उटकटारी

उटकटारी : (काटेचुबुक; हिं. गोक्रू, उटकांटा; क. नीरगोळ गोळिके; गु. शुलिओ, उटकांटो; सं. उत्कंटक, कंटफल; लॅ. एकिनॉप्स एकिनॅटस; कुल-कंपॉझिटी). सु. ३०–९० सेंमी. उंच व मुळापासून अनेक पसरट फांद्या असलेल्या ह्या काटेरी (त्यावरून लॅटिन नाव पडले), ताठर व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) ओषधीचा [ओषधि] प्रसार अफगाणिस्तानात व भारतात सर्वत्र असून १,५५० उंचीपर्यंत ही आढळते. पान बिनदेठाची, पिच्छाकृती खंडित, एकाआड एक, काटेरी व लांबट, ७–१२ सेंमी. लांब असून खालच्या बाजूस कापसासारखे मऊ आच्छादन असते. फुलांची स्तबके पांढरी, काटेरी, गोल, चेंडूसारखी, ५ सेंमी. व्यासाची असून नोव्हेंबर-जानेवारीत येतात. सर्वच फुले व्दिलिंगी व फलनक्षम; छदमंडले तीन, मधले काटेरी पिच्छसंदले आखूड व पिवळट प्रदलमंडल नळीसारखे, पाकळ्या रेषाकृती [→ फूल]; कृत्स्‍नफळावर [→ फळ] दाट लव असते. ही वनस्पती कडू, तंत्रिका तंत्रास (मज्‍जासंस्थेस) पौष्टिक, रक्तशोधक (रक्त शुद्ध करणारी) व मूत्रल (लघवी साफ करणारी) असते; कोरडी ढास, उन्माद, अग्निमांद्य, गंडमाळा, त्वचारोग, नेत्रविकार इत्यादींवर उपयुक्त. जनावरांच्या जखमांतील किडे मारण्यास हिच्या मुळांचे चूर्ण लावतात. तसेच बाभळीच्या डिंकात मिसळून उवा मारण्यास केसांना लावतात. वीर्य दाट होण्यास हिचे बी देतात.

पहा : कंपॉझिटी.

जमदाडे, ज. वि.