उल्म : पश्चिम जर्मनीच्या बाडेन-वर्टेम्बर्ग प्रांतातील ऐतिहासिक शहर. लोकसंख्या ९२,४८६ (१९७०). डॅन्यूब व इलर नद्यांच्या संगमाजवळ हे वसले असून स्टटगार्ट शहराच्या आग्नेयीस ९४ किमी. आहे. इटलीकडे जाणाऱ्या मार्गावर, घाटाच्या तोंडाशी असल्याने मध्ययुगात उल्म भरभराटीस आले रोमन साम्राज्यातील महत्त्वाचे नगरराज्य म्हणून पंधराव्या शतकापर्यंत त्याची कीर्ती होती. १५३० मध्ये उल्मने प्रॉटेस्टंट पंथ स्वीकारला व त्यानंतर शहराचे वैभव कमी होऊ लागले. एकोणिसाव्या व विसाव्या शतकात शहर पुन्हा ऊर्जितावस्थेत आले. दहा लोहमार्ग, आठ हमरस्ते, शहराजवळून जाणारा ‘आटोबान’ रस्ता व डॅन्यूबवरील या शहरापर्यंत होणारी जहाजवहातूक यांमुळे उल्म दळणवळणाचे केंद्र झाले आहे. शहरात मोटारी, कापड, शेतीची अवजारे, विजेची उपकरणे, धातुकाम, मद्यनिर्मिती इ. उद्योग आहेत. दुसऱ्या महायुद्धात येथील ६५ टक्के वास्तू नामशेष झाल्या घंटेकरिता १६१ मी. उंचीचा मनोरा असलेले गॉथिक चर्च व जुन्या नगरराज्याचे अंश दर्शविणाऱ्या काही इमारती मात्र त्यातून वाचल्या. प्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाइन याचे हे जन्मस्थान होय.

शहाणे, मो. ज्ञा.