एडगर : (? ९४४ ? – ८ जुलै ९७५). मध्ययुगीन इंग्लंडमधील एक प्रसिद्ध राजा. वेसेक्स परगण्याचा राजा पहिला एडमंड याचा मुलगा. त्याची मर्शिया व नॉर्थंबरलँडच्या गादीवर ९५७ मध्ये राजा म्हणून निवड झाली. पुढे ९५९ मध्ये तो वेसेक्सच्या गादीवर बसला. त्याने स्कॉटलंड व वेल्समधील अंतर्गत बंडाळी मोडून तेथील केनेथ व इड्वाल ह्या राजांना सरंजामी सरदाऱ्या बहाल केल्या आणि शांतता प्रस्थापित केली. इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या डॅनिश लोकांना त्याने विशेष हक्क देऊन त्यांचीही मैत्री संपादिली. त्यामुळे डेन्मार्कमधून होणाऱ्या डॅनिश लोकांच्या स्वाऱ्या काही काळ थांबल्या. ह्याशिवाय त्याने आरमार भरभक्कम करून देशातील वाटमारी व व्हायकिंग लोकांची आक्रमणे ह्यास पायबंद घातला. साहजिकच व्यापार वाढून इंग्लंडची आर्थिक स्थिती सुधारली. विधिसंहिता तयार करून त्याने न्यायपद्धतीत अनेक सुधारणा केल्या. डन्स्टन ह्या धर्माधिकाऱ्याच्या साहाय्याने केलेल्या त्याच्या धर्ममठांबाबत सुधारणाही उल्लेखनीय आहेत. डेन, सॅक्सन, वेल्श इ. इंग्लंडमधील तत्कालीन जमातींना त्याने न्यायाने व नि:पक्षपातीपणे वागविल्यामुळे पुढे इंग्लंडचे एकीकरण होण्यास मदत झाली आणि अँग्लालँड (अँग्लीज लोकांची भूमी) म्हणजे इंग्लंड हे नाव रूढ झाले. शांतताप्रिय राजा म्हणून त्याचे नाव इतिहासात प्रसिद्ध आहे.
ओक, द. ह.