ईजायना : ग्रीसचे आग्नेयीकडील बेट. क्षेत्रफळ ८५ चौ. किमी. लोकसंख्या ६,०९२ (१९६१). हे सारॉनिक आखातात असून अथेन्सच्या २८ किमी. नैर्ऋत्येस आहे. १४ किमी. लांब व त्रिकोणी आकाराच्या या बेटावर ऑलिव्ह, अंजीर, द्राक्षे, बदाम यांसारखी उत्पन्ने निघतात. पूर्वकिनारा ज्वालामुखीच्या लांबोळक्या, खडकाळ व उंच कडांनी बनलेला असून तेथील अनेक उंच सुळक्यांपैकी ओरस शिखर ५३२ मी. उंचीचे आहे.
बेटाच्या पश्चिम किनार्यावरील ईजायना शहर इ. स. पू. ३००० वर्षांपूर्वीचे आहे. या नगराची लोकसंख्या ६,२१७ (१९५१) होती. १८२८-२९ या ग्रीक स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात ही ग्रीसची राजधानी होती. इ. स. पू. पाचव्या शतकाच्या सुरुवातीला हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून ग्रीक नाण्यांच्या वापरास येथून सुरुवात झाली. १८११ मधील उत्खननावरून हे प्राचीनकाळी ग्रीस व पूर्वेकडील देश यांच्यातील महत्त्वाचे बंदर असल्याचे सिद्ध झाले व आसपासच्या देशांना तेथील वैशिष्ट्यपूर्ण मातीच्या भांड्यांची निर्यात होत असल्याचाही पुरावा मिळाला. याच उत्खननात अपोलोमंदिराचे उत्कृष्ट नक्षीकाम असलेल्या शिल्पाचे भग्नावशेष आढळले. सध्या ते म्यूनिक येथे ठेवण्यात आले आहेत.
जोशी, चंद्रहास