उपयोगिता: उपभोक्त्याला निरनिराळ्या उपभोग्य वस्तूंची व सेवांची गरज भासते. उपभोक्त्यांच्या गरजा भागविण्याची वस्तूंची व सेवांची जी शक्ती, तिला उपयोगिता असे म्हणतात. स्थूलमानाने अर्थशास्त्राचा इतिहास मूल्यमीमांसेच्या प्रश्नाची उकल करण्यातून उद्भवला आहे, असे म्हणतात. उपयोगिता या संकल्पनेने मूल्यमीमांसेच्या प्रश्नाची उकल होण्यास पुष्कळच मदत झाली आहे आणि म्हणून अर्थशास्त्राच्या तात्त्विक विवेचनात उपयोगिता या संकल्पनेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. वस्तूची उपयोगिता ही नैतिक दृष्ट्या तटस्थ संकल्पना आहे. म्हणूनच उपयोगिता (युटिलिटी) आणि उपयुक्तता (युसफुलनेस) यांतील फरक स्पष्ट केला पाहिजे. ज्या उपभोग्य वस्तूला उपयोगिता आहे ती उपयुक्त असेलच असे नाही. उपयुक्ततेचा नैतिकतेशी संबंध आहे. कोणतीही उपभोग्य वस्तू उपयुक्त आहे की नाही हे नीतिशास्त्र, सामाजिक रूढी, परंपरा आदी कसोट्यांवरून ठरविले जाते. परंतु कोणत्याही उपभोग्य वस्तूला उपयोगिता आहे की नाही, हे तिला असलेल्या उपभोक्त्यांच्या मागणीवरून ठरविले जाते. उपभोक्त्यांना निरनिराळ्या उपभोग्य वस्तूंची गरज का भासते आणि ते वस्तूंची मागणी का करतात, या प्रश्नांचा विचार अर्थशास्त्रात मोडत नाही. तसेच कोणत्या गरजा नैतिकदृष्ट्या इष्ट व कोणत्या अनिष्ट, हेही अर्थशास्त्र सांगू शकत नाही. तंबाखू, अफू, गांजा, विष या व अशा प्रकारच्या वस्तू उपभोक्त्यांच्या आरोग्याला विघातक असल्यामुळे त्यांना उपयुक्तता नाही, परंतु उपयोगिता आहे कारण उपभोक्त्यांना त्यांची गरज असते. म्हणून त्या वस्तूंना मागणी असते आणि उपभोक्ते त्या वस्तू किंमत देऊन विकत घ्यावयास तयार असतात.

कोणत्याही वस्तूची गरज भागविण्याची शक्ती म्हणजे तिची उपयोगिता, असे वर म्हटले आहे. परंतु वस्तूची ही शक्ती किंवा सामर्थ्य म्हणजे तिचा तो स्थायीभाव किंवा वस्तुनिष्ठ गुणधर्म नव्हे. वस्तूची उपयोगिता काही अंशी तिच्या स्थायी गुणधर्मावर व बहुतांश उपभोक्त्यांच्या वृत्तीवर अवलंबून असते. म्हणून उपयोगिता बव्हंशी व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. वस्तूची उपयोगिता तिच्या अंगभूत गुणधर्माने नव्हे, तर उपभोक्त्यांच्या वस्तूच्या गरजेच्या तीव्रतेने दर्शविली जाते. निरनिराळ्या उपभोक्त्यांचे वस्तूंच्या सेवनाबाबतचे अनुभव, त्यांच्या चवी आणि आवडीनिवडी वेगवेगळ्या असल्यामुळे अमुक एका वस्तु-परिमाणाची अमुक उपयोगिता, असे म्हणता येत नाही.

उपभोग्य वस्तूंचा वस्तूनिष्ठभाग व त्यांचा व्यक्तीनिष्ठभाग यांच्या परस्परसंबंधाविषयीच्या वादामुळेच अर्थशास्त्रीय वाङ्मयाला नवीन वळण मिळाले. ॲडम स्मिथ (१७२३–१७९०), डेव्हीड रिकार्डो (१७७२–१८२३), टॉमस मॅल्थस (१७६६–१८३४) वगैरे सनातनवादी अर्थाशास्त्रज्ञांनी वस्तूच्या उपयोगितेविषयी विचार मांडताना वस्तूच्या वस्तुनिष्ठ भागावर अधिक भर दिलेला दिसून येतो. नंतर साधारणपणे १८७० पासून उपयोगितेचा वापर करताना वस्तूच्या व्यक्तीनिष्ठ भागावर अधिक जोर देण्यात आला व अर्थशास्त्राच्या प्रगतीला नवीन चालना मिळाली. विल्यम स्टॅन्ली जेव्हन्झ (१८३७–१८८२), कार्ल मेंगर (१८४०–१९२१), लेआँ व्हालरा (१८३४–१९१०), हे सुप्रसिद्ध ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञ सीमांत उपयोगिता संप्रदायाचे अध्वर्यू होत. नंतरच्या अर्थशास्त्रज्ञांनी म्हणजे ॲल्फ्रेड मार्शल (१८४२–१९२४), व्हेझर (१८५१–१९२६), बंबाव्हेर्क (१८५१–१९१४), व्हिलफ्रेदो पारेअतो (१८४८–१९२३) यांनी सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला अर्थशास्त्रात समाविष्ट करून घेतले.

घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम: कोणत्याही उपभोग्य वस्तूच्या सेवनापासून उपभोक्त्याला समाधान प्राप्त होते. उपभोग्य वस्तूच्या उपयोगितेचे मापन समाधानाच्या एककांत किंवा अंशांत करतात. उपभोक्त्याजवळील वस्तूचे परिमाण वाढत असताना समग्र उपयोगिता वाढत जाणे स्वाभाविक आहे परंतु जसजसे वस्तूचे परिमाण वाढत राहते, तसतसे समग्र उपयोगितेच्या वाढीचे प्रमाण कमी कमी होत जाते. उपभोक्त्याच्या दृष्टीने दोन सफरचंदांची समग्र उपयोगिता तीन सफरचंदांच्या समग्र उपयोगितेपेक्षा कमी असते, म्हणजे सफरचंदांच्या परिमाणात एका सफरचंदाची भर पडल्यामुळे तीन सफरचंदांची समग्र उपयोगिता दोन सफरचंदांच्या समग्र उपयोगितेपेक्षा अधिक होते. वस्तूच्या परिमाणात वाढ झाल्याने समग्र उपयोगितेत जी वाढ होते, तिला सीमांत उपयोगिता म्हणतात. समजा, एका सफरचंदाची समग्र उपयोगिता १० एकक आहे, तर त्याची सीमांत उपयोगिता १० एककच राहील. दोन सफरचंदांची समग्र उपयोगिता १६ एकक आहे आणि तीन सफरचंदांची समग्र उपयोगिता २० एकक आहे, तर दोन सफरचंदांची सीमांत उपयोगिता सहा आणि तीन सफरचंदांची सीमांत उपयोगिता चार होईल

समग्र उपयोगिता व सीमांत उपयोगिता तक्ता 

सफरचंदाचे एकक 

समग्र उपयोगिता 

सीमांत उपयोगिता 

१ 

१० 

१० 

२ 

१६ 

६ 

३ 

२० 

४ 

४ 

२० 

० 

५ 

१५ 

-५ 

समग्र उपयोगिता व सीमांत उपयोगिता ह्यांतील परस्परसंबंध सोबतच्या तक्त्यावरून स्पष्ट होईल.


समग्र व सीमांत उपयोगिता दर्शविणारा आलेख.

वरील तक्त्याच्या साहाय्याने खालील आकृती काढलेली आहे. उपभोक्त्याजवळ उपभोग्य वस्तूचे परिमाण प्रमाणाबाहेर वाढले, तर उपभोक्त्याला त्या वस्तूचा उबग येईल आणि तरीसुद्धा जर तो सेवन करीत राहिला, तर समग्र उपयोगिताच घटेल म्हणजे त्या परिमाणाची सीमांत उपयोगिता ऋण होईल (पाचव्या सफरचंदाची उपयोगिता-५ होईल). वस्तूच्या सेवनाबाबतचा उपभोक्त्याचा हा अनुभव सीमांत उपयोगितेच्या नियमात ग्रथित केला आहे. ॲल्फ्रेड मार्शलने नमूद केल्याप्रमाणे तो नियम असा :‘उपभोक्त्याजवळील कोणत्याही वस्तूचे परिमाण जसजसे थोड्या थोड्या अंशाने वाढत जाते, तसतसे परिमाणाच्या प्रत्येक अंशवाढीगणिक उपभोक्त्याच्या समाधानात होणारी वाढ कमी कमी होत जाते. या सीमांत उपयोगिता-नियमाच्या शर्ती अशा : (१) उपभोक्त्याची आवड कायम राहिली पाहिजे, (२) त्याच्या मानसिक अवस्थेत बदल होता कामा नये, (३) वस्तूचे सर्व नग एकजिनसी असले पाहिजेत, (४) उपभोक्त्याने एकाच वस्तूच्या सेवनावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि (५) वस्तूंच्या लागोपाठच्या एककांच्या सेवनात खंड पाडता कामा नये.

सम-सीमांत उपयोगितेचा सिद्धांत: घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर हा सिद्धांत आधारलेला आहे. याला उपभोगाच्या क्षेत्रातील पर्यायतेचा सिद्धांत असेही म्हणतात. व्यक्तीच्या गरजा अनंत असतात, पण त्या पुऱ्या करण्याची साधने मर्यादित असल्याने व्यक्तीला सर्वच गरजा पुऱ्या करता येत नाहीत. पैशाचा योग्य उपयोग करून जास्तीतजास्त गरजा कशा भागवावयाच्या व कमाल समाधान कसे मिळवावयाचे, याचा विचार व्यक्तीला करावा लागतो. सर्व पैसे एकाच वस्तूवर खर्च केल्यास व्यक्तीला जास्तीतजास्त समाधान मिळणार नाही. एकतर त्यात वस्तूपासून मिळणारी उपयोगिता क्रमशः घटत जाते, दुसरे व्यक्तीच्या गरजांत विविधता व वैचित्र्य असते. जास्तीतजास्त समाधान मिळविण्यासाठी व्यक्ती आपल्याकडील पैसा विविध वस्तूंवर अशा तऱ्हेने खर्च करते की प्रत्येक वस्तूची सीमांत उपयोगिता सारखीच होते. , , या वस्तूंची उपयोगित-कोष्टके दिलेली असतील आणि त्यांच्या किंमती गृहीत धरलेल्या असतील, तसेच उपभोक्त्याने आपल्या जवळील ९ रुपये या मर्यादित रकमेपैकी ४ रुपये वर, ३ रुपये वर आणि २ रुपये वर खर्च केले असतील, तर वर खर्च केलेल्या ४ रुपयांची, वर खर्च केलेल्या ३ रुपयांची आणि वर खर्च केलेल्या २ रुपयांची सीमांत उपयोगिता समान असेल. रकमेची अशी विभागणी झाल्यावर वस्तूच्या किंमती आणि सीमांत उपयोगिता-कोष्टके दिली असतील, तर निरनिराळ्या वस्तूंच्या किंमती आणि त्यांच्या परिमाणांच्या सीमांत उपयोगिता यांचे प्रमाण सारखेच असेल आणि उपभोक्त्याला अधिकतम समाधान प्राप्त होईल. म्हणजे

‘अ’ची 

 

‘ब’ची 

 

‘क’ची 

सी. उपयोगिता 

=

सी. उपयोगिता 

=

सी. उपयोगिता 

‘अ’ची किंमत 

 

‘ब’ची किंमत 

 

‘क’ची किंमत 

वास्तविक जीवनात समसीमांत उपयोगिता नियम उपयोगात आणणे अवघड आहे. कारण काही वस्तूंवरील खर्च अविभाज्य असतात आणि रेडिओ किंवा मोटार यांसारख्या वस्तू एकदा खरेदी केल्यानंतर अधिकाधिक परिमाणांत कोणी खरेदी करीत नाहीत. पहिली अडचण उपभोक्ता, वस्तू हप्ते-पद्धतीने खरेदी करीत आहे, असे मानून टाळता येते.

उपयोगितेचे मापन: सीमांत उपयोगितेविषयीचे विवेचन, वस्तूच्या सेवनापासून मिळणारी उपयोगिता मोजता येते, या गृहीततत्त्वावर आधारलेले आहे. परंतु एखाद्या वस्तूपासून किती उपयोगिता मिळते, याची कल्पना करणे शक्य असले, तरी तिचे मूळसंख्यावाचक पद्धतीने मोजमाप करणे अशक्य असते. थर्मामीटरच्या साहाय्याने जसे अचूक तपमान मोजता येते किंवा फूटपट्टीच्या साहाय्याने जशी लांबीरुंदी अचूकपणे मोजता येते, त्याप्रमाणे उपयोगिता मोजण्याचे कोणतेच अचूक साधन उपलब्ध नाही. उपयोगिता ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे. आत्मनिष्ठ भावभावनांची गणितीय संख्येत मोजदाद करणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसते. एकाच व्यक्तीला एकाच वस्तूची उपयोगिता वेगवेगळ्या काळात वेगवेगळी वाटेल. व्यक्तीचे मनोविचार जसे बदलतात, त्याप्रमाणे उपयोगितेत बदल होत जातो.

उपयोगिता मोजता येत नसली, तरी एखाद्या व्यक्तीस एका वस्तूपेक्षा दुसरी वस्तू जास्त पसंत आहे की, दोन्ही वस्तू सारख्याच प्रमाणात पसंत आहेत, हे मात्र सांगता येते. असे सांगताना वस्तूंची उपयोगिता मोजण्याची आवश्यकता नसते.उपभोक्त्याच्या मनात वस्तूविषयी असलेल्या पसंतीवरून वस्तूंची अधिमान श्रेणी ठरविता येते व तिच्या जोरावर उपभोक्त्याला एखादी वस्तू किंवा विविध वस्तूंचा एखादा गट, हा दुसऱ्या वस्तूपेक्षा किंवा त्या विविध वस्तूंच्या दुसऱ्या गटापेक्षा जास्त पसंत आहे की सारख्याच प्रमाणात पसंत आहे, ते सांगता येते. मूळसंख्यावाचक पद्धतीने उपयोगिता मोजण्याची रीत आता बाजूला पडली असून आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी उपयोगितेच्या सिद्धांतामागील तत्त्व उपयोगितेच्या संकल्पनेचा उपयोग न करता स्पष्ट केलेले आहे. क्रमवाचक संख्यापद्धतीवर आधारलेले समतुष्टी वक्र तंत्र प्रथम पारेअतो व रशियन अर्थशास्त्रज्ञ स्लट्स्की ह्यांनी मांडले आणि पुढे हिक्स व ॲलन ह्यांनी या तंत्राला पूर्णत्व प्राप्त करून दिले.

पहा : समतुष्टी वक्र सेवन.

सुर्वे, गो. चिं.