उमर: (सु. ५८६–३ नोव्हेंबर ६४४). इस्लामी परंपरेतील दुसरा खलीफा. संपूर्ण नाव उमर इब्न अल् खत्ताब. जन्म मक्का येथे कुरैश जमातीत झाला. मुहंमद पैगंबरानंतर मदीनावासीयांशी उद्भवलेल्या संघर्षात उमरने बाहेरून आलेल्या मुसलमानांचे नेतृत्व केले. २२ ऑगस्ट ६३४ रोजी मुहंमदांचा सासरा पहिला खलीफा अबू बकर वारला, तेव्हा उमर खलीफा झाला. ६३७ मध्ये त्याने कादिसीया येथील प्रसिद्ध लढाईत महत्त्वाचा विजय मिळविला. आपल्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत त्याने सिरिया, पॅलेस्टाइन, ईजिप्त, इराण व पर्शिया ह्या देशांवर विजय मिळवून इस्लामी साम्राज्य स्थापिले. इस्लामी साम्राज्यात अरबी परंपरा टिकवून ती वाढीस लावणे व दुर्बलांचे रक्षण करून प्रबलांना विधिपालन करावयास लावणे, हे त्याचे जीवनकार्य होते. करपद्धती सुरू करून लुटीत मिळालेल्या संपत्तीचा धर्माला पोषक होईल असा विनियोग करण्याचे आर्थिक धोरण त्याने अवलंबिले. जेरूसलेम येथील प्रसिद्ध मशीदही त्यानेच बांधली. मदीना येथे कुफन या ख्रिस्ती पर्शियन गुलामाने त्याला भोसकून मारले.
पहा : खिलाफत.
करंदीकर, म. अ.