एनॅमल : धातूच्या पृष्ठावर चढवलेल्या काचेच्या जातीच्या शोभिवंत व संरक्षक लुकणाला (आवरणाला) एनॅमल म्हणतात. असे लुकण बसवलेली वस्तू गंजत नाही व तीवर अम्‍लाचा अगर क्षाराचा (अल्कलीचा) काहीही परिणाम होत नाही, त्यामुळे एनॅमल केलेली वस्तू पुष्कळ दिवस उत्तम स्थितीत राहते. एनॅमल केलेल्या स्वच्छ भांड्याला वास येत नाही त्यामुळे जेवणघरात व दवाखान्यात अशा भांड्यांचा चांगला उपयोग होतो. यांशिवाय स्नानकुंडे, प्रशीतक (पदार्थ थंड ठेवण्याचे उपकरण), चुलासंच, दिव्यांची परावर्तक झाकणे, जाहिरातींचे फलक अशा अनेक वस्तू एनॅमल चढवून बनवितात. साधारणत: एनॅमलाचा रंग पांढराशुभ्र असतो परंतु जरूर असल्यास त्याला इतर रंगही देता येतात.

इतिहास : एनॅमल चढविण्याची कला फार पुरातन कालापासून चालू आहे. तिचा उगम ईजिप्त किंवा ग्रीस देशात झाला असावा असे मानतात. पूर्वी श्रीमंत लोक वापरीत असलेले जडजवाहीर व सोन्या-चांदीच्या वस्तूंवर रंगीत काचेची लुकणे बसवून शोभिवंत वस्तू तयार करीत असत [→ मीनाकारी].

अशा वस्तू तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यांपैकी ⇨ क्‍लॉयझन  पद्धतीत धातूच्या पत्र्यावर बारीक तारेने तयार केलेल्या आकृत्या झाळ देऊन चिकटवतात व त्या आकृत्यांच्या निरनिराळ्या विभागांत निरनिराळ्या रंगाची काचेची पूड चिकटवून पत्रा काच वितळेपर्यंत तापवतात. शांलेव्ह पद्धतीत धातूच्या पत्र्यावर खोदकाम करून किंवा कोरून त्यामध्ये रंगीत काचेची भुकटी भरतात व ती वितळेपर्यंत गरम करतात. नंतर वस्तू साफ करून ती घासून चकचकीत करतात. अशा बर्‍याच पद्धती अजूनही सोनारकामात चालू आहेत.

इ. स. १८०० नंतर मध्य यूरोपातील देशांत बिडावर काचेचे एनॅमल चढविण्याचा उद्योग सुरू झाला. पुढे पोलादी पत्रा मिळू लागल्यावर १८५० च्या सुमारास पोलादी पत्र्यावर एनॅमल चढविण्याचा उद्योग सुरू झाला. १९०८ साली मुंबईच्या व्हिक्टोरिया ज्यूबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये एनॅमलाचे शिक्षण देण्याचा वर्ग उघडण्यात आला व १९१२ साली कलकत्ता येथे प्रफुल्लचंद्र रे यांनी  ‘बंगाल एनॅमल’  हा पहिला कारखाना सुरू केला. त्यानंतर १९२८ साली ओगले बंधूंनी ओगलेवाडी येथे एनॅमलाचा दुसरा कारखाना सुरू केला. १९२४ साली बनारस हिंदू विद्यापीठात एनॅमल तंत्राच्या शिक्षणास सुरुवात झाली. नंतर कलकत्ता येथे काच व मृत्तिका तंत्र यांसंबंधी सर्वांगीण संशोधन करण्यासाठी एक सरकारी संस्था सुरू झाली. आता अनेक ठिकाणी एनॅमलाचे तंत्र शिकविण्याची सोय झाली आहे. पुढारलेल्या देशांतील एनॅमलाच्या कारखान्यांत सर्व काम स्वंयचलित यंत्रांद्वारे करण्यात येते त्यामुळे ते काम सुबक होऊन स्वस्त पडते.

अमेरिका, जर्मनी वगैरे देशांत जाहिरातीकरिता रंगीत एनॅमलाचा उपयोग करतात. जाहिरातीचे फलक पूर्वी बहुतेक पोलादी पत्र्याचे असत. पोलादापेक्षा ॲल्युमिनियम बरेच हलके असल्याने जाहिरातीकरिता ॲल्युमिनियम पत्र्याचा उपयोग वाढत आहे.

वर्गीकरण : रासायनिक उद्योगांत एनॅमलाच्या पृष्ठांचे अम्‍लरोधी, क्षाररोधी, ऊष्मसह (उच्च उष्णता सहन करणारे), रसायनसह, घर्षणसह, विद्युत् निरोधक असे विविध वर्ग करतात. एनॅमलाची काच करण्याकरिता वापरलेल्या मुख्य द्रव्यानुसार एनॅमलाचे क्षारी बोरोसिलिकेट, टिटॅनिया, शिसेयुक्त, शिसेरहित, फॉस्फेट असे विविध वर्ग पडतात.

कच्चा माल : एनॅमल चढविण्याकरिता वापरीत असलेल्या लोखंडाच्या मुख्य जाती व त्यांमधील घटकांचे टक्के प्रमाण कोष्टक क्र. १ मध्ये दिले आहे. त्यांमधील एनॅमल–लोखंड एनॅमल चढविण्यासाठी अधिक


योग्य आहे. या लोखंडावर एनॅमल चढविताना त्याचा पापुद्रा सुटत नाही व फोडासारखे फुगवटे येत नाहीत. असे लोखंड टेबलावरचे मुख्य पृष्ठ व इतर महत्त्वाचे सपाट पृष्ठभाग बनविण्याकरिता वापरतात. साध्या पोलादावर एनॅमल चढविता येते, परंतु त्यावर थोडासाही दोष असल्यास तेवढा भाग एनॅमल केल्यावर खराब होतो. याकरिता साधे पोलाद वापरताना ते फार काळजीपूर्वक स्वच्छ करावे लागते. एनॅमल चढविण्याची काच तयार करण्यासाठी लागणारी द्रव्ये अगदी ठराविक प्रमाणात मिसळावी लागतात. पोलादी पत्रा व बीड यांवर चढविण्याच्या काचेच्या घटकांचे टक्के प्रमाण पुढील पानावर कोष्टक क्र. २ मध्ये दिले आहे.

एनॅमल काचेची पारदर्शकता नाहीशी करण्याकरिता टिटॅनिया, झिर्कोनिया, अँटिमनी ऑक्साइड व मॉलिब्डेनम ऑक्साइड ही द्रव्ये काचेच्या मिश्रणात घालतात.

     एनॅमल तयार करण्याची कृती : एनॅमलाच्या काचेचे मिश्रण भट्टीतील मुशीत १२५०° से. तपमानावर तापवतात. मुशीमधील तपमान वाढत जाते तसतसा काही द्रव्यांचा वायू तयार होतो. काही द्रव्य वितळतात व काहींचा अगदी पातळ रस होतो. मिश्रणातील सोडा नायट्रेट ३०८° से. वर वितळण्यास सुरुवात होते. टाकणखार तापत असताना उष्ण रसाला काळपट लाल रंग येताच त्याचे बाष्प होऊ लागते व मिश्रण उकळू लागते आणि मिश्रणातील इतर धातूंची ऑक्साइडे त्यात मिसळतात. ४००° से. तपमानावर व्हाइट लेडमधील पाणी व कार्बन डाय-ऑक्साइड वेगळी होतात व ५००° से. वर रेड लेडमधील ऑक्सिजन बाहेर पडतो. ८१५° से. ते ९२६° से. तपमानात सोडा ॲश व लेड ऑक्साइड वितळतात. व्हाइटिंगमधील (पांढरा रंग आणणार्‍या पदार्थामधील) कार्बन डाय-ऑक्साइड व चुना यांचे पृथक्करण होते आणि ९२६° से. तपमानावर सर्व वायू व बाष्प बाहेर पडतात. वितळत असलेल्या सोडा ॲशमधील कार्बन डाय-ऑक्साइड मोकळा झाल्यावर सिलिका व ॲल्युमिना यांवर त्याची विक्रिया होते. यावेळी फ्ल्युओराइडामधील फ्ल्युओरीन वायू मोकळा होऊन तोही वरील प्रक्रियेत मदत करतो.

एनॅमल काचेचे मिश्रण मुशीत दोन ते अडीच तास तापत ठेवले म्हणजे काच तयार होते. काच तयार झाली किंवा नाही हे तपासण्याकरिता लोखंडी पळी मुशीत बुडवून थोडेसे पातळ एनॅमल बाहेर काढून एखाद्या लोखंडी पत्र्यावर ओततात. एनॅमलाचा लगेच तुकडा पडतो. त्या तुकड्याची तडकलेली बाजू चकचकीत असली व त्यामध्ये छिद्रे किंवा वाळूचे कण दिसत नसले, तर काच तयार झाली असे समजतात. याच वेळी रसाची २५–३० सेंमी. लांब तार काढतात व तीत मणी दिसत नाही अशी खात्री झाल्यावर रस पक्का झाला असे मानतात.


रस पक्का झाल्यावर तो गरम असतानाच थंड पाण्यात ओततात म्हणजे काच पिचते व रसाचे दाणेदार साखरेसारखे बारीक कण तयार होतात. हे कण गोलिका दलित्रामध्ये (पिपामध्ये लोखंड, पोलाद किंवा दगड यांच्या मोठ्ठ्या गोळ्यांनी पदार्थ दळण्याच्या चक्कीमध्ये) पाण्याबरोबर दळून त्याचा पातळ लेप तयार करतात.

धातूच्या पत्र्यावर एनॅमल बसविण्याचे भाजून चढविलेले व वितळवून चढविलेले असे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात एनॅमल भाजण्याकरिता २००°–२५०° से. तपमान लागते. या प्रकारचे एनॅमल स्वस्त जातीचे असते व घरात ठेवण्याच्या स्थिर राहणार्‍या वस्तूवर उपयोगी पडते. वितळवून चढविलेले एनॅमल म्हणजे काच असल्याने ते ८५०°–९५०°से. पर्यंत गरम करावे लागते. हे एनॅमल धातूवर पक्के चिकटून बसते व त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत व चमकदार असतो. हे एनॅमल ऊन, वारा व पाऊस चांगल्याप्रकारे सहन करू शकते.


एनॅमल चढविण्याची कृती : प्रथम मूळ पत्रा किंवा भांडे भट्टीमध्ये ७५०° सें. तपमानावर थोडा वेळ गरम करतात. यामुळे वस्तूवर लागलेला तेलकट भाग, गंज व इतर डाग जळून जातात. त्यानंतर त्या वस्तूवर खरारा क्रिया (रासायनिक प्रक्रियांनी खरवडण्याची क्रिया) करतात. या क्रियेत वस्तू प्रथम अम्‍ल विद्रावात बुडवून काढतात व नंतर सोड्याच्या गरम पाण्याने धुऊन सर्व अम्‍ल काढून टाकतात व वस्तू पुन्हा स्वच्छ पाण्याने धुऊन साफ करतात. नंतर टाकणखाराच्या विरल विद्रावात बुडवून पुन्हा गरम पाण्याने धुतात. नंतर ती वस्तू सुकवून कोरडी करतात. त्यावर पहिला थर देण्याकरिता एक विशेष मिश्रणाचा फवारा उडवितात. अशा प्रकारच्या एक किग्रॅ. मिश्रणाने २.५ चौ. मी. पृष्ठभागावर फवारा मारता येतो. हे मिश्रण २०० क्रमांकाच्या जाळीतून चाळले असता ४ ते ६% कण रहावेत म्हणजे मिश्रण योग्य आहे असे समजतात. पांढर्‍या रंगाच्या मिश्रणात २०० क्रमांकाच्या जाळीवर कण मुळीच राहू नयेत. त्याचप्रमाणे निळा, लाल वगैरे रंगही २०० क्रमांकापेक्षा बारीकच दळतात. ओला रंग लावलेली  वस्तूसुकवण्याकरिता अगदी स्वच्छ व बेताच्या गरम जागेत ठेवतात. हवा मोकळी असली तर रंग बाहेरून आत वाळत जातो. पण उष्णता जास्त असली तर रंग बाहेरून लवकर वाळतो परंतु आत अर्धवट ओलाच राहतो. असे झाल्यास वस्तू भट्टीमध्ये भाजताना रंग फाटतो व वस्तू बिघडते. एनॅमलाची जाडी वाढवण्याकरिता एकावर एक अशी ६ ते ८ पुटे देता येतात. एकाच वेळी जाड थर दिला तर तो तडकण्याची भीती असते. एनॅमल तापविण्याच्या भट्टीला पेटीची भट्टी म्हणतात. या भट्टीत वस्तू तापविली जात असताना पेटीतील हवा अगदी स्वच्छ राहते व पेटीतील वस्तूशी भट्टीच्या वायूंचा प्रत्यक्ष संबंध येत नाही.  या भट्टीत वस्तू गरम करताना एनॅमलाच्या पहिल्या थराकरिता ८५०°–९५०° से. तपमान ठेवतात. दुसर्‍या पांढर्‍या थराकरिता ८००°–९००° से. तपमान ठेवतात व रंगाच्या थराकरिता ८००°–८५०° से. तपमान ठेवतात. तपमान किती असावे व वस्तू पेटीमध्ये किती वेळ ठेवावी हे वस्तूच्या आकारमानावर व वजनावर अवलंबून असते व ते अनुभवानेच ठरविले जाते. बिडाच्या वस्तूवर एनॅमल चढविण्यासाठी कमी तपमानावर वितळणारे रंग वापरावे लागतात. वस्तू जास्त तापविली तर बिडात अडकलेले वायू बाहेर येतात व पृष्ठभागावर फोड येतात आणि नग बिघडतो.

बिडावर एनॅमल चढविण्याकरिता पातळ मिश्रण किंवा सुक्या मिश्रणाची पूड वापरता येते. एनॅमल चढविताना प्रत्येक ठिकाणी पूर्ण स्वच्छता ठेवावी लागते. पत्र्याच्या वस्तू बनविण्यासाठी प्रथम योग्य जाडीचा पत्रा बरोबर मापाप्रमाणे कापून घेतात व त्याला दाबयंत्रात दाबून जरूर तसा आकार देतात. नंतर तो नग ६००° ते ७००° से. पर्यंत गरम करतात. त्यानंतर खरारा क्रिया व उदासिनीकरण करून पुन्हा स्वच्छ धुतात व सुकवितात. त्यानंतर त्यावर प्राथमिक लेप देऊन वाळवतात व भाजतात आणि नग नीट तपासतात. पहिला थर समाधानकारक असल्यास नगावर नंतर दुसरा तुषारी थर देतात व नग चांगला सुकवितात. नग चांगला सुकल्यावर तो तापवितात व पुन्हा नीट तपासतात. दुसरा चांगला बसल्यावर त्यावर अखेरचा रंगाचा तुषारी थर उडवितात. नंतर नग सुकवून भाजतात व नीट तपासून पहातात. नगावर जाहिरातीची अक्षरे किंवा इतर आकृत्या काढावयाच्या असल्यास कागदाची जाळी करून त्यामधून कुंचल्याने नगावर रंग लावतात किंवा छपाईच्या विविध पद्धतीने एकदम छाप उठवतात. कपबश्या वगैरे चिनीमातीच्या भांड्यांवर बसविलेले एनॅमल वर वर्णन केलेल्या जातीचेच असते.

पहा : मृत्तिका उद्योग.

संदर्भ : Thorpe, J. F. Whiteley, M. A. Thorpe’s Dictionary of Applied Chemistry, London, 1966.

ओगले, वि. प.