एडिंबरो : इंग्‍लंडच्या स्कॉटलंड भागाची राजधानी. लोकसंख्या ५,४३,०२५ (१९७१). फोर्थ नदीखाडीच्या दक्षिण किनाऱ्यावर, ग्‍लासगोच्या ईशान्येस ७१ किमी. आहे. शहराच्या ३ किमी. ईशान्येस लीथ हे एडिंबरोचे बंदर व पश्चिमेस ९ किमी. अंतरावर विमानतळ आहे. स्कॉटलंडचे हे प्रमुख सांस्कृतिक केंद्र असून व्यापार, उद्योग, शिक्षण, इ. क्षेत्रांत अग्रेसर आहे. वर्षाकाठी सु. आठ लक्ष प्रवासी येथे येतात.

जुना व नवा असे शहराचे दोन भाग असून कॅसलरॉक ते हॉलिरूड पॅलेस या जुन्या भागात स्कॉटलंडच्या व इंग्लंडच्या इतिहासातील अनेक चित्तथरारक घटना घडल्या आहेत. यातील जुन्या वास्तू हे प्रवाशांचे मोठे आकर्षण आहे. शहररचना कौशल्याचा उत्कृष्ट नमुना असे नव्या एडिंबरोचे वर्णन केले जाते. प्रिन्सेस स्ट्रीट हा या भागातील प्रमुख राजपथ असून त्याच्या एका बाजूला उत्तुंग इमारती व दुसऱ्या बाजूला आकर्षक बागबगीचे आहेत. हॉलिरूड पार्क ह्या प्रमुख उद्यानाजवळील आर्थर सीट व सॉल्झबरी क्रॅग ह्या टेकड्यांमुळे शहराच्या या मध्य विभागाला स्कॉटिश हायलँडचे सौंदर्य प्राप्त झाले आहे. औद्योगिक शहर म्हणूनही एडिंबरो विख्यात आहे. व्हिस्की व अन्य मद्ये, खाद्यपदार्थ, कागद, रबराचे पदार्थ, धातुकाम, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रसायने, औषधे, काचसामान असे विविध उत्पादन येथे होते. येथील मुद्रणव्यवसाय, जहाजबांधणी व अभियांत्रिकी व्यवसायही उत्कर्षावस्थेत आहे. येथील विद्यापीठाची स्थापना १५८२ मध्ये झाली. वैद्यक, कायदा, गायन व अन्य कला, धर्मशास्त्र इ. शाखा यात असून अलीकडे आण्विक व इलेक्ट्रॉनिक विषयांच्या संशोधनाची खास व्यवस्था येथे करण्यात आली आहे. एडिंबरोमध्ये शिक्षणाच्या विविध सोयी उपलब्ध असल्याने हे शिक्षणाचे मोठे केंद्र समजले जाते.

रॉयल स्कॉटिश अकादमी, नॅशनल गॅलरी व रॉयल स्कॉटिश म्यूझियममधील चित्रशिल्पादी कलासंग्रह, येथील प्राणीसंग्रहालय व वनस्पती उद्यान, राष्ट्रीय ग्रंथालय, सेंट जाईल्स कॅथीड्रल इत्यादींवरून एडिंबरोच्या समृद्ध सांस्कृतिक जीवनाची कल्पना येते. वॉल्टर स्कॉट व स्टीव्हन्सन, डेव्हिड ह्यूम, ॲडम स्मिथ इ. साहित्यिक, धर्मसुधारक जॉन नॉक्स यांच्या वास्तव्यामुळेही एडिंबरोची सांस्कृतिक भरभराट झाली. १९४७ मध्ये सुरू करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय नृत्यनाट्य महोत्सव हे एडिंबरोचे सर्वांत मोठे सांस्कृतिक आकर्षण आहे. डेव्हिड लिंझीच्या नाटकाचा प्रयोग हे या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य असून या शारदीय महोत्सवात प्रसिद्ध संगीतिकांचे प्रयोग होतात. जागतिक कीर्तीचे नट, तसेच नृत्य व संगीत विशारद यांच्या कलाविष्काराने हा महोत्सव गजबजलेला असतो. या महोत्सवासाठी सु. ९०,००० लोक येथे जमतात. (चित्रपत्र ७६).

ओक, द. ह.