दूरदर्शनसंच इ.), अन्नप्रक्रिया, छपाई व प्रकाशन हे येथील प्रमुख उद्योग आहेत. हे रस्ते, लोहमार्ग व हवाईमार्गांनी देशातील प्रमुख शहरांशी जोडलेले असून येथे भुयारी लोहमार्ग सुविधा आहे. इंचॉन हे सेऊलचे सागरी बंदर आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात सरळ व काटकोनात छेदणारे रस्ते आहेत. परंतु टेकड्यांच्या पायथ्यालगतचा शहरी भाग उंचसखल असल्यामुळे तेथील रस्ते अनियमित आढळतात. शहरातील चाँग-नो, म्याँग-डाँग व उल्ची-रो हे केंद्रीय व्यापारी विभाग (सेंट्रल बिझिनेस डिस्ट्रिक्ट-सीबीडी) आहेत. सीबीडीमध्ये बँका, विभागीय वस्तुभांडारे, उपहारगृहे, दुकाने व रंगमंदिरे तसेच अनेक प्रशासकीय कार्यालये आहेत.
सेऊल हे देशातील उच्च शिक्षणाचे प्रमुख केंद्र असून सेऊल नॅशनल, योन्सेई, कोरिया आणि ह्वा ही प्रमुख विद्यापीठे येथे आहेत. राष्ट्रीय सिम्फनी वाद्यवृंद, राष्ट्रीय शास्त्रीय संगीत संस्था, राष्ट्रीय संगीतिका गृहे व खाजगी रंगमंदिरे, संगीतिका गृहे व सार्वजनिक ग्रंथालये ह्या येथील प्रमुख सांस्कृतिक संस्था आहेत. शहरात अनेक गगनचुंबी इमारती आढळतात. आधुनिक इमारतींबरोबरच येथे अनेक ऐतिहासिक वास्तू आढळतात. त्यांमध्ये रोमन कॅथलिक चर्च, संगमरवरी पॅगोडा (तेरावे शतक), चाँगम्यो रॉयल स्मारक (१३९५), चांगडोक राजवाडा व सीक्रेट बगीचा (१४०५), आधुनिक कला व राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय इ. प्रसिद्ध आहेत. हान नदीतील योईदो बेटावरील आधुनिक इमारतीत दक्षिण कोरियाच्या विधानमंडळाचे कामकाज चालते. येथे १९८८ मधील ऑलिंपिक क्रीडासामने झाले होते.
चौधरी, वसंत