उत्तर प्रदेश : भारतातील लोकसंख्येत पहिल्या क्रमांकाचे व क्षेत्रफळात चौथ्या क्रमांकाचे राज्य. क्षेत्रफळ २,९४,४१३ चौ. किमी. लोकसंख्या ८,८३,४१,१४४ (१९७१). २३०५२’ उ. ते ३१०१८’ उ. आणि ७७०३’ पू. ते ८४०३९’ पू. याच्या वायव्येस हिमाचल प्रदेश, उत्तरेस तिबेट व नेपाळ, पूर्वेस नेपाळ व बिहार, दक्षिणेस मध्य प्रदेश आणि पश्चिमेस राजस्थान, दिल्ली व हरयाणा आहे. लखनौ ही राज्याची राजधानी आहे.
भूवर्णन : उत्तर प्रदेशाचे चार नैसर्गिक विभाग पडतात : (अ) उत्तरेकडील हिमालयाचा पर्वतीय प्रदेश : हा एखाद्या प्रचंड भिंतीसारखा पूर्व-पश्चिम पसरला आहेअगदी उत्तरेस सरासरी ६,१०० मी. उंचीच्या मुख्य हिमालयश्रेणी असून त्यात कामेट, त्रिशूल, नंदादेवी यांसारखी उत्तुंग शिखरे आहेत त्यांच्या अलीकडे सरासरी ३,७२० मी. उंचीच्या मध्य हिमालयाच्या श्रेणी आणि त्यांच्या दक्षिणेस सरासरी १,५५० मी. उंचीच्या बाह्य हिमालय किंवा शिवालिक पर्वतश्रेणी असून त्यांत नैनिताल, मसूरी, अलमोडा, रानीखेत यांसारखी गिरिस्थाने आहेत. शिवालिक रांगां मधील ‘दून’ नामक उत्तम हवा पाण्याच्या व सुपीक खोर्यांना उत्तर प्रदेशाचे उद्यान म्हणतात. यांच्याही दक्षिणेस पसरलेल्या पायथा-टेकड्या शिवालिक रांगांचेच फाटे आहेत व त्यांना लागूनच नद्यांनी वाहून आणलेल्या दगडवाळूचा ‘भाबर’ पट्टा पश्चिमेस सु. ३२ किमी. रुंद असून पूर्वेकडे अरुंद होत गेला आहे. त्याच्या खालून जलप्रवाह वाहतात.
(आ) तराई : भाबर पट्ट्यातील भूमिगत प्रवाह ज्या भूप्रदेशात पुन्हा वर येतात, त्याचे नाव तराई असून त्यातून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्यामुळे तो डबकी, सरोवरे, उंच गवत व दाट जंगलांनी व्यापलेला आहे. तराईमधील हवा दमट व मच्छरांच्या उपद्रवाने रोगट आहे. त्यामुळे तेथे वस्ती कमी असून पिके काढण्यासाठी पर्वतप्रदेशातून व मैदानभागातून हंगामापुरते येणारे लोक कापण्या होताच परत जातात. तराई संपून गंगेचे मैदान ज्या सीमेवर सुरू होते त्या सीमेवर सहारनपूर, पीलीभीत, बहरइच, गोरखपूर अशी शहरे आहेत आणि त्यांच्या आधारावर तराईतील झाडी व दलदल कमी करून शेतीयोग्य जमीन वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत.
(इ) गंगेचे मैदान : हा उत्तर प्रदेशाचा अधिकांश भाग आहे. गंगा व तिला मिळणार्या यमुना, रामगंगा, घागरा इ. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाने हा सपाट, जलसमृद्ध व सुपीक विभाग बनलेला आहे. सहारनपूरपासून अलाहाबादपर्यंत समुद्रसपाटीपासून २५० ते १२५ मी. उतरत आलेले व वार्षिक सरासरी १०० सेंमी. पावसाचे क्षेत्र हे गंगेचे वरचे मैदान असून यात मुख्यतः गंगा-यमुना दुआबाचा अंतर्भाव होतो. गंगेचे मधले मैदान अलाहाबादपासून पूर्वेस बिहारची राजधानी पाटणापर्यंत पोहोचते. याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान १०० ते १५० सेंमी. असून घागरा, गंडक, शोण इ. उपनद्या गंगेत विपुल पाणी आणून ओततात तथापि त्यांना महापूर येतात आणि त्यांचा गाळ साचून पात्रेही बदलत राहतात. त्यामुळे गंगेच्या मध्य मैदानात अनेक तुटक जलाशय, दलदली आणि खाजणे निर्माण झाली आहेत.
(ई) दक्षिणेचा पठारी प्रदेश : हा दोन प्रकारांचा आहे.एक झांशीभोवतालच्या मध्य प्रदेशाच्या बुंदेलखंड पठाराचा ‘नीस’ खडकाचा भाग आणि दुसरा त्याच्या पूर्वेस विंध्याचल श्रेणीचा शोण नदीच्या उत्तर-दक्षिणेचा प्राचीन खडकांचा भाग याच्या उत्तरेच्या मिर्झापूरवरून याला मिर्झापूर पठार म्हणतात. हा प्रदेश उंचसखल असून तुटक खडक, सुटे डोंगर व लहान लहान दर्या यांचा बनलेला आहे.
मुख्य हिमालय पर्वतप्रदेश अनेक जातींच्या प्राचीन खडकांचा, बाह्य हिमालय मागाहून वर आलेल्या नदीनिक्षेपांचा आणि पायथाटेकड्या वाळू-मुरुमाच्या आहेत. हिमालयाच्या रांगा घड्या पडलेल्या पर्वताच्या असून त्याला उंच ढकलणारी भूशक्ती अजून जागृत असल्याने त्या भागात भूकंपाचा संभव नेहमी असतो. जास्त जाडीची दून खोरी हे नदीगाळाचे प्रदेश आहेत आणि गंगेचे मैदान हा तर ९०० मी. हून जास्त जाडीच्या गाळाचा थर आहे. जुन्या गाळाचे पुरांच्या पाण्यापासून सुरक्षित प्रदेश ते ‘बांगर’ व पुराखाली जाणारे ते ‘खादर’ अशा स्थानिक संज्ञा आहेत. अतिप्राचीन खडकांचा मिर्झापूर पठारप्रदेश अनेक नद्यांनी कोरून काढलेला आहे. शोण नदीच्या उत्तरेकडचा भाग विंध्य पठाराच्या अवशिष्ट पर्वतांचा असून त्यात मुख्यतः सिकताश्म, थरांचे अनेक खडक व चुनखडक आहेत दक्षिणेकडचा भाग सातपुड्याच्या पूर्वरांगांतील अग्निजन्य व रूपांतरीत खडकांचा आहे. बुंदेलखंडातील खडक प्राचीन ग्रॅनाइट व नाईस जातीचे आहेत.
उत्तर प्रदेश अधिकांश नदीगाळाचा असल्यामुळे ती थोडीबहुत खनिजे सापडतात ती डोंगराळ भागात. नैनिताल, झांशी व मिर्झापूर जिल्ह्यांत थोडे लोहधातुक आढळले आहे. अलीकडे जिप्सम गढवाल जिल्ह्यात, मॅग्नेसाइट, तांबे व शिसे अलमोडा व गढवाल, टेहरी-गढवाल वगैरे जिल्ह्यांत आणि फॉस्फोराइट गढवाल व डेहराडून जिल्ह्यांत मिळण्याची शक्यता दिसली आहे पण वाहतुकीच्या व इतर अडचणींमुळे ही खनिजे काढणे अद्याप नफ्यात पडत नाही. खनिज तेलाचाही मोठा संचय हिमालयात असेल असे अनुमान आहे. चुनखडक व स्लेट (पाटीचा खडक) हिमालयाच्या वेगवेगळ्या भागांत मिळतात. लोहधातुक व कनिष्ठ प्रतीचा कोळसा मिर्झापूर पठाराच्या सिंगरौली भागात उपलब्ध आहे, पण उत्पादन आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासारखे नाही. चुनखडक मात्र या क्षेत्रात भरपूर असून चुर्क येथे सिमेंटचा एक मोठा कारखाना चालत आहे त्याशिवाय चुन्याचे व इमारतींच्या सजावटीत उपयोगी अशा नानारंगी चुनखडींचेही उत्पादन बरेच होते. विंध्य पर्वतरांगेतील सिकताश्म बांधकामाच्या दगडांसाठी उपयुक्त असल्याने त्याचा वापर राज्यात पुष्कळ होतो व मिर्झापूर जिल्ह्यात त्याच्या अनेक खाणी आहेत. मैदानी भागात रस्त्यांना उपयोगी मुरुम, चिकण माती व काचेसाठी लागणारी वाळू भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. भारतातील सिलिका वाळूचे ८०% उत्पादन उत्तर प्रदेशात होते. लोणा आलेल्या जमिनीवरच्या खारापासून सोरा-उत्पादन होते. झांशी जिल्ह्याच्या चरखरी तालुक्यात पूर्वी हिरेही सापडले आहेत.
दून खोऱ्यातील व गंगामैदानातील गाळमाती सुपीक आहे. नद्यांच्या किनार्यालगत खादर माती बारीक रेतीमिश्र असेल आणि बांगर भागात पाण्याचा निचरा नीट असेल तर दगड खड्यांच्या थरावर दुमट माती असते. रेताड, दुमट, चिकण आणि मिश्रजातींच्या मृदा राज्यात सर्वत्र आढळतात. पूर्वभागाच्या सखल प्रदेशात चिकण व काळी माती असून ती पाटाच्या पाण्यावर चांगली पिके देते. बुंदेलखंड पठारभागाच्या आणि फत्तेगढ, कानपूर व अलाहाबाद जिल्ह्यांत सापडणार्या ‘काबर’, ‘राकर’ , ‘परवा’ , ‘मार’ अशा जातींच्या मृदा तुलनेत कोरड्या पण सुपीक असतात. निर्जल भागातील ‘रेह’ नावाची खार माती नापीक असते, ती गंगा-घागरा दुआबात अधिक प्रमाणात आढळते. चंबळ, बेटवा, यमुना, गोमती या नद्यांच्या खोर्यांत मातीची धूप होऊन मोठमोठ्या घळी व खड्डे तयार झाले आहेत.
राज्याची मुख्य नदी गंगा. तिला डाव्या अंगाने रामगंगा, गोमती, व घागरा आणि उजव्या बाजूने यमुना या नद्या मिळतात. टेहरीगढवालमध्ये गंगोत्रीला उगम पावली, तरी अलकानंदा-भागीरथी संगमापासून गंगा ही गंगा म्हणून सुरू होते, ती हरद्वारजवळ मैदानात उतरून राज्याच्या आग्नेयीस वाहत जाते. यमुनेचा उगम गंगेच्या पश्चिमेस होऊन ती राज्याच्या पश्चिम सीमेवरून काही अंतर वाहून अलाहाबादजवळ गंगेला मिळते. दक्षिण पठारी भागातून यमुनेला चंबळ, सिंद, बेटवा व केन या नद्या मिळतात. मिर्झापूर जिल्ह्यातून शोण नदी पश्चिमपूर्व वाहते तिला मिळणार्या रिहांड नदीवरच्या धरणामुळे झालेला जलाशय अधिकांश उत्तर प्रदेशात येतो. त्याखेरीज मोठे जलसंचय या राज्यात नाहीत.
या राज्याचे हवामान सामान्यतः उष्ण व कोरडे आहे. उत्तरेतला हिमालय पर्वतप्रदेश तुलनेने थंड व जास्त पावसाचा, तेथे तपमान सरासरी १२·८० से. व वार्षिक सरासरी पर्जन्य १५० सेंमी. पेक्षा जास्त असतो. तराईतील पर्जन्यमान १०० ते २०० सेंमी. असून तेथे जुलै ऑगस्टमध्ये पाऊस जास्त पडतो पूर्वेकडून पश्चिमेकडे पाऊस कमी होत जातो. तपमान थंडीत १५·८० से. ते १८·३० से. व उन्हाळ्यात २६·७० से. हून अधिक असते. मैदानी भागातील हवामान उन्हाळ्यात कोरडे व गरम, पावसाळ्यात दमट व गरम आणि हिवाळ्यात थंड व कोरडे असते. उन्हाळ्यातील तपमान ४६० से. च्या वर जाते आणि सकाळी दहापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत कढत पश्चिमवारे वाहतात. अलाहाबादच्या पूर्वेकडील अधिक पावसाचा भाग भातासारख्या पिकांना अनुकूल, तर पश्चिमेकडचा भाग गहू, जव, बाजरी, ज्वारी अशा पिकांना योग्य आहे. थंडीच्या सुखद ऋतूत संपूर्ण प्रदेशात सुगीचा मोसम असतो. कधीकधी हलका हिमपात होतो, तर कधी थंडीची लाट येऊन जाते. मोसमी पाऊस बंगालच्या उपसागरावरून येतो. दक्षिणेच्या पठारी प्रदेशात सरासरी वार्षिक पर्जन्य ५० ते १०० सेंमी. असून थंडीतील तपमान १२·८० से. ते १८·३० से. च्या दरम्यान राहते. उन्हाळ्यात येथील खडकाळ उजाड जमीन अतिशय तप्त व कोरडी असते.
राज्याच्या भूमीपैकी १५·३% वनप्रदेश असून तो पर्वतीय प्रदेशाच्या ४७% व मैदानी प्रदेशाच्या फक्त ३% भाग व्यापतो. चोपन्नपैकी चौतीस जिल्ह्यांत ३% पेक्षा कमी प्रदेश वनाच्छादित आहे. पर्वतीय वने संपन्न व विविध वृक्षांची आहेतत्यांच्यापासून शाल, शिसवी, खैर, हालदू, तेंडू आणि इतर उपयुक्त लाकडांचा पुरवठा होतो. उत्तर हिमालय भागात बर्च, फर, स्प्रूस, ज्युनिपर, ब्लू पाइन, चीड व देवदार यांसारख्या मऊ लाकडाची दाट बने आहेत. विखुरलेल्या जंगलातून आणि मैदानी भागात मोहाची बरीच झाडे आहेत. मैदानात आंबे, पेरू, बोरे व पर्वतप्रदेशात सफरचंद, नास्पतीसारखी फळझाडे प्रामुख्याने आढळतात. शेतीसाठी मैदानी भागात झालेल्या झाडतोडीमुळे होणारी जमिनीची धूप वाचवण्यासाठी वृक्षारोपणाचे शासकीय प्रयत्न सुरू झाले आहेत. प्राण्यांपैकी पर्वतप्रदेशात व तराईत वाघ, चित्ते, अस्वल, नीलगाय, हरिण व वानर पुष्कळ आहेत. मोर, रानकोंबडे, तीतर वगैरे रानपक्षी सर्वत्र आढळतात. पाणथळ प्रदेशात करकोचे, बगळे, बदके व ऋतुनुसार येणारे चक्रवाक, चातक असे विविध जातींचे पक्षी दृष्टीस पडतात.
ओक, शा. नि.
इतिहास : राज्याचे नाव उत्तरेकडील प्रदेश या अर्थाने १९५० च्या संविधानानंतर मिळाले. त्याचे ब्रिटिश अमदानीत संयुक्त प्रांत (युनायटेड प्रॉव्हिन्सिस) असे नाव होते. मिर्झापूर, बांदा व हमीरपूर जिल्ह्यांत पाषाणयुगीन हत्यारे आणि मथुरा, बिजनोर, उनाओ व कानपूरच्या आसपास ताम्रयुगीन बाणांचे व भाल्यांचे फाळ मिळाले आहेत. आर्यसंस्कृतीचे उत्तर प्रदेश हे माहेरघर होते. आर्यांच्या टोळ्या गंगा—यमुनेच्या सुपीक खोर्यात प्राचीन काळीच स्थायिक झाल्या. प्राचीन वाङ्मयात उल्लेखिलेल्या मध्यदेशात हल्लीच्या उत्तर प्रदेशाचा काही विभाग मोडत असे. या भागात काशी-कोसल, कुरू, पांचाल इ. राज्ये होती. पुराणांत वत्सांच्याही वंशावळी मिळतात. रामायण-महाभारतातील अनेक घटनांची ही भूमी. विशेषतः रामायण म्हणजे एक प्रकारे कोसल राज्याचा इतिहासच. यांखेरीज साकेत ही कोसलांची आणखी एक राजधानी. अयोध्येचेच हे दुसरे नाव असेही एक अनुमान आहे. कोसलांचे विदेह व काशी राज्यांशी कधी मैत्रीचे, तर कधी शत्रुत्वाचे संबंध असत. महाकोसल राजाने काशीचे राज्य कोसलात समाविष्ट केले. त्याचा मुलगा प्रसेनजित पराक्रमी असला, तरी मगधाच्या अजातशत्रूने त्याचा पराभव केला. तेव्हापासून मगधाची या भागावर अधिसत्ता प्रस्थापित झाली. मथुरेच्या भागात यदुवंशीय केव्हा स्थायिक झाले हे कळत नाही. महाभारतात कुरू, पांचाल व यदुकुलाचा थोडाफार इतिहास आला आहे. बौद्ध वाङ्मयात श्रावस्ती, कौशांबी, वाराणसी (काशी) यांची वर्णने आहेत. गौतम बुद्धाच्या उत्तर प्रदेशातील संचाराचे पुरावे स्तूप व पुरातन विहार यांच्या रूपाने शिल्लक आहेत. बुद्धोत्तर काळात या भागात कोलिय, मोरिय, मल्ल यांची गणराज्ये असावीत. त्यानंतर ती मौर्यांच्या साम्राज्यात समाविष्ट झालेली दिसतात. सम्राट अशोकाच्या राजाज्ञा कोरलेले शिलास्तंभ कालसी, मीरत, वाराणसी व अलाहाबादला सापडले आहेत. मौर्यानंतर ख्रिस्तपूर्व दुसर्या शतकात शुंग व त्यानंतर कण्व यांनी या प्रदेशावर अधिसत्ता गाजविली. ख्रिस्तोत्तर तिसर्या शतकात मथुरेला एक क्षत्रपांचे राज्य होते. त्यांच्यामागून कुशाण आले. चौथ्या शतकात उत्तर प्रदेश मगधाच्या गुप्त साम्राज्यात समाविष्ट झाला. त्याचा र्हास होऊ लागल्यावर सहाव्या शतकात मौखरी वंशाचा उदय झाला. सातव्या शतकात हर्षवर्धनाने कनौजला राज्य स्थापून साम्राज्यविस्तार केला. हर्षाच्या मृत्यूनंतर माजलेल्या अराजकात यशोवर्म्याने कनौजवर अधिसत्ता स्थापली, पण ती अल्पकाळ होती. नवव्या शतकात गुर्जर-प्रतिहारांनी येथे साम्राज्य स्थापले, पण सत्ता टिकविण्यासाठी त्यांना पाल व राष्ट्रकुटांशी युद्धे करावी लागली व एक प्रकारे हे त्यांचे युद्धक्षेत्रच झाले.
अकराव्या शतकात सुरुवातीस गझनीच्या मुहंमदच्या स्वार्या सुरू झाल्या. त्याने बुलंद शहर, मथुरा, कनौज ही नगरे लुटली बुलंद शहराचा राजा मुसलमान झाला, पण मुस्लिम सत्ता अजून स्थिर व्हायची होती. अहंमद नियाल्तिगीन या पंजाबच्या मुसलमान राज्यपालाने उत्तर हिंदुस्थानवर बनारसपर्यंत १०३४ मध्ये स्वारी केली ती हिंदूनी परतवून लावली. या काळातच पुढे गांगेयदेव चेदीनेही कनौजवर स्वारी केलेली दिसते, पण भोज परमाराने त्याचा पराभव केला. अकराव्या शतकाच्या अखेरीस चंद्रदेव गाहडवालाने येथे गाहडवाल-वंशाचे वर्चस्व स्थापले. या वंशातील गोविंदचंद्र (१११२–११५५) विद्येचा भोक्ता व पराक्रमी असून त्याने मगधावरही अधिसत्ता स्थापली. मुस्लिम आक्रमणेही वाढत होती. मुहंमद घोरीने १११२ मध्ये पृथ्वीराज चौहानाचा आणि ११९४ मध्ये कनौजच्या जयचंदाचा पराभव करून उत्तर प्रदेशातील हिंदूंची सत्ता जवळजवळ नामशेष केली. बुंदेलखंड स्वतंत्र राहिले व बाकीच्या भागावर दिल्लीच्या सुलतानांची सत्ता सुरू झाली. ती दुर्बल दिसली, की अयोध्येचे सुभेदार स्वतंत्रपणे वागू पहात. बल्बन, अलाउद्दीन खल्जी, मुहंमद तुघलक यांसारखे प्रबळ सुलतान त्यांच्या बंडाळ्या मोडून काढीत. १३४४ मध्ये दुआबात मोठाच दुष्काळ पडला होता पण फिरोझशाह तुघलकाच्या काळात दुआबाचे उत्पन्न चांगले असे. त्यानेच फिरोझपूर व जौनपूर ही शहरे वसविली. पंधराव्या शतकात जौनपूरचे शर्की स्वतंत्र झाले. त्यातील इब्राहिम शर्की (१४०२–१४३६) हा पराक्रमी सुलतान होता. शर्की वंशाने दिल्लीवरही सत्ता गाजवण्याचा प्रत्यन केला. पंधराव्या शतकाच्या अखेरीस दिल्लीच्या लोदींनी शर्की वंशीयांच्या सत्तेचा शेवट केला. सिकंदर लोदीने आग्र्याला राजधानी हलवली. हिंदुस्थानात मोगल साम्राज्यात पाया घालणार्या बाबराने खानुवाजवळ राणा संगाचा पराभव केला (१५२७) आणि तेव्हापासून उत्तर प्रदेश मोगल साम्राज्यात समाविष्ट झाला. या भागातील अफगाणांचा विरोध बाबरला मोडून काढावा लागला. पण हूमायूनला हुसकावून अफगाणांची पुनःस्थापना करणार्या शेरशहाने चुनारचा किल्ला घेऊन आपल्या साहसाची सुरुवात केली (१५३०) आणि कनौजच्या महत्त्वाच्या लढाईत हुमायूनचा पराभव केला (१५४०). अफगाणांचा विजय अल्पकालीन होता अकबराने हा प्रदेश पुन्हा काबूत आणला. आईन-इ-अकबरीवरून आग्रा, अलाहाबाद व अवध (अयोध्या) असे तीन मोगल सुभे या भागात होते. औरंगजेबाने दिल्लीला राजधानी हलवेपर्यंत आग्रा हे तर मोगलांच्या राजधानीचेच शहर होते. शाहजहानने तिचे सौंदर्य वाढवले. गादी बळकाणार्या औरंगजेबाला भावांशी या भागात महत्त्वाच्या लढाया कराव्या लागल्या. कुमाऊँ राज्याचा समावेश मोगल साम्राज्यात औरंगजेबानेच केला. त्याने मथुरा काशी येथील देवळे पाडून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखविल्या. पुढे प्रबळ झालेल्या आग्रा-मथुरेच्या जाटांच्या बंडाळ्यांची सुरुवातही याच काळात झाली.
अठराव्या शतकात मोगल साम्राज्याचा र्हास होऊ लागला. जाटांविरुद्ध पाठवलेल्या सादतखानाने (१७२२–१७३७) पुढे अयोध्येच्या सुभ्यात जवळजवळ स्वतंत्रपणे कारभार केला. पहिल्या बाजीरावाच्या काळात मराठ्यांचा बुंदेलखंडात शिरकाव झाला. अवधमधील बंडखोर रोहिल्यांविरुद्ध सादतचा पुतण्या व मोगल वझीर सफदरजंगाने मराठ्यांची मदत घेतली पुढे अब्दालीच्या धाडी थांबविण्यासाठी मराठ्यांना आग्र्याची सुभेदारी दिली (१७५१). अंतर्वेदीत मराठी सत्ता प्रस्थापित झाली. नजीबखान रोहिल्याने अब्दालीशी संगनमत करून ती उलथण्याचा प्रयत्न केला. पानिपतच्या लढाईनंतर जाटांनी आग्रा भागात बस्तान बसवले. दुसर्या शाह आलमच्या वझीर नजफखानने तो पुन्हा मोगलांच्या काबूत आणला, पण त्याच्या मृत्यूनंतर (१७८२) हा भाग शिंद्यांच्या कबजात आला. बक्सरच्या लढाईत अवधचा सुभेदार शुजाउद्दौलाचा पराभव झाल्यामुळे (१७६८) इंग्रजांचाही उत्तर प्रदेशात शिरकाव झाला. अलाहाबादच्या तहानुसार (१७६५) अलाहाबाद व कडा जिल्हे २६ लाख रुपयांना शाह आलम बादशहाला विकण्यात आले. बादशहा महादजी शिंदेच्या छत्राखाली गेल्यावर वॉरन हेस्टिंग्जने हे जिल्हे पुन्हा शुजाला विकले. शुजाने कंपनीची रोहिल्यांविरुद्ध मदत घेतली. या काळापासूनच इंग्रजांनी अवधच्या संरक्षणाची हमी घेतली आणि तैनाती फौजेची सुरुवात झाली. बनारसवरील कंपनीची हुकमतही वॉरन हेस्टिंग्जच्याच काळात सुरू झाली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस सादतअलीला अवधच्या गादीवर बसवून वेलस्लीने त्याच्याकडून रोहिलखंड, खालचा दोआब व गोरखपूर हे विभाग कंपनीसाठी मिळविले. लॉर्ड लेकने दौलतराव शिंदेचा पराभव करून शिंद्यांच्या अंमलाखालचा उत्तर प्रदेशातला भाग त्याला जोडला (१८०३). गुरखा युद्धात कुमाऊँ व हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश (१८१५), पेशव्यांकडून बुंदेलखंड (१८१८), दत्तकविधान रद्द करून जालौन, ललितपूर, जैतपूर, झाशी आणि गैरशिस्त कारभार म्हणून खालसा केलेला अवध (१८५६) हे सर्व प्रदेश मिळून सध्याचा प्रांत तयार झाला. १८५७ च्या बंडात सबंध उत्तर प्रदेश पेटला होता अवधचे तालुकदार, झांशीची राणी, बिठूरचा नानासाहेब हे या उठावाचे नेते होते. उठाव इंग्रजांनी मोडून काढला. कंपनीच्या अंमलातले त्याचे नाव वायव्य प्रांत होते, पण १९०२ मध्ये वायव्य सरहद्द प्रांत निर्माण झाल्यामुळे उत्तर प्रदेशाचे नाव संयुक्त प्रांत ठेवण्यात आले. १९३५ च्या कायद्यानुसार त्याला स्वायत्तता मिळाली. स्वातंत्र्योत्तर रामपूर, टेहरी-गढवालसारखी संस्थाने विलीन झाली, बुंदेलखंडाच्या उत्तरेचा काही भाग त्यास जोडण्यात आला आणि १९५० च्या संविधानानुसार उत्तर प्रदेशाला ‘अ’ दर्जा मिळाला. लगोलग जमीनदारी नष्ट करण्याचा कायदा झाला. १९६२ च्या चिनी आक्रमणानंतर हिमालयाच्या सीमेवरील राज्याच्या काही भागाचा उत्तर खंड या नावाचा नवीन विभाग करण्यात आला. विसाव्या शतकातील स्वातंत्र्यासाठी झालेल्या सर्व काँग्रेसप्रणीत आंदोलनांना उत्तर प्रदेशाने नेतृत्व व अनुयायी पुरवले. अलीगढ व देवबंद ही मुस्लीम द्विराष्ट्रवादाची केंद्रस्थानेही याच राज्यात आहेत.
राज्यव्यवस्था : भारतीय संघराज्यातील हे घटक राज्य आहे. राष्ट्रपतींनी नेमलेल्या राज्यापालाच्या संमतीनुसार विधिमंडळाला जबाबदार असलेले मंत्रिमंडळ कारभार पाहते. विधिमंडळाचे ४२५ (अधिक एक अँग्लो-इंडियन नियुक्त) व विधान परिषदेचे १०८ सदस्य असतात.राज्यातून लोकसभेवर ८५ व राज्यसभेवर ३४ सदस्य निवडून जातात. काँग्रेस पक्ष सुरुवातीपासून बहुमतात असला, तरी त्यात दुफळी होती आणि १९६७ च्या निवडणुकात हे बहुमतही संपल्यामुळे विरोधी पक्षांच्या संयुक्त विधायक दलाने मंत्रिमंडळ बनवले. ते न टिकल्यामुळे १९६९ मध्ये पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या. काँग्रेस, जनसंघ, संयुक्त समाजवादी, भारतीय क्रांतिदल हे प्रमुख पक्ष आहेत. कोणत्याच पक्षाचे हुकमी बहुमत नसल्यामुळे संयुक्त मंत्रिमंडळे बनविली जातात. १३ जून १९७३ ते ८ नोव्हेंबर १९७३ या काळात राज्यात राष्ट्रपतींची राजवट होती. सध्या इंदिरावादी काँग्रेसचे बहुगुणा मुख्यमंत्री आहेत व त्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ आहे. शासनाच्या सोयीसाठी ५४ जिल्ह्यांचे अलाहाबाद, आग्रा, उत्तरखंड, कुमाऊँ, गोरखपूर, झांशी, फैजाबाद, मीरत, रोहिलखंड, लखनौ व वाराणसी असे ११ महसूल विभाग आयुक्तांच्या देखरेखीखाली आहेत. पंचायत राज्याची त्रिसूत्री योजना १९६३ पासून अंमलात आलेली असून ५१ जिल्हा परिषदा व ३ अंतरिम जिल्हा परिषदा आहेत. कृषी, महसूल, पाटबंधारे, शिक्षण, न्याय, आरोग्य, कुटुंबनियोजन, सहकार, सामूहिक प्रकल्प, उद्योगधंदे, विद्युत्-शक्ती, वाहतूक, सार्वजनिक बांधकाम इ. खात्यांचा कारभार संबंधित मंत्री कर्मचारी यंत्रणेच्या साहाय्याने बघतात. १४२ नगरपालिका आहेत. उच्च न्यायासन अलाहाबादला असून एक न्यायपीठ लखनौला आहे. मुख्य न्यायाधीशाव्यतिरिक्त अतिरिक्त न्यायाधीशांसह ४० दुय्यम न्यायाधीश असून राज्यात ४५ सेशन विभाग आहेत.
कुलकर्णी, ना. ह.
आर्थिक स्थिती : भारताच्या शेतजमिनीपैकी अष्टमाशांवर शेतजमीन असलेल्या व एकूण शेती उत्पादनाचा षष्ठांश पुरविणार्या या राज्यात वर्षातून दोन पिके काढण्यात येतात. भात, मका, ज्वारी व काही डाळी ही खरीप पिके आणि गहू, जव, हरभरा व वाटाणा ही रब्बी पिके मुख्य आहेत. लोकसंख्येच्या ७५% लोक शेतीवर आहेत. १९७२-७३ मध्ये खाद्य पिकांचे उत्पादन सु. १७९·३ लाख टन झाले. गहू, तांदूळ, मका, ज्वारी, वगैरे धान्ये, ऊस, डाळी, तेलबिया, ताग ही मुख्य पिके होती. ऊस ५८७ लाख टन व तेलबिया १६·३ लाख टन झाल्या. ऊस व तांदूळ बव्हंशी पूर्वभागात काढण्यात येतो. बाकीची पिके पावसाच्या प्रमाणानुसार पश्चिम भागात निघतात. दुय्यम पिकांपैकी तराई भागात ताग, पर्वतीय प्रदेशात चहा व पश्चिम भागात कापूस निघतो. ऊस, अळशी, मोहरी, भुईमूग, तीळ, कापूस व ताग ही प्रमुख नगदी पिके आहेत. अधिक धान्योत्पादनासाठी तिसर्या योजनेत दोन लाख विहिरी खोदण्यात आल्या. बटाट्याच्या लागवडीचे क्षेत्र १४ ते १७ हजार हेक्टरपर्यंत वाढविण्यात आले. उत्तर व दक्षिण गंगा, यमुना, आग्रा व शारदा या मुख्य कालव्यांनी १९६३ मध्ये ३८ लाख हेक्टर क्षेत्राला पाणी दिले. माताटिला, रामगंगा, पश्चिम गंडक कालवा व शारदा सागर हे स्वातंत्र्योत्तर कालात उभारलेले प्रमुख जलसिंचन प्रकल्प होत. पाटबंधारे खात्याने याशिवाय सात हजारांवर नलिकाकूप चालू केले. सुमारे पावणेदोन लाख भक्कम विहिरी, शिवाय छोट्या पाणीपुरवठा योजनांसाठी विहिरी, रहाटगाडगी, नलिकाकूप यांसाठी कर्जे देऊन तिसर्या योजनेअखेर आणखी ४० लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आणली आहे. राज्यातील उपलब्ध १,५८० मेवॉ. विद्युत्शक्तीपैकी फक्त ३५% वापरली गेल्यामुळे, ऑगस्ट १९७२ मध्ये २५% व जानेवारी १९७३ मध्ये आणखी १५% कपात करावी लागली. यामुळे भात पिकाचे सहा लाख टनांचे नुकसान झाले. १९७१ मध्ये भारताच्या सु. ३५ कोटी पशुधनापैकी ५ कोटींहून अधिक, १४.७% जनावरे उत्तर प्रदेशात होती. त्यांत सु. २·६ कोटी गाई-बैल, १·२ कोटी म्हशी, १.१ कोटी घोडे, २९ लक्ष मेंढ्या, ८९ लक्ष शेळ्या व १२ लक्ष डुकरे होती. त्याशिवाय ३७ लाख कोंबड्या होत्या. घोडे वाहनांसाठी, शेळ्यामेंढ्या मुख्यतः डोंगरप्रदेशात आणि दुभती व ओझ्यांची गुरे मैदानी भागात होती. राज्यात म्हशींचे प्रमाण जास्त असल्याने देशातील २७% दूध व २०% तूप येथे होते. तराई भागात पुष्कळदा हत्ती नांगर ओढतात. १९६२ साली राज्यात ७,२०० ट्रॅक्टर ६,८०० तेल एंजिने ३,००० यांत्रिक, ३२,००० हाताचे व १,२९,००० बैलांचे चरक होते. देशातील खांडसरी साखरेचा मोठा हिस्सा उत्तर प्रदेशाचा आहे. राज्यात १६,४०० हेक्टर क्षेत्र फळबागांखाली आहे व यांत्रिकी पद्धतीची शासकीय कृषिक्षेत्रे अकरा भागांत मिळून साडेसात लाख हेक्टर जमिनीवर आहेत. राज्याच्या एकूण उत्पादनाच्या ६८% किंमतीचे कृषी उत्पादन आहे, त्यात अन्नधान्ये व बटाटे प्रथम व तेलबिया द्वितीय क्रमांकावर असून, या पिकांचा आधार तेलाच्या व पिठाच्या गिरण्यांना आणि अन्नप्रक्रियांच्या कारखान्यांना मिळतो. शेतीखालील जमिनीपैकी २९% ओलीत व २७% दुबार पिकांची आहे. सरासरी जमीन-तुकडा आकाराने २·२ हेक्टर एवढाच असतो त्यावर माणसे फार असल्याने उत्पन्न कमी पडते.
उत्तर प्रदेश हे एक प्रमुख साखरउत्पादक राज्य आहे. येथील मुख्य कुटिरोद्योग हातमागाचा असून सुती व लोकरी कापड, पादत्राणे व चामड्याच्या वस्तू, आसवन्या व ऊर्ध्वपातन भट्ट्या, कागद, रसायने, काच व काचवस्तू यांचे कारखाने भरभराटीत आहेत.
१९६१ मध्ये कामकरी वर्गापैकी केवळ २·८% कारखान्यात व एकूण उत्पादनमूल्याच्या फक्त ८ टक्के वाटा कारखान्यांचा अशी स्थिती होती वाढत्या औद्योगिकीकरणाच्या प्रयत्नांनी ती थोडी बदलत आहे, पण उद्योगधंद्यांत घरगुती व लहानसहान धंद्यांचा वाटा २२·७ टक्क्यांपेक्षा फारसा कमी झाला नाहीकारखानदारीत प्रामुख्याने ७२ साखर कारखाने, ३१ कापड गिरण्या, २५ काचकारखाने, लोहमार्ग-कर्मशाला, शेतीची अवजारे, रेडिओ, विद्युत् उपकरणे, रसायने, सायकली इत्यादींचे बारीकसारीक यांत्रिकी कारखाने, कानपूरच्या रोलिंग मिल्स व लोखंडपोलाद कारखाने, लखनौचा उपकरण कारखाना यांचा समावेश होतो. हरद्वारचा भारत इलेक्ट्रिकल्स, वाराणसीचा डिझेल रेल्वे एंजिनांचा कारखाना, नैनीचा त्रिवेणी स्ट्रक्चरल्स, बरेलीचा संश्लिष्ट रसायनांचा कारखाना, चुर्क व दल्ला येथील सरकारी सिमेंट कारखाने, गोरखपूरचा खत कारखाना, तुंडलाचा मांसशीतकरण कारखाना, लखनौचा हिंदुस्थान एअरोनॉटिक्स, कानपूर येथील युरिया कारखाना, शिवाय अवजड अवजारांचे सहा कारखाने, हृषिकेशचा प्रतिजैविक पदार्थांचा कारखाना व इंडियन ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्स हे सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प चालू झाले आहेत. चुर्कनजीक दल्ला येथील ॲल्युमिनियम कारखान्यात १९६३ पर्यंत सु. ८ कोटी रुपयांचे उत्पादन झाले. खाजगी क्षेत्रात आणखी दोन खत कारखाने नियोजित आहेत. त्यांखेरीज आग्रा, रामपूर, कानपूरची चामड्याची कारखानदारी १२० कोटींपर्यंत वाढविण्याची १९६२ मध्ये योजना होती. मध्यम व लहान प्रमाणातले उद्योगधंदे अधिक, या उत्तर प्रदेशाच्या वैशिष्ट्यानुसार राज्यात वाराणसीस जरीकाम, फिरोझाबादभोवती १३० बांगडी कारखाने, मिर्झापुरास सतरंज्या व गालिचे, अलीगढला कुलुपे व लोखंडी हत्यारांचे उद्योग, मुरादाबादेस पितळी घडणकाम, शिवाय वेगवेगळ्या भागांत वनस्पती तूप, पॉवर अल्कोहोल, राळ, टरपेंटिन, रेशमी वस्त्रे, हस्तिदंतीकाम, चामड्याच्या वस्तू, अत्तरे, वाद्ये, बांबू व वेताच्या वस्तू, लाकूड, धातू, चिनीमाती, दगडी वस्तू, कंदिल लखनौ-सहारनपूर येथे कागद, खेळ, लाख, काडेपेट्या, बॉबिन, सिगारेट, प्लॅस्टिकच्या वस्तू अशा मालांचे लहानमोठे कारखाने विखुरलेले आहेत. खेळसामान तयार करण्याचे नवे हुन्नर बरेली व मीरत येथे निघाले आहेत. १९६६ मध्ये या राज्यात भारताच्या वीज-उत्पादनापैकी केवळ ८% उत्पादन झाले. १९७१ मध्ये १,५८० मेवॉ. क्षमतेची उभारणी झालेली असून रिहांड, यमुना टप्पा एक व दोन, रामगंगा, ओब्रा जलविद्युत् व मटालिआ, हर्दागंज, सिंगरौली औष्णिक आणि गिरिप्रदेश केंद्रे यांची उत्पादनक्षमता वाढविण्याच्या योजना कार्यान्वित आहेत.
उत्तर प्रदेशातून मुख्यतः गहू, डाळी, तेलबिया अशा शेतमालाची त्याचप्रमाणे साखर, लाकूड व इतर वन्य पदार्थ, तूप, तंबाखू, रंग-रोंगणे या वस्तूंची निर्यात आणि सुती, लोकरी व रेशमी कापड, यंत्रसामग्री, धातूंचा माल, अन्य तयार माल, मीठ व नित्य गरजेच्या जीवनोपयोगी वस्तूंची आयात होते. राज्यातल्या मुख्य बाजारपेठा कानपूर, अलाहाबाद, आग्रा, वाराणसी, मिर्झापूर, हापूर, मीरत, मुरादाबाद व गोरखपूर या आहेत. १९६१ मध्ये राज्याचे एकूण आर्थिक उत्पादन रुपयांच्या किंमतीत २,१९७ कोटी रुपये होते त्यापैकी कृषी, पशुपालन, वनव्यवसाय व मच्छीमारी मिळून १,४९५ कोटी कारखाने, लघूद्योग व गृहोद्योग, बांधकाम व खाणकाम मिळून १९४ लोहमार्ग, दळणवळण, वाहतूक, साठवण मिळून ६९ व्यापार-उदीम १५० इतर नोकऱ्या २३० आणि मालमत्तेवर ५९ कोटी असा तपशील होता.
उत्तर व उत्तरपूर्व रेल्वेचे ९२% आणि मध्य व पश्चिम रेल्वेचे ८% मिळून एकूण ८,६५६ किमी. लांबीचे लोहमार्ग या राज्यात आहेत पण ते रुंद, मीटर व अरुंद अशा तिन्ही तऱ्हांचे असल्यामुळे माल व उतारूंच्या राज्यांतर्गत वाहतुकीत खोळंबा आणतात. राज्यातून आग्नेयीकडून वायव्येकडे व नैर्ऋत्येकडून ईशान्येकडे थेट जाणारे मार्गच तेवढे सोयीस्कर आहेत. तशात हरद्वार, काशी, प्रयाग व इतर क्षेत्रांना यात्रांच्या निमित्ताने लोटणारे देशभरचे उतारूंचे लोंढे लोहमार्गांवर फार ताण पाडतात. उतारू वाहतुकीखेरीज कोळसा, कापूस व अन्नधान्ये आयात करणे, तेलबिया निर्यात करणे, ऊस, साखर, गूळ व मळी यांची क्षेत्रीय वाहतूक करणे, ही कामे लोहमार्गांवरच पडतात. १९६१ मध्ये ८४% वस्ती खेड्यात होती. त्यांना दळणवळणाची पुरेशी सोय नव्हती. रस्त्यांच्या अभावामुळे १३% वनसंपत्तीचा उपयोग होत नाही. वाहनयोग्य अशा लहानमोठ्या मिळून राज्यातील १,६३,१५० किमी. रस्त्यांपैकी १९७०-७१ मध्ये ३६,५५९ किमी. पक्के होते. राज्यवाहतूक यंत्रणेच्या सात वाहतूक क्षेत्रांत ७,००० वर उतारू गाड्या आहेत. १९७१ पर्यंत राज्याच्या २२,००० किमी. मार्गांवर राज्य वाहनांची सोय होणार होती. मालट्रक्सची संख्या २३,९७६ असून सहा शहरांतून स्थानिक बस वाहतुकीची सोय आहे. डाकघरे खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचली असून मध्यम वस्तीच्या गावांपर्यंत तार-कचेऱ्या व दूरध्वनीची व्यवस्था झाली आहे. उत्तर प्रदेशात नभोवाणी केंद्रे लखनौ, अलाहाबाद, वाराणसी व रामपूर या चार ठिकाणी आहेत. चौथ्या योजनेत लखनौ येथे दूरचित्रवाणी केंद्र होणार आहे.
लोक व समाजजीवन : चपट्या नाकाचे व काळ्या रंगाचे द्राविड वंशीय, धारदार नाकांचे आणि गोरे आर्य वंशीय आणि गोल डोक्यांचे, गालांची हाडे उंच असणारे व पिवळसर वर्णाचे मंगोलॉईड अशा तीन प्रकारांचे आणि त्यांच्या संकराने झालेल्या असंख्य प्रकारांच्या मानववंशीयांचे नमुने उत्तर प्रदेशात आढळतात. त्यांपैकी द्राविड नमुने दक्षिण मिर्झापूर व बुंदेलखंड भागात, आर्य प्रकार पश्चिमेकडे आणि मंगोलॉईड वळणाचे लोक, हिमालय पर्वतभागात सामान्यतः दिसून येतात. पूर्व भागाकडे लोकांची उंची कमी आणि वर्ण काळसर होत जातो. सहज ओळखू येण्यासारखे लोकांचे काही विशिष्ट नमुने या राज्यात अनेक आहेत. उदा., गौर वर्णाचे ठेंगणे पण भक्कम कुमाऊँ व गढवाली व वायव्य बाजूचे ऐसपैस बांध्याचे जाट. उत्तर प्रदेशाच्या लोकांना आणि भाषेला शेकडो वर्षे ‘हिंदुस्थानी’ हे एकच नाव आहे. राज्यातले ८५% लोक हिंदू व बाकीचे अधिकांश मुसलमान आहेत. येथील मुसलमानांचे राज्यातीलच नव्हे, तर देशातील सामाजिक व राजकीय जीवनात मोठे स्थान आहे. याशिवाय राज्यात शीख, जैन, ख्रिश्चन, बौद्ध हेही थोड्याफार प्रमाणात आहेत. राज्यातील बहुसंख्य वस्ती ग्रामीण विभागात आणि व्यवसाय कृषीचा असल्यामुळे परंपरागत समजुती सोडून देण्यास ते नाखुश असतात आणि जातीजमातींच्या बंधनातून ते लवकर बाहेर पडत नाहीत. शिक्षणाचा प्रसार आणि आधुनिक कल्पनांचा स्वीकार त्यांच्यात झाला नसल्याने धार्मिक श्रद्धांचापगडा त्यांच्या मनावर टिकून आहे. त्याकारणानेच कुटुंबनियोजनाची निकड त्यांना पटत नाही. एकूण लोकसंख्येपैकी एक लाख लोकवस्तीवरच्या २२ शहरांतून मिळून पुरी एक कोटीही नागरी वस्ती नव्हती. १९७१ च्या आकडेवारीनुसार भारताच्या १६·१०% लोक या राज्यात असून दर चौ. किमी. ला ३०० माणसे राहतात दर हजार पुरुषांमागे ८८३ स्त्रियांचे प्रमाण असून साक्षर लोकांचे प्रमाण २२% आहे. १९७१ साली अनुसूचित जाती व जमातींची लोकसंख्या १,८७,४७,४८१ होती. राज्यात एकूण कामकरी २·८ कोटी म्हणजे राज्याच्या लोकसंख्येच्या ३२·१६% व त्यातील दोन कोटींच्यावर शेतीकामात आहे. बाकीच्यापैकी घरगुती व लहान धंद्यांत सु. अठरा लाख, कारखान्यांतून आठ लाख, बांधकामावर दोन लाख व इतर नोकऱ्यांत चार लाख अशी विभागणी आहे. उपजीविकेसाठी कलकत्ता, मुंबई यांसारख्या औद्योगिक शहरांकडे स्थलांतर करणारांची संख्या एकूण वस्तीच्या प्रमाणात अल्प आहे. सामाजिक वर्ग ग्रामीण भागात जातींप्रमाणे व नागरी भागात सामान्यतः आर्थिक परिस्थितीनुसार पडतात. अल्पसंख्य श्रीमंत व फार मोठ्या बहुसंख्येचे गरीब यांच्या दरम्यानचा मध्यम वर्ग फारच लहान आहे. राज्यात साक्षरतेचे प्रमाण नैनिताल, डेहराडून, कानपूर, लखनौ या जिल्ह्यांत २५ टक्क्यांच्यावर, तर बाकीच्या जिल्ह्यांत फारच कमी मिळून एकूण लोकसंख्येच्या २२% एवढेच आहेत. हिंदुधर्मीयांची दैवते सामान्यतः राम, कृष्ण, शिव व देवी असून या देवतांचे वेगवेगळे सण व उत्सव, यात्रा व मेळे हिवाळ्यात व उन्हाळ्यात एकामागून एक चालू असतात. बद्रीनारायण, केदारनाथ, हरद्वार, गढमुक्तेश्वर, मथुरा, अयोध्या, काशी, प्रयाग या मोठ्या तीर्थक्षेत्रांप्रमाणेच इतर अनेक प्रादेशिक पवित्र स्थानांकडे कुठल्या ना कुठल्या तरी पर्वणीच्या निमित्ताने भाविकांची अखंड रीघ लागलेली असते. होळीत रंग खेळणे आणि दसऱ्याला रामलीला उत्सवाच्या निमित्ताने रावणादिकांचे पुतळे जाळण्याची आतषबाजी हे सार्वजनिक करमणुकींचे प्रकार आहेत. ग्रामीण प्रजेची राहणी साधी व काटकसरीची असते दगडमातीच्या किंवा विटांच्या घरांतून जरा सुस्थितीतील लोक राहतात, इतरांची घरे मातीची व भिंती कुडाच्या असतात. पूर्व भागात जास्त पावसामुळे घरांना गवताची छपरे आणि पश्चिम भागात उष्ण व कोरड्या हवेमुळे घरांना धाबी असतात. शेतकरी पुरुषांचा पोषाख धोतर, कुडते व पागोटे आणि स्त्रियांचा पोषाख रंगीबेरंगी घागरे, सदरे व ओढण्या असा असतो. स्थलपरत्वे दक्षिण पठारावर आणि उत्तरेच्या पर्वतप्रदेशात या पोषाखात फेरफार दिसतात. आहार आर्थिक कुवतीनुसार गव्हाची चपाती, ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, डाळी व भाज्या असा असतो. तूप आणि मांसाहार परवडणारे थोडे, तसेच मांसाहार व मत्स्याहार धार्मिक प्रवृत्तीमुळे इतर प्रदेशांच्या मानाने बऱ्याच कमी प्रमाणावर असतो. पूर्वेकडे अन्नात गव्हाऐवजी तांदुळाचा वापर अधिक होतो. उन्हाळ्यात आंबे व मोहाची फुले गरीब लोकांच्या अन्नास पूरक होतात. फार गरीब लोक एकदा संध्याकाळचे जेवण घेऊन दिवसाची वेळ चुरमुरे-फुटाण्यावर भागवतात. त्यांच्या अन्नात मक्याची भाकरीही असते. या राज्यातील कौटुंबिक जीवन जुन्या वळणाचे व परंपरागत संस्कृतीस अनुसरून असते. स्त्रिया अजून पुढारलेल्या नाहीत. शहरी वातावरणात मात्र जुने वळण बदलून कौटुंबिक जीवन आधुनिक स्वरूप घेऊ लागले आहे राज्याची भाषा हिंदुस्थानी ही देवनागरी लिपीत हिंदीच्या व उर्दू लिपीत उर्दूच्या स्वरूपात लिहिली जाई तथापि देशाच्या फाळणीनंतर हिंदी जास्त संस्कृतनिष्ठ झाली व उर्दूला स्वतंत्र भाषेचा दर्जा मिळावा असे मतप्रवाह वाहू लागले. लखनौ व त्याच्या आसपासच्या प्रदेशात बोलली जाणारी उर्दू देशात शुद्ध समजली जाते. पश्चिमी हिंदी अथवा ‘खडी बोली’ही राज्याची व पर्यायाने राष्ट्राची अधिकृत भाषा झाल्यावर, साहित्य दृष्ट्या संपन्न अशी तुलसीदासाची अवधी व सूरदासाची व्रज या भाषांचे आणि पूरबी, भोजपुरी, कुमाउनी, बुंदेलखंडी अशा बोलींचे महत्त्व कमी झाले तथापि आग्रा प्रदेशात वज्र आणि लखनौ भागात याच अवधी याच हिंदी भाषेच्या शैली कायम आहेत.
शिक्षणात राज्यातील मागासपणा लक्षात येऊन शासनाने विद्याप्रसाराचे काम नेटाने पुढे चालवले आहे. चौदा वर्षे वयापर्यंत प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे आहे. त्या तरतुदीचा अंमल अधिक निकडीने करणे, प्रौढांना साक्षर करणे हे कार्यक्रम चालू आहेत. १९६५ पासून दहाव्या इयत्तेपर्यंत मुलींचे शिक्षण मोफत केल्याचा लाभ पावणेदोन लाख मुलींना मिळाला आहे. १९७२-७३ मध्ये राज्यातील ६२,४०८ प्राथमिक शाळांतून १,१६,१६,००० विद्यार्थी त्यांपैकी ७२,०५,००० मुलगे व २,३६,६४३ शिक्षक ३,७९३ माध्यमिक शाळांतून ११,९३,००० विद्यार्थी त्यांपैकी ९,५३,००० मुलगे व ५०,७३० शिक्षक २९२ महाविद्यालयांतून १,१८,००० विद्यार्थी व ७,०५१ शिक्षक अभियांत्रिकी व पदवी महाविद्यालये ६ तंत्रनिकेतने २८ डिप्लोमा संस्था ६ होत्या. राज्यात आग्रा, अलीगढ-मुस्लिम, अलाहाबाद, बनारस-हिंदू, गोरखपूर, कानपूर, लखनौ, मीरत, रूडकी- अभियांत्रिकी व पंतनगर-कृषी या दहा विद्यापीठां खेरीज कानपूरची तंत्रविद्या संस्था, वाराणसी संस्कृत विद्यापीठ आणि देवबंद (सहारनपूर) येथील दारुल उलूम हे विख्यात इस्लामी शिक्षणकेंद्र या महत्त्वाच्या शिक्षणसंस्था आहेत. अलाहाबादचे हिंदी साहित्य संमेलन व वाराणसीची नागरी प्रचारिणी सभा हिंदी भाषेची श्रेष्ठ पीठे आहेत. लखनौला औषधी, पशुवैद्यकी व स्थापत्यविषयक संशोधनसंस्था आहेत.
ओक, शा. नि.
कला व क्रीडा : उत्तर प्रदेशातील कृष्णलीला आणि रामलीला प्रसिद्ध आहेत. आरंभी मंदिरांतून कथा सांगितल्या जात. उत्तर प्रदेशामध्ये मोगल अंमल सुरू होण्यापूर्वी या कथा प्रकारांतून जन्माला आलेला ⇨ कथ्थक हा नृत्यप्रकार रूढ झाला होता. उत्तर प्रदेशीय लोक रावण, कुंभकर्ण, मेघनाद इत्यादींचे पुतळे जाळून त्यांभोवती ‘भगवान रामकी जय’ असा जयघोष करीत व नाचत रामलीला साजरी करतात.
आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहाल व किल्ला, वाराणसीमधील बिर्ला मंदिर व राजा मानसिंहाची वेधशाळा, आग्रा, जौनपूर, फतेपुर सीक्री येथील जाळीदार सज्जांच्या मशिदी, अलमोडा येथील प्राचीन राजांचे किल्ले, प्राचीन देवालये, सारनाथमधील स्तूप इ. वास्तूंवरून उत्तर प्रदेशातील वैविध्यपूर्ण वास्तुकलेची कल्पना येते. ‘बडा इमामबारा’ आणि ‘छोटा इमामबारा’ ह्या लखनौमधल्या वास्तू अभिजात मुस्लिम कलावास्तू म्हणून प्रसिद्ध आहेत. या वास्तूंच्या प्रमुख दिवाण खान्याचे छप्पर सु. १६ मी. उंचीवर असून, कोणत्याही खांबाचा किंवा इतर आधार न घेता हे बांधकाम करण्यात आल्यामुळे ते स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने अजोड मानले जाते. लखनौतील ‘भुलभुलैया’ वास्तू चमत्कृतिपूर्ण असून त्यात आत जाणाऱ्याला सहजासहजी बाहेर पडता येत नाही.
भगवान कार्तिकेयाची एक गुप्तकालीन मूर्ती, उत्तर मध्ययुगीन भारतीय मूर्तिकलेचे प्रतीक असलेले शिव विवाह शिल्प, तसेच गणेशनृत्य यांसारख्या मूर्तींवरून येथील दर्जेदार मूर्तिकलेची कल्पना येते. मथुरा वृंदावनाच्या मार्गावर अलीकडेच बांधण्यात आलेल्या गीता मंदिरात श्रीकृष्णाच्या कलात्मक आणि भव्य मूर्ती असून भिंतींवर सुंदर अक्षरामध्ये संपूर्ण भगवदगीता कोरण्यात आली आहे.
वाराणसी येथील कलाभवनाच्या संग्रहातील पक्वमृदा पट्टावरील वासवदत्ता हरण हे शुंगकालीन चित्र उल्लेखनीय आहे.
उत्तर प्रदेश ही कथ्थक या नृत्याप्रकाराची जन्मभूमी असल्यामुळे साहजिकच येथील नृत्यकलेमध्ये त्याचाच प्रभाव आहे. शंभु महाराजांनी कथ्थकमध्ये आपली एक शिष्यपरंपरा निर्माण केली आहे.
उत्तर प्रदेशाने भारतीय संगीताला दिलेल्या दोन महत्त्वाच्या देणग्या म्हणजे दादरा आणि ठुमरी हे प्रकार होत. दादरा या प्रकाराचा प्रारंभ लखनौ मध्ये, तर ठुमरी या प्रकारचा प्रारंभ बनारसमध्ये झाला. गायक आणि वादक यांची एक अखंड परंपरा ह्या प्रदेशाने निर्माण केली. बरकत अली खाँ, मुस्ताफ अली खाँ, उस्ताद जान खाँ, शराफत सेन खाँ, सिंग बंधू, अमरनाथ, बेगम अख्तर, सुजाता चक्रवर्ती ह्या गायक-गायिका प्रसिद्ध असून नामवंत वादकांमध्ये बहादूर खाँ, दामोदरलाल कामा, हरिप्रसाद चौरसिया, देवेंद्र मुर्डेश्वर, निखिल बॅनर्जी, मुस्ताफ हुसेन खाँ, महापुरुष मिश्रा, अबदुल करीम खाँ, सामता प्रसाद, गुलाम साब्री खाँ आणि अली हुसेन यांचा समावेश होतो. सनई वादकांमध्ये रामदासजी आणि छोटेखान ह्यांच्या नंदलाल ह्या शिष्याने स्थापन केलेली ‘नंदलाल पार्टी’ नावारूपाला आली आहे. भारतीय संगीताचा पुरस्कार करणारी ‘भातखंडे युनिव्हर्सिटी ऑफ इंडियन म्युझिक’, ‘भारतीय संगीत-ललित कला विद्यापीठ’, ‘कंभोज सप्तकला निकेतन’ ह्या येथील सुप्रसिद्ध कलासंस्था आहेत.
सर्वसामान्य भारतीय खेळ उत्तर प्रदेशात खेळले जातात. त्यांत कोंबड्यांच्या झुंजी आणि पतंग उडविण्याच्या स्पर्धा हे उत्तर प्रदेशातील पारंपरिक खेळ आहेत.
महाम्बरे, गंगाधर
महत्त्वाची स्थळे : उत्तर प्रदेशात अलकनंदेच्या काठी बद्रीनाथ त्याच्या वाटेवर केदारनाथ गंगा सपाटीवर येते तेथे हरद्वार त्याच्याजवळच हृषिकेश यमुनेच्या काठी मथुरा व वृंदावन गंगेच्या काठी वाराणसी किंवा काशी, विठूर किंवा ब्रह्मावर्त गंगा-यमुनांच्या संगमावर प्रयाग किंवा अलाहाबाद शरयूच्या काठी अयोध्या विंध्यमधील चित्रकूट इ. प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आहेत. यांशिवाय सारनाथ (बुद्धाचे प्रथम उपदेशाचे स्थान, स्तूप, अशोकस्तंभ) हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ, कुरुक्षेत्र इ. पौराणिक स्थळे लखनौ (राजधानी, ‘चिकन’ कापड, गुडाखू, मातीची नक्षीदार भांडी, बडा व छोटा इमामबारा या ऐतिहासिक इमारती) वाराणसी (जरी व रेशमी काम, गुडाखू, तांब्यापितळेची नक्षीदार भांडी, लाकडी व मातीची खेळणी, हिंदू विद्यापीठ, भारतमाता मंदिर, वेधशाळा, संस्कृत विद्यापीठ इ.) आग्रा (ताजमहाल, संगमरवरी काम, किल्ला) फतेपुर सीक्री (अकबराची जुनी राजधानी, तेथील बुलंद दरवाजा व इतर इमारती) कानपूर (धान्य, कातडी सामान, साखर व इतर उद्योगधंदे) फैजाबाद जौनपूर, झांशी, काल्पी, महोबा इ. ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे कालिंजर येथील डोंगरी किल्ला, कनौज ही कान्यकुब्जांची प्राचीन राजधानी व तेथील अत्तरे, गुडाखू, इ. सुवासिक पदार्थ मिर्झापूर, शाहजहानपूर, भदोही येथील गालिचे, रामपूर, हाथरस, मीरत येथील चाकू, कातऱ्या इ. हत्यारे अलीगढ येथील कुलुपे व मुस्लिम विद्यापीठ वेत, बांबू, लाकूड यांच्या सुबक वस्तूंसाठी बरेली डेहराडून येथील लाकडी खेळणी, लष्करी शाळा व नकाशे छापण्याचे भारतीय सर्वेक्षण खात्याचे केंद्र गोरखपूर, रायबरेली, फैजाबाद, बाराबंकी, झांशी, अमरोहा वगैरे ठिकाणचे सुती कापड बांगड्यांसाठी फिरोझाबाद इ. स्थळे, वस्तू व उत्पादने महत्त्वाची आहेत. मसूरी, रानीखेत, अलमोडा, नैनिताल, ही प्रसिद्ध गिरिविश्रामस्थाने आहेत. कॉर्बेट नॅशनल पार्क व राजाजी आणि चंद्रप्रभा अभयारण्ये येथे रानटी पशुपक्ष्यांचे त्यांच्या नैसर्गिक परिसरात निरीक्षण करता येते. (चित्रपत्रे ६३, ६४).
ओक, शा. नि.
संदर्भ : 1. Basu, Purnendu, Oudh and The East India Company, Lucknow, 1939.
2. Dharma, Bhanu, History and Administration of the North-Western Provinces (1803-1859), Agra, 1957.
3. Pathak, Vishuddanand, History of Kosala, Delhi, 1963.
4. Rizvi, S. A. A.; Bhargav, M. L. Freedom Struggle in Uttar Pradesh, 5 Vols., Lucknow, 1957-60.
5. Tiwari, A. R. Geography of Uttar Pradesh, New Delhi, 1971.
6. Tripathi, R. S. History of Kanauj, Delhi, 1959.