उषा : उषा म्हणजे अरुणोदय. अरुण वर्णाची उषा ही वैदिक देवता आहे. निसर्गातील विशाल व भव्य दृश्यांना देवता मानून रचलेले धार्मिक उच्चकाव्य ऋग्वेदाशिवाय जगाच्या कोणत्याही साहित्यात नाही. ऋग्वेदातील सर्वांत उत्कृष्ट काव्य म्हणून पश्चिमी विद्वान चोवीस उषासूक्तांचा (ऋग्वेदसंहिता १·३०, ४८, ४९, ९२, ११३,१२३-२४ ३·६१ ४·५१-५२ ५·७९-८० ६·६४-६५ ७·४१, ७५, ७६, ७७, ७८, ७९, ८०, ८१ ८·१०१ १०·१७२) निर्देश करतात. ऋग्वेदातील लहानमोठ्या देवता बहुतेक पुरुष आहेत. उदात्त सौंदर्यभावनेने प्रेरित होऊन रचलेली हीच तेवढी देवीची सूक्ते होत. अदिती इ. स्त्रीदेवता ऋग्वेदात आहेत पण उषेचा महिमा मात्र सर्वांत अगाध मानला आहे. उषादेवतेला यज्ञात आहुती द्यावयाची असा ऋग्वेदात कुठेही निर्देश नाही. उषादेवता हे प्रकाशदृश्य आहे, याची जाणीव सूक्तकारांनी कायम ठेवली. ती सर्व ज्योतींमध्ये श्रेष्ठ अशी ज्योती आहे, असा तिचा निर्देश केला आहे.
आकाशात पुन्हापुन्हा जन्म घेणारी, द्यूलोकाची ही कन्या तेजस्वी महिला आहे. काळी रात्र ही तिची भगिनी आहे. या दोन्ही भगिनी नियमाने एकामागून दुसरी अशा प्रगट होतात. सूर्य हा तिचा प्रियकर असून तो सारखा तिच्या पाठीमागे लागलेला असतो. त्याचा प्रकाश तिचा मार्ग उजळून टाकतो व तीही त्यामुळे उजळून निघते. तिचा जन्म लाल अश्वांच्या किंवा बैलांच्या रथात होत असतो. प्रकाशाची वस्त्रे नेसून ही अरुणवर्णाची तरुणी स्नानगृहातील न्हात्या युवतीप्रमाणे पूर्वेस प्रगट होऊन आपले रूप उघडे करून दाखविते. ही नृत्यांगना आपले उरस्तन सारखे दाखवून मोहित करते. ती फार उदार आहे. तिच्यापुढे धाकटा-मोठा हा भेद नाही. सगळ्यांनाच तिच्या अनुपम सौंदर्याचा अनुभव घेता येतो. अंधकारमय स्वर्गाची कपाटे ती उघडते आणि गाईंना गोठ्यातून मोकळे करते. तिची किरणे म्हणजेच गाई होत. रात्रीचा काळा झगा बाजूला करून, पापी भुतांना ती पळवून लावते. चराचराला ती जागवते, सपाद प्राण्यांना जागे करून मार्गक्रमणा करावयास लावते. पक्षिगण आपल्या घरट्यांमधून गगनात संचार करू लागतात आणि सगळी माणसे आपल्या उपजीविकेकरिता उद्योगशील बनतात. चराचराचे ती साक्षात जीवन आहे. यज्ञकर्मांकरिता धार्मिक लोक तिच्यामुळेच उद्युक्त होतात. मधुर ध्वनींनी व स्वरांनी आकाश तिच्यामुळेच भरून जाते. स्वरमाधुर्याची ती नेत्री आहे. ऋताचा पंथ म्हणजे सत्यनियमांचा पंथ ती कधीही सोडत नाही. नियमित स्थानी, देवांनी घालून दिलेल्या नियमांनी ती प्रगट होते. तिचा मार्ग कधीच चुकत नाही. ती सनातन काळापासून प्रतिदिनी उगवते. ती आता उगवली आहे, पुढेही ती उगवेल, ती चिरतरुणी आहे, तिला वार्धक्य नाही, ती अमर आहे अशा तऱ्हेचे तिचे स्तवन ऋग्वेदाने केले आहे.
जोशी, लक्ष्मणशास्त्री