ऊलान बाटोर : मंगोलिया प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या २,८२,००० (१९७१). १९२४ पर्यंत यास उर्गा म्हणत चिनी नाव कुलून व मंगोलियन डा खुरे. हे तोला नदीच्या काठी, बोगडो ऊला टेकडीच्या पायथ्याशी वसले असून मंगोलियाच्या राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनात याला महत्त्वाचे स्थान आहे. हे प्रसिद्ध औद्योगिक शहर असून येथे लोकरी कापड, फेल्ट, घोड्यांचे जिन, खोगीर, लोकरधुलाई इत्यादींचे कारखाने आहेत. आउटर मंगोलियाच्या सर्व प्रमुख शहरांशी पक्क्या सडकांनी व रशिया, चीनशी लोहमार्गांनी हे जोडलेले असल्याने येथील व्यापार व उद्योगाची भरभराट झाली आहे. १९४२ मध्ये स्थापन झालेले विद्यापीठ तसेच चिनी, मंगोलियन व तिबेटी हस्तलिखितांचे मोठे संग्रह असलेले ग्रंथालय यांमुळे शहराचे महत्त्व वाढले आहे. येथे ऊलान बाटोर या मंगोलियन क्रांतिवीराचा पुतळा असून मंगोलियातील बौद्धधर्मीयांच्या धर्मगुरूचे (हुतुख्तू) निवासस्थान आहे. १९११ मध्ये झालेल्या मंगोलियन प्रजासत्ताकाच्या घोषणेनंतरच्या रशियन यादवी युद्धांत बॅरन फॉउन्गर्नस्टर्नबर्गच्या यूरोपीय सैन्याची छावणी येथेच होती.
ओक, द. ह.