ऋषि : गमनार्थक ‘ऋष्’ धातूपासून ‘ऋषि’ हा शब्द झाला आहे. भटकणारा, असा व्युत्पत्त्यर्थ. वेदमंत्रांचा द्रष्टा म्हणजे कर्ता असा मूळ रूढार्थ. त्रिकालदर्शी अशी विद्यातपःसंपन्न व्यक्ती म्हणजे ऋषी, असा अर्थ नंतर सामान्यपणे रूढ झाला आहे. विद्यातपःसंपन्न अशा पुरातन विशिष्ट व्यक्तींचा निर्देश ऋषी शब्दाने होतो. या ऋषींच्या ठिकाणी प्रजाविस्तार करण्यामुळे प्रजापतित्व व ज्ञानसंप्रदायाच्या प्रवर्तनामुळे आचार्यत्व अशा दोन भूमिका होत्या. 

सर्व विश्वाच्या स्थितीकरिता एक सर्वव्यापी पारमेश्वरसंस्था आहे, तिचा परमेश्वर मुख्यनियंता, इंद्रादी देवता उपनियंते, सर्व विश्व नियम्य आणि वेद व वेदार्थाचा विस्तार करणारी शास्त्रे ही संविधान घटना आहे. या विश्वसंस्थेच्या पोटात ऋषी ही एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. समाजधारणेचे मुख्य साधन असलेल्या, मनुष्यजीवनाच्या सर्वांगविषयक ज्ञानाचा संप्रदाय परमेश्वराने ऋषींच्या द्वारा प्रवृत्त केला व प्रत्येक कल्पामध्ये तो ऋषींच्या द्वाराच प्रवृत्त केला जातो. वेदादी शास्त्रांचे कर्ते ऋषी असल्यामुळे जन्माला येणार्‍या द्विजांवर ऋषींचे ऋण आहे. वेदादी शास्त्रांच्या अध्ययनाने ऋषिऋण फेडायचे असते. नित्य ऋषितर्पण करायचे असते उत्सर्जन व उपाकर्म यांच ऋषिपूजन करायचे असते. स्त्रीपुरुषांनी ऋषिपंचमी व्रत करायचे असते. 

ऋषींचे मूलभूत सात प्रकार आहेत, ते पुढीलप्रमाणे : (१) ब्रह्मर्षी, (२) देवर्षी, (३) महर्षी, (४) परमर्षी, (५) कांडर्षी, (६) श्रुतर्षी आणि (७) राजर्षी. ब्रह्म जाणणारे किंवा ब्राह्मण ऋषी ते ब्रह्मर्षी. या वर्गात कश्यप, वसिष्ठ, भृगू, अंगिरस्, अत्री इ. ऋषी येतात. देवजातीचे जे ऋषी ते देवर्षी. या गटात धर्म, पुलस्त्य, क्रतू, पुलह, नर-नारायण, वालखिल्या, नारद इ. ऋषी येतात. महर्षी व परमर्षी यांच्या स्पष्ट विभाग नाही. या दोन शब्दांचा केवळ ‘श्रेष्ठ’ ऋषी या अर्थाने अनेक प्रकारच्या ऋषींना उद्देशून प्रयोग केलेला आढळतो. कांड म्हणजे धर्मशास्त्र, पूर्वोत्तर मीमांसा, व्याकरण, न्याय, धनुर्विद्या इ. शास्त्रे प्रवृत्त करणारे जैमिनी, व्यास, शांडिल्य इ. जे ऋषी, ते कांडर्षी अथवा वेदकांडांचे प्रवर्तक प्रजापती सोम, अग्‍नी इ. जे ऋषी ते कांडर्षी. अन्य ऋषींपासून विद्याग्रहण करून जे ऋषिपदास पोहोचले, ते श्रुतर्षी. आयुर्वेदपर ग्रंथांचे प्रणेते सुश्रुतादी या गटात येतात. क्षत्रिय जातीचे अथवा प्रजानुरंजनामुळे जे ऋषित्वाला प्राप्त झाले ते राजर्षी. ऋतुपर्ण, इक्ष्वाकू, नाभाग इ. राजे या गटात मोडतात. बौधायनादिकांनी (बौ. ध. २·९·१४) ऋषितर्पणामध्ये वरील सात प्रकारांबरोबर जनर्षी, तपर्षी आणि सत्यर्षी असे तीन अधिक प्रकार दिले आहेत. वायुपुराण (अ. ५९), ब्रह्मांडपुराण (अ. २·३२) वमत्स्यपुराण (अ. १४५) यामध्ये ऋषींचे मूलभूत पाच प्रकार सांगितले आहेत, ते असे : ‘अव्यक्त’ या परतत्त्वाचे यथार्थ ज्ञान असलेले ते ‘परमर्षी’ ‘महत्’ तत्त्वाचे यथार्थ ज्ञान असलेले ते ‘महर्षी’ ‘अहंकार’ तत्त्वाचे यथार्थज्ञाते ते’ऋषी’ ‘तन्मात्र’ तत्त्वाचे यथार्थवेत्ते ते ‘ऋषीक’ आणि’पंचमहाभूतां’ चे तत्त्ववेत्ते ते ‘श्रुतर्षी’. परमर्षी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, त्यांचे पुत्र महर्षी व औरसपुत्र ऋषी ऋषींचे औरसपुत्र ऋषीक आणि ऋषीकांचे औरसपुत्र श्रुतर्षी. परमर्षी हे ऋषिरूपानेच जन्माला आले. महर्षी व ऋषी हे तपश्चर्येने ऋषी झाले. ऋषीक हे सत्याने ऋषित्व पावले आणि श्रुतर्षी हे विद्याश्रवणाने ऋषित्वाला प्राप्त झाले. वायु (अ. ६१) व ब्रह्मांड (अ. २.३५) पुराणांत ब्रह्मर्षी, देवर्षी व राजर्षी असेही तीन स्वतंत्र प्रकार केले आहेत. सनक, सनंद, सनातन, आसुरी, कपिल, वोढू आणि पंचशिला हे सात ब्रह्मपुत्र ऋषींत त्यांचा समावेश आहे. तर्पणीय पितरांत सुमंतू, जैमिनी वैशंपायन, गौतम, शाकल्य, ऐतरेय, आश्वालायन, शौनाक इ. अनेक ऋषींचा समावेश आहे.

सप्तर्षी : ऋषिसंस्थेच्या पोटात ‘सप्तर्षी’ ही संस्था आहे. प्रत्येक मन्वंतरात सप्तर्षी भिन्न भिन्न असतात व मन्वंतरारंभी प्रजोत्पादन व धर्मस्थापना ही कार्ये मुख्यतः त्यांच्याकडेच असतात. चौदा मन्वंतरे व त्यांतील भिन्न भिन्न सप्तर्षीचे गण पुढीलप्रमाणे आहेत : (१) स्वायंभभुव : मरीती, अत्री, अंगिरस्, पुलस्त्य, पुलह, क्रतू, वसिष्ठ. (२) स्वारोचिष : दत्त, निश्च्यवन, स्तंब, प्राण, कश्यप, और्व, बृहस्पती. (३) उत्तम : कौकरुंडी, दाल्‌भ्य, शंग, प्रवहण, शिव, सित, सस्मित. (४) तामस : कवी, पृथू, अग्‍नी, अकपी, कपी, जल्प, धीमान्, (५) रैवत : देवबाहू, सबाहू, पर्जन्य, सोमप, मुनी, हिरण्यरोमा, सप्ताश्व. (६) चाक्षुष : भृगू, सुधामा, विरज्ज्स्, सहिष्णू, नाद, विविस्वान्, अतिनामा. (७) वैवस्वत : अत्री, वसिष्ठ, कश्यप, गौतम, भरद्वाज, विश्वामित्र, जमदग्‍नी. (८) सावर्णी : अश्वत्थामा, शरद्वान, कौशिक, गालव, शतानंद, काश्यप, परशुराम. (९) दक्षसावर्णी : मेधातिथी, वसू, सत्य, ज्योतिष्मान्, द्युतिमान्, सबल, हव्यवाहन. (१०) ब्रह्मसावर्णी : आपोमूर्ती, हविष्मान्, सुकृती, सत्य, नाभाग, अप्रतिम, वासिष्ठ. (११) धर्मसावर्णी : हविष्मान् वरिष्ठ, ऋष्टी, आरुणी, निश्चर, अनघ, विष्टी, अग्‍नितेजस्. (१२) रुद्रसावर्णी : द्युती, तपस्वी, सुतपस्, तपोमूर्ती, तपोनिधी, तपोरती, तपोधृती. (१३) देवसावर्णी (रौच्य) : धृतिमान्, अव्यय, तत्त्वदर्शी, निरुत्सुक, निर्मोह, सुतपस्, निष्प्रकंप. (१४) इंद्रसावर्णी (भौत्य) : आग्‍नीध्र, अग्‍निबाहू, शुची, मुक्त, माधव, शुक्र, अजित. सप्तर्षींच्या नावांबाबत मत्स्य, मार्कंडेय इ. पुराणात मतभेद आहे. 

प्रजापती ऋषी : ब्रह्मदेव स्वतः व त्याने प्रजाविस्तार करण्याकरिता जे ऋषी उत्पन्न केले ते प्रजापतिरूप ऋषी होत. महाभारतात (१२·३२१) ब्रह्मा, स्थाणू, मनू, दक्ष, भृगू, धर्म, तपस्, दम, मरीची, अंगिरस्, अत्री, पुलस्त्य, पुलह, क्रतू, वसिष्ठ, परमेष्ठी, विवस्वान्, सोम, कर्दम, क्रोध आणि विक्रीत असे एकवीस प्रजापती सांगितले आहेत. निरनिराळ्या पुराणांत सात, दहा, बारा, तेरा, चौदा अशा निरनिराळ्या प्रजापतींच्या संख्या आढळतात. 

गोत्रर्षी : मानववंशातील अनेक कुलशाखा ज्या ऋषींपासून प्रवृत्त झाल्या, त्या कुलशाखाप्रवर्तक ऋषींना’गोत्र’ असे पारिभाषिक नाव आहे. विश्वामित्र, जमदग्‍नी, भरद्वाज, गौतम, अत्री, वसिष्ठ, कश्यप आणि अगस्त्य हे आढ गोत्रप्रवर्तक ऋषी आहेत. या आठ ऋषींनी प्रवृत्त केलेल्या कुलांत असंख्य गोत्रसंज्ञक ऋषी उत्पन्न झाले. त्यांपैकी काही ऋषींची नामनिर्देशपूर्वक गणना बौधायनादी सूत्रकारांनी व पुराणांनी उदाहरणादाखल केली आहे. बौधायनाने प्रवरा-नुसाराने ४९ गण कल्पून त्या सर्व गणांत मिळून ८३५ गोत्रर्षींची गणाना केली आहे. इतर सूत्रकारांनी गणांची व गोत्रांची कमीअधिक संख्या सांगितली आहे. गोत्रसंज्ञक ऋषींपैकीच ज्यांचा यज्ञामध्ये अग्‍निवरणाच्या वेळी उल्लेख केला जातो, त्या ऋषींना’प्रवरर्षी’ म्हणतात.


वैदिक ऋषी : वेदांच्या मंत्र-ब्राह्मणादी भागांचा प्रवर्तन व प्रसार ज्या ऋषींनी केला ते वैदिक ऋषी होत. त्या त्या ऋषींनी ते ते वेदभाग रचले, असे आधुनिक विद्वानांचे मत आहे. वेदांचे अपौरुषेयत्व मानणार्‍या प्राचीन शास्त्रवेत्त्यांच्या मते ऋषींना परमेश्वराने वेद प्रथम दिले.’स्वयंभू ब्रह्म म्हणजे वेद, त्यांचे ज्यांना ज्ञान झाले ते ऋषी झाले, वेदांचे ज्ञान हेच ऋषींचे ऋषित्व आहे’, असेतैत्तिरीय आरण्याकात (२·९·१) म्हटले आहे. सर्वच ऋषींना मंत्रादी वेदभागाचे स्फुरणात्मक ज्ञान झाले, तेच त्यांचे ऋषित्व आहे, असे काही निबंधकारांनी म्हटले आहे. परंतु ते ‘गोत्रर्षी’, ‘मंत्रांचे ऋषी’ इ. संदर्भांपुरतेच मर्यादित आहे, असे मानले पाहिजे. कारण श्रुतर्षी व इतर अनेक ऋषी मंत्रद्रष्टे नव्हते, हे स्पष्ट आहे. ऋषींचा वेदांशी असलेला ज्ञानात्मक संबंध हा दर्शन (प्राथमिक स्फुरण) आणि स्मरण असा दोन प्रकारचा आहे.सर्वानुक्रमणीमध्ये सांगितलेले मंत्रांचे ऋषी हे प्रायः मंत्रद्रष्टे आहेत. पूर्वऋषिदृष्ट वेदभागांच्या स्मरणाने त्यांचा संप्रदाय सुरू करणाऱ्या अथवा वेदार्थांचे स्वशब्दांनी निबंधन करणाऱ्या श्रुतीर्षींचा वेदांशी स्मरणात्मक संबंध आहे. उदा., शाकलसंहितेचा स्मर्ता ऋषी शाकल आणि त्या संहितेत येणार्‍या त्या त्या सूक्तांचे वसिष्ठ, वामदेव, विश्वामित्र इ. ऋषी द्रष्टे आहेत. कात्यायनानेसर्वानुक्रमणीत ‘ऋषयो मंत्रद्रष्टारः स्मर्तारः पारमेष्ठयादयः’ या वाक्यात ‘द्रष्टे’ आणि ‘स्मर्ते’ असे दोन प्रकार केले आहेत. मत्स्यादी पुराणांत (म. पु. १४५) ईश्वर (परमर्षी), ऋषी आणि ऋषीक हे मंत्रकृत आहेत असे म्हटले आहे. सर्वानुक्रमणीत अनेक मंत्रांचे इंद्र, पुरूरवस्, अदिती, अगस्त्यस्वसा, इंद्रस्‍नुषा, उर्वशी इ. देवता, राजे व स्त्रिया हे ऋषी सांगितले आहेत. सर्वानुक्रमणीकाराने (परिभाषा २) मंत्रात्मक वाक्यांचा जो वक्ता तो ऋषी आणि ज्याला उद्देशून ते वाक्य उच्चारले असेल ती देवता, असे म्हटले आहे. कात्यायनाच्या सर्वानुक्रमणीत (परिभाषा १३) गोधा, घोषा, विश्ववारा, अपाला, उपनिषद, निषद, जुहूर्नामा ब्रह्मजाया, अगस्त्यस्वसा, अदिती, इंद्राणी, इंद्रमाता, सरमा, रोमशा, उर्वशी, लोपामुद्रा, नदी, यमी, नारी, शश्वती, श्री, लाक्षा, सार्पराज्ञी, वाक्, श्रद्धा, मेधा, दक्षिणा, रात्री, सूर्या आणि सावित्री या २९ स्त्रिया ब्रह्मवादिनी म्हणून सांगितल्या आहेत. 

ऋषिचर्या : तपश्चर्या व ज्ञानप्रसार हे ऋषींचे सर्वप्रमुख लक्षण सर्वत्र वर्णिले आहे. शरीर, वाणी व मन यांच्या ठिकाणाचे दोष नाहीसे करण्याकरिता शास्त्रविहित विशिष्ट कठोर कर्मे आचरणे, हा ‘तपः’ शब्दाचा सर्वमान्य अर्थ आहे. ती तपोरूप कर्मे कृच्छ्र, अतिकृच्छ्र, तप्तकृच्छ्र, सांतपन, चांद्रायण, पंचाग्‍निसाधन, वाताशन, शीर्णपर्णाशन इ. अनेक प्रकारची आहेत. अर्वाचीन काळात तपश्चर्येचा र्‍हास झाल्यामुळे ऋषी उत्पन्न होत नाहीत, पूर्वजन्मातील तपश्चर्येमुळे अर्वाचीन काळातही काही श्रुतर्षी उत्पन्न होऊ शकतात, असे आपस्तंबधर्मसूत्रात (१·५·४, ५,६) लिहिले आहे. उपवासपूर्वक वेदपारायणे ऋषी करीत असत, असे बौधायनधर्मसूत्रात (३·९·११) सांगितले आहे. शिक्षादी सहा वेदांगे, न्यायवैशेषिक इ. सहा शास्त्रे, आयुर्वेद, धनुर्वेद, संगीतशास्त्र, वास्तुशास्त्र, स्मृती, धर्मसूत्रे, कारिका, पुराणे, इतिहास, भाष्ये, वार्तिके इ. सर्व ज्ञानभंडार ‘आर्ष’ म्हणजे ऋषिप्रणीत आहे. ऋषींचे संध्यावंदन दीर्घकाळ चाले. दीर्घकाळ संध्या करण्यामुळे ऋषींना दीर्घायुष्य, प्रज्ञा, यश, कीर्ती व ब्रह्मवर्चस् प्राप्त झाले, असे मनू म्हणतो (मनुस्मृति ४·९४). यज्ञादी कर्मांचे अनुष्ठानही ऋषी करीत असत. ऋषींनी सत्रे केल्याचे उल्लेख ब्राह्मणादी अनेक ग्रंथांत आहेत. चांद्रायणाने आत्मशोधन करून ऋषींनी कर्मे केली, असे विधानबौधायनधर्मसूत्रात (३·८·३९) आहे. निरनिराळ्या मंत्रांचा जप करणे, हाही एक ऋषिचर्येचा भाग होता. ‘श्रीरामाय नमः’ या षडक्षर मंत्राचा जप केल्यामुळे ऋषी मुक्त झाले, असे वर्णन वृद्धहारीतस्मृतीत (६·२४१) आहे. आत्मगुणांचा अपकर्ष करणारे म्हणून पौरोहित्य गर्ह्य समजले जाते, तेही वसिष्ठ, शतानंद, धौम्य इ. अनेक ऋषींनी केले.’सूर्यकुलात तू (परमेश्वर) अवतार घेणार असल्याचे समजल्यावरून तुझा सहवास घडावा, म्हणून हे गर्ह्य जीवन (पौरोहित्य) मी पतकरले’, असे अध्यात्म रामायणात (२·२) वसिष्ठांनी रामास सांगितले आहे. 

ऋषींचा निवास वनांमध्ये असे. त्या वनांना तपोवने म्हणत. तपोवनात ऋषींच्या अनेक वसत्या असत. त्यांना आश्रम असे नाव असे. आश्रमात ऋषींच्या निवासाकरिता पर्णकुटी तसेच फळे, फुले व छाया देणारे वृक्ष असत. आश्रमामध्ये तपश्चर्येकरिता ‘पंचवटी’ तयार करावी असा विधी आहे. नाशिकजवळील पंचवटी-आश्रम इतिहासप्रसिद्ध आहे. बसण्याकरिता मध्ये चार हात लांबी-रुंदीचा कट्टा तयार करून त्यांच्या भोवतालच्या पूर्व, उत्तर, पश्चिम, दक्षिण आणि आग्नेय या दिशांना अनुक्रमे पिंपळ, बेल, वड, आवळी आणि अशोक हे वृक्ष लावावेत आणि पाच वर्षांनी या पंचवटीची विधिपूर्वक प्रतिष्ठा करावी, असे पंचवटीचे विधान आहे. पंचवटीत केलेल्या तपश्चर्येचे फळ अधिक मिळते. या प्रत्येक आश्रमाता प्रायः एकेक कुलपती असे. दहा हजार विद्यार्थांची अन्नवस्त्रादिकांच्या योगे पोषणाची जबाबदारी स्वीकारून त्यांना अध्यापन करणार्‍या ऋषीला कुलपती म्हणत असत. ऋषींचे जीवन उंछवृत्तीने, शिलवृत्तीने अथवा कंदमुळे, फळे व अकृष्टपच्य म्हणजे शेतात न पिकविलेले, वनात आपोआप उत्पन्न झालेले नीवारादी धान्य, यांच्या योगे होत असे. आर्त्विज्य व पौरोहित्य हेही जीवनाचे उपाय होते. ऋषींच्या ठिकाणी त्रिकालज्ञता, इंद्रियनिग्रह, सत्य, निग्रहानुग्रहसामर्थ्य, वैराग्य, संतोष, दया इ. गुण होते. ऋषींना हजारो वर्षे आयुष्य असल्याबद्दलचे उल्लेख आहेत. 

अशा या धर्मनिष्ठ व धर्मोपदेशक ऋषींकडून क्रोधादी दोषांच्या आधीन झाल्यामुळे अधर्माचरण घडत असे. म्हणूनच तैत्तिरीय शिक्षाध्यायात ‘आमच्या सदाचारांचेच अनुकरण करावे, दुराचारांचे करू नये’ असा गुरूने शिष्यास उपदेश केला आहे. ऋषींचे शरीर आणि इंद्रिये तपोबलाने तेजोमय झाली असल्यामुळे, अधर्माचरणजन्य दोष त्यांना लागत नाही म्हणून तपोबल नसलेल्या आधुनिकाने ऋषींच्या उदाहरणाने अधर्माचार करू नये, असे स्मृतिकार (आपस्तंबधर्मसूत्र  २·१३·८,९) सांगतात. 

सप्तर्षींचा अंमल संपूर्ण मन्वंतरापर्यंत असतो.पाणिनिसूत्रात (४·३·१०५) पुराण (प्राचीन) आणि अर्वाचीन असे ऋषींचे दोन वर्ग केलेले आहेत. 

संदर्भ : १. गोविंदशास्त्री त्रिपाठी, छोटूपती शर्मा, संपा.निरुक्त, मुंबई, १९२५.

           २. चिन्नस्वामी, संपा.आपस्तंबधर्मसूत्र, बनारस, १९३२.

           ३. चिन्नस्वामी, संपा.बौधायनधर्मसूत्र, बनारस, १९३४.

           ४. भांडारकर प्रा. सं. संस्था, संपा. महाभारत, पुणे, १९३३-६७. 

 

  केळकर, गोविंदशास्त्री