एप्रिल : ग्रेगरीय कॅलेंडरमधील चवथा महिना. रोम्युलसने ३०, पाँपिलिअसने २९, ज्यूलियस सीझरने पुन्हा ३० असे याचे दिवस ठरविले. रोमनांचा हा दुसरा व लॅटिन कॅलेंडरमध्ये पहिला महिना असून त्यात त्याचे ३६ दिवस होते. पूर्वी एप्रिलला निरोनियस, ईस्टर अशीही नावे होती. रोमन प्रेमदेवता ॲफ्रोडायटी किंवा उमलणे या अर्थाच्या लॅटिन शब्दावरून एप्रिल नाव पडले असावे. एप्रिलमध्ये वसंताचा बहर असतो. फाल्गुनामध्ये किंवा चैत्रात एप्रिल सुरू होतो. याच्या १३ तारखेस मेषसंक्रांत असते. रोमचा वाढदिवस, गुड फ्रायडे व ईस्टर हे सण आणि निसान या हिब्रू महिन्यातील ज्यूंचा पेसाह सण हे एप्रिलमध्ये येतात.
ठाकूर, अ. ना.