सेना, आयर्टन : (२१ मार्च १९६०–१ मे १९९४). आंतरराष्ट्रीय ख्यातीचा ब्राझीलियन मोटार शर्यतपटू. सांता आना (ब्राझील) येथे मिल्टन दा सिल्व्हा आणि नीडी सेना-दा सिल्व्हा या दांपत्यापोटी जन्म. त्याने साऊँ पाउलू येथील रिओ ब्रँको या महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी संपादन केली (१९७७). बालपणापासूनच त्याला व्यायाम, शारीरिक कसरती, खेळ यांचा छंद होता. विशेषतः साहसपूर्ण व धोकादायक वेगवान मोटार शर्यतींमध्ये त्याला अधिक रुची होती. सातव्या वर्षीच तो आपल्या वडिलांची जीप चालविण्यास शिकला. वयाच्या तेराव्या वर्षापासून त्याने ‘कार्टिंग’ (स्पोर्टस्‌कार) या वेगवान मोटार शर्यतप्रकारात भाग घ्यायला सुरुवात केली.

 

आयर्टन सेना

दक्षिण अमेरिकन कार्टिंगमध्ये त्याने अजिंक्यपद मिळविले (१९७७). पुढे इंग्लंडमधील ‘फॉर्म्युला फोर्ड २०००’ स्पर्धेत त्याने विजेतेपद संपादन केले (१९८२). त्यानंतर ‘फॉर्म्युला वन’ (एफ्-१) मध्ये त्याने आपली कारकीर्द सुरू केली. ब्राझीलियन (१९८४), पोर्तुगीज (१९८५), ब्रिटिश (१९८६), कॅनडियन (१९८८), सान मारिनो (१९८९), जपानी (१९९०), अमेरिकन (१९९१), जर्मन (१९९३), ऑस्ट्रेलियन (१९९३) इत्यादी ग्रां प्री (ग्रँड प्रिक्स) जागतिक मोटार शर्यतींमध्ये त्याने विजेतेपद पटकाविले. त्याने सु. १६२ शर्यतींमध्ये सर्वाधिक –६५– ‘पोल पोझिशन्स’ (मोटार शर्यतीत प्रारंभी घेतलेली आघाडी) आणि ४१ विजय आपल्या नावावर कोरले (१९८४–९४). ग्रां प्री मधील त्याच्या या कामगिरीमुळेच तीन वेळा जागतिक अजिंक्यपदाचा बहुमान त्याला मिळाला (१९८८, १९९०, १९९१). ‘सर्वाधिक यशस्वी मोटारचालक’ (मोस्ट सक्सेसफुल ड्रायव्हर) म्हणून त्याची नोंद द गिनिज बुक ऑफ रेकॉर्डस् (१९९९) मध्ये झाली आहे. आपल्या कारकीर्दीच्या अत्युच्च शिखरावर असतानाच इटलीतील सान मारिनो ग्रां प्री शर्यतीवेळी (१९९४) त्याचा अपघाती मृत्यू झाला.

अतिवेगवान, साहसी व धोकादायक अशा मोटार शर्यतीत जगज्जेता ठरलेला सेना आपल्या विक्रमी व साहसपूर्ण कामगिरीने जगभर परिचित होताच; शिवाय तो सामाजिक कार्यासाठी व दानशूरपणासाठीही प्रसिद्ध होता. आपल्या वैयक्तिक मिळकतीतील काही रक्कम तो गरीब मुलांसाठी खर्च करत असे. पुढे त्याच्या मृत्यूनंतर त्याची बहीण व्हिव्हीअन हिने त्याच्या नावे सामाजिक विश्वस्त संस्था स्थापन केली. त्याच्या जागतिक दर्जाच्या कर्तृत्वावर द राइट टू विन (२००४) व सेना (२०१०) हे माहितीपट तयार करण्यात आले. आयर्टन : द हिरो रिव्हील्‌ड (२००४) हे ईर्नेश्तू रूद्रीगीस याने त्याच्यावर लिहिलेले पुस्तकही प्रसिद्ध आहे. ‘बी. बी. सी. स्पोर्ट्स’ या क्रीडा विभागाने सेना याचा ‘सर्वोत्तम जागतिक फॉर्म्युला वन ड्रायव्हर’ म्हणून गौरव केला (नोव्हेंबर, २०१२).

मिठारी, सरोजकुमार