सेज : ह्या सामान्य इंग्रजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनस्पती दोन कुलांतील विशिष्ट प्रजातीत आढळतात. त्यांपैकी एक वनस्पती सायपेरेसी कुलातील कॅरेक्स प्रजातीत आणि दुसरी वनस्पती लॅबिएटी कुलातील सॅल्व्हिया प्रजातीत आहे. या दोन्ही वनस्पतींची माहिती पुढे दिली आहे.
सेज–१ : (कुल–सायपेरेसी). फुलझाडांपैकी एकदलिकित वर्गात कॅरेक्स या प्रजातीचा अंतर्भाव असून त्यामध्ये १,५००–२,००० जाती समाविष्ट आहेत व त्यांचा अधिक प्रसार समशीतोष्ण प्रदेशांत आहे; जगात इतरत्रही त्यांपैकी काही जाती आढळतात. सायपेरेसी कुलातील सर्वच वनस्पतींना सेज या इंग्रजी नावाने संबोधण्याची पद्धत रूढ आहे; त्या दृष्टीने आवश्यक ती माहिती ⇨ सायपेरेसी कुलात वर्णिली आहे. येथे फक्त कॅरेक्स प्रजातीतच समाविष्ट केलेल्या जातींसंबंधी थोडक्यात माहिती दिली आहे.
ह्या जाती गवतासारख्या दिसतात व काही लक्षणांत त्याच्याशी साम्य दर्शवितात [→ ग्रॅमिनी ग्रॅमिनेलीझ]. सेजचा दांडा त्रिकोणी असतो. त्यामुळे गोल दांड्याचा सेज गवतापासून सहज ओळखता येतो. त्या बहुवर्षायू ⇨ ओषधी असून पाणथळ जागी वाढतात व फुटव्यांनी त्यांचा शाकीय प्रसार होतो. पाने गवतासारखी साधी फुले लहान, एकलिंगी, एकत्र किंवा विभक्त असून फुलोरे कणिश प्रकारचे व त्यावर एकपुष्पे कणिशके असतात. स्त्री-पुष्पातील एक तूस किंजपुटाभोवती वाढून बनणाऱ्या शुष्क कृत्स्न फळाला क्लोम म्हणतात. कॅरेक्स प्रजातीतील जातीला एका गटात दोन किंजले व कणिशात दोन्ही प्रकारची पुष्पे असतात, तर दुसऱ्या गटात तीन किंजले असून पुं-कणिशे टोकावर व स्त्री-कणिशे खाली असतात क्लोमांच्या आकारातसुद्धा फरक असतो. रुंदट पानांच्या काही जाती बागेत शोभेकरिता कुंड्यांत किंवा कडेने वाफ्यात लावतात अभिवृद्धी बियांपासून वा फुटव्यांपासून करतात. काही जाती (कॅ. ॲरिनॅरिया व कॅ. इंडिका ) वालुकाराशीवर वाढतात. जमिनीतील घटक एकत्र बांधण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे त्यांची लागवड किनाऱ्याजवळ करतात, त्यामुळे जमिनीची झीज कमी होण्यास मदत होते. काही जातींच्या खोडापासून चटया करतात. जपानमध्ये काही जातींच्या पानांचा हॅटकरिता व दोऱ्याकरिता उपयोग करतात. काही जातींचे मूलक्षोड औषधी आहेत.
परांडेकर, शं. आ. कुलकर्णी, सतीश वि.
सेज–२ : [व्रणतुलसीबंधू; हिं. सीस्ती; इं. कॉमन (गार्डन) सेज, सॅलबिया सेफॅकस; लॅ. सॅल्व्हिया ऑफिसिनॅलिस ; कुल-लॅबिएटी (लॅमिएसी)] ⇨तुळससारखी दिसणारी ही बहुवर्षायू, मोठी, सुगंधी, सदापर्णी व क्षुपासारखी ओषधी असून मूळची भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील आहे. स्वयंपाकात व औषधात तिचा वापर सु. ३०० वर्षांपूर्वीपासून आहे व त्यामुळे ती सर्वत्र अद्यापही लागवडीत आहे. मात्र नाजूकपणामुळे तिची लागवड काळजीपूर्वक करावी लागते. रोमन साम्राज्याच्या काळी तिचे आरोग्यदायक महत्त्व माहीत झाल्यामुळे त्यांनी जिंकलेल्या प्रदेशात तिचा प्रसार केला. सध्या तिचे अनेक प्रकार लागवडीत आहेत. तिची उंची १५–३० सेंमी. पाने एकाच पेऱ्यावर दोन, समोरासमोर, अखंडित (२·५–३·८ सेंमी. लांब), टोकदार, तळाशी गोलसर किंवा निमुळती व कमी-जास्त लवदार फुलोरे सप्टेंबर–नोव्हेंबर मध्ये येतात. तसेच त्यांवर थोड्या पुंजवल्लरींच्या मंजिऱ्या येतात. फुले जांभळी, निळी किंवा पांढरी संवर्त घंटाकृती, लवदार व रंगीत पुष्पमुकुट इर्योष्ठक व रंगीत दोन केसरदले असतात [⟶ पुष्पबंध]. इतर सामान्य लक्षणे लॅबिएटी कुलात (लॅमिएसी) वर्णन केल्याप्रमाणे असतात.
ही वनस्पती सुगंधी, स्तंभक व पौष्टिक असून सुकी पाने उत्तेजक, वायुनाशी व अग्निमांद्यावर गुणकारी असतात. वनस्पतीचा फांट खरचटलेल्या भागावर लावतात, व्रणावर धावन म्हणून वापरतात व मुलाचे दूध तोडण्यास मातेला देतात. घसा व त्यातील गाठी आणि तोंडातील व घशातील व्रणांवर पानांच्या फांटाच्या गुळण्या करतात. मांसाहारी स्वयंपाकात स्वाद व इतर गुणाकरिता ह्या ओषधीची पाने फार महत्त्वाची आहेत. सेजचे तेल सुगंधी द्रव्यात वापरतात. नवीन लागवड बियांपासून करतात.
पहा : लॅबिएटी.
देशपांडे, ज. र.