ईबादान : नायजेरियाच्या पश्चिम प्रांताची राजधानी. लोकसंख्या ७,५८,३३२ (१९७१ अंदाज). हे लागोसपासून १४२ किमी. ईशान्येस असून, सु. २२५ मी. उंचीच्या सात टेकड्यांवर वसलेले आहे. योरूबा टोळीवाल्यांची ही पूर्वीची राजधानी. कोकोसमृद्ध परिसर व दळणवळणाचे प्रमुख केंद्र म्हणून याची झपाट्याने वाढ झाली. येथे सिगारेट, फर्निचर, कापड, तेल, प्लॅस्टिक-वस्तू, खेळणी, डबाबंद फळे इत्यादींचे उद्योग असून, पूर्वी लंडन विद्यापीठाशी संबद्ध असलेले विद्यापीठ १९६२ पासून स्वतंत्रपणे पदव्या देते. वैद्यकीय शिक्षणाची सोय असलेल्या येथील रुग्णालयात पाचशे खाटांची व्यवस्था आहे.
शाह, र. रू.