उपालि: (इ. स. पू. सु. सहावे शतक). गौतम बुद्धाचा एकनिष्ठ शिष्य. हा नापिताच्या कुळात जन्मला होता. बुद्धाने ज्या काही अल्पवयीन (वीस वर्षांच्या आतील) मुलांना दीक्षा दिली, त्या गटातील हा एक होता. मुलाचे कल्याण व्हावे म्हणून त्याच्या मात्यापित्यांनी त्याच्या संन्यासदीक्षेला परवानगी दिली. अंगुत्तरनिकायातील ‘एतदग्गवग्गा’त विनयधरांमध्ये सर्वात श्रेष्ठ, असे त्याचे वर्णन आहे. म्हणून बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर लगेच भरलेल्या पहिल्या संगीती त उपालीने विनयपिटकाचे संगायन केलेले आहे.उपालि परिपृच्छा ह्या नावाने उपलब्ध असलेल्या एका संस्कृत ग्रंथात विनय-नियमभंग केव्हा होतो व केव्हा होत नाही, हे सांगितले आहे.

बापट, पु. वि.