उष्णताजन्य विकार : वातावरणातील उष्णता फार वाढल्यामुळे होणार्‍या विकारांना उष्णताजन्य विकार असे म्हणतात.

हे विकार साहजिकच उष्णकटिबंधात अधिक प्रमाणात दिसतात. समशीतोष्ण प्रदेशांत हवेचे तापमान एकदम वाढले, तर तेथेही हे विकार होऊ शकतात. हवेचे सावलीतील तापमान ४३·५० से. अथवा त्यापेक्षा अधिक वाढले, तर हे विकार आढळतात. हवा उष्ण असून तिच्यातील आर्द्रता वाढल्यास अथवा ज्यांमुळे रक्तपरिवहन (रक्तप्रवाह वाहणे) आणि श्वसन नीट मोकळेपणाने होऊ शकणार नाही असे घट्ट कपडे वापरल्यास हे विकार संभवतात.

शरीरातील उष्णतेचे नियंत्रण मस्तिष्काच्या (मेंदूच्या) तळाशी असलेल्या अभिवाही मस्तिष्ककेंद्राकडून (त्वचेकडून ज्याच्याकडे मज्‍जातंतूंच्या द्वारे संदेश जातात त्या मेंदूतील केंद्राकडून) होत असते. हे नियंत्रण दोन प्रकारांनी होते : भौतिक आणि शारीरिक. त्वचेमधून उष्णतेचे संवहन (प्रत्यक्ष रेणूंची वा अणूंची हालचाल न होता एका रेणूकडून वा अणूकडून दुसर्‍या रेणूकडे वा अणूकडे उष्णता वाहणे) संनयन (उष्ण द्रव्याचा प्रवाह थंड द्रव्याकडे जाणे), प्रारण (तरंगरूपाने उष्णता बाहेर पडणे) आणि बाष्पीभवन हे भौतिक आणि घाम येणे, रक्तवाहिन्यांचे आकुंचन-प्रसरण होणे हे शारीरिक नियंत्रण असते.

उष्णताजन्य विकारांची संप्राप्ती (विकार होण्याची कारणे) अजून निश्चितपणे समजलेली नाही. त्यांची सुरुवात शारीरिक श्रमानंतर होते. तीव्र आणि चिरकारी (दीर्घकालिक) संसर्ग रोगामुळे, पानात्ययामुळे (मद्य पिण्याच्या अतिरेकामुळे) आणि वृक्कादी (मूत्रपिंडादी) अंतस्त्यांच्या (अंतर्गत इंद्रियांच्या) विकारांमुळे हे विकार होण्याची प्रवृत्ती वाढते. एखाद्या प्रदेशात उष्णतेची लाट आली असता शरीराचे त्या स्थितीशी अनुकूलन होण्याला वेळ मिळू न शकल्यामुळे हे विकार संभवतात, म्हणून अशी लाट येण्याच्या सुरुवातीस या विकारांचे प्रमाण अधिक दिसते. लहान मुले आणि वृद्ध यांना हे विकार तरुणांपेक्षा लवकर होतात.

उष्णताजन्य विकारांचे तीन प्रकार आहेत : (१) ऊष्मा-अवक्लांती (उष्णतेमुळे येणारी मूर्च्छा), (२) ऊष्मा-स्‍नायुसंकोच आणि (३) ऊष्माघात, आतपाघात किंवा ऊष्मा-तापाधिक्य.

(१) ऊष्मा-अवक्लांती : या प्रकारात रोग्याला एकाएकी घेरी व मूर्च्छा येते. चेहरा पांढरा फटफटीत पडतो. शरीराचे तापमान प्राकृतावस्थेइतके अथवा त्यापेक्षा कमी असते. ⇨ अवसादाची (शॉकची) सर्व लक्षणे दिसतात.

मूर्च्छा आल्याबरोबर रोग्याला आडवे करून घट्ट कपडे सैल करावे पंखा लावून हवा खेळती राहील असे करावे. बेशु्द्धी लवकरच नाहीशी होऊन रोगी एकदम बरा होतो. परंतु काही काळानंतर त्याला ऊष्माघात होण्याचा संभव असल्यामुळे त्याला विश्रांती देऊन काही वेळ देखरेखीखाली ठेवावे लागते.

(२) ऊष्मा-स्‍नायुसंकोच : या प्रकारात स्‍नायूंना एकदम पेटके येतात. भट्टीपाशी, खाणीत व एंजिनाजवळ उष्ण हवेमध्ये कष्टाची कामे करीत असलेल्या लोकांना एकदम पुष्कळ घाम आल्यामुळे रक्तातील पाणी आणि मीठ (सोडियम क्लोराइड) कमी झाल्यामुळे हा विकार होतो. विशेषतः घाम आल्यानंतर नुसतेच पाणी प्याल्यास हा विकार होण्याचा संभव असतो. पायांत, मांड्यांत जोराचे तीव्र वेदनायुक्त पेटके येतात दंड व पोट येथील स्‍नायूही जोराने संकोच पावतात. क्वचित ओकारीही होते.


या विकाराचा प्रतिबंध करण्यासाठी आहारात व इतर वेळेलाही भरपूर प्रमाणात मीठ व पाणी द्यावे लागते. पेटके आल्यानंतर ते कमी करण्यासाठी अफूचा अर्क (मॉर्फीन) आणि नीलेतून लवणद्राव (सलाइन) देतात.

(3) ऊष्माघात : या प्रकारात सुरूवातीस घाम येण्याचे बंद होते, एकाएकी घेरी येऊ लागते ओकारी वा अतिसार आणि संभ्रांती अथवा मनस्थिती क्षुब्ध होऊन रोगी बेशुद्ध पडतो. रोग्याचा चेहरा लाल असून त्वचा गरम आणि शुष्क असते. ताप ४२·८ से. अथवा त्यापेक्षाही अधिक असतो. झटके येण्याचा संभव असतो. योग्य इलाज वेळीच न झाला तर ताप वाढत जाऊन मृत्यू येतो. पहिल्या २४ ते ४८ तासांमध्ये मृत्यू न आला तर विकार बरा होण्याचा संभव असतो मात्र काही दिवस बेशुद्धी, अस्वस्थता आणि वात ही लक्षणे चालूच राहतात. एकदा ऊष्माघात होऊन गेलेल्या व्यक्तीला पुनःपुन्हा हा विकार होण्याचा संभव असतो. अतितीव्र प्रकारात मेंदू, हृदय, वृक्क, यकृत वगैरे ठिकाणी रक्तस्राव होतो.

ऊष्माघात टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते .उन्हाळ्यात थंड हवेच्या वेळी म्हणजे सकाळी व संध्याकाळीच कामे करावीत. रोज एक अथवा अधिक वेळा स्‍नान करावे. आहारात भरपूर मीठ आणि पाणी घेतले पाहिजे. घरामध्ये हवा चांगली खेळेल आणि जरूर तर खिडक्यांवर ओले, साधे वा वाळ्याचे पडदे लावावे. हवा थंड करण्यासाठी पंखे आणि त्यांच्यावर पाणी सतत उडत राहील अशी यंत्रणा (कूलर) विदर्भ भागात करतात.

रोग्याला आडवा निजवून सर्व बाजूंनी थंड हवा खेळेल अशी व्यवस्था असावी. जरूर तर गार पाण्यात त्याला गळ्यापर्यंत बुडवून ठेवावा. गुदद्वारातील तापमान ३९ से. येईपर्यंत त्याला पाण्यातच ठेवावे. मान व डोके यांवर सतत बर्फ ठेवावा. हृद्‍वैफल्य (हृदयाच्या शक्तीचा र्‍हास) नसेल आणि झटके येत नसतील, तर नीलेतून लवणद्राव देतात. झटके बहुधा मस्तिष्कशोफामुळे (मेंदूमध्ये रक्त साठून राहण्यामुळे) येतात, अशा वेळी नीलेतून रक्त काढून घ्यावे लागते. धोक्याची वेळ उलटल्यावरही रोग्याला २०–२५ दिवस पूर्ण विश्रांतीची आणि शामक (क्षोभ कमी करणार्‍या) औषधांची जरूरी असते. ऊष्माघात पुन्हा होऊ नये म्हणून शक्य तर अतिउष्ण प्रदेशात जाणे टाळावे.

रानडे, म. आ. ढमढेरे, वा. रा.

आयुर्वेदीय चिकित्सा : याला सुश्रुतांनी उष्णवातातपदग्ध असे म्हटले आहे. त्यावर शीतस्पर्शी आणि शीतवीर्य अशी सर्व सर्व द्रव्ये द्यावयाची असतात. ही द्रव्ये द्रव असणे अतिशय चांगले. नारळ, काकडी, कोहाळा, केळीचे काल (केळीचा गाभा) व ताडगोळे यांचे पाणी, साखर घालून वाळा, चंदन ,कापूर यांचा वास लावून थोडे थोडे देत रहावे. ताप असेल तर नारळाच्या पाण्यात चंद्रकला कालवून ते पाणी थोड्या थोड्या वेळाने देत जावे. डोके अतिशय दुखत असेल, मूर्च्छा येत असेल तर कांदा वा कोहळा ही किसून डोक्यावर थापावीत. सर्व अंगाला वाळा, कापूर, चंदन घातलेले, तापवून थंड केलेल्या पाण्याचे प्रोक्षण करावे शंखाच्या ठिकाणी जळवा लावून रक्त काढावे. मौतिक, शौक्तिक, दगडीबेर (लघवी सुटण्यासाठी) व कामदुधा ही औषधे वरील अनुपानातून द्यावीत.

या रुग्णाला थंडावा असेल आणि वारा वाहत असेल, प्रकाश सौम्य असेल, थंड सुगंध दरवळत असेल, अशा जागेत मऊ गाद्यागिरद्या असलेल्या जागेवर ठेवावे, कपाळावर कापूर वा चंदन यांच्या पाण्याची पट्टी सतत ओली ठेवावी. अंगाला चंदनाचे पाणी पुनःपुन्हा लावावे. नारळपाणी, दूध, साखर, तूप यांचा बस्ती द्यावा. थंड पाण्यामध्ये अवगाहन करावे.

जोशी, वेणीमाधवशास्त्री