उपत्वचा: (लॅ. क्युटिकल). वनस्पतींची पाने, पुष्पदले, फळे व कोवळ्या फांद्या किंवा खोडे ह्या भागांवरच्या  अपित्वचेवर क्युटिन या मेदी (चरबीसारख्या) पदार्थाचा कमीजास्त जाडीचा थर पसरलेला असतो, त्यास उपत्वचा ही संज्ञा आहे. हा पदार्थ अनेकदा कोशिकावरणातही (वनस्पतीतील सूक्ष्म घटकांच्या म्हणजे पेशींच्या आवरणातही) सामावलेला असतो व तो कोशिकांतील सजीव प्राकलापासून [कोशिकेचे केंद्र व त्याच्या भोवतील जीवद्रव्ये यांपासून, कोशिका] निर्माण होतो. तो अपित्वचेवर चिकटून वाढतो व त्यामुळे त्या अवयवावर चकाकी येते क्‍वचित तो अपित्वचेपासून अलग झाल्यास रूपेरी दिसतो. तो पारदर्शक असून पाण्याला अपार्य (पलीकडे न जाणे) असतो. वाढ चालू असलेल्या मुळावर तसेच त्वग्रंध्रावर (त्वचेवरील छिद्रावर) तो नसतो. प्राचीन वनस्पतींच्या जीवाश्मांवरचा (अवशेषांवरचा) हा थर सतत टिकून राहिलेला आढळतो. सावलीत व ओलसर हवेतील वनस्पतींवरचा हा थर पातळ आणि उघड्यावर किंवा रुक्ष ठिकाणी वाढणाऱ्या वनस्पतींवरचा जाड असतो. जलवनस्पतींच्या बुडलेल्या अवयवांवर त्याचा अभाव असतो. क्युटिनीभवन झालेल्या (क्युटिनाचा थर बसलेल्या) अवयवांच्या पृष्ठभागातून बाष्पीभवन फार कमी होते त्यावर पडलेले पाणी वाहून जाते व चिकटत नाही. कित्येक वनस्पतींच्या उपत्वचेच्या थरावर मेणाचा थर आढळतो व त्यामुळे त्याला निळसरपणा येतो (उदा., निळी द्राक्षे, मनुका, घायपाताची पाने). ब्राझील मधील ताडाच्या एका जातीच्या (कोपर्निशिया सेरीफेरा) पानावरच्या मेणाला (कार्नोबा वॅक्स) व्यापारी महत्त्व आहे.

पहा : त्वग्रंध्र मेण शारीर वनस्पतींचे.

परांडेकर, शं. आ.