ईस्टमन, जॉर्ज : (१२ जुलै १८५४–१४ मार्च १९३२). अमेरिकन शास्त्रज्ञ. ⇨ छायाचित्रणासंबंधी  महत्त्वाचे कार्य. त्यांचा जन्म वॉटरव्हिले (न्यूयॉर्क) येथे झाला. गरिबीमुळे त्यांना फारसे शिक्षण मिळाले नाही. रॉचेस्टर येथील सार्वजनिक शाळेत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अल्पकाळ विमा कंपनीत व बँकेत काम केले. 

त्यांनी १८८७ मध्ये आपले लक्ष छायाचित्रणाकडे केंद्रित केले. यापूर्वी छायाचित्रणासाठी वापरण्यात येणारी तबकडी काचेची असे. छायाचित्र घेण्यापूर्वी काचेला रसायनांचे पायस (प्रकाशाला संवेदनशील असलेल्या रसायनांचा थर) लावावे लागे व नंतर त्यावर छायाचित्र घेण्यात येई. पण रसायनांचे पायस जास्त वेळ टिकत नसे, त्यामुळे प्रत्यक्ष वापरण्यापूर्वीच ते बनवावे लागे. १८८० मध्ये ईस्टमन यांनी काचेच्या शुष्क तबकड्या बनविण्याची पद्धत शोधून काढली व त्यानुसार तबकड्यांचे उत्पादन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी १८८४ मध्ये पारदर्शक फिल्मचा शोध लावला व त्याच साली ईस्टमन ड्राय प्लेट अँड फिल्म कंपनीची स्थापना केली. तसेच १८८८ मध्ये त्यांनी सुप्रसिद्ध कोडॅक कॅमेरा बाजारात विक्रीस आणला. 

त्यांनी १८८९ मध्ये फिल्मसाठी सेल्युलॉइड वापरण्यास सुरुवात केली. पण ही फिल्म ज्वालाग्राही असल्याने तिच्याऐवजी सेल्युलोज ॲसिटेट या कमी ज्वालाग्राही पदार्थाचा उपयोग करून १९२४ मध्ये फिल्म बनविण्यात येऊ लागली. ईस्टमन यांच्या या फिल्ममुळेच चलच्चित्रणाची पद्धती शक्य झाली.

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत ईस्टमन यांची १९२४ अखेर फिल्म निर्मितीत मक्तेदारी होती. त्यांनी कामगाराला नफ्यातील भागीदार करण्याची कल्पना प्रथमच प्रत्यक्षात आणली.१९२४ मध्ये त्यांनी आपला अर्धा नफा रॉचेस्टर विद्यापीठ, मॅसॅच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी इ. संस्थांना वाटला. ही रक्कम ७·५ कोटी डॉलरपेक्षा जास्त होती. रॉचेस्टर येथे त्यांनी आत्महत्या केली.

साबळे, सु. र.