सेलँडाइन : दोन भिन्न वनस्पतींचे इंग्रजी सामान्य नाव. यांपैकी एक वनस्पती (सेलँडाइन पॉपी; लॅ. केलिडोनियम मॅजुस) ⇨ पॅपॅव्हरेसी कुलातील असून तिला ग्रेटर सेलँडाइन असेही म्हणतात. दुसरी वनस्पती (पाइलवर्ट; लॅ. रॅनन्क्युलस फिकॅरिया) रॅनन्क्युलेसी [⟶ रॅनेलीझ] कुलातील असून तिला लेसर सॅलेंडाइन असेही म्हणतात. दोन्हींना उद्यानांत स्थान असते.
सेलँडाइन पॉपी : (ग्रेटर सेलँडाइन). या द्विवर्षायू किंवा बहुवर्षायू ओषधीचे मूलस्थान समशीतोष्ण उत्तर उपध्रुवीय प्रदेश व युरेशिया असून ती यूरोपात काही जुन्या उद्यानांत लावलेली अथवा इतरत्र सामान्यपणे कोठेही वाढलेली आढळते. अमेरिकेत प्रथम ज्यांनी वस्ती केली त्यांनी इंग्लंडमधून बरोबर नेलेल्या अनेक बियांपासून झाडे बनविली. आता अटलांटिक किनाऱ्यावरच्या गावांमध्ये रस्त्यांच्या कडेने त्यांची वाढ झालेली आहे त्यांपैकी सेलँडाइन पॉपी एक आहे. तिचे खोड ठिसूळ, ३०–६० सेंमी. व केसाळ असून त्यात शेंदरी रंगाचा चीक असतो खोडावर एकाआड एक, अपूर्ण, पिच्छाकृती, खंडयुक्त व दातेरी पाने येतात. तिची फुले लहान, पिवळी व २·५ सेंमी. व्यासाची असून चामरकल्प फुलोऱ्यामध्ये उन्हाळ्यात (मे–ऑगस्ट) येतात.
फुलात संदले दोन, प्रदले चार, केसरदले १६–२४, किंजल फार आखूड व किंजल्क विभक्त असतो शिंबा लांबट व अरुंद असतात. त्या तडकून दोन शकले होतात व त्यांतून पडलेल्या काळ्या चकचकीत बियांपासून नवीन झाडे तयार होतात. तिचा शेंदरी रंगाचा चीक चामखिळीवर लावतात. चीक जनावरांना विषारी आहे. वनस्पती विरेचक, मूत्रल, स्वेदक व फलोत्सारी आहे. लेक डिस्ट्रिक्टमध्ये महाकवी विल्यम वर्ड्स्वर्थ यांच्या स्मारकावरचे चित्र ग्रेटर सेलँडाइनाचे आहे; परंतु त्यांच्या कविता लेसर सेलँडाइनबद्दल आहेत.
पाइलवर्ट : (लेसर सेलँडाइन). ही बहुवर्षायू ओषधी मूळची यूरोपीय असून ईशान्य अमेरिकेत रानोमाळ पसरली आहे. तिचे खोड जमिनीवर पसरून वाढते; मुळे मांसल, पाने साधी, दातेरी, लांब देठाची, हृदयाकृती, गुळगुळीत, ५ सेंमी.पर्यंत लांब व काहीशी मांसल असून उन्हाळ्याच्या आरंभी खोडावर नसतात. त्यांच्या बगलेत कंदिका असतात. फुले पिवळी, २·५ सेंमी. व्यासाची, एकेकटी व एप्रिल–मे मध्ये येतात. संदले तीन, प्रदले ८-९ व १५–२० संकृत्स्न फळांचे झुबके स्तबकासारखे असतात. कंदिकापासून नवीन वनस्पती येतात त्या ब्रिटनमध्ये सामान्य आहेत.
परांडेकर, शं. आ.; कुलकर्णी, सतीश वि.