सेठी, प्रमोद करण : (२८ नोव्हेंबर १९२७-६ जानेवारी २००८). भारतीय विकलांग चिकित्सक. ‘जयपूर फूट’ या नावाने परिचित असलेल्या कृत्रिम पायाचे निर्माते व प्रसारक म्हणून त्यांची ख्याती आहे. या कार्यासाठी त्यांना १९८१ मध्ये मागसायसाय पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार त्यांना सामूहिक नेतृत्व या शाखेत मानवाच्या कल्याणासाठी एका व्यक्तीने केलेल्या नेतृत्वाबद्दल देण्यात आला होता. प्रमोद करण सेठी हे डॉ. पी. के. सेठी या नावाने अधिक परिचित आहेत.
सेठी यांचा जन्म वाराणसी येथे झाला. सुरुवातीचे व पुढील वैद्यकीय शिक्षण त्यांनी भारतातच घेतले. उच्च शिक्षणासाठी ते स्कॉटलंडला गेले होते. भारतात परत आल्यावर ते जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे शल्यचिकित्सा या विषयाचे व्याख्याते म्हणून काम करू लागले. तेथे त्यांनी १९५८ मध्ये विकलांग चिकित्सा विभाग सुरू केला. बालपक्षाघाताने (पोलिओने) विकलांग झालेल्या रुग्णांना तेथे व्यावसायिक चिकित्सेच्या दृष्टीने प्रशिक्षण द्यायचे होते. त्यासाठी त्यांनी परंपरागत कारागिरीमध्ये कुशल असलेल्या रामचंद्र शर्मा यांना मदतीसाठी बोलाविले. शर्मा यांचे औपचारिक शिक्षण फक्त चौथी इयत्ता एवढेच झाले होते. मात्र ते अतिशय कुशल कारागीर होते. सेठी यांनी रुग्णालयात रुग्णांना कृत्रिम पाय दिले होते. ते कृत्रिम पाय महाग, जड व वापरायला गैरसोयीचे होते. शर्मा यांनी वजनाला अधिक हलके व स्वस्त असे कृत्रिम अवयव आणि विशेषत: कृत्रिम पाय स्थानिक कारागिरांकडून करून घ्यावेत, अशी सूचना सेठी यांना केली. दोघांनी एकत्रित प्रयत्न केले आणि रबरी टायर-दुरुस्ती करणाऱ्या स्थानिक कारागिरांची मदतही घेतली. या प्रयत्नांतून कृत्रिम पायांसाठीचे आवश्यक असलेले रबरी साचे तयार झाले. अशा प्रकारे शर्मा यांनी सेठी यांच्या अपेक्षेबरहुकूम कृत्रिम पाय तयार केले (१९६८).
कृत्रिम पायांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने सेठी व शर्मा या दोघांनी संशोधनाला वाहून घेतले. या संशोधनातून वजनाला अधिक हलके, बसविण्यास सुलभ आणि रुग्णाला विविध प्रकारच्या हालचाली करण्याची मुभा देणारे कृत्रिम अवयव तयार करण्याचे प्रयत्न झाले. या अवयवांचा फक्त पन्नास रुग्णांना उपयोग होऊ शकला. कारण हे अवयव मोठ्या प्रमाणात निर्माण करणे शक्य झाले नव्हते. याच काळात डी. आर्. मेहता नावाचे भारतीय प्रशासकीय सेवेतील एक वरिष्ठ अधिकारी अपघातात जखमी झाल्याने उपचार करून घेण्यासाठी या रुग्णालयात दाखल झाले होते. रुग्णालयात असताना व नंतरही मेहता यांनी जयपूर फूट निर्मितीत लक्ष घातले. त्यांचे उच्च पदांवर असलेले दोन भाऊही या कार्याकडे आकर्षित झाले. या सर्वांच्या प्रयत्नांमधून सेठी यांच्या काऱ्याची माहिती जगभर पसरली. मेहतांच्या प्रयत्नांमुळे भगवान महावीरांच्या २५००व्या जयंतीस ‘भगवान महावीर विकलांग साहित्य समिती’ ही संस्था स्थापन झाली. रुग्णांना कृत्रिम अवयव विनाशुल्क व आस्थापूर्वक वर्तनाद्वारे थोड्याच कालावधीत तयार करून देण्याचे काम ही संस्था करते.
जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयातील पुनर्वसन संशोधन केंद्रात सदर संस्था स्थापन झाल्यावर कृत्रिम पाय तयार करण्याचे काम जलदपणे होऊ लागले. परिणामी अधिकाधिक उपयुक्त असे कृत्रिम अवयव मोठ्या प्रमाणावर तयार होऊ लागले. या महाविद्यालयात सेठी विकलांग चिकित्सेचे प्राध्यापक व या केंद्राचे संचालकही झाले. या अवयवांसाठी उच्च घनतेचे पॉलिएथिलीन, वजनाला हलके ऊष्मामृदू प्लॅस्टिक (थर्मोप्लॅस्टिक), उच्च प्रतीचे रबर, ॲल्युमिनियम धातू वगैरे विविध पदार्थ वापरण्यात आले. कृत्रिम अवयवांची निर्मिती करणारे एक केंद्र तमिळनाडूमधील गांधीग्राम येथे सुरू करण्यात आले. यासाठी मदुराई येथील टीव्हीएस् रबर कारखान्याचे सहकार्य मिळाले होते. शिवाय भारतात विविध ठिकाणी आणि व्हिएटनाम, बांगला देश, कंबोडिया व मोझँबीक यांसारख्या देशांतही प्रशिक्षण देणारी व कृत्रिम अवयव बसविणारी केंद्रे स्थापन झाली. यामुळे पाय, हात यांसारखे कृत्रिम अवयव, कुबड्या तसेच कृत्रिम नाक, कान इत्यादीही मिळू लागले. शर्मा यांचे चिरंजीवही नंतर या कार्यात सहभागी झाले. सेठी १९८१ मध्ये निवृत्त झाले.
जयपूर फूट तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कृत्रिम अवयवांमुळे अपंग रुग्ण अनवाणी व खडबडीत जमिनीवरून चालणे, पळणे, सायकल चालविणे, शेतातील कामे करणे, झाडावर चढणे व गिर्यारोहण करणे अशी कामे सहजपणे करू शकतात. या कृत्रिम पायावर बूट घालण्याची गरज नसल्याने बुटांचा खर्च वाचतो. पाय दुमडणे वा मांडी घालणेही या कृत्रिम पायांमुळे शक्य होते. हे पाय नैसर्गिक पायांसारखेच दिसतात. पाण्यात वा ओल्या स्थितीत काम करण्यासही हे पाय सोयीचे आहेत. सेठी यांना रोटरी इंटरनॅशनल ॲवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची ब्रिटिश रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स फेलो म्हणून निवड झाली.
सेठी यांचे जयपूर येथे निधन झाले.
पहा : अवयव, कृत्रिम.
ठाकूर, अ. ना.
“