इरूला : दक्षिण भारतातील निलगिरी पर्वतात राहणारी एक आदिवासी जमात. ह्यांना तीरकमठाधारी असेही म्हणतात. ह्यांची वस्ती मुख्यत्वे अर्काट चिंगलपुट ह्या शहरांतून तसेच जिंजी टेकड्यांतून व जवळपासच्या खेड्यांतून आढळते. चिंगलपुटचे इरूला इतर इरूलांपेक्षा सुधारलेले असून त्यांवर हिंदुधर्माचे संस्कार झालेले दिसतात. बहुतेक इरूलांमध्ये राहणीमान, चालीरीती, धार्मिक विधी इ. बाबतींत साम्य आहे, मात्र काही किरकोळ फरक आढळतात. त्यांच्यात पूर्वी मातृसत्ताक कुटुंबपद्धती होती, पण अलीकडे पितृसत्ताक कुटुंबपद्धती रूढ होत आहे.
इरूला वांशिक दृष्ट्या प्रोटो ऑस्ट्रेलॉइड असून बुटके व अत्यंत काळे आहेत. चपटे नाक, अरूंद छाती व कुरळे केस ही त्यांची वैशिष्ट्ये होत. त्यांची भाषा हे तमिळचेच अपभ्रष्ट रूप आहे. ते लहानलहान राहुट्यांत व झोपड्यांत राहतात त्यांना चाळी म्हणतात व त्याही एकमेकांपासून दूर बांधलेल्या असतात. क्वचित एखाद्या ठिकाणी चारपाच झोपड्या दिसतात. खेड्यातून राहणार्या इरूलांचे शेती व मोलमजुरी हे प्रमुख धंदे आहेत, तर जंगलात राहणारे इरूला मध, मेण, शिकेकाई वगैरे पदार्थ गोळा करतात तसेच पत्रावळी करून त्या विकतात. जंगलातील इरूलांना औषधी वनस्पतींची चांगली माहिती असते. त्यामुळे काही वैदू बनून औषधे देतात. चिंगलपुटचे इरूला शेती व भात सडण्याचा धंदा करतात, काही गाईम्हशींचे कळप पाळतात. गाईम्हशींच्या मांसाखेरीज इतर सर्व प्रकारचे मांसभक्षण ह्या लोकांत रूढ असून उत्सवप्रसंगी व लग्नसमारंभात ते बकर्याचे मांस खातात. ह्याशिवाय भाताची आंबिल, उंदीर, पंख आलेल्या मुंग्या व वाळवी हेही ते खातात. तो एखाद्या मोठ्या शिळेवर विस्तव टाकून ती शिळा तापवितात व त्यावर लाह्या फुलवितात किंवा दामट्या भाजतात. ते कमीत कमी कपडे वापरतात पुरुष एखादी लंगोटी वापरतो, तर स्त्रिया गळ्यापासून गुडघ्यापर्यंत एकच वस्त्र गुंडाळून घेते. काही स्त्रिया कमरेवरील भाग उघडाच ठेवतात. तान्ह्या मुलालाही ते कपडे घालीत नाहीत. फारच थंडी पडली, तर जमिनीत लहानसा खड्डा खणून त्यात पालापाचोळा पसरतात व त्यावर मुलाला ठेवतात आणि जवळच शेकोटी पेटवून ऊब निर्माण करतात. स्त्रियांना दागिन्यांची हौस असते. त्या हातात पितळेच्या व काचेच्या भरपूर बांगड्या भरतात, तसेच गळ्यात मण्यांच्या व कवड्यांच्या भरपूर माळा घालतात.
इरूलांत विवाहाविषयी फारशी बंधने नाहीत. लग्नसमारंभही अत्यंत साधा असतो. स्त्री-पुरुष दोघे स्वेच्छेने एकत्र येतात व थोडेसे बिनसले, तर तत्काळ विभक्तही होतात. अर्थात हे सर्व मुख्यत्वे स्त्रीवरच अधिक अवलंबून असते. मुलीला देज देऊन लग्न करतात. ह्यांच्या पोटजातींत विवाह होत नाहीत, विवाह हा असमान गोत्रांत होतो. मातृसत्ताक कुटुंबपद्धती असणार्या काही इरूलांमध्ये आते-मामे नातेसंबंधात विवाह होतात. विवाहाच्या दिवशी नवरामुलगा वधूकडे जातो, तिच्या कपड्यात चार पैसे बांधतो आणि तिला आपल्या घरी घेऊन येतो. लग्नविधीच्या वेळी वर मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र ऊर्फ ताली बांधतो. त्यांच्यात बहुपत्नीकत्व आहे. विधवा अथवा घटस्फोटीत स्त्रीच्या पुनर्विवाहाची चाल आहे, परंतु तो कुडकी म्हणजे गुप्त रीतीने पार पाडला जातो. विवाहानंतर बोकड कापून निमंत्रितांना मेजवानी देतात.
इरूलांमध्ये मृताला बसलेल्या स्थितीत पुरतात बहुतेक इरूलांची घराशेजारीच स्वतंत्र अशी दफनभूमी असते. मयत झालेल्या ठिकाणी दोन ‘कुरूंबा’ येतात. त्यांतील एक दुसर्याची हजामत करतो. बुटक्या इसमास भरपूर खायला घालून नवीन वस्त्र देतात. तो ते वस्त्र आपल्या डोक्यास गुंडाळून मृतास शांती मिळावी म्हणून सदिच्छा व्यक्त करतो. बाहेरच्या बाजूस स्त्री-पुरुष वाद्यांच्या गजरात नाचगाणे पार पाडतात. मग मृतास नवीन कपडे व दागिने घालून थडग्यात ठेवतात व त्याच्या तोंडाशी दगड, झुडपे व काटे ठेवतात. जन्म व विवाह यांसंबंधीचे विधी साधे असले, तरी अंत्यविधी मात्र हे लोक समारंभपूर्वक पार पाडतात. मृताच्या तिसर्या दिवशी मेजवानी करतात व अकराव्या दिवशी मृताचा मुलगा मृताचे पापक्षालन करतो.
कनिअम्मा, मारी, बैरम्मा, मदम्मा, भैलेश्वर, कअबूल व मदेश्वर अशी इरूलांची सात दैवते आहेत. ह्यांशिवाय रंगस्वामी म्हणजे विष्णुलाही ते पूजतात. वरील दैवते बहुतेक ग्रामदैवते असून त्यांतील कनिअम्मा ही त्यांच्या जमातीची कुलदेवता असून मारी ही रोगराई नष्ट करणारी देवता समजली जाते. लोकसंख्येच्या दृष्टीने ह्या प्रदेशात राहणारी ही दुसर्या क्रमांकाची जमात आहे. ह्यातील बहुतेक लोक दरिद्री असून राज्यसरकार व केंद्र सरकार त्यांना सुधारण्याचे प्रयत्न करीत आहेत.
संदर्भ : 1. Luiz, A. A. D. Tribes of Mysore, Banglore, 1963.
2. Thurston, Edgar, Castes and Tribes of Southern India, Vol. II, Madras, 1965.
देशपांडे, सु. र.