एअर, ॲल्फ्रेड जूल्झ : (२९ ऑक्टोबर १९१०– ). प्रभावी ब्रिटिश तत्त्ववेत्ता. जन्म लंडन येथे. शिक्षण ईटन तसेच ख्राइस्ट-चर्च कॉलेज, ऑक्सफर्ड येथे. तार्किक प्रत्यक्षार्थवाद ह्या तात्त्विक विचारप्रणालीशी अधिक निकटचा परिचय करून घेण्यासाठी व्हिएन्ना विद्यापीठात काही काळ अध्ययन. १९३३ ते १९४६ पर्यंत युद्धाचा काळ सोडल्यास ऑक्सफर्ड येथे तत्त्वज्ञानाचा अध्यापक १९४६ ते १९५९ पर्यंत लंडन विद्यापीठात तत्त्वज्ञानाचा ‘ग्रोटे’ प्राध्यापक१९५९ नंतर ऑक्सफर्ड विद्यापीठात तत्त्वज्ञानाचा’वाइकहॅम’प्राध्यापक.

लँग्वेज, टूथ अँड लॉजिक ह्या १९३६ साली प्रसिद्ध झालेल्या एअरच्या ग्रंथाने तत्त्वज्ञानाच्या जगात बरीच खळबळ माजवली. तार्किक प्रत्यक्षार्थवादाच्या सिद्धांतांची तर्ककठोर व काहीशी आक्रमक मांडणी एअरने ह्या ग्रंथात केली आहे. ह्या ग्रंथातील मध्यवर्ती भूमिकेवर रसेल आणि व्हिट्‌गेनश्टाइन ह्यांच्या मतांचा प्रभाव ज्याप्रमाणे दिसून येतो, त्याप्रमाणे पारंपरिक ब्रिटिश ⇨ अनुभववादाचे अध्वार्यू असलेल्या बर्क्ली व ह्यूम ह्या तत्त्ववेत्त्यांच्या मतांचा प्रभावही तिच्यावर आढळून येतो. किंबहुना पारंपरिक ब्रिटिश अनुभववादाचा आजचा पाईक, असे एअरचे यथार्थपणे वर्णन करता येईल. ह्या ग्रंथात एअरने स्वीकारलेल्या भूमिकेचे वर्णन संक्षिप्तपणे असे करता येईल : विधान विश्लेषक तरी असते किंवा संश्लेषक तरी असतेते विश्लेषक असल्यास त्याच्यातील पदांच्या अर्थावरून ते सत्य आहे असे ठरते, उदा.,’मावशीला एकतरी बहीण असते’ ते संश्लेषक असल्यास त्यातील पदांच्या केवळ अर्थावरून ते सत्य आहे की असत्य आहे, हे निश्चित होत नाही आणि अशा विधानात जे सांगितलेले असते त्याची इंद्रियानुभवद्वारा प्रचीती घेऊन ते सत्य आहे की असत्य आहे हे ठरविता येत असेल, तरच ते विधान अर्थपूर्ण असतेनाहीतर अर्थशून्य असते. गणितातील व आकारिक तर्कशास्त्रातील विधाने विश्लेषक असतात. पारंपरिक तत्त्वमीमांसेतील विधाने संश्लेषक असतातपण इंद्रियानुभवद्वारा त्यांची प्रचीती घेता येत नसल्यामुळे ती अर्थशून्य असतातउदा.,’जग माया आहे आणि केवळ ब्रह्म सत्य आहे’, अशी विधाने सत्य आहेत की असत्य आहेत हा प्रश्नच उद्‍’वत नाही. कारण अर्थशून्य असल्यामुळे ती खरीखुरी विधानेच नसतातनैतिक विधाने संश्लेषक असतात, त्यांचीही प्रचीती घेता येत नाहीउदा.,’चोरी करणे वाईट’. तेव्हा नैतिक विधानेही, जी सत्य किंवा असत्य ठरू शकतील, अशा प्रकारची खरीखुरी विधाने नसतातही विधाने कित्येक प्रकारच्या कृत्यांविषयी बोलणाऱ्याच्या मनातील पसंती-नापसंती व्यक्त करतात आणि ऐकणाऱ्याच्या मनात त्यांच्याविषयी पसंती-नापसंतीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

‘विधान जर अर्थपूर्ण असायचे असेल, म्हणजे ते खरेखुरे विधान असायचे असेल, तर एकतर ते विश्लेषक तरी असले पाहिजे, म्हणजे त्याच्यातील पदांच्या केवळ अर्थावरूनच ते सत्य ठरत असले पाहिजे किंवा इंद्रियानुभवद्वारा त्याची प्रचीती घेता आली पाहिजे, म्हणजे ते सत्य आहे की असत्य आहे हे ठरविता आले पाहिजेपण विधान जर विश्लेषक नसेल आणि प्रचीतिक्षमही नसेल, तर ते खरेखुरे, अर्थपूर्ण विधानच असत नाही’. हे तत्त्व म्हणजे ⇨ तार्किक प्रत्यक्षार्थवादाने पुरस्कारिलेला विधानांच्या अर्थपूर्णतेचा निकष. ह्या निकषाच्या आधारे इंद्रियानुभवापलीकडे असलेल्या अंतिम वास्तवतेचे वर्णन करणारी पारंपरिक तत्त्वमीमांसेतील विधाने अर्थशून्य ठरविण्यात आली. अतिशायी वास्तवतेचे ज्ञान प्राप्त करून घेणे हे तत्त्वज्ञानाचे कार्य नव्हे, तर सामान्य व्यवहारात आणि विज्ञानात आपण जी वेगवेगळी विधाने करतो, त्यांचे विश्लेषण करून त्यांची तार्किक घडण स्पष्ट करणे हे तत्त्वज्ञानाचे कार्य आहे, ही भूमिका एअरने स्वीकारली.

एअरची तत्त्वज्ञानातील नंतरची कामगिरी साधारणपणे ह्या भूमिकेला धरूनच आहे.द फाउंडेशन्स ऑफ इंपीरिकल नॉलेज (१९४०) ह्या ग्रंथात त्याने भौतिक वस्तू अस्तित्वाचे अंतिम घटक आहेत, की वेदनदत्ते अस्तित्वाचे अंतिम घटक आहेत, असा आपल्यापुढील प्रश्न नसून, आपल्या अनुभवाचे वर्णन करण्यासाठी भौतिक वस्तूंची परिभाषा वापरावी, की वेदनदत्तांची परिभाषा वापरावी हा आपल्यापुढील प्रश्न आहे ह्या दोन पर्यायी भाषा आहेत, निरीक्षणाने ज्ञात होणार्‍या कोणत्याही वस्तुस्थितीचे वर्णन करायला दोन्हीही परिभाषा सारख्याच समर्थ आहेततेव्हा त्यांच्यातून निवड करायची ती केवळ सोयीच्या दृष्टीने करायची असतेकोणती परिभाषा वस्तुस्थितीला अधिक अनुरूप आहे हा प्रश्न उद्‌भवत नाही हे मत मांडले.प्रॉब्‍लेम ऑफ नॉलेज (१९५६) ह्या ग्रंथाच आपण साधारणपणे प्रमाण मानीत असलेल्या प्रत्यक्ष ज्ञान, स्मृती इ. ज्ञानप्रकारांच्या प्रामाण्याचे तात्त्विक संशयवादाच्या संदर्भात कोणत्या पद्धतीने समर्थन करता येईल, ह्या प्रश्नाचे विवेचन एअरने केले आहे.⇨ ज्ञानमीमांसेतील विविध समस्यांची त्याचप्रमाणे नीतिशास्त्रातील प्रश्नांची चर्च करणारे त्याचे फुटकळ निबंध फिलॉसॉफिकल एसेज (१९५४) आणि द कन्सेप्ट ऑफ ए पर्सन (१९६३) ह्या दोन ग्रंथांत संगृहीत करण्यात आले आहेत. द ओरिजिन्स ऑफ प्रॅग्मॅटिझम (१९६८) ही एअरचा सर्वांत अलीकडचा ग्रंथ. त्यात त्याने चार्ल्स एस्. पर्स आणि विल्यम जेम्स ह्या फलाप्रामाण्यवादी तत्त्ववेत्त्यांच्या विचारांचा परामर्ष घेतला आहे आणि त्यांच्या संदर्भात स्वचऋच्या प्रत्यक्षार्थवादी भूमिकेचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. बर्क्ली व ह्यूम ह्या अभिजात ब्रिटिश तत्त्ववेत्त्यांप्रमाणेच एअर आपल्या सुश्लिष्ट व प्रसन्न भाषाशैलीसाठी विख्यात आहे.

संदर्भ : 1. Passmore, John, A Hundred Years of Philosophy, London, 1957.

           2. Warnock, G. J. English Philosophy Since 1900, London, 1958.

रेगे, मे. पुं.