जडवाद : ही तत्त्वमीमांसेतील एक महत्त्वाची भूमिका आहे. अचेतन म्हणजे जडवस्तू हेच प्राथमिक किंवा प्रधान अस्तित्व आहे आणि आत्मा, चैतन्य किंवा मन ह्यांचे अस्तित्व फार तर दुय्यम किंवा गौण असते, हे मत ह्या भूमिकेचे सार आहे. आत्म्याचे, मनाचे तसेच मानसिक कृती, घटना, प्रक्रिया ह्यांचे अस्तित्व आत्यंतिक जडवादी समूळ नाकारतात. सौम्य जडवादी मनाचे अस्तित्व मानतात पण मानसिक घटना जडवस्तूवर, भौतिक प्रक्रियांवर आधारलेल्या असतात त्यांना स्वतंत्र, पृथक् अस्तित्व नसते, ही भूमिका स्वीकारतात.

जडवादी भूमिका सुसंगतपणे मांडायची किंवा तिचे समर्थन करायचे, तर प्रथम जडवस्तू किंवा भौतिक वस्तू म्हणजे काय, हे स्पष्ट करावे लागेल. सामान्यपणे जडवस्तू किंवा भौतिक वस्तू म्हणजे ज्या वस्तूला अवकाशात स्थान असते, जी कालात बदलत जाते आणि जिच्या ठिकाणी केवळ भौतिक धर्म असतात अशी वस्तू, असे आपण म्हणू. भौतिक धर्म म्हणजे आकार, आकारमान, वस्तूमान, घनता, गती, तपमान, विद्युत्‌भर इ. धर्म असे म्हणता येईल. म्हणजे ‘भौतिक धर्म’ ह्याची व्याख्या करता येणार नाही किंवा भौतिक धर्मांची संपूर्ण यादीही करता येणार नाही. पण भौतिक धर्म म्हणजे कोणत्या प्रकारचे धर्म, ह्याचे सामान्य दिग्दर्शन करता येईल. जाणीव, इच्छा, सुखदु:ख, निरीक्षणशक्ती इ. धर्म मानसिक धर्म आहेत, असे आपण म्हणू. आता भौतिक वस्तूची व्याख्या अशी करता येईल : ज्या वस्तूच्या ठिकाणी केवळ भौतिक धर्म आहेत, म्हणजे मानसिक धर्म नाहीत, अशी वस्तू म्हणजे भौतिक वस्तू. जडवादाचे म्हणणे असे, की अशा भौतिक वस्तूंनाच स्वतंत्र व स्वायत्त असे अस्तित्व असते. आत्मा, मने किंवा चैतन्य असा भौतिक वस्तूंहून वेगळा असा अस्तित्वप्रकार नाही. आत्म्याला, मनाला किंवा चैतन्याला स्वतंत्र, स्वायत असे अस्तित्व नसते. उदा., शरीराहून वेगळा असलेला आत्मा. अशा आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व असणार नाही. जडवादी भूमिका अनेक लोक स्वीकारतात. ह्याचे एक महत्त्वाचे कारण असे, की विश्वाच्या स्वरूपाचा, विश्वात ज्या घटना घडतात त्यांचा उलगडा करण्यात विज्ञानाला कल्पनातीत यश आले आहे. तेव्हा विज्ञानात विषेशतः भौतिकीत, स्वीकारण्यात आलेल्या उपपत्तीमध्ये वस्तूंच्या ज्या गुणधर्मांचा निर्देश करण्यात येतो, ते गुणधर्म म्हणजे भौतिक गुणधर्म, असे म्हणता येईल व मग जडवादी भूमिकेचा उलगडा असा करता येईल : जडवाद असे मानतो, की विश्वात ज्या ज्या घटना घडतात, त्या भौतिक असतात वा त्या केवळ भौतिक घटनांपासून निष्पन्न होत असतात. भौतिक घटना म्हणजे वरील अर्थाने जे भौतिक धर्म आहेत, असेच धर्म ज्यांच्या अंगी आहेत अशा घटना.

जडवादाचा इतिहास : प्राचिन पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात मन किंवा आत्मा (नाउस) हे भौतिक वस्तूंहून भिन्न अशा प्रकारचे अस्तित्त्व आहे, ही कल्पना प्रथम ॲनॅक्सॅगोरस (इ. स. पू. सु. ५००–४२८) ह्याने मांडली  व ती सॉक्रेटीस (इ. स. पू. सु. ४७०–३९९) आणि प्लेटो (इ. स. पू. सु. ४२८–३४८) ह्यांनी उचलून धरली. देहाहून भिन्न असलेला व देहात काही काळ वसणारा असा आत्मा प्लेटो मानीत असे. ज्या द्रव्यांच्या किंवा तत्त्वांच्या साहाय्याने विश्वाचा उलगडा ॲनॅक्सॅगोरसपूर्व तत्त्ववेत्ते करीत, त्यांचे स्वरूप संदिग्ध होते. ती भौतिक द्रव्ये असत पण त्यांच्यावर मानसिक गुणांचाही आरोप करण्यात येत असे. उदा., एम्पेडोल्लीझ (इ. स. पू. सु. ४९०–४३०) पृथ्वी, आप, वायू व तेज अशी चार द्रव्ये मानीत असे पण त्यांचे संघटन किंवा विघटन, प्रेम आणि द्वेष ह्या दोन शक्तींमुळे घडून येते, असेही तो मानीत असे. ह्या शक्ती मानसिक आहेत की भौतिक आहेत, हा प्रश्न त्याने स्पष्टपणे उपस्थितही केला नाही व म्हणून त्याचे उत्तरही त्याने दिले नाही. ल्युसिपस (इ. स. पू. सु. ४५०) व डीमॉक्रिटस (इ. स. पू. सु. ४६०–३६०) ह्या परमाणुवाद्यांची भूमिकाही जडवादी होती. रिक्त अवकाश आणि त्याच्यात भ्रमण करणारे परमाणू ह्यांच्याशिवाय विश्वात काहीही नाही, सर्व वस्तू परमाणूंच्या बनलेल्या असतात, हे सिद्धांत म्हणजे परमाणुवादाचा गाभा होय. पण आत्माही परमाणूंचाच बनलेला असतो आणि बाह्य वस्तूंपासून निघणाऱ्या, परमाणूंच्या बनलेल्या ‘त्वचा’ जेव्हा ज्या परमाणूंचा आत्मा बनलेला असतो त्यांच्यावर आदळतात, तेव्हा वेदने निर्माण होतात, असेही परमाणूवादी मानीत. पुढे ⇨एपिक्यूरस  (इ. स. पू. ३४२ – २७०) आणि लुक्रीशिअस (इ. स. पू. सु. ९६–५५) ह्यांनीही ल्यूसिपस–डीमॉक्रिटस ह्यांचा परमाणुवाद, त्याला काही मुरड घालून स्वीकारला व त्याच्या पायावर एक नैतिक जीवनमार्ग आधारला. सर्व प्रकारच्या धार्मिक अंधश्रद्धांपासून सुटका करून घेऊन माणसाने शांत, समघात चित्ताने जगावे, ह्यांच्यात त्याचे कल्याण असते भौतिक सृष्टीच्या संदर्भातच माणसाला व्यवहार करता येतो, ह्या व्यवहाराने जी कायिक व मानसिक सुखे प्राप्त करून घेता येतात, त्याच्यातच माणसाचे कल्याण सामावलेले असते, ह्या कल्पनांवर जडवादी नीती आधारलेली असते [⟶ परमाणुवाद, ग्रीक एपिक्यूरस मत].

मध्युगात ख्रिस्ती धर्मशास्त्र आणि ॲरिस्टॉटलचे तत्त्वज्ञान ह्यांचा पगडा यूरोपमधील विचारसरणीवर होता पण सतराव्या शतकात ⇨ प्येअर गासँदी  (१५९२–१६५५) आणि ⇨ टॉमस हॉब्ज  (१५८८–१६७९) ह्यांनी जडवादी तत्त्वज्ञानाचे प्रतिपादन केले व ते बरेच प्रभावशाली ठरले. गासँदीने त्या काळी प्रचलित असलेल्या ॲरिस्टॉटलवादी तत्त्वज्ञानाचा अव्हेर केला व त्याऐवजी एपिक्यूरसच्या परमाणुवादी तत्त्वज्ञानाची स्थापना केली पण एपिक्यूरसच्या परमाणुवादाला त्याने मुरडही घातली. ह्या मताप्रमाणे सर्व भौतिक वस्तू परमाणूंच्या बनलेल्या असतात मानवी ज्ञानही अखेरीस भौतिक वस्तूंपासून माणसांना जी वेदने प्राप्त होतात, त्यांचे बनलेले असते पण गासँदी ईश्वर मानीत होता व म्हणून परमाणू ईश्वराने निर्माण केलेले असतात, असे त्याचे प्रतिपादन होते. उलट हॉब्जचा जडवाद अधिक निखळ होता. भौतिक वस्तूला किंवा जडवस्तूलाच अस्तित्व असते, जे काही आहे त्याचे जडवस्तू ह्या स्वरूपातच अस्तित्व असते, हा त्याचा मूलसिद्धांत होता. जडवस्तूची व्याख्या जिला आपल्या अनुभवाबाहेर अस्तित्व असते आणि जिला विस्तार असतो अशी वस्तू, अशी तो करीत असे. म्हणून हॉब्ज रिक्त अवकाश असू शकतो असे मानीत नसे. कारण अवकाशाचा कोणताही भाग आपण घेतला, तरी त्याला विस्तार असतो व म्हणून हॉब्जच्या व्याख्येप्रमाणे ती जडवस्तू ठरते. तेव्हा सर्व अवकाशात जडद्रव्य ओतप्रोत भरलेले आहे, असा हॉब्जचा सिद्धांत होता. ज्याप्रमाणे विश्वात केवळ जडद्रव्य आहे असे हॉब्ज मानीत असे, त्याप्रमाणे कोणताही बदल म्हणजे अखेरीस जडवस्तूंची गती असते, असेही तो मानीत असे. एक जडवस्तू दुसऱ्या जडवस्तूवर आदळल्यामुळेच गती निर्माण होते. वेदने म्हणजे माणसाच्या शरीरात निर्माण होणाऱ्या गती असतात आणि वेदनांतील बदल म्हणजे ह्या गतींत होणारे बदल होत. रंग, स्वाद, गंध इ. जे वेद्य गुण प्रतीत होतात त्यांचे अस्तित्व, ज्या ज्ञात्याला प्रतीत होतात, त्या ज्ञात्यामध्ये असते पण ज्ञाता ह्या भासांचे बाह्य वस्तूंवर प्रक्षेपण करतो व म्हणून वस्तूंचे गुण ह्या स्वरूपात ते ज्ञात्याला प्रतीत होतात. पण संवेदन, विचार इ. मानसिक व्यापार ह्या कोणत्या प्रकारच्या शारीरिक गती असतात व कोणत्या जडवस्तूंचा शरीराशी संपर्क आल्यामुळे ह्या गती निर्माण होतात, ह्याचा उलगडा हॉब्ज करू शकला नाही. शिवाय माणसाला प्रतीत होणारे भास भौतिक असतात की नाही, ह्याचेही नीट स्पष्टीकरण त्याने केलेले नाही.


गासँदी व हॉब्ज ह्यांच्या जडवादाच्या विरोधी मत ⇨ रने देकार्त  (१५९६–१६५०) ह्याने प्रभावीपणे मांडले. देकार्तच्या मताप्रमाणे विश्वात दोन भिन्न, परस्परविरोधी  आणि स्वायत्त अशी द्रव्ये आहेत. पहिले द्रव्य म्हणजे द्रव्यवस्तू आणि दुसरे जडवस्तू म्हणजे मन. विस्तार हा जडवस्तूचा व्याख्यापक धर्म किंवा सत्त्व होय. उलट जाणीव हा मनाचा व्याख्यापक धर्म होय. ही दोन द्रव्ये एकमेकांपासून स्वतंत्र व स्वायत्त असतात. जडद्रव्य आणि चैतन्य, शरीर आणि आत्मा किंवा मन ह्यांच्यात द्वैत मानणाऱ्या विचारपंथांची आधुनिक काळातील सुरुवात देकार्तपासून झाली. ह्या परंपरेचा जडवादाला विरोधही झाला.

आधुनिक काळातील जडवादाची मुळे दुहेरी होती. एकतर एपिक्यूरसप्रमाणे धार्मिक अंधश्रद्धेमुळे माणसे भयग्रस्त होतात व जे सुख त्यांना स्वतःच्या प्रयत्नांनी  साधता येते त्यालाही आचवतात, या जाणिवेतून धार्मिक श्रद्धेचा अव्हेर करणारा जडवाद उदयाला आला पण शिवाय भौतिकी व विशेषतः शारीरक्रियाविज्ञान ह्यांच्या झालेल्या प्रगतीमुळे माणसाच्या सर्व वर्तनाचा–शारीरिक व मानसिक वर्तनाचा–संपूर्ण उलगडा केवळ भौतिक विज्ञानांच्या साहाय्याने करता येईल, अशी आशा निर्माण झाली होती. माणूस निसर्गात उठून दिसतो, ह्याचे कारण माणसाचे मानसिक वर्तन विशेषतः त्याचे विवेकी वर्तन. उदा., त्याचे तर्कशुद्ध विचार, नैतिक आचरण इत्यादी. तेव्हा माणसाच्या स्वरूपाचा उलगडा करायचा, तर जडवस्तूहून भिन्न मन किंवा आत्मा हे चित्स्वरूप तत्त्व मानावे लागते, असे अनेकांना वाटते. पण जडद्रव्याचे बनलेले माणसाचे शरीर आणि त्याचे चित्स्वरूप मन ही मानवी प्रकृतीत कशी एकवटू शकतात, हे गूढ कायमच राहते. देकार्तपुढेही हे गूढ होते. ह्याऐवजी जडद्रव्य हेच एकमेव द्रव्य असते, असे मानून जर सर्व मानवी व्यवहाराचा उलगडा करता येतो असे दाखवून देता आले, तर मानवी ज्ञानाचे स्वरूप बंदिस्त व एकसंध होईल. शारीरक्रियाविज्ञानाच्या विकासामुळे अशी शक्यता निर्माण झाली होती. अठराव्या शतकाच्या सुरुवातीपासून ह्या दिशेने प्रयत्न होऊ लागले होते. त्यातील सर्वांत प्रसिद्ध व प्रभावशाली प्रयत्न म्हणजे झ्यूल्यां ऑफ्रे द ला मेत्री (१७०९–५१) ह्याचा L Homme machine  (म. शी. मानवी यंत्र) हा ग्रंथ. ला मेत्री हा एक वैद्य होता. ह्या ग्रंथात त्याने मानवी आत्मा चित्स्वरूप आहे, ह्या मताचा अव्हेर केला व सर्व मानसिक व्यापार हे पूर्णपणे शारीरिक व्यापार असतात, ह्या मताचा पुरस्कार केला. बोलणे, इतरांच्या बोलण्याचा अर्थ ग्रहण करणे, वस्तू ओळखायला शिकणे, योग्य-अयोग्य ह्यांच्यात भेद करायला शिकणे इ. ज्यांना आपण विशेषत्वाने मानवी असे व्यवहार मानू, तेही शरीर व विशेषतः मेंदू ह्यांतील घडामोडींवर आधारलेले असतात व म्हणून शारीरिक व्यापार असेच त्याचे स्वरूप असते, असे त्याने प्रतिपादन केले. पण ह्या विश्लेषणात ला मेत्रीला एक अडचण आली. ‘आपल्याला ज्या वेदनांचा आणि मानसिक व्यापारांचा अनुभव येतो, त्याचे स्थान काय?’ हा प्रश्न उरतोच व त्याचे समाधानकारक उत्तर ला मेत्रीला देता आले नाही. ला मेत्रीचे शारीरक्रियाविज्ञान बरेचसे ओबडधोबड होते पण मज्जाप्रक्रियांच्या आधाराने सर्व मानसिक व्यवहारांचा उलगडा करण्याच्या त्याच्या कार्यक्रमाला बराच पाठिंबा मिळाला आहे.

अठराव्या शतकातील सर्वांत प्रसिद्ध जडवादी तत्त्ववेत्ता म्हणजे पॉल आंरी दीत्रीक ऑलबाक (१७२३–८९) हा होय. हा जन्माने जर्मन होता पण त्याने आपले सर्व आयुष्य पॅरिसमध्ये घालविले. Systeme de la nature (म. शी. निसर्गाची व्यवस्था) ह्या १७७० मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात त्याने आपले तत्त्वज्ञान मांडले आहे. धर्मिक श्रद्धेवर हल्ला करणे, हा ह्या ग्रंथाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. ऑलबाकच्या मताप्रमाणे निसर्ग ही एक सर्वव्यापी व एकसंध अशी व्यवस्था आहे. निसर्ग एकाच तत्त्वाचा बनलेला आहे आणि हे तत्त्व म्हणजे गतिमान असे जडद्रव्य. ह्याचा अर्थ असा, की ज्या ज्या कशाला अस्तित्व आहे, ते ते गतिमान असलेली भौतिक वस्तू किंवा परमाणू ह्या स्वरूपाचे असते सबंध विश्वाची कोणत्याही एका काळची अवस्था घेतली ही अवस्था विश्वातील सर्व वस्तूंच्या त्या काळच्या गतींनी बनलेली असते–तर त्या अवस्थेपासून विश्वाची पुढची अवस्था कार्यकारण–नियमाला अनुसरून निष्पन्न होते. कोणत्याही भौतिक वस्तूच्या ठिकाणी असलेली गती तिच्यावर दुसऱ्या भौतिक वस्तूचा आघात झाल्यामुळे निर्माण झालेली असते. असा भौतिक आघात हेच जगात ज्या कोणत्या घटना घडतात त्यांचे एकमेव कारण असते. माणूस हा निसर्गाचा भाग आहे व म्हणून गतिमान अशी भौतिक वस्तू हेच माणसाचेही स्वरूप आहे. माणसाची वेदने, भावना,  इच्छा, सर्व बौद्धिक व्यापार ह्यांचेही स्वरूप माणसाच्या शरीराच्या अंतर्भागात होणाऱ्या क्रिया किंवा हालचाली असेच असते. ऑलबाकच्या मते आपले सर्व मानसिक व्यापार भावावस्थांवर आधारलेले असतात आणि कोणतीही भावावस्था म्हणजे शरीराची अंतर्गत अवस्था म्हणजे भौतिक अवस्थाच असते. भौतिक वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, ह्या वस्तुस्थितीचा उलगडा करण्यासाठी भौतिक द्रव्य चार प्रकारचे–पृथ्वी, आप, अग्नी व वायू अशा चार प्रकारचे–असते, असे ऑलबाक मानीत असे. ह्या चार प्रकारांचे वेगवेगळ्या प्रमाणात मिश्रण झाल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या भौतिक वस्तू निर्माण होतात.

ए. एल्. लाव्हाझ्या (१७४३–९४) यांच्या संशोधनामुळे रसायन शास्त्राचा जेव्हा विकास झाला, तेव्हा जडवादी विचारसरणीला भक्कम वैज्ञानिक बैठक लाभली. कारण केवळ भौतिक द्रव्ये आणि त्यांच्यामध्ये कार्यकारणनियमांना अनुसरून होणाऱ्या भौतिक क्रियाप्रतिक्रिया ह्यांच्या साहाय्याने रासायनिक क्रियांचा संपूर्ण उलगडा होतो, हे सिद्ध झाले. शिवाय प्राण्यांच्या शरीरांत ज्या सेंद्रिय प्रक्रिया घडून येतात, त्यांचे स्वरूपही रासायनिक व म्हणून भौतिक असते, असे मानता येऊ लागला व म्हणून एकसंघ अशा भौतिक निसर्गाची संकल्पना प्रमाण म्हणून स्वीकारता येऊ लागली.

भौतिक विज्ञानावर आधारलेल्या जडवादाचा पुरस्कार एकोणिसाव्या शतकात अनेक वैज्ञनिकांनी व तत्त्ववेत्त्यांनी केला. लूटव्हिख बूखनर (१८२४–९९) ह्याने Kraft und stoff  (म. शी. ऊर्जा व द्रव्य) ह्या १८५५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या आपल्या ग्रंथात जडद्रव्याशिवाय अन्यत्र ऊर्जा किंवा शक्ती नसते आणि ऊर्जेशिवाय जडद्रव्य नसते, हे तत्त्व अनुभवाधिष्ठित विज्ञानावर आधारलेले आहे व म्हणून आपण ते स्वीकारले पाहिजे, अशी भूमिका मांडली. कार्ल फोख्ट (१८१७–९५), एमील ड्यू ब्वारेमाँ (१८१८–९६)  प्रभृती शास्त्रज्ञांनी शारीरिक प्रक्रियांचा उलगडा केवळ रसायनशास्त्राच्या तत्त्वांना अनुसरून करता येतो, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. युरिया इ. सेंद्रिय संयुगे –म्हणजे शरीरांतर्गत होणाऱ्या प्रक्रियांचा परिणाम म्हणून निर्माण होणारी संयुगे–प्रयोगशाळेत रासायनिक संश्लेषणाने सिद्ध करता येतात, हे स्पष्ट झाले. हेर्मान हेल्महोल्टस (१८२१–९४) ह्याने प्राण्याचे शरीर म्हणजे जिच्यातील ऊर्जेचे संरक्षण होत असते अशी भौतिक व्यवस्था असते, हे दाखवून दिले. ह्यामुळे प्राणी, वनस्पती इ. सजीव वस्तू ह्या गुंतागुंतीच्या भौतिक-रासायनिक व्यवस्थाच असतात, भौतिक शास्त्रांच्या सिद्धातांचा उपयोग करून त्यांचे स्वरूप पूर्णपणे समजून घेणे शक्य असते सजीव पदार्थांची घडण किंवा त्यांचे वर्तन ह्यांचे स्पष्टीकरण करण्यासाठी प्राणतत्त्व ह्यासारख्या अ-भौतिक तत्त्वाचा आधार घ्यावा लागत नाही, ह्या मताला बळकटी आली. चार्ल्‌स डार्विनच्या ऑरिजिन ऑफ स्पीशिज  (१८५९) आणि डिसेंट ऑफ मॅन  (१८७१) तसेच टी. एच्. हक्सली ह्यांच्या मॅन्स प्लेस इन नेचर (१८६३) ह्या ग्रंथांनी उत्क्रांतिवादाचा सिद्धांत त्याला आधारभूत असलेल्या सर्व भक्कम अनुभवाधिष्ठित पुराव्यासहित मांडला व त्यामुळे प्राण्यांच्या गुंतागुंतीच्या शरीररचनेचा उलगडा करण्यासाठी कोणत्याही स्वरूपाच्या निसर्गप्राप्त अशा चित्‌शक्तीचे साहाय्य घ्यावे लागत नाही, हे स्पष्ट झाले. ह्या सर्वांचा परिणाम असा झाला, की जीवशास्त्रज्ञ, शारीरक्रियावैज्ञानिक हे आपापल्या क्षेत्रात स्वाभाविकपणे जडवादी दृष्टिकोण स्वीकारू लागले. म्हणजे केवळ भौतिक व रासायनिक संकल्पनांच्या व नियमांच्या साहाय्याने सजीव पदार्थाच्या घडणीचा  व वर्तनाचा संपूर्ण उलगडा करता येतो, ह्यासाठी अ-भौतिक अशा कोणत्याही तत्त्वाचा आधार घ्यावा लागत नाही, असा दृष्टीकोण स्वीकारून आपापल्या क्षेत्रात ते संशोधन करू लागले. सर्वसाधारण सुशिक्षित वर्गातही जडवादी भूमिका बरीच रूढ झाली.


विसाव्या शतकात जडवादाला पुष्टी देणारी महत्त्वाची वैज्ञानिक घटना म्हणजे ‘सायबरनेटिक्स’ वा संक्रांतिविज्ञान ह्या विज्ञानशाखेचा झालेला विकास. संक्रांतिविज्ञान म्हणजे थोडक्यात गणकयंत्रांचे शास्त्र. ही गणकयंत्रे माहिती गोळा करतात, तिचा अर्थ लावतात, माहिती साठवून ठेवतात व ह्या सर्व माहितीचा उपयोग करून समस्या यशस्वीपणे सोडवितात. प्राणी, वनस्पती इ. सजीव पदार्थांच्या अंतर्भागात ज्या प्रक्रिया घडतात, त्यांचे स्पष्टीकरण करण्यासाठी ज्याप्रमाणे अ-भौतिक अशा प्राणतत्त्वाचा आधार घ्यावा लागत नाही, त्याप्रमाणे प्राण्यांच्या किंवा माणसांच्या गुंतागुंतीच्या बौद्धिक व्यापारांचा उलगडा करण्यासाठीही ‘मन व ‘आत्मा’ ह्यांसारख्या अ-भौतिक तत्त्वांचा आधार घ्यावा लागत नाही, असे संक्रातिविज्ञानातील शोधांचे तात्पर्य आहे, असे म्हणता येईल. गणकयंत्रांची रचना ज्या भौतिक तत्त्वांना अनुसरून प्राण्यांच्या व माणसांच्या मज्जासंस्थेची घडण झालेली असते असे मानले, तर सर्व मानसिक व्यापारांचा उलगडा केवळ भौतिक तत्त्वांच्या आधारे करता येतो, असे म्हणता येईल.

जडवादाविरुद्ध दोन महत्त्वाचे आक्षेप घेण्यात येतात. एक असा, की आपल्याला साक्षात अनुभव येत असतात व जाणिवा उत्पन्न होतात. हे अनुभव वा जाणिवा आपण जाणतो आणि हे अनुभव म्हणजे केवळ आपल्या शरीराच्या अवस्था नसतात. उदा., मी जेव्हा वेदनेने कळवळतो तेव्हा मला वेदनेचा साक्षात अनुभव येत असतो किंवा मला कंटाळा आलेला असतो व फिरायला जावे असे मी ठरवितो. मला येत असलेला वेदनेचा वा कंटाळ्याचा अनुभव, फिरायला जाण्याचा उद्देश, ह्या मानसिक गोष्टी आहेत, भौतिक नव्हेत. पण काही मानसशास्त्रज्ञ व काही तत्ववेत्ते ह्यांनी ह्या बाबतीत वेगळी मानसशास्त्रज्ञ भूमिका स्वीकारली आहे. आपल्या साक्षात अनुभवांचे स्वरूप गूढ आहे. एकतर इतरांच्या साक्षात अनुभवांशी माझा साक्षात परिचय होऊ शकत नाही. माझ्या साक्षात अनुभवांचे वर्णन जेव्हा मी करू जातो, तेव्हा भौतिक वस्तूंचे व घटनांचे वर्णन करण्याइतके ते साधे नसते, असे मला आढळून येते. उदा. ‘मला कंटाळा वाटतो’ असे मी म्हणेन पण ह्या कंटाळ्याचे वर्णन करणे मला जमणार नाही. कंटाळा आलेला असणे म्हणजे एका विशिष्ट रीतीने वागणे आणि हे वागणे शारीरिक असते. तेव्हा आपल्या मानसिक घटना म्हणजेएका वेगळ्या, अ-भौतिक प्रकाराच्या घटना आहेत असे न मानता, मानसिक घटना म्हणजे केवळ काही वैशिष्टपूर्ण रीतीने वागण्याच्या प्रवृत्ती, अशीच त्यांची व्याख्या करणे योग्य ठरेल. ‘मला राग आला’, ह्या वाक्याने माझ्या मनात काय घडले याचे वर्णन होत नाही, तर मी कसा वागत होतो व कसे वागण्याकडे माझी प्रवृत्ती झाली होती, हे हे वाक्य सांगते. विचार म्हणजे आपण जे शब्द किंवा वाक्य बोलतो ते शब्द किंवा वाक्य बाहेरच्या स्नायूंनी व्यक्त न होता, आतल्या आत बोलले जाते एवढाच याचा अर्थ वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ करतात. पण मानसिक घटनांचा असा वर्तनवादी अर्थ लावणे तत्त्वतः शक्य आहे, हे अजून कुणी दाखवून दिलेले नाही. दुसरा आक्षेप असा, की परचित्तज्ञान (टेलिपॅथी) इ. गूढ अनुभवांचे स्पष्टीकरण जडवाद करू शकत नाही किंबहुना ह्या प्रकारच्या घटना जडवादाशी विसंगत आहेत. अशा ‘गूढ’ घटना घडतात, हे आता अनुभवाने सिद्ध झाले आहे  पण त्यांचा उलगडा कसा करायचा, याची दिशा अजून स्पष्ट झालेली नाही आणि जडवादाशी सुसंगत ठरेल असे त्याचे  स्पष्टीकरण करता येणार नाही, हेही सिद्धझालेले नाही.

जडवादी विचारपंथांमधील एक महत्त्वाचा पंथ म्हणजे ⇨ कार्ल मार्क्स  (१८१८–८३) व ⇨ फ्रीड्रिख एंगेल्स (१८२०–९५) ह्यांनी पुरस्कारलेला द्वंद्वात्मक जडवाद होय. तो मार्क्सवाद ह्या नावानेही ओळखला जातो[⟶ मार्क्सवाद].

रेगे, मे. पुं.

भारतीय विचार : अचेतन जडद्रव्यच मुळात आहे, चेतन जीव हा जडद्रव्याचाच विकार किंवा जडद्रव्याचीच कार्यरूप परिणती आहे, असे मत उपनिषत्‌कालापासून भारतात प्रचलित आहे. विश्वाचे मूलभूत कारण ईश्वर नसून पृथ्व्यादी भूतद्रव्येच आहेत, असे एक मत श्वेताश्वतनिषदात सांगितले आहे. काल, स्वभाव म्हणजे प्रकृती, नियती किंवा यदृच्छा यांपैकी एकच मूलभूत तत्त्व मानणाऱ्याची मतेही निर्दिष्ट केली आहेत. देहाहून निराळा, मृत्यूनंतर ज्याचे अस्तित्व राहते, असा आत्मा नाही असे जडवादी मत कठोपनिषदात सांगितले आहे. पृथ्वी, जल, तेज व वायू ही चारच मूलभूत भूतद्रव्ये विश्वात असून त्यांच्या संयोगामुळे सजीव शरीर निर्माण होते मद्य हा विकार ज्याप्रमाणे किण्वादिकांपासून म्हणजे फसफसणाऱ्या द्राक्षादी फळांच्या रसापासून तयार होतो, त्याचप्रमाणे जीवद्रव्ये तयार होतात, असे मत बृहस्पतीने व चार्वाकाने मांडले आहे. चार्वाकाच्या किंवा बृहस्पतीच्या मताप्रमाणे विश्वाची रचना, विश्वातील व्यवस्था, ही विश्वाच्या स्वभावातून सिद्ध होते. राघूचा हिरवा रंग, कमळाचे मार्दव, मोराच्या पंखाचे वैचित्र्य, ऋतुचक्राचा नियमितपणा, सूर्य, चंद्र इ. आकाशस्थ गोलांचे नियमित परिवर्तन इ. गोष्टी या वस्तुस्वभावाच्या निर्दशक आहेत. या विश्वाच्या रचनेच्या पाठीमागे कोणीतरी स्वतंत्र सर्वज्ञ परमेश्वरच आहे, असे मानण्यास निश्चित प्रमाण नाही. चार्वाक  किंवा बृहस्पती यांचे हे मत म्हणजे केवळ भौतिकवाद किंवा जडवाद होय. [⟶ लोकायतदर्शन].

प्राचीन उपनिषदांमध्ये केवळ जडवादाच्या विरुद्ध असा चिद्-अद्वैतवाद म्हणजे ब्रह्माद्वैतवाद प्रतिपादिला आहे. चैतन्यरूप ब्रह्माचीच जड पंचमहाभूते ही परिणती आहे, असे नेमके चार्वाकाच्या विरुद्ध मत उपनिषदांमध्येप्रतिपादिले आहे. चार्वाकाशिवाय जडाचे म्हणजे अचेतनाचे मूलभूत स्वतंत्र अस्तित्व मानणारी अनेक भारतीय तत्त्वदर्शने आहेत. ही दर्शने जड आणि चेतन यांचे मूलभूत स्वतंत्र अस्तित्व मानतात त्यांना सामान्यपणे द्वैतवादी दर्शने म्हणता येते. ⇨सांख्यदर्शन  यांपैकीच एक दर्शन होय. सांख्यदर्शन दोन प्रकारचे : निरीश्वर सांख्य व सेश्वर सांख्य. निरीश्वर सांख्य मताप्रमाणे त्रिगुणात्मक जड प्रकृती आणि अनंत चेतन पुरुष ही दोन तत्वे स्वतंत्र अस्तित्वात असून, चेतन पुरुषांच्या भोगार्थ मूलभूत प्रकृती दृश्य व भोग्य विश्वाच्या रूपाने परिणत होते. सेश्वर सांख्य मताप्रमाणे परमेश्वर हे तिसरे मूलभूत तत्त्व आहे. त्रिगुणात्मक जड प्रकृती हे परमेश्वराचे शाश्वतकाल राहणारे शरीर आहे. ते शरीर परमेश्वर निर्माण करीत नाही, असे रामानुज व नीलकंठ शिवाचार्य यांचे मत आहे. पृथ्वी, जल, तेज व वायू या चार महाभूतांचे परमाणू आकाश, दिक् व काल ही जडद्रव्ये अनादी व अनंत असून ती एका अर्थी परमेश्वराचे शरीर आहेत, असे न्याय व वैशेषिक ही दर्शने मानतात. [⟶ न्यायदर्शन वैशेषिक दर्शन]. पूर्वमीमांसक परमेश्वराचे अस्तित्व मानीत नाहीत. जीवात्मांचे स्वतंत्र अस्तित्व मानतात परंतु त्याचबरोबर चार महाभूतांचे शाश्वत परमाणू व त्याचप्रमाणे आकाश, काल व दिक् यांचे स्वतंत्र स्वयंसिद्ध अस्तित्व मानतात. [⟶ पूर्वमीमांसा].


विज्ञानवाद आणि शून्यवाद हे बौद्धांचे दोन संप्रदाय सोडल्यास ⇨ बौद्ध दर्शनातही पृथ्वी, आप, तेज व वायू ही चार महाभूते स्वतःसिद्ध स्वतंत्र अस्तित्वात असून क्षणोक्षणी बदलणारे त्यांचे परमाणू हेच त्याचे खरे स्वरूप आहे, असे मानले आहे. ⇨ जैन दर्शनातही अजीव म्हणजे चेतन जीवाव्यतिरिक्त नित्य, स्वतःसिद्ध, परिवर्तनशील जडद्रव्यांचे अस्तित्व मानले आहे.

तात्पर्य ब्रह्माद्वैतवाद सोडला, तर बाकी सर्व द्वैतवादी दर्शने प्रकृती किंवा परमाणू, आकाश, काल आणि दिक् या अचेतनांचे स्वयंसिद्ध अस्तित्व मानतात. जडवादाचा विलक्षण प्रभाव ब्रह्माद्वैतवादाव्यतिरिक्त भारतीय दर्शनांवर दीर्घकाल कायम राहीला आहे, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.

 जोशी, लक्ष्मणशास्त्री

संदर्भ : 1. Hayes, C. J. H. A Generation of Materialism : 1871–1900, New York, 1941.

            2. Hobbes, Thomas, The Metaphysical System of Hobbes, Chicago, 1905.

            3. Lange, F. A. Trans. Thomas, E. C. The History of Materialism, 3 Vols., London, 1877–80.

            4. Perry, R. B. Present Philosophical Tendencies, New York, 1916.

            5. Seely, C. S. Modern Materialism : A Philosophy of Action, New York, 1960.

            6. Sellars, R. W. McGill, V. J. Farber, Marvin, Ed. Philosophy for the Future The Quest of Modern Materialism, New York, 1949.

           ७. माधवाचार्य अनु. शर्मा, उमाशंकर, सर्वदर्शनसंग्रह, बनारस, १९६४.