इमारती व घरे : ऊन, वारा, पाऊस यांपासून व हिंस्र पशूंपासून संरक्षण व वैयक्तिक व्यवहाराकरिता आडोसा मिळेल असा आसरा मिळविण्याच्या मूलभूत प्रेरणेतून घरे व इमारतींचा उगम व विकास झालेला आहे. अगदी प्रथम माणसाने झाडाचा आश्रय घेतला, नंतर गुहा व झाडाच्या फांद्या व गवत यांचे निवार्‍यापुरेसे आसरे तयार करू लागला. त्यानंतर माणसास उभे राहून व्यवहार करता येतील अशा झोपड्या तयार झाल्या. सु. ६,००० वर्षांपूर्वी मातीच्या कच्च्या ओबडधोबड विटांची चौकोनी आकाराची घरे बांधण्यास सुरुवात झाली. त्यांच्या विकासातून वाडे, किल्ले, निरनिराळ्या आकाराच्या व आकारमानाच्या इमारती उभारल्या जाऊ लागल्या व मनुष्याच्या इतर प्रगतीबरोबर आधुनिक बंगले, राहण्याच्या गाळ्याच्या टोलेजंग इमारती, गगनचुंबी इमारती, कारखान्याच्या व इतर खास उपयोगाच्या सार्वजनिक इमारती यांची सर्व सुखसोईयुक्त बांधणीत प्रगती झाली. ज्या त्या काळातील परिस्थितीनुरूप घराच्या बांधणीच्या पद्धतीत फरक पडत गेले. घरांच्या प्राथमिक अवस्थेत आसर्‍यास पुरेशी एक खोली असे व स्वयंपाकपाणी वगैरे बराचसा इतर व्यवहार वाडेभिंतीच्या आत उघड्यावर करीत असत, घरांना खिडक्यांऐवजी सुरक्षिततेच्या दृष्टीने जमिनीपासून उंच अंतरावर लहान झरोके ठेवीत असत. त्या काळात घरामध्ये भरपूर हवा व उजेडाची तरतूद करण्याची आवश्यकता भासत नव्हती. विज्ञानाच्या प्रगतीबरोबर वातानुकूलनाच्या, वायुवीजनाच्या, प्रकाशाच्या, दूरचित्रवाणी व इतर दळवळणाच्या, निरनिराळ्या साधनांच्या उपलब्धतेमुळे व वातावरणातील दूषित हवा व आवाज यांचा उपद्रव टाळण्याकरिता खिडक्यांविना इमारती बांधणे आता शक्य होत आहे. व्यक्ती, समाज व त्यांचा परिसर सुखदायक, सुरक्षित व उन्नतीपोषक राहील अशी घरांची व इमारतींची बांधणी असावी लागते.

इमारती व घरे यांचे (१) निवासस्थाने, (२) सार्वजनिक उपयोगाच्या इमारती व (३) कारखान्यांच्या इमारती असे स्थूलमानाने तीन प्रकार होतात. निवासस्थानांच्या बांधणीत सुखसोयी व आराम यांबरोबर अवश्य तो एकांत मिळून सामाजिक जीवनास वाव राहील, अशीही व्यवस्था करणे आवश्यक असते. सार्वजनिक उपयोगाच्या इमारतीत स्वच्छता, सुरक्षितता व वावरण्यास सुलभता यांवर जास्त भर द्यावा लागतो. कारखान्यांच्या बाबतीत सर्व पूरक इमारतींची त्यांच्या उपयोगानुसार मांडणी व सुरक्षिततेच्या दृष्टीने बांधणी यांकडे तसेच मालाची सहजसुलभ चढउतार व हालचाल होऊ शकेल, कामास अवश्य तेवढा उजेड व वाव मिळेल, कारखान्यातील व त्याच्या परिसरातील वातावरण दूषित होणार नाही किंवा आवाजाचा उपद्रव होणार नाही अशा तरतुदींकडे विशेष लक्ष द्यावे लागते.

इमारतींची व घरांची बांधणी त्रिगुणात्मक असते. तीत (१) मजबूत व आधुनिक सुखसाधनांनी परिपूर्ण रचना, (२) उपयुक्त व कार्यक्षम मांडणी व (३) सौंदर्यपूर्ण थाटणी असावी लागते. रचनेबाबतचे सर्व काम अभियंत्याचे असते, तर उपयुक्त व कार्यक्षम मांडणीचे काम वास्तुशिल्पज्ञाचे असते. हल्ली घरे व इमारती बांधण्याचे काम वास्तुशिल्पज्ञाकडे सर्वस्वी सोपविण्याची प्रवृत्ती आहे. एक किंवा दोन खोल्यांची निवासस्थाने बांधताना वास्तुशिल्पज्ञांना फारसा वाव नसतो. अशा लहान निवासस्थानाचे प्रमाण किती मोठे आहे हे समजून येण्याकरिता भारतातील काही राज्यांतील १,००० कुटुंबांच्या पहाणीवरून आढळलेली निवासस्थानांची १९६१ मधील परिस्थिती कोष्टकरूपाने खाली दिली आहे.

भारतातील काही राज्यांतील निवासस्थानांची १९६१ मधील परिस्थिती (आकडे टक्क्यांमध्ये).

राज्य बेघर १ खोली २ खोल्या ३ किंवा जास्त खोल्या
महाराष्ट्र २·३ ६५·० २२·७ १०·०
आंध्र प्रदेश ०·० ६४·५ २२·२ १३·३
केरळ १·४ ३२·० ३१·६ ३५·०
गुजरात ३·० ६०·० २५·० १२·०
उत्तर प्रदेश ३·० ३३·४ २७·६ ३६·०
म्हैसूर (कर्नाटक) १०·६ ४०·८ ३०·१ १८·५
मध्य प्रदेश ३·० ५४·० २७·० १६·०

देशादेशांतील हवामानात फार फरक आहे, त्यास अनुरूप अशी घरांची मांडणी निरनिराळ्या प्रकारांनी करतात. वालुकामय प्रदेश, भूकंप क्षेत्रातील प्रदेश वगैरे निरनिराळ्या नैसर्गिक परिस्थितींचा प्रभाव घरबांधणीच्या पद्धतीवर पडतो.

भारतात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा अशा वर्षातील तीन ऋतूंत तीन प्रकारचे हवामान ठिकठिकाणी कमी जास्त प्रमाणात आढळते. घरबांधणीचा विचार करताना तेथील तीनही ऋतूंतील हवामानाची परिस्थिती पहावी लागते. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली प्रांत वगैरे भागांत एप्रिल ते जुलै या महिन्यांत उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून खोली दिवसा बंद ठेवावी लागते. तर रात्रीच्या वेळी गच्चीची सोय असणे अवश्य वाटते. भिंती व छप्पर यांवर सरळ उन्हाची किरणे पडू नयेत म्हणून खोलीला किमान २·१५ मीटरची पडवी अगर आतपनिवारक (उन्हापासून संरक्षण करणारी) रचना असावी लागते. जुलै ते सप्टेंबर या महिन्यांत हवेचे चलनवलन नीट व्हावे म्हणून समोरासमोरील खिडक्या उघड्या ठेवाव्या लागतात. ऑक्टोबर ते मार्च महिन्यांत शुद्ध हवा, उजेड व सूर्याचे किरण आत येतील, पण वार्‍याच्या झोताला प्रतिबंध होईल अशी खोलीची योजना असावी लागते. भारताच्या बर्‍याचशा भागांत हवामान असे आहे की, वर्षातील ८ ते ९ महिन्यांच्या काळातील बराचसा वेळ उघड्या जागेत काढता येतो. वरील कारणांमुळे स्थानिक हवामानाचा व रहाणीचा विचार करून घराची मांडणी करणे आवश्यक असते.

निवासस्थाने : निवासस्थानांचा विचार तीन प्रकारांनी केला आहे : (१) ग्रामीण, (२) शहरी व (३) औद्योगिक कामगारांची. १९६१ च्या भारतीय शिरगणतीच्या वेळी ग्रामीण व शहरी घरांच्या केलेल्या व्याख्येनुसार ज्या गावांत नगरपालिका अगर तत्सम नगरसंस्था प्रस्थापित आहेत अथवा ज्यांची लोकवस्ती ५,००० अगर त्यापेक्षा जास्त आहे व ज्यांतील तीन चतुर्थांशापेक्षा जास्त पुरुष बिगरशेती व्यवसाय करतात त्या गावांना शहरे व इतर ठिकाणे ग्रामीण गणली आहेत.

ग्रामीण निवासस्थाने : ग्रामीण भागातील घरांची सद्यस्थिती अजमावण्याकरिता १९४८ साली केंद्र सरकारने एक १५ कलमी प्रश्नपत्रिका प्रत्येक राज्य सरकारकडे पाठवून त्यांच्याकडून खेडेगावातील घरांबाबतची संपूर्ण माहिती मागविली होती. त्यावरून असे आढळून आले की, या घरांच्या बांधकामाकरिता स्थानिक उपलब्ध असलेल्या मालाचा वापर केलेला आहे व ती पूर्वापार रूढ पद्धतीने साधी बांधलेली आहेत. स्थानिक हवामान, पर्जन्यमान, भूभागाची ठेवण यांना अनुरूप अशी घरबांधणी आढळते.

केंद्र सरकारने १९५४ साली दिल्लीत कमी खर्चाच्या घरांचे प्रदर्शन भरविले होते. याच वेळी संयुक्त राष्ट्रांच्या सहकार्याने कमी खर्चाच्या घराबाबत एक चर्चा-बैठक केंद्र सरकारने भरविली होती. या बैठकीत वर निर्दिष्ट केलेल्या ग्रामीण घरबांधणीसंबंधी संकलित केलेल्या माहितीच्या आधारे बरीच चर्चा झाली. तीवरून पुढील तीन मुख्य निष्कर्ष निघाले : (१) ग्रामीण घरात धूर कोंडणार नाही असे स्वयंपाकघर, भंग्याची जरूरी लागणार नाही असे संडास, हवेशीर खोल्या, सांडपाण्याचा व्यवस्थित निकाल अशी योजना असावी. (२) ग्रामीण भागात निव्वळ शेतीवर उपजीविका करणारे व सुतार, लोहार, कुंभार, दुकानदार वगैरे व्यवसायी लोकांच्या घरात व्यवसायास योग्य सोय असावी. (३) स्थानिक मालाचा जास्तीत जास्त वापर व रूढ पद्धतीत नवीन संशोधनाप्रमाणे बदल करून घरे बांधली जावीत.

पंच्याहत्तर टक्के ग्रामीण घरे एक किंवा दोन खोल्यांची एक मजली बांधलेली आढळतात. तिघई घरात क्वचित ठिकाणी मधल्या भागावर माडी बांधतात. लाकडी सांगाडा व कौलारू मोळाचे अगर पन्हळी पत्र्याचे उतरते कोन असलेले वाशाचे छप्पर किंवा धाब्याचे छप्पर असते. मुरमाड जमिनीत अर्धा मीटर रुंद व एक मीटर खोलपर्यंत पायाखोदाई करून डबर-मातीत अगर माळावरच्या गोट्याचे बांधकाम केले जाते. जमीन काळवट असेल, तर पायाची रुंदी एक मीटर व खोली दोन मीटरपर्यंत घ्यावी लागते. त्यात तळात अर्धा मीटर उंचीची वाळू थराथराने टाकून धुमसून त्यावर अर्ध्या मीटर जाडीचे डबर-मातीचे काम केले जाते व बांधकामाच्या दोन्ही मोकळ्या बाजू वाळूने भरून काढतात. त्यावर सु. ३५ सेंमी. जाडीचे व ३० सेंमी. उंचीचे जोत्याचे बांधकाम डबर-मातीत करून दर्शनी भागाच्या दरजा सनल्याने (संदल्याने) अगर सिमेंटने भरतात. ओलप्रतिबंध म्हणून जोत्यावर भाजलेल्या विटांचे दोन थरांचे बांधकाम चुन्यात करतात. मागील पडवीस जोत्याची उंची सु. १५ सेंमी. असते. जोत्यात कठीण मुरमाची थराथराने भर करून जमिनी करतात. सांगाड्याच्या लाकूडकामात खांब, लग, तुळया, कड्या वगैरे स्थानिक उपलब्ध लाकडाच्या अगर वाश्याच्या तयार करून बसवितात. डबराच्या अगर कच्च्या किंवा पक्क्या विटांच्या भिंती बांधून त्यावर मातीचा गिलावा व शेणामातीचे सारवण करतात. त्यावर कोठे कोठे चुन्याचा रंग देतात. दगड-विटांच्या भिंतीऐवजी दोन खांबांच्या गाळ्यात अडवटे बांधून त्यास बांबूच्या कामट्या अगर कारवीच्या काठ्या उभ्या बांधून त्यावर पांढऱ्यामातीचा गिलावा करून भिंती बनवितात. ऐपतीप्रमाणे काही घरांच्या बाहेरील बाजूस चुन्याचा अगर सिमेंटचा गिलावा करतात. छप्पराकरिता स्थानिक चौरस लाकडाचे अगर गोल वाशांचे आढे, मुख्य वासे व पाखाड्या यांचे छप्पराचे लाकूडकाम करतात. गावठी कौलांच्या छप्पराकरिता अगर गवताच्या ताट्यांच्या छप्पराकरिता पाखाड्यांवर किंवा गाळा लहान असल्यास आढ्यापासून वळचणीपर्यंत वासे जवळजवळ बसवून त्यावर ओमण करतात. पन्हळीपत्र्याचे छप्पर पाखाड्यावर बसवितात.

खेडेगावात सुखसोयींच्या दृष्टीने कमीत कमी ११ चौ.मी. ची ओटी, तेवढीच झोपण्याची खोली, ९ चौ.मी. चे स्वयंपाकघर, स्वयंपाकघरापुढे पडवी, मागील कोपर्‍यात १-२ चौ.मी. चा शौचकूप, मागील हद्दीजवळ अवश्य तेवढा गोठा व तेवढीच लाकूडफाटा, वैरण वगैरे ठेवण्याकरिता पडळ अशा सोईचे निवासस्थान असावे. स्थानिक परिस्थितीप्रमाणे गावठाणे मोठी करता येतात. घराजवळ धंदा चालविण्याकरिता दुकान व कोठी बांधता येते.

शहरी निवासस्थाने : शहरी निवासस्थानांचे पुढीलप्रमाणे दोन भाग पडतात : (१) शहरातील गावठाण भागातील जुनी व नवी निवासस्थाने व (२) शहराबाहेर नगररचनेच्या क्षेत्रात बांधलेली निवासस्थाने.

(१) शहरातील (गावठाण भागातील) जुन्या घरांची बांधणी एकत्र कुटुंबपद्धतीला उपयुक्त अशी झालेली आहे. मध्ये एक अगर अनेक चौक ठेवून बाजूला निरनिराळ्या उपयोगांकरिता दालने बांधलेले वाडे आढळतात. ह्या बांधणीत दालने एकघई, दुघई अगर तिघई असत. घराच्या प्रवेशद्वारी लाकडी दिंडी-दरवाजा म्हणजे १·५ ते २ मी. रुंदीचा दरवाजा व त्यातील मादी झडपेत दिंडी म्हणजेच मनुष्य येण्यापुरेशी वाट देणारी पोट झडप असे. दरवाजे बंद करण्यास कडी-कोयंड्याखेरीज लाकडी जाड अडसर असे. प्रवेशद्वारातून आच्छादित मार्गातून चौकात जाऊन तेथून निरनिराळ्या दालनांत प्रवेश करता येत असे. इमारतीच्या मागे विहीर, न्हाण्याधुण्याचा फरस, मागील अंगण, गोठा, संडास, वगैरे सोई असत. माडीवर जाण्याचे जिने दोन दालनांमध्ये दोन्ही बाजूच्या भिंतींत पायठे बसवून काढलेले असत व छप्पराजवळ प्रशस्त माळा असे. उष्ण व कमी पावसाच्या प्रदेशात छप्पराऐवजी गच्ची असे. जुने वाडे बहुधा दुमजली असत. बाहेरच्या भिंती पाऊण ते एक मीटर रूंदीच्या असत. रुंद भिंतीत खिडक्या व दरवाजे दुहेरी आसरी चौकटीचे असत. जोते घडीव दगडाचे व त्यावर दगडी पाटथर घातलेला असे. भिंती विटांच्या असत. रुंद भिंती मातीत व अरुंद भिंती चुन्यात बांधल्या जात. तुळ्या, कडीपाट, छप्पर वगैरे भिंतीवर न आधारता लाकडी खांबांवर आधारित असत. मध्यम व लहान घरात पुढील चौकाभोवतालचा भाग वगळून ओटी व तेथून पुढे मागला भाग वाड्याप्रमाणेच कमी जास्त प्रमाणात असे.

गावठाणात नवीन निवासस्थाने बांधली जातात. ती हवा व उजेड व्यवस्थित मिळेल अशी व पतिपत्‍नी, त्यांची अपत्ये व त्यांच्यावर अवलंबून असलेले निकटचे आप्तसंबंधी अशा मर्यादित कुटुंबाला ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे व सोईप्रमाणे विभक्तपणे राहता येईल, अशा सोयीची निवासस्थाने अथवा लहान मोठे स्वतंत्र गाळे बांधतात. मोठ्या गाळ्यात स्वयंपाकघर, जेवणघर, बैठकीची खोली, शयनगृह व न्हाणी संडास यांचा किमान समावेश असतो. दोन किंवा तीन खोल्यांचे गाळे स्वयंपूर्ण अथवा दोन तीन गाळ्यांना समाईक संडास असलेले बांधतात.

आ. १. गाळ्यांची मांडणी

(२) नगररचनेच्या सीमेत बांधल्या जाणाऱ्या घरांना हवा, उजेड, मोकळी जागा व इतर आरोग्यपोषक सोई असाव्यात म्हणून व त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष नियम केलेले असतात. घर ज्या जागेत उभारावयाचे तिचे किमान क्षेत्रफळ ठरविलेले असते व त्यापैकी काही हिश्श्यावरच बांधकाम करता येते. किती मजले बांधावेत यावर नियमन असते. दालनांची व त्यास ठेवावयाच्या खिडक्यांची किमान मापे निर्देशित केलेली असतात. चाळीवजा घरे बांधण्यावर बंधन असते.

बांधकामाच्या क्षेत्रावर नियमन असते तेव्हा उपलब्ध जागेचा परिपूर्ण उपयोग होईल अशी खोल्यांची मांडणी करावी लागते. कोणतीही खोली ओलांडावी न लागता प्रत्येक दालनात परस्पर प्रवेश करता येईल व न्हाणीघर, संडास यांसारख्या सोई प्रत्येक दालनाच्या उपयोगाप्रमाणे नजीकच राहतील यावर भर दिलेला असतो. प्रत्येक गाळ्याला एकच प्रवेशद्वार असणे व गाळा सर्व प्रकारे अलिप्त राहील अशी मांडणी करतात. प्रत्येक मजल्यावर एकापेक्षा जास्त गाळे असलेल्या अनेक मजली इमारतीत मध्यवर्ती जिन्याच्या अर्ध्या उंचीवर असलेल्या रमण्यावरून प्रवेश मिळेल असे एका बाजूचे गाळे व वरच्या रमण्यावरून प्रवेश मिळेल असे दुसऱ्याबाजूचे गाळे बांधण्याकडे जास्त प्रवृत्ती होत आहे. तळमजल्यावरील अर्धा भाग कमी उंचीचा घेऊन त्या जागेचा उपयोग वाहने ठेवणे वगैरे मनुष्य-निवासाखेरीज इतर कामांकडे करता येतो.

औद्योगिक कामगारांकरिता घरे : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात खाजगी व सरकारी कारखानदारीत झपाट्याने वाढ झाली. पण त्या मानाने कारखान्यात काम करणाऱ्यालोकांची राहण्याची सोय झाली नाही. त्यामुळे या प्रजेचा ताण शहरांवर पडला. म्हणून कामागारांकरिता घरबांधणीच्या विचाराला महत्त्व आले आहे.

कामगारांच्या घरांचा स्वच्छतेचा दृष्टीने विशेष विचार करावा लागतो. शौचकूप, आंघोळीच्या जागेची योजना करताना ती जागा दिवसा अगर रात्री सोईस्करपणे वापरता येईल अशी असावी लागते. मैल्याचा व सांडपाण्याचा निकाल भुयारी गटाराने अगर पूतिकुंडात करता आल्यास वातावरण आरोग्यदायक राहते. कामगाराचे आरोग्य ही महत्त्वाची बाब आहे. अन्यथा साथींचा उपद्रव अगर इतर आजार यांमुळे कामाचे तास बुडून शारीरिक व आर्थिक हानी होते. त्याचा परिणाम कारखान्यातील कामावरही होण्याची शक्यता असते.

सर्वसाधारणपणे कामगाराच्या एकूण कुटुंबाला कमीत कमी दोन खोल्या व लगत एक पडवी असणे इष्ट असते. अशा प्रकारच्या तीन गाळ्यांना मिळून एक शौचकूप व एक आंघोळीची खोली पुरते. ही घरे, जागा मुबलक असल्यास एक मजली बांधतात. जास्त मजल्यांच्या चाळी बांधणे आवश्यक असल्यास जास्तीत जास्त चार मजले बांधणे इष्ट असते. सुरक्षिततेच्या दृष्टीने सहा गाळ्यांना एक जिना ठेवला जातो.

वरिष्ठ दर्जाचे कामगार व अधिकारी वर्गाकरिता तीन किंवा चार खोल्यांचे स्वतंत्र अथवा एकाला लागून एक दोन ते चार बंगले बांधले जातात. असे मोठे गाळे चारापेक्षा जास्त मजल्यांच्या इमारतीत बांधावयाचे असल्यास विजेचा पाळणा, दूरध्वनी वगैरेंची सोय त्यात असणे आवश्यक असते.

औद्योगिक कामगारांकरिता घरे बांधण्याचा प्रश्न मोठा खर्चाचा आहे. त्याकरिता केंद्र सरकार उद्योगपतींना पैशाचे साहाय्य देते. कामगारांकरिता बांधलेल्या घरांच्या जवळपास शाळा, दुकाने, पिठाची गिरणी वगैरेंसारख्या दैनंदिन गरजांच्या सोई उपलब्ध न केल्यास कामगार कुटुंबे अशा घरांत राहणे पसंत करीत नाहीत. म्हणून या सोईंचाही समावेश घरबांधणी कार्यक्रमात करावा लागतो.

गलिच्छ वस्त्या : गलिच्छ वस्त्या तीन प्रकारांत मोडतात : (१) शहरातील, (२) झोपडपट्टी व (३) भटक्या लोकांची. शहरातील जुनी घरे पूर्वीच्या पद्धतींनी उपयोगात आणता येत नसल्यामुळे त्यांतच निरनिराळ्या कुटुंबांना राहणे भाग पडले व या घरांचे काळोखाच्या, कोंदट व दमट अशा गाळ्यांत रूपांतर झाले. आरोग्याच्या अपुऱ्या सोई, डागडुजीच्या अभावामुळे मोडकळीस आलेली घरे व राहाणारांची गर्दी यामुळे शहराच्या जुन्या भागांत गलिच्छ जागा उत्पन्न झाल्या. परवडेल अशी राहण्याची जागा शहरात दुर्मिळ झाल्यामुळे एकाच गाळ्यात अनेकजण दाटीगर्दीने राहिल्यामुळेही गलिच्छपणा उत्पन्न झाला. कामधंद्यानिमित्त शहराकडे ओढल्या गेलेल्या लोकांनी मन मानेल तेथे घातलेल्या बैठ्या झोपड्यांची गर्दी झाली. त्या ठिकाणी हवा, पाणी, संडास व मोऱ्या यांच्या अभावामुळे गलिच्छपणा निर्माण झाला. याखेरीज रस्त्यावरच वस्ती करून राहणार्‍यांमुळेही गलिच्छ भाग निर्माण झाले. भारतातील बर्‍यांच गावांत सु. ४८ टक्के घरे मातीची व तत्सम निकृष्ट प्रतीच्या मालाची उभारलेली आहेत व सु. ४४ टक्के घरांना न्हाणी व संडास नाहीत. १९४८ पासून लोकवस्तीत झालेल्या वाढीच्या १० टक्के इतकीसुद्धा राहण्याच्या जागांत वाढ झालेली नाही. मुंबई शहरातील जवळजवळ पन्नास लाख वस्तीपैकी दहा लाख लोक झोपड्यांतून किंवा नातेवाईकांच्या गाळ्यांत दाटी करून राहिलेले आहेत, तर पाच लाख लोक रस्त्यावर झोपतात. अहमदाबादमध्ये ४३ टक्के लोकांना राहण्याची सोय आहे, तर ३२ टक्के लोक दाटीगर्दीने राहतात. बाकीच्या लोकांना मानवी जीवनास प्रतिकूल अशा झोपड्यांतून काळ कंठावा लागतो. इतर शहरांतून थोड्याफार प्रमाणात हीच परिस्थिती आहे.

शहरातील जमिनीच्या किंमती व घरबांधणीचा खर्च भरमसाट वाढला आहे. त्यामुळे घरे बांधणे किंवा घरभाडेही मध्यम व कनिष्ठ वर्गाला परवडत नाही. स्वस्त भाड्याच्या जागा उपलब्ध करणे ही जबाबदारी नगरपालिकांची आहे पण त्यांचे प्रयत्‍न तोकडे पडतील इतका हा प्रश्न मोठा व खर्चाचा आहे. राज्य सरकारे व केंद्र सरकार यांच्या मदतीने राज्य सरकारच्या गृहनिर्माण मंडळाकडून गलिच्छ वस्त्या निर्मूलनाकरिता घरे बांधण्यात येत आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी शहरात पुरेशी घरे बांधणे शक्य नाही म्हणून घरे बांधण्यायोग्य जागेवर रस्ते, पाणी पुरवठा, भुयारी गटारे, दिवाबत्ती, अंग धुण्याच्या व कपडे धुण्याच्या जागा अशा आवश्यक गोष्टींची तरतूद करून घ्यावी झोपडी बांधण्याचे काही सामानही उपलब्ध करून घ्यावे व निरनिराळ्या कुटुंबानी आपापली निवासे बांधावीत. या धर्तीवर भारताच्या केंद्रीय शासनाने गलिच्छ वस्त्या सुधारण्याची योजना आखलेली आहे. यानुसार तमिळनाडू राज्यात १०,००० निवासस्थाने बांधली गेली आहेत. आवश्यक गोष्टींवर झालेल्या खर्चाचा प्रत्येक निवासावरील हिस्सा धरून निवासामागे रु. १,००० खर्च (१९६५ पूर्वी) आला. कलकत्त्यातील गलिच्छ वस्त्या नाहीशा करण्यासाठीही ही पद्धत अंमलात आणण्याची योजना आहे. कनिष्ठ उत्पन्नाच्या लोकांना या पद्धतीने घरे बांधणे शक्य होते. पण शहरातील भारी किंमतीच्या जागेवर अशा एकेरी झोपड्या बांधल्याने जागेचा अपव्यय होतो. जास्त मजल्यांच्या इमारती बांधल्या, तर मध्यमवर्गीय जास्त लोकांची राहण्याची सोय होऊ शकते. अत्यल्प प्राप्तीच्या लोकांची या प्रकारची वस्ती शहरापासून दूर अंतरावर थोड्या कमी किंमती असलेल्या नजीकच्या भागात करावी लागते. कामधंद्याकरिता जाण्यायेण्याचा खर्च व लागणारा वेळ विचारात घेऊनसुद्धा या पद्धतीने स्वतःची घरे बांधणे अत्यल्प प्राप्तीच्या लोकांना परवडू शकते.

गलिच्छ वस्त्या कमी करण्याच्या उपायात, कारखाने शहरापासून दूरच्या प्रदेशात बांधावेत व कारखानदारांनी आपल्या कामगारांकरिता घरे बांधून ती कमी भाड्याने राहण्यास द्यावीत हा एक मार्ग आहे. कामाच्या जवळपास कामगारांची राहण्याची व इतर सुखसोईंची सोय केल्याने कामगारांचा जाण्यायेण्याचा खर्च, श्रम व वेळ वाचतो व इतर ठिकाणी दाटीगर्दीने राहण्यापासून ते परावृत्त होतात [→ गलिच्छ वस्त्या].

निवासस्थानांची समस्या : टंचाईची कारणे व उपाय : वाढती लोकसंख्या, ग्रामीण भागातून शहराकडे धाव घेण्याची प्रवृत्ती, बांधकामाचे अपुरे साहित्य, प्रचलित व उपलब्ध साहित्याच्या किंमतीत भरमसाट वाढ व घरावरील व त्याच्या उत्पन्नावरील वाढते कर ही घरटंचाईची काही कारणे होत. याकरिता स्वयंपूर्ण उपनगरे वसविणे, शासकीय साहाय्य पद्धती सुलभ करणे, सवलतीच्या अटींवर व बेताच्या व्याजाने आर्थिक मदत मिळण्याची सोय करणे, घर बांधण्यायोग्य व वीज, पाणी वगैरे सोई मिळू शकतील अशा जागा योग्य किंमतीत उपलब्ध करणे, घरबांधणीच्या अद्ययावत साधनांचा, साहित्याचा व तंत्राचा प्रसार करणे, कुटुंबनियोजन, घरबांधणीकरिता आकर्षक बचत योजना, घरपट्टीत व प्राप्तीकरात सवलती वगैरे टंचाई कमी करण्याचे काही उपाय आहेत. नॅशनल बिल्डिंग ऑर्गनायझेशन व रूडकी येथील केंद्रीय संशोधन संस्था घरबांधणीचे काम सुलभ व्हावे या दृष्टीने प्रयत्‍न करीत आहेत.

इतर देशांतील प्रयत्‍न : इंग्‍लंडमध्ये १९४५ ते १९६५ या वीस वर्षांत ५० लाख घरे बांधली गेली, त्यांपैकी निम्मी घरे खाजगी भांडवलाने बांधली गेली. ३/५ गलिच्छ वस्त्या कमी झाल्या. घरबांधणी संस्थांना प्रेरणा मिळावी म्हणून १९६४ मध्ये घरबांधणी निगम स्थापन केले. सोव्हिएट युनियनमध्ये सरकारी खर्चाने सर्व घरबांधणी होते व घरबांधणी कामात या देशाचे जगात पहिले स्थान आहे. अमेरिकेत घरबांधणीचे काम स्थानिक संस्थांमार्फत होते. सरकार कर्ज देते किंवा इतर कर्जाबद्दल हमी घेते. घरपट्टीत सूट मिळते. स्वस्त भाड्याने देता येतील अशी लहान घरे स्थानिक संस्था बांधतात. पश्चिम जर्मनीत दुसऱ्या महायुद्धात २३ लाख म्हणजे सु. १/५ घरांची मोडतोड झाली होती, ती व आलेल्या निर्वासितांकरिता उभारावयाची घरे १९६२ पर्यंत बांधून झाली व त्यामुळे बरीचशी टंचाई दूर झाली. स्वतः पुरेसे घर बांधणारांना सरकारी मदतीत प्राधान्य होते. स्वतःचे घर बांधण्यासाठी बचत केलेल्या पैशात घरबांधणीच्या वेळी सरकार २५ टक्के भर घालते. प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र घर बांधून ती घरे मालकी हक्काने सरकारने विकली. सरकारी मदतीशिवाय घर बांधणारांना घरपट्टीत व प्राप्तीकरात सवलती दिल्या. भाड्याने देण्याकरिता बांधलेल्या खाजगी घरांना भाडेनियंत्रण ठेविले नाही. घरभाडे किंवा घराबद्दलचे कर वगैरे देणी कुटुंबाच्या उत्पन्नाच्या काही ठराविक हिश्शापेक्षा जास्त असतील, तर जास्त रक्कम सरकार सोसते. १९६२ पर्यंत ६८ लाख घरे बांधली गेली त्यांपैकी दोन लाख एकेका कुटुंबापुरेशी होती. १९५२ मध्ये दोनखोल्यांची १६ टक्के, चार खोल्यांची २८ टक्के व पाच खोल्यांची ९ टक्के घरे प्रतिवर्षी बांधली जात असत. ती १९६२ साली अनुक्रमे ९, ४० व ३१ टक्के होऊ लागली. यावरून तेथील आर्थिक मान किती झपाट्याने सुधारले, हे दिसून येते.

दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य मिळालेल्या देशांपैकी ब्रह्मदेशात १९५१ च्या नॅशनल हौसिंग अँड टाउन अँड कंट्री डेव्हलपमेंटच्या कायद्याने एक खास संस्था स्थापन करून तिच्या करवी रंगूनच्या १६ किमी. च्या परिसरात पाऊण ते एक लाख वस्तीची तीन उपनगरे स्थापिली. सरकारी खर्चाने भाड्याने देण्याकरिता घरे बांधली. महायुद्धात रस्त्यांची, पाणी पुरवठ्याची, आरोग्यसोईची झालेली मोडतोड दुरुस्त करण्याकरिता स्थानिक संस्थांना मदत दिली. १९६४ पर्यंत घरबांधणीवर ७७० लाख क्याट (Kyat) खर्च केले. त्यांपैकी पहिल्या पाच वर्षांत ५८६ लाख क्याट खर्ची पडले. इंडोनेशियात १९६१ च्या खानेसुमारीप्रमाणे ४८ लाख घरांची आवश्यकता होती. स्वकष्टाने बांधल्या जाणाऱ्याघरांना, सरकारी नोकरांच्या घरांना व सहकारी संस्थांना फक्त सरकारी मदत दिली गेली. इतर घरबांधणी खाजगी भांडवलाने झाली. जपानमध्ये घरबाधणीपेक्षा उद्योगधंद्याना सरकार जास्त महत्त्व देते म्हणून घरबांधणीच्या एकूण खर्चात ८० टक्के खर्च खाजगी आहे. शहरांत व त्यांच्या आसपास अनेक मजली इमारती बांधून त्या मध्यम व कनिष्ठ वर्गाला भाड्याने देण्याची सोय तेवढी सरकारने केली.

भारतातील प्रयत्‍न : भारतातील बहुसंख्य लोकांना स्वतःच्या खर्चाने स्वतःपुरेसे घर बांधणे परवडत नाही. घरबांधणीसंबंधी स्थानिक संस्थांची नियमने सांभाळून शहरातील जागेवर लहान घरे बांधणे किफायतशीर होत नाही. निवासस्थानांच्या मोठाल्या इमारती बांधण्याची ऐपत असलेले लोक अशी घरे बांधून धंदा करतात. त्यांचे भाडे देणेही आवाक्याबाहेरचे असते म्हणून निवासस्थानांची समस्या सोडविण्याकरिता सामुदायिक, सामाजिक संस्थांद्वारा, शासनाकडून किंवा शासनप्रणीत संस्थांकडून प्रयत्‍न व्हावे लागतात. असे प्रयत्‍न महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व कालात थोड्याफार प्रमाणात सुरू झाले. १९२२–२७ या काळात दादरची हिंदू वसाहत, पारशी वसाहत, शिवाजी पार्क वसाहत, पुण्याची डेक्कन जिमखाना वसाहत या आरंभीच्या वसाहती होत. पारशी जमातीचे आपल्या जमातीपुरते निवासबांधणीचे कार्य विसाव्या शतकाच्या आरंभापासून चालू आहे. सर्व जगातील पारशी जमातीपैकी ७० टक्के लोक म्हणजे सु. ७०,००० लोक मुंबईत आहेत. विसाव्या शतकातील पहिल्या ७० वर्षांत त्यांपैकी निम्म्या लोकांची सोय पारशी पंचायत व इतर विश्वस्त निधीतून करण्यात आली आहे. शासनप्रणीत असा पहिला उपक्रम १९१७-१८ मध्ये त्यावेळच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमार्फत ३०,००० गाळे बांधून झाला. त्यांपैकी काही गाळे डेव्हलपमेंट चाळी म्हणून ओळखल्या जातात. १९४१–४७ या काळात लढाईच्या कामाखेरीज इतर घरबांधणीला बंदी होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर औद्योगिक कामगार व नंतर निर्वासित यांच्या निवासस्थानांची निकड भागविण्याकरिता मुंबई सरकारने गृहनिर्माण मंडळ ही संस्था १९४९ च्या आरंभी निर्माण करून तिच्याकडे सर्व प्रकारच्या कमी उत्पन्नाच्या लोकांसाठी निवासस्थाने बांधण्याचे काम सोपविले.

निवासस्थानांची उभारणी खाजगी भांडवलाने होते पण निकडीच्या मानाने ती तोकडी पडते. निवासस्थानांची गरज भागविण्याकरिता शासनाकडून दोन प्रकारांनी चालना मिळालेली आहे. (१) गाळ्यांच्या इमारती व चाळी शासनाच्या खर्चाने बांधण्याकरिता गृहनिर्माण मंडळाची स्थापना व (२) सहकारी गृहरचना संस्थांना सवलती व आर्थिक मदत देण्याचे शासकीय धोरण. यांमुळे निवासस्थाने बांधण्याच्या कामात बरीच भर पडली आहे. घर बांधणीला चालना मिळावी म्हणून केंद्रीय गृहनिर्माण निगम स्थापून त्यामार्फत घरबांधणीला जागतिक बँकेच्या सहकार्याने चौथ्या पंचवार्षिक योजनेत फिरता निधी उभारण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे.

गृहनिर्माण मंडळ : हे मंडळ मुंबई सरकारने १९४९ साली स्थापन केलेले आहे. १९६० साली महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर यास महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ हे नाव दिले गेले. विदर्भाच्या आठ जिल्ह्यांकरिता विदर्भ गृहनिर्माण मंडळ हे स्वतंत्रपणे काम करीत आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाच्या गृहनिर्मितीच्या योजना पुढीलप्रमाणे आहेत :

आ. २. औद्योगिक कामगारांच्या गाळ्यांची मांडणी

(१) औद्योगिक कामगारांकरिता : मासिक उत्पन्न रु. ३५० पर्यंत असलेल्या कामगारांकरिता ३ मी. × ३·८ मी. आकाराची खोली व ३ मी. × २·६ मी. चे स्वयंपाकघर व मागील लहान अंगणात स्वतंत्र संडास व न्हाणी असे रु. ३,५०० अंदाजी खर्चाचे गाळे बांधतात (आ. २). बांधणी खर्चापैकी ५० टक्के अनुदान व ५० टक्के उसनवार केंद्र सरकारकडून राज्यसरकारला मदत मिळते. याखेरीज भाड्यातही राज्य सरकारकडून सवलत दिली जाते. अशा गाळ्यांपैकी काही गाळे उद्योगपतींच्या मागणीप्रमाणे त्यांच्या कामगारांकरिता राखून ठेवतात, मात्र अशा गाळ्यांच्या खर्चापैकी २५ टक्के खर्च उद्योगपतींना उचलावा लागतो. तसेच शासकीय योजनेपेक्षा जास्त प्रशस्त गाळे बांधण्यास लागणाऱ्या जास्त खर्चाचा बोजा उद्योगपतींनी उचलल्यास वरील मर्यादेपर्यंत सरकारी मदत मिळू शकते.

(२) मध्यम प्राप्तीच्या लोकांकरिता : ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु. ६,००० ते रु. १५,००० च्या दरम्यान आहे अशा लोकांकरिता ५६ चौ.मी. व ७४ चौ.मी. जोत्याचे क्षेत्रफळ असलेले अनुक्रमे रु. १५,००० ते रु. २०,००० अंदाजी खर्चाचे दोन प्रकारचे गाळे बांधतात. यास अनुदान मिळत नाही. या गाळ्यांपैकी २५ टक्के गाळे भाड्याने दिले जातात. राहिलेले गाळे मालकी हक्काने देतात. त्याकरिता बांधणी खर्चापैकी सु. ३० टक्के प्रारंभी भरून बाकी रक्कम १० ते ३० वर्षांत हप्त्यांनी फेडावयाची असते.

(३) अल्प प्राप्तीच्या लोकांकरिता : ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु. ६,००० पेक्षा कमी असेल अशा लोकांकरिता वरील अटींवरच ४० चौ. मी. व ४९ चौ.मी. जोत्याचे क्षेत्रफळ असलेले अनुक्रमे रु. ७,५०० व रु. ८,५०० अंदाजी खर्चाचे गाळे बांधले जातात.

(४) अत्यल्प प्राप्तीच्या लोकांकरिता : ज्यांचे मासिक उत्पन्न मुंबईत रु. २५० व मुंबईबाहेर रु. १७५ आहे अशा लोकांकरिता २·९ मी. × ३·९ मी. ची खोली, २·९ मी. × २·७५ मी. चे स्वयंपाकघर व बाहेरच्या बाजूस संडास व न्हाणी असलेल्या रु. ३,२०० अंदाजी खर्चाच्या खोल्या बांधतात. यांच्या बांधणीकरिता मध्यवर्ती शासनाकडून २५ ते ५० टक्के अनुदान व भाड्यात सवलतीकरिता मदत मिळते.

(५) गलिच्छ वस्त्या निर्मूलनाकरिता : १९६१ च्या पूर्वीपासून झोपडपट्टीत राहणाऱ्यालोकांकरिता अत्यल्प प्राप्तीच्या खोल्यांप्रमाणे खोल्या बांधतात. यांच्या बांधणीच्या खर्चासाठी केंद्र सरकारकडून ३७·५ टक्के उसनवार व ३७·५ टक्के अनुदान मिळते. राहिलेले २५ टक्के राज्य सरकार खर्च करते.  तरी पण त्यापैकी महानगरपालिकांकडून १२·५ टक्के किंवा महानगरपालिका, परिषदांकडून १० टक्के मदतीची अपेक्षा असते.

(६) बेघर झालेल्यांकरिता : आकस्मिक आपत्तीमुळे बेघर झालेल्या लोकांकरिता अल्पप्राप्ती लोकांच्या गाळ्यांप्रमाणेच हे गाळे असतात. फरक एवढाच की, हे गाळे मालकी हक्काने न देता भाड्याने देतात.

गृहनिर्माण मंडळाने डिसेंबर १९६५ पर्यंत सु. ७५,००० गाळे सु. ३४ कोटी रुपये खर्च करून बांधले आहेत. या मंडळाने ज्या वसाहती निर्माण केल्या आहेत, त्यांमध्ये शक्य त्या ठिकाणी समाजमंदिरे, खुली नाट्यगृहे, क्रीडांगणे, प्राथमिक शिक्षणाकरिता शाळा, दवाखाने, दुकाने वगैरेंसारख्या सोईंची तजवीज केली आहे.

मालकी हक्काचे गाळे : शहरात घरे बांधण्याकरिता लागणाऱ्या जागेच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे व होत आहे. त्यामुळे काही शहरांतून जमिनीची किंमत स्वतःला राहण्याकरिता बांधावयाच्या एक मजली बंगल्याइतकी द्यावी लागत आहे. जागेच्या एका तुकड्यात (प्लॉट) कमीत कमी तीन खोल्यांचे दोन गाळे बांधता येतात व स्थानिक नगरपालिकेच्या नियमांप्रमाणे त्यावर मजले बांधल्यास जमिनीचा खर्च मजल्यांवर वाटला जातो. सामान्य माणसाला एवढा खर्च करण्याची ऐपत नसते. जमिनीपैकी घराभोवतालचा बराच भाग मोकळा ठेवावा लागतो. अशा प्रकारची बंधने सांभाळून आवश्यकतेपुरते लहान घर बांधण्यापेक्षा जास्त मजल्यांच्या इमारती बांधणे आर्थिक दृष्ट्या किफायतशीर ठरते. त्यास लागणारा जास्त खर्च करण्याची ऐपत असलेले लोक याचा फायदा घेऊन स्वयंपूर्ण गाळ्यांच्या अनेक मजल्यांच्या इमारती बांधतात व गाळे विकतात. जागा ऐन खरेदीची असते किंवा लांब मुदतीच्या करारांनी घेतलेली असते. जमिनीचा मालक गाळ्याच्या खर्चाचा अंदाज काढून गिर्‍हाईकाकडून हप्त्याहप्त्याने पैसे घेऊन इमारती बांधतो. काही मालक पहिल्या प्रथम स्वतःच सर्व खर्च करून गाळा विक्रीच्या पोटी सुरुवातीलाच काही ठोक रक्कम घेऊन किंमतीच्या राहिलेल्या रकमेची वसूली हप्त्याहप्त्याने पैसे घेऊन करतात.

सहकारी गृहरचना संस्था : व्यापारी हेतूने बांधलेले गाळे सर्वसाधारण लोकांना पाहिजे त्या सोईचे व ऐपतीत बसणारे असतीलच असे नाही. याकरिता काही लोकांनी एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर गृहनिर्माण संस्था स्थापल्यास त्यातील सभासदांना आपल्या सोईची घरे व गाळे कमी खर्चात बांधता येतात. मात्र त्याच्या क्षेत्रफळावर व खर्चावर मर्यादा असतात. सहकारी कायद्याखाली नोंदलेल्या गृहनिर्माण संस्थांना बांधणीच्या खर्चाच्या ६० टक्क्यांपर्यंत पण प्रत्येक गाळा अगर घरामागे जास्तीत जास्त रु. २५,००० पर्यंत सहकारी गृहनिर्माण वित्त संस्थेकडून २० वर्षांच्या मुदतीत फेडावयाचे कर्ज मिळते व आरंभी फक्त ४० टक्के खर्च सभासदावर पडतो. यामुळे घरबांधणी शक्य होते. सहकारी संस्थेतील घराखालील जमिनीची मालकी सदैव सहकारी संस्थेची राहते व कर्ज फिटेपर्यंत घर अगर गाळा सहकारी संस्था व कर्ज देणारी संस्था यांच्याकडे गहाण राहतो, पण सभासद त्या गाळ्याचा अगर घराचा मालकी हक्काने उपभोग घेऊ शकतो. भाडेकरूंच्याही सहकारी संस्था आहेत व त्या आपल्या सभासदांना भाड्याने देण्याकरिता गाळे बांधतात. सहकारी संस्थांना नगररचनेच्या घरबांधणीबाबतच्या नियमांत काही सवलतीही मिळतात.

कमी खर्चाची घरे : खेड्यांत कमी खर्चाची घरे कशी बांधता येतील याबद्दल रूडकी येथील केंद्रीय संशोधन संस्थेकडून बरेच संशोधन झाले आहे व त्याबाबतीत चर्चा-बैठकाही झालेल्या आहेत. स्थानिक मालासंबंधी संशोधन होऊन घरास वापरण्याकरिता ते मजबूत व सुखदायी बनविण्याचे प्रयत्‍न होत आहेत.

खेडेगावात मातीच्या भिंती बांधण्याची पद्धत पुरातन काळापासून रूढ आहे. खेडेगावातील लोकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे भाजलेल्या पक्क्या विटांचे बांधकाम त्यांच्या आवाक्याबाहेरचे असते. बहुसंख्य खेड्यांतील घरावर चौमोळी गवताच्या ताट्यांची छपरे आढळतात. हाच माल वापरून त्यात थोडी सुधारणा केल्यास घरांची कामे कमी खर्चात होण्यासारखी आहेत. जेथे घर बांधावयाचे असेल तेथील मातीत ४ ते ५ टक्के सिमेंट मिसळून नंतर विटा पाडून त्या वाळवून, त्याचे बांधकाम केल्यास ते चांगले होऊन बरेच वर्षे टिकते. विटांकरिता वापरावयाच्या मातीचे नमुने तपासून विटा पाडण्याकरिता त्यात किती प्रमाणात सिमेंट मिसळावे याची माहिती मुंबईच्या सिमेंट काँक्रीट असोसिएशनकडून अल्पखर्चात मिळू शकते व माती-सिमेंटच्या पक्क्या विटा पाडण्याच्या बाबतीत तिच्याकडून तज्ञ सल्ला विनामूल्य मिळतो. चाळलेल्या मातीत सिमेंट मिसळून त्याचे गोळे हाताने बनविता येतील इतक्या थोड्या प्रमाणात त्यात पाणी घालतात व मिश्रण विटाळ्यात घालून विटा पाडतात. चोवीस तासानंतर त्या सात दिवस ओल्या ठेवतात व पुढे सहा आठवडे वाळल्यावर त्या वापरता येतात. बांबूच्या कामट्या अगर कारवी दोरीने विणून बांधून त्याचे कूड भिंतीऐवजी वापरतात. यावर पांढऱ्या मातीचा गिलावा करून भिंती मजबूत व टिकाऊ होतात. मातीत गवताचा भुसा, बिट्युमेन, रॉकेल व थोडेसे मेण यांचे मिश्रण करून बाहेरच्या भिंतीस गिलावा केल्यास त्यावर पावसाच्या पाण्याच्या मार्‍याचा फारसा परिणाम होत नाही. पायात या मिश्रणाची माती पसरून व पाणी टाकून धुमसून पायातले काम करता येते. घरातील जमिनीचे काम या मातीचे केल्यास ती टिकाऊ होते. खिडक्या व दरवाजे यांच्या चौकटींचा खर्च हा घरबांधणीच्या खर्चापैकी भिंतींच्या खर्चाच्या खालोखाल म्हणजे दुसऱ्या क्रमांकाच्या खर्चाची बाब आहे. सुखसोईस अवश्य इतकीच त्यांची संख्या ठेविल्यास खर्च कमी करता येतो. खिडक्यांची उंची व रुंदी आवश्यकतेएवढीच कमी ठेवून खर्चात बचत होते. झडपा लाकडी फळ्यांच्याच कराव्या लागतात. लाकडी चौकटीत पत्र्याचे वा सिमेंटचे तक्ते भरलेल्या झडपा स्वस्त असतात. दुहेरी झडपांपेक्षा एकेरी झडपा वापरून खर्चात बचत होते. मोरचूद, सोडियम डायक्रोमेट व ॲसिटिक अम्‍ल यांच्या मिश्रणात सहा तास भिजवून वाळविलेले गवताचे छप्पर कमी खर्चात होते व ते गळत नाही व त्यात कोणताही कृमिकीटक राहू शकत नाही. या छप्पराचे आयुष्य १५ ते २० वर्षे असते. कोणतेही छप्पर एकपाखी किंवा दुपाखी ठेवून ढापे कमी करता येतात व कुंदावर गटारे करण्याचा खर्च व खटाटोप वाचतो.

घराच्या भिंतीचे काही भाग पुढे-मागे ठेवल्याने कोपर्‍यांची संख्या वाढते व जास्त खर्च येतो. चौकोनी ठोकळ्याच्या आकाराचे घर बांधण्यास कमी खर्च येतो. बरीच घरे एका ठिकाणी सामुदायिक पद्धतीने व सहकार्याने बांधली गेली, तर खर्चात पुष्कळ बचत होऊ शकते. शहरातील घरांच्या बांधणीवर नगरपालिका व तत्सम स्थानिक सार्वजनिक संस्थांची बंधने असतात, म्हणून वरीलपैकी काही उपायांचा तेथे अवलंब करता येत नाही. सिमेंटमुळे घरबांधणीच्या खर्चात बचत कशी करता येते हे घरबांधणीतील सिमेंटचे कार्य या उपशीर्षकाखाली पुढे दर्शविले आहे. चांगल्या दर्जाच्या भरपूर सिमेंटच्या पुरवठ्याच्या अभावी त्या पद्धतींचा वापर क्वचितच केलेला आढळतो.

विविध उपयोगांच्या सार्वजनिक इमारती, त्यांची रचना व त्यासंबंधीच्या सर्वसाधारण शिफारसी यांसंबंधीचे विवेचन खाली दिले आहे.

शिक्षणमंदिरे : (१) पूर्वप्राथमिक शाळा अगर बालकमंदिरे, (२) प्राथमिक शाळा, (३) माध्यमिक शाळा व (४) व्यावसायिक अथवा तांत्रिक शिक्षण संस्था असे बांधणीच्या दृष्टीने शिक्षणमंदिरांचे  चार प्रकार पडतात. महाविद्यालयीन इमारतींची बांधणी माध्यमिक शाळांच्या धर्तीवर असते. महाविद्यालयात निरनिराळ्या शाखांच्या स्वतंत्र इमारती असतात व त्यांत वर्गखोल्या, प्रयोगशाळा, प्राध्यापकांच्या खोल्या वगैरेंची सोय असते. प्रयोगशाळांना शक्यतो उत्तरेकडील भिंतीतील प्रशस्त खिडक्यांतून दिवसाचा प्रकाश मिळावा अशी रचना करतात.

बालकमंदिरे : बालकमंदिरात प्रत्येक विद्यार्थ्यामागे ३ चौ.मी. क्षेत्र मिळेल असे वर्गखोलीचे क्षेत्रफळ असते. साध्या शिक्षणाच्या शाळांना प्रत्येक विद्यार्थ्यामागे हे क्षेत्र १ ते १·२५ चौ. मी. लागते. औद्योगिक शिक्षणाच्या शाळांना हे क्षेत्र १·५ चौ. मी. लागते. बालकमंदिरात २० विद्यार्थ्यांना पुरेल एवढीच वर्गखोली असावी. प्राथमिक शिक्षणाच्या शाळेच्या वर्गखोल्या २५ ते ३५ विद्यार्थ्यांना पुरेशा असतात. वरच्या शिक्षणाच्या शाळेच्या वर्गखोल्या ३० ते ४५ विद्यार्थ्यांना पुरेशा असतात. वर्गखोल्यांची रुंदी ८ मी. पेक्षा जास्त नसावी.

बालकमंदिराच्या शिक्षणाच्या जागा बहुधा तळमजल्याच्या असतात. वर्गखोलीच्या खिडक्या जमिनीपासून ०·५ मी. वर सुरू व्हाव्यात. ऊन व वार्‍याचा झोत वर्गात येणार नाही अशी दिशा असावी. वर्गखोल्यांशिवाय एक आच्छादित व चौफेर कठडा असलेले वठाण एका वर्गाची मुळे खेळ खेळू शकतील इतके ऐसपैस असावे लागते. चार विद्यार्थ्यांमागे एक मुखमार्जनाचे भांडे, एक मुतारी व दहा विद्यार्थ्यांमागे एक मोरी व एक संडास, मोठे दोन आरसे, टॉवेलाकरिता घोडे इतक्या सोई करता येतील अशी प्रशस्त खोली नजीकच असावी. मुलांची शाळेतून ने-आण करण्याकरिता येणाऱ्या मंडळींना थांबण्याकरिता सोपा असावा बालकमंदिराची इमारत व नजीकचा रहदारीचा रस्ता यांमध्ये मोकळी जागा राहील अशी आखणी अवश्य आहे.

आ. ३. माध्यमिक शाळेच्या इमारतीची मांडणी

माध्यमिक शाळा : या शाळांचे कामकाजाचे पुढीलप्रमाणे दोन विभाग पडतात : (अ) शिक्षण विभाग : यात सर्वसाधारण वर्ग, प्रयोगशाळा, चित्रकला व हस्तव्यवसाय विभाग, वाचनालय, सभागृह वगैरे व (आ) व्यवस्थापन विभाग : यात कचेरी, मुख्याध्यापकांची खोली, शिक्षकांची खोली, मुलींकरीता प्रतीक्षालय, फराळाकरिता खोली, मुतार्‍या, संडास वगैरे.

वर्गखोल्यांची बांधणी शक्यतर पूर्व-पश्चिम असावी. दक्षिण बाजूस सु. २ मी. रुंदीची पडवी व उत्तरेकडील भिंतीत खिडक्या ठेवून मुख्यत: उजेड घेतला जातो. उन्हाचा कवडसा खोलीत येऊ नये हा मुख्य उद्देश असतो. हल्ली आतपनिवारक योजनेने हा उद्देश साध्य होऊ शकतो म्हणून इमारतीची दिशा हवी तशी सोईस्कर ठेवता येते. माध्यमिक शाळांकरिता तीन पाकळ्यांची इमारत सोईस्कर ठरते. (आ. ३). खिडक्यांचे क्षेत्र खोलीच्या १/५ असते व त्यांची उंची जमिनीपासून १·२५ मी. ठेविलेली असते. वर्गाच्या जमिनी फरसबंद केलेल्या असतात. उत्तरेकडील खिडक्या समांतर ठेवून बसविलेल्या असतात. वर्गाच्या भिंतींची उंची तुळईखाली अगर कैचीच्या ताणपट्टीखाली कमीत कमी ३·७५ मी. असावी. वर्गखोली ६० चौ.मी. पेक्षा मोठी असेल, तर उंची ४·२ मी. असावी. जेव्हा वर्गाच्या खोल्या वाढविण्याची जरूर पडेल, तेव्हा एका मजल्यावर विशिष्ट संख्येपेक्षा जास्त खोल्या न वाढविता, स्वतंत्र खोल्यांची इमारत बांधणे अगर मजला वाढविणे इष्ट असते. तळमजला मुलांना खेळण्यास अगर सायकली ठेवण्यास  मोकळा ठेवून वरचे मजले शाळांच्या कामकाजाकरिता बांधणे सोईचे असते. शाळेच्या जिन्याची रुंदी १·५ मी. पेक्षा कमी नसावी. पायसर ३० सेंमी. व टप्पा १५ सेंमी. असावा. प्रत्येक जिन्यास अर्ध्या चढानंतर निदान जिन्याच्या रुंदी इतका रमणा असावा. विद्यार्थ्यांच्या उपयोगाकरिता गोल जिने किंवा जिन्यांपैकी कोणतीही पायरी वळणात असू नये. ३०० विद्यार्थ्यांमागे एक जिना असणे आवश्यक आहे. २० मी. पेक्षा जास्त चालावे लागू नये अशा अंतरावर जिने असावेत. शौचमुखमार्जनाची खोली मुख्य इमारतीजवळ असावी व मुख्य इमारतीस आच्छादित मार्गांनी जोडलेली असावी. प्रत्येक १०० विद्यार्थ्यांमागे चार मुतार्‍या, एक संडास, एक मुखमार्जनाचे भांडे व एक पाय धुता येईल अशी मोरी असावी. मुलामुलींच्या व शिक्षकांच्या सोई निराळ्या असाव्यात. पिण्याच्या पाण्याकरिता आच्छादित स्वतंत्र जागा फराळाच्या खोलीजवळ असावी. पाण्याच्या तोट्या सरळ अगर चक्राकार मालिकेत, प्रत्येक तोटीत अर्धा मीटर अंतर ठेवून बसवाव्यात. तोटीची जमिनीपासून उंची एक मी. असावी व तोट्यांच्या खाली जमिनीपासून ७५ सेंमी. वर ३० सेंमी. रुंदीची खोल पन्हळी सांडपाणी वाहून नेण्याकरिता असावी. ३० ते ४० विद्यार्थ्यांमागे कमीत कमी एक तोटी असावी.

आ. ४. वसतिगृह व भोजनगृह

विद्यार्थ्यांची वसतिगृहे : विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या खोल्यांच्या रचनेत पुढील मुख्य प्रकार आढळतात : (१) खोली व पुढे पडवी व दोन्ही टोकांना जिने अशी चाळीसारखी तीन ते चार मजली इमारत व (२) मध्ये मोठा चौक ठेवून, खोली व पडवी अशा चारी बाजूंस खोल्या व चार कोपर्‍यांत जिने अशी इमारत किंवा (३) जाण्यायेण्याच्या समाईक मार्गांच्या दुतर्फा खोल्या. विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या एकेरी खोलीचे क्षेत्रफळकमीत कमी ९ चौ.मी. असावे. दुहेरी खोली १३ चौ.मी. क्षेत्रफळाची असावी. तीन अगर चार विद्यार्थ्यांना एकत्र राहण्याकरिता खोलीची सोय करावयाची असेल, तर प्रत्येक विद्यार्थ्यामागे ६ चौ.मी. जागा पुरेशी होते. दहा विद्यार्थ्यांमागे एक न्हाणीघर, एक संडास, मुखमार्जना करिता एक भांडे असावे. पंचवीस विद्यार्थ्यांमागे एक मुतारी पुरेशी असते. अभ्यागतांकरिता जागा तसेच बैठ्या खेळांकरिता व वाचनालयाकरिता एक एक दालन असावे. वसतिगृहाच्या जवळपास दवाखाना नसल्यास जुजबी वैद्यकीय उपचाराकरिता एक-दोन खोल्या असाव्यात. सायकली व स्कूटर ठेवण्याची सोय काही वसतिगृहांत करण्याची आवश्यकता असते. तशी स्वतंत्र सोय नसेल तर जाण्यायेण्याच्या मार्गात व राहण्याच्या खोल्यांत अडगळ करण्याची प्रवृत्ती होते. वसतिगृहाला लागून भोजनगृह असणे सोईचे असते (आ. ४). भोजनगृहात जेवण्याची जागा, स्वयंपाकाची जागा, कोठी, भांडी घासण्याची जागा, हात धुण्याची जागा, नोकरांकरिता संडास, न्हाणी अशी व्यवस्था असावी. जेवणाच्या जागेचे क्षेत्रफळ प्रत्येक जेवणार्‍यामागे कमीत कमी १·५ चौ.मी. असावे. सर्व विद्यार्थी एका वेळी जेवू शकतील असे प्रशस्त भोजनगृह असावे.

रुग्णालये : रुग्णालयात करावयाच्या उपचाराप्रमाणे त्याच्या इमारतीच्या रचनेत व त्यात करावयाच्या सोईत फरक पडतो. या दृष्टीने रुग्णालयाचे (१) दवाखाने, (२) खेडेगावातील आरोग्यकेंद्रे, (३) इस्पितळे, (४) प्रसूतिगृहे, (५) शुश्रूषागृहे, (६) मनोरुग्णालये, (७) विविक्ती रुग्णालये व (८) आरोग्यभुवने असे प्रकार होतात. दवाखान्यात आजारी माणसाला तपासून औषध देण्यात येते किंवा लहानसहान जखमांवर मलमपट्टी करण्यात येते. कित्येक वेळा याच इमारतीत रोगप्रतिबंधक लस टोचण्याचीही सोय करतात. उपचाराकरिता येणाऱ्या लोकांना बसण्याकरिता दालन असते व त्याभोवती डॉक्टरांची बसण्याची व रोगी तपासण्याची खोली, मलमपट्टी करण्याची खोली, औषधे तयार करण्याची खोली व शौचमुखमार्जनाची खोली या कमीत कमी सोई असतात. खेडेगावातील आरोग्यकेंद्रात दवाखान्याच्या जागेखेरीज बाळंतपणाची, शिशुसंगोपनाची व कुटुंबनियोजनाची माहिती व सल्ला देण्याची सोय करतात. स्त्री डॉक्टरांकरिता स्वतंत्र जागेची तरतूद करतात. आरोग्यकेंद्रात येणाऱ्या लोकांना थांबण्यासाठी प्रतीक्षागृह लागते. ते ऐसपैस बांधल्यास फारसा जास्त खर्च न येता ते समाजमंदिर, व्याख्याने, चित्रपट दाखविणे वगैरे कामांच्या सोईचे होऊ शकते (आ. ५).

आ. ५. आरोग्यकेंद्र

खेडेगावाच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणच्या आरोग्यकेंद्रात सर्व प्रकारच्या उपाचारांची सोय नसते पण रोग्याला तपासून अधिक निदानाकरिता त्याला मार्गदर्शन करतात. जिल्हा इस्पितळात बहुधा सर्व प्रकारच्या उपचारांची सोय असते व रोग्यांच्या राहण्याची, शुश्रूषेची सोय असते. इस्पितळातही दवाखाना असतो व त्यातील सोई व विस्तार मोठ्या प्रमाणावर असतो. सर्व प्रकारच्या शारीरिक तक्रारींची तज्ञाकडून परीक्षा करण्याची सोय करतात. औषध घेऊन रोगी घरी जातो, या विभागास बाह्यरुग्ण विभाग म्हणतात. ज्या रोग्यांच्या बाबतीत जास्त चिकित्सेची व शुश्रूषेची आवश्यकता असेल त्यांना ठेवून घेण्याची सोय असते. बाह्यरुग्ण विभागात लघुशल्यचिकित्सेची जागा ठेवतात. रोग्यांना व त्यांच्याबरोबर येणाऱ्या लोकांसाठी प्रतीक्षागृह असावे लागते व त्याच्या बाजूस नोंदणी विभाग असतो. वाहनातून उतरल्याबरोबर फार चालावे वा चढावे न लागता प्रतीक्षागृहात प्रवेश करता येईल अशी सोय करतात. नोंदणी विभागात रोग्याची वैद्यकीय माहिती व शारीरिक तक्रारीची नोंद झाल्यावर योग्य तो चिकित्सक प्रतीक्षागृहाच्या नजीकच असू शकेल अशी खोल्यांची मांडणी करतात (आ. ६). चिकित्सेनंतर औषधोपचार अथवा मलमपट्टी उपचाराची खोली असावी लागते. बाह्यरुग्ण विभागाशेजारी तात्काळ उपचार अवश्य असलेल्या रोग्यांसाठी स्वतंत्र विभाग ठेवतात. यानंतरचा इस्पितळाचा महत्त्वाचा भाग म्हणजे आंतररुग्ण विभाग. यात शस्त्रक्रिया व रुग्णशाळा असे दोन मुख्य भाग असतात. शस्त्रक्रिया भागात एक किंवा अधिक शस्त्रक्रियागारे व त्या प्रत्येकास जोडून लहान प्रतीक्षालय, रोग्यावर शस्त्रक्रियापूर्व संस्कारांकरिता मोरी व संडासयुक्त खोली, शल्यचिकित्सकाची खोली, उपकरणे वगैरे साहित्याची खोली व निर्जंतुकीकरण खोली असावी लागते. शस्त्रक्रियेनंतर भूल उतरेपर्यंत रोग्यास निजवून ठेविण्याकरिता काही ठिकाणी स्वतंत्र खोली असते. शस्त्रक्रियागार पूर्ण विशुद्ध रहावे म्हणून ते एका टोकाला ठेवतात व त्यामुळे प्रवेश निर्बंधित राहतो. सर्वसाधारण शस्त्रक्रियेसाठी ३३ चौ.मी. ते ३८ चौ.मी. क्षेत्रफळाचे शस्त्रक्रियागार पुरेसे होते. ज्या शस्त्रक्रियेसाठी अनेक शस्त्रचिकित्सक एकाच वेळी असावे लागतात असे शस्त्रक्रियागार जास्त विस्तीर्ण ठेवतात. वैद्यकीय विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेचे निरीक्षण करण्याची संधी द्यावयाची असेल, तर शस्त्रक्रियागाराला पोटमाळ्याची सोय करतात. सर्वांगपरिपूर्ण इस्पितळे व वैद्यकीय महाविद्यालये बहुधा संलग्‍न असतात.

आ. ६. बाह्यरुग्ण विभाग

रुग्णशाळा भागात स्वतंत्र खोल्या किंवा बर्‍याच रुग्णशय्यांच्या रांगा मावतील अशी दालने असतात. स्वतंत्र खोलीत एकच रुग्ण असतो, पण त्याच्या सोबतीस कोणास राहता येण्याच्या दृष्टीने ३·६५ मी. × ३·५ मी. ची खोली पुरेशी होते. यातच सांडपाण्याच्या मोरीचा समावेश होऊ शकतो. दोन रुग्णांकरिता ४·५ मी. × ३·५ मी. खोली पुरते. यात निराळ्या सोबतीची सोय करीत नाहीत. परस्परांकडे पायथे केलेल्या दोन रुग्णशय्या व दोहोंमध्ये १·२५ मीटरचा जाण्यायेण्याचा मार्ग याकरिता कमीत कमी २·२५ मी. × ४·५ मी. जागा लागते. लांबच लांब दालनात रुग्णशय्यांची अशी मांडणी ठेवावयाची असेल, तर जाण्या-येण्याचा मधला मार्ग जास्त रुंद रहावा म्हणून दालनाची रुंदी कमीत कमी ६ मी. ठेवतात. रुग्णशय्यांच्या प्रत्येक रांगेतील दोन रुग्णशय्यांत कमीत कमी २·३ मी. अंतर ठेवतात. निजविलेल्या स्थितीत रुग्णाला सुलभतेने वाहून नेता यावे म्हणून वळण असलेले जिने व त्यांचे रमणे कमीत कमी १·५ मी. रुंद असावे लागतात. मजल्यावर जाण्यास लिफ्ट असल्यास त्यांपैकी निदान एकतरी कमीत कमी २·५ मी. × १·५ मी. आकाराची असावी. रुग्णालयाच्या इमारतीचा एकूण एक भाग पूर्ण अग्‍निप्रतिरोधक असावा. खाद्यपेये तयार करण्याकरिता खोल्या, भांडाराच्या खोल्या, परिचारिका व अन्य कर्मचार्‍यांच्या खोल्या, न्हाणीघरे, मोर्‍या, संडास वगैरे सोई इमारतीत असाव्या लागतात त्यांचे येण्याजाण्याचे मार्ग स्वतंत्र व रुग्णशाळेस उपद्रव होणार नाही अशा ठिकाणी असावे. मृत देह ठेवण्याची खोली व उत्तरीय परीक्षणाची खोली इमारतीपासून अलग असतात. प्रसूतिगृहे व शूश्रूषागृहे यांची मांडणी सर्वसाधारणपणे रुग्णशाळेसारखीच असते. विविक्ती रुग्णालयातील रुग्ण अलिप्त राहतील अशा बर्‍याच सोई कराव्या लागतात. मनोरुग्णालयातील आवारात करमणुकीची व शिवणकाम, विणकाम, चित्रकला वगैरेंसारख्या व्यवसायांसाठी दालने बांधावी लागतात. भोजनगृहाचे दालन, दवाखाना, लघुशल्यचिकित्सा व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मानसशास्त्रीय प्रयोगांकरिता खोल्या असतात. आरोग्यभुवनांत वसतिस्थाने स्वयंपूर्ण असतात.

बाजार : दैनंदिन गरजेच्या जिनसा विकण्याकरिता ठरवून दिलेली ठिकाणे म्हणजे बाजार होय. बाजारांचे बांधणीच्या दृष्टीने (१) नाशवंत मालाचे, (२) वाणी-सौद्याचे व (३) इतर संसारोपयोगी सामानाचे असे तीन प्रकार होतात. भाजीपाला, फळे वगैंरेच्या मंडईतील ओटे २० ते ३० सेंमी. उंचीचे, ५ ते १२ मी. लांबीचे असणे सोईचे असते. एकेरी ओटे १·२५ मी. व पाठीला पाठ लागलेले त्याच्या दुप्पट रुंदीचे असतात. ओट्यांमधील रहदारीची वाट १·५० मी. पेक्षा कमी नसावी. ओटे व मधली वाट फरसबंद करतात. तात्पुरत्या विक्रीकरिता उघडे ओटे लोकप्रिय आहेत. तरी पण आच्छादित व उन्हापासून संरक्षित असे ओटे व त्यांमधील मार्ग अशी मंडई गिर्‍हाईकास पसंत पडते. मंडईचे जोते १५ ते २५ सेंमी. उंचीचे असावे. वाणी-सौद्याच्या सामानाकरिता पाऊण ते एक मी. उंचीचे बंदिस्त व जास्त ऐसपैस ओटे मंडईच्या इमारतीत अगर नजीक फार दूर जावे लागणार नाही अशा मांडणीचे बांधतात. मांस, सुके व ओले मासे यांकरिता स्वतंत्र मंडई असते व माशा वगैरेंचा उपद्रव होऊ नये म्हणून हा विभाग भिंती व जाळ्या लावून बंदिस्त करतात आणि आपोआप बंद होणारे दरवाजे बसवितात. साफसफाईसाठी स्वतंत्र मोरी आतच असावी लागते. कत्तलखान्यात हत्येकरिता आणण्यात येणारे प्राणी कोंडण्याची जागा, ते प्रत्यक्ष मारण्याच्या स्थानातील आवाज येणार नाही अशी तुटक पण जोडलेली ठेवतात. वधस्थानातील रक्त व इतर द्रव्ये पन्हाळीतून वाहत येऊन एका खड्ड्यात गोळा होण्याची व्यवस्था करावी लागते. कत्तलखाना व त्याच्या दाराशी वाहने उभी राहतील इतकी जागा माशा, धूळ वगैरेंपासून संरक्षित करतात.

वस्तुसंग्रहालय : पूर्वी संग्रहणीय वस्तूंच्या आकर्षक मांडणीपेक्षा संग्रहालयाच्या इमारतीला व त्याच्या शिल्पाला जास्त महत्त्व देण्यात येत असे. हळूहळू संग्रहालयांकरिता बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतींमध्ये मांडणीला प्राधान्य मिळू लागले व बांधणीत बदल होत गेला. संग्रहालयाच्या इमारतीत पुढील दालनांचा समावेश होतो : (१) प्रदर्शनीय वस्तू मांडण्याकरिता प्रशस्त विभाग, (२) अभ्यासनीय वस्तूंकरिता राखीव दालन, (३) शैक्षणिक विभाग, (४) सभागृह, (५) ग्रंथालय विभाग, (६) संग्रहालय संचालक किंवा अभिरक्षकांचे कार्यालय व कचेरीची खोली, (७) कारागिरी विभाग, (८) राखीव विभाग, (९) शौचमुखमार्जनाची व पिण्याच्या पाण्याची सोय.

सामान्यत: प्रदर्शनीय वस्तू कलात्मकरीत्या मांडण्याकरिता सु. १० मी. रुंदीची दालने पुरतात. प्रेक्षकांच्या रहदारीला २ ते ३ मी. रुंदीची मोकळी वाट असावी. प्रदर्शनीय वस्तूंच्या कपाटाची उंची २·५ मी. पेक्षा जास्त नसते. दालनाची उंची ४ ते ५ मी. असावी लागते. विभागांची लांबी रुंदीच्या तिपटीपेक्षा जास्त नसावी. प्रेक्षकाला पाहिजे त्या विभागात प्रवेश मिळविता यावा याकरिता प्रत्येक विभागात प्रवेशद्वार बैठकीची सोय असलेल्या मध्यवर्ती दालनात किंवा सज्‍जात येईल अशी रचना असावी म्हणजे प्रेक्षकास थकवा वाटल्यास अन्य विभागात शिरण्यापूर्वी विश्रांती घेता येईल. दुसऱ्या कोणत्याही विभागाला प्रेक्षकांच्या रहदारीचा उपद्रव होणार नाही अशी मांडणी असावी. इतर कोणत्याही विभागाशी संपर्क येणार नाही पण प्रेक्षकाच्या सहज नजरेत येईल अशा ठिकाणी सभागृह असावे. सभागृहात लहानसे व्यासपीठ असावे. आवश्यक तेव्हा सभागृहाचा उपयोग प्रासंगिक प्रदर्शनाकरिता करता यावा म्हणून सभागृहातील प्रेक्षागृहात चढत्या बैठकींची मांडणी करीत नाहीत. संग्रहालयातील वस्तू नीट नेटक्या करण्याकरिता बरीच प्रशस्त जागा लागते. त्यात कारागिरीकरता कांही यंत्रसामग्रीही ठेवावी लागते. नवीन आलेला अवजड माल उतरून घेता येईल व प्रदर्शन दालनात सुलभतेने नेता येईल असे प्रशस्त प्रवेशद्वार लागते. एकापेक्षा जास्त मजले असल्यास इमारतीस दोन किंवा अधिक जिन्यांची सोय पाहिजे. जिन्याची रुंदी दीड मीटरपेक्षा कमी नसावी.

प्रेक्षकांचे लक्ष प्रदर्शनीय वस्तूकडे केंद्रित व्हावे म्हणून इमारतीच्या आतील भागाचा रंग भडक नसावा. संग्रहालयाच्या इमारतीभोवती झाडी व बगीचा असावा. त्यामुळे हवेतील धुराळ्याचा त्रास कमी होतो व इमारतीस उठाव येतो.

संग्रहालयातील वस्तू सुरक्षिततेसाठी काचेच्या आवरणात ठेवलेल्या असतात. दालनात येणाऱ्या दिनप्रकाशाची कोणतीही योजना केली, तरी प्रेक्षक व इतर वस्तूंचे प्रतिबिंब कपाटाच्या काचेमुळे कपाटात पडते व त्यामुळे कपाटातील वस्तू उठून व स्पष्ट दिसणे सदासर्वकाल शक्य नसते. म्हणून कृत्रिम प्रकाश व वातानुकूलन यांचा अवलंब संग्रहालयातील इमारतीत करण्यात येत आहे. खिडक्यांतून हवा, प्रकाश येणार नाही अशी तरतूद करतात. त्यामुळे धुळीचाही उपद्रव होत नाही व प्रेक्षकांना थकवा लवकर येत नाही. वातानुकूलनाकरिता लागणारी यंत्रे व इतर सामग्री उभारण्याकरिता निराळ्या जागेची सोय इमारतीत करावी लागते.

सभागृह : नगरमंदिर, शिक्षण संस्थांची सभास्थाने, नाट्यगृहे, चित्रपटगृहे वगैरेंची रचना सभागृहास लागू होणाऱ्या तत्त्वांवर केली जाते. अशा इमारतीत रंगमंच बहुधा कायमचा बांधलेला असतो. याची लांबी-रुंदी सभागृहाच्या इच्छित उपयोगाप्रमाणे कमी-जास्त ठेवतात. रंगमंचाची उंची प्रेक्षागृहाच्या रंगमंचाजवळील टोकाच्या जमिनीच्यावर एक मीटरपेक्षा जास्त उंच नसावी. प्रेक्षागृहाचा उपयोग बैठे खेळ, बालकमंदिर, प्रासंगिक प्रदर्शन, अल्पोपहार वगैरेंकरताही व्हावा म्हणून जेव्हा सभागृह बांधतात तेव्हा प्रेक्षागृहाची जमीन सपाट ठेवतात. रंगमंचावरील कार्यक्रम ऐकण्या पहाण्यापुरता सभागृहाचा उपयोग मर्यादित असेल, तर प्रेक्षागृहातील खुर्च्या मांडण्याकरिता पायऱ्या बांधणे योग्य असते. पायर्‍यांची रुंदी सु. ९० सेंमी. ठेवतात पण ती एक मीटर ठेवली, तर जास्त आरामशीर होते. पायर्‍यांचा चढ १० सेंमी. पासून १६ सेंमी. पर्यंत ठेवतात. खुर्च्यांची मांडणी वक्राकार ठेवल्याने सर्व प्रेक्षकांना रंगमंचाकडे सरळ पाहता येते. मधील वाटांना पायर्‍यांऐवजी तितका उतार ठेवतात. पायर्‍यांच्या मांडणीचा फायदा म्हणजे पायर्‍यांच्या चढात जाळ्या बसवून वायुजीवन करता येते. जाण्यायेण्याच्या वाटा जमेस धरून प्रत्येक प्रेक्षकामागे ०·७५ चौ.मी. ते १ चौ.मी. इतके क्षेत्र धरतात.

सभागृहाच्या नजीक शौचमुखमार्जनाकरिता सोय करावी लागते. सभागृहाच्या इप्सित उपयोगाप्रमाणे कचेरीच्या कामकाजाची खोली, रंगपट, विश्रांती खोल्या वगैरे सोई आवश्यकतेप्रमाणे करतात.

सभागृहाबाहेरील आवाज कमी करण्याकरिता बाहेरच्या बाजूस काढलेल्या उतरत्या छपराच्या पडव्यांचा उपयोग होतो. पडवीमुळे मुख्य इमारतीच्या भिंतीकडे येणाऱ्या ध्वनितरंगांना अटकाव होतो. दरवाजे व खिडक्यांना दुहेरी झडपा ठेवून अगर एकेरी झडप व जाड कापडाचे पडदे त्यापुढे सोडून बाहेरचा आवाज पुष्कळ कमी करता येतो.

सभागृहातील कार्यक्रम सभागृहाच्या कोणत्याही भागात सुस्पष्ट ऐकू येण्याकरिता सभागृहाच्या बांधणीत विशेष दक्षता घ्यावी लागते. ध्वनीचा प्रतिध्वनी येणे, ध्वनी घुमणे, ध्वनीचे केंद्रीकरण होणे किंवा तो स्पष्ट ऐकू न येणे हे दोष टाळावे लागतात. रंगमंचावरून निघालेले ध्वनितरंग रंगमंचासमोरील भिंतीवर आपटून ते सर्व तरंग परावर्तित होतात त्यावेळी मूळ ध्वनीच्या पाठोपाठ त्यांचे प्रतिध्वनी स्पष्टपणे ऐकू येतात. व्यासपीठाच्या समोरील भिंतीच्या गुळगुळीत व कठीणपणावर ध्वनीच्या परावर्तनाचे प्रमाण अवलंबून असते. समोरील भिंत थोडी फार खडबडीत ठेवून अगर त्यावर चुण्या अगर सरनळ्या पाडून परावर्तित होणारे तरंग कमी करता येतात. समोरच्या भिंतीत गवाक्षे असल्यासही प्रतिध्वनी कमी होतो. त्या भिंतीच्या जागी अगर त्या भिंतीच्या पृष्ठभागावर लाकडी, मुद्दाम बनविलेल्या पुठ्ठ्याचे अगर गवत, लाकडाचा भुसा, सालपा किंवा इतर तंतुमय वस्तूचे तक्ते, रबर, लिनोलियम, छिद्रमय तक्ते किंवा काच-तंतू बसवून त्यावर भोकांचे तक्ते बसविले, तर ते ध्वनितरंग शोषून घेतात. छतावरून परावर्तित होणारे तरंग सरळ जाणाऱ्या तरंगांच्या समवेत श्रोत्यांच्या कानावर पडले, तर ध्वनी जास्त दूरपर्यंत पोहोचू शकतो. छत एका पातळीत असण्यापेक्षा स्थलभेदाप्रमाणे ते किंचित खालीवर ठेवण्याने ध्वनी मागेपर्यंत जास्त अंतरावर ऐकू जाऊ शकतो. छताचा आकार किंचित जरी अंतर्गोल अगर बर्हिगोल आकाराचा असेल, तर ध्वनीचे तरंग विशिष्ट ठिकाणी केंद्रीत होतील तर काही ठिकाणी ध्वनी अती कमजोर होईल. छताची आखणी व श्रोत्यांपासूनची त्याची उंची ध्वनीस मदत होईल अशी ठेवणे शक्य नसेल तेव्हा ध्वनी शोषून घेतला जाईल अशा पदार्थांच्या तक्त्यांचे आवरण त्यावर देणे हा एक उपाय असतो. सभागृहाच्या दोन्ही बाजूंकडील भिंतीवर आपटून येणारे तरंग सभागृहात निरनिराळ्या ठिकाणी प्रसारीत होतात त्यामुळे प्रतिध्वनी उत्पन्न न होता एकामागून एक सूक्ष्म ध्वनी श्रोत्यांच्या कानावर येतात व मूळ ध्वनी स्पष्ट ऐकू येत नाही. या भिंतीत रुंद दरवाजे ठेवून हा त्रास कमी करता येतो. रंगमंचापासून दुतर्फा जाणाऱ्या भिंती सभागृहाच्या जवळजवळ मागील टोकापर्यंत रुंदावत नेल्याने बाजूच्या भिंतींवरून परावर्तित होणारे तरंग सगळीकडील ध्वनीस पोषक होतात. प्रेक्षागृहातील बैठक मागील बाजूस चढती ठेवल्याने शेवटच्या ओळीपर्यंत पोहोचणारा ध्वनी, सभागृहाच्या सपाट जमिनीवरील बैठकीच्या शेवटच्या ओळीत येईल, त्यापेक्षा जास्त स्पष्ट ऐकू येतो. मागील टोकास झुकत्या पोटमाळ्यावर बैठकीची सोय करावयाची असेल, तर पोटमाळ्याचा तळ अशा तर्‍हेने तिरकस असावा की, तळमजल्यावरील शेवटच्या ओळीतून छताचा निदान १/६ भाग दिसू शकेल. असे करण्याने छतावरून थोड्या फार प्रमाणात परावर्तित होणाऱ्या तरंगांनी मूळ ध्वनीत जी भर पडते, तिचा फायदा मिळू शकतो [→ ध्वनिकी ].

प्रेक्षागृहाप्रमाणे रंगमंचाचे छत उंच ठेवीत नाहीत. बाजूच्या भिंती व छत पुढल्या अंगाला फाकते ठेविल्याने ध्वनिप्रसारणास मदत होते. रंगमचांवर अगर प्रेक्षागृहातील कोणत्याही भागाचे छत घुमटाच्या आकाराचे असू नये. सभागृहाच्या रुंदीच्या दुप्पट उंचीवर व सभागृहाच्या क्षेत्रफळाच्या १/३ पेक्षा कमी क्षेत्रफळावर घुमटवजा छत असले, तर मात्र उपद्रव होत नाही. सभागृहाच्या सभोवारच्या भिंतीजवळ कापडाचे पडदे सोडल्याने सर्व ध्वनितरंग शोषले जातात व मूळ ध्वनी तेवढा सुस्पष्ट ऐकू येतो. ध्वनी दूरवर पोहोचण्याकरिता ध्वनिक्षेपक वापरतात. अशा वेळी रंगमंचाचे छप्पर उंच असले किंवा बाजू मोकळ्या असल्या तरी अडचण येत नाही. ध्वनिक्षेपक छतात ठिकठिकाणी विभागून बसविल्यास ध्वनी सर्व ठिकाणी सारख्याच तीव्रतेने पोहोचविता येतो.

आगगाड्यांची स्थानके : इमारती बांधण्याच्या दृष्टीने स्थानकांचे चार प्रकार होतात : (१) आगगाडीचे अंतिम स्थानक, (२) संगम स्थानक, (३) आडवळणी स्थानक, (४) उपनगरी गाड्यांचे स्थानक.

अंतिम स्थानकांवर व संगम स्थानकांवर कामकाजाची सर्व प्रकारची दालने, प्रवाशांच्या सुखसोई, कर्मचार्‍यांचे विश्रांतिस्थान, रक्षकदल व टपालखाते यांच्याकरिता सोई तसेच आच्छादित प्लॅटफॉर्म व रूळ ओलांडण्याकरिता प्रशस्त दादर असावे लागतात. पाण्याचा भरपूर साठा राहील अशा टाकीची सोय इमारतीवर करतात.

इमारत किंवा तिचा कोणताही भाग आगगाडीपासून किती सुरक्षित अंतरापलीकडे असावा याची मापे ठरलेली आहेत व त्यानुसार इमारत बांधणे अवश्य असते. भरलेल्या व भरधाव जाणाऱ्या आगगाड्यांमुळे व एंजिनाच्या बाष्प निष्कासनामुळे (बाहेर पडणाऱ्या वाफेमुळे) जे हादरे बसतात त्यांचा विचार विशेषेकरून प्लॅटफॉर्म, त्यावरील आच्छादन व इतर वास्तूंच्या अभिकल्पात करावाच लागतो.

आडवळणी ठिकाणच्या स्थानकावर मर्यादित स्वरूपाची रहदारी असल्याने कामकाजाची व प्रवाशांच्या सोईची मर्यादित दालने पुरी होतात. प्लॅटफॉर्म उघडा असला तरी चालतो. उपनगरी आगगाड्यांच्या मार्गांवरील स्थानकांवर पत्र्याने आच्छादित प्लॅटफॉर्म व प्रशस्त आच्छादित दादर असणे महत्त्वाचे असते. इतर जुजबी सोई पुरेशा होतात. प्लॅटफॉर्मच्या मध्यावर खांबांची ओळ घेऊन दोन्ही बाजूला झुकाव पद्धतीची काँक्रीटची कवची छपरे करण्याचा प्रघात सोईचा आहे. आगगाडीच्या बाजूला छप्पर उंच ठेवून मध्यवर्ती खांबाकडे उतरते ठेवता येते.

मालधक्का : मोठ्या स्थानकांवर किंवा औद्योगिक वसाहतींजवळील स्थानकांवर मालाची चढउतार करण्याकरिता स्वतंत्र धक्के असतात. तेथे अवजड मालही उतरविला जातो. त्याचे वजन व आघात पेलवण्यासारखी धक्क्याची फरशी व तिचा तळ करावा लागतो. पाऊसपाण्याने खराब होईल असा माल उतरवून ठेवण्याकरिता बंदिस्त जागा असावी लागते. छप्परास भरपूर उतार देऊन गळण्याचा धोका टाळावा लागतो. मालाच्या सुलभ चढउतारामुळे धक्क्याची उंची रुळाच्या बाजूला मालगाडीच्या डब्याच्या उंचीपेक्षा किचिंत जास्त ठेवतात.

बसस्थानके : बसस्थानकांवर मुख्य भाग प्रतीक्षालय असते. स्थानकाच्या इमारतीपैकी ३० ते ६० टक्के भाग प्रतीक्षालयाने व्यापलेला असतो. बस सुटतात व विराम पावतात अशी आरंभीची स्थानके, निरनिराळ्या दिशांना जाणाऱ्या येणाऱ्या बसांची मार्गस्थ स्थानके व वाटेवरील स्थानके अशा स्थानकाच्या प्रकारांप्रमाणे इमारतीच्या बांधणीत फरक होऊ शकतात. मार्गस्थ स्थानकांवर प्रतीक्षालयाचे क्षेत्रफळ इतर स्थानकांपेक्षा जास्त असावे लागते. बसच्या गर्दीच्या वेळी एका तासात सुटणाऱ्या बसमधून जितके लोक जाऊ शकतील त्यांपैकी १/३ लोकांना पुरतील असे व प्रत्येक माणसामागे १·५ ते ३ चौ.मी. जागा मिळेल एवढे प्रतीक्षालय असावे. प्रतीक्षालयाच्या खालोखाल व प्रतीक्षालयाच्या २/३ इतकी जागा उपहारगृहाने व्यापलेली असते. जागेची टंचाई असल्यास उपाहारगृह दुसऱ्या मजल्यावर बांधतात. या खेरीज स्थानक नियंत्रकाची खोली, तिकिटे देण्याची खोली, पार्सलांकरिता खोली, बसच्या कर्मचार्‍यांकरिता आरामगृह वगैरे प्रशासन सोई व वर्तमानपत्रे, फळफळावळ, किरकोळ जिनसा यांच्या विक्रीची सोय व शौचमुखमार्जनाच्या सोईची तरतूद स्थानक इमारतीत आवश्यकतेप्रमाणे करावी लागते. प्रतीक्षालयाच्या एका बाजूकडे लंब दिशेने बस उभ्या राहण्याची सोय करतात. बसमध्ये चढण्याकरिता प्रतीक्षालयाच्या बाहेर सु. २० सेंमी. उंचीचा कट्टा करतात. त्यावर बाहेर झुकते छप्पर करतात. साफसफाईच्या सुलभतेकरिता इमारतीची जमीन गुळगुळीत फरशीची करतात. पण चढण्या-उतरण्याच्या कट्ट्यावर चर्‍यांची फरशी बसवितात. स्थानकाच्या आवाराची प्रवेशद्वारे ५ ते ७ मी. रुंदीची असावी म्हणजे बस वळून आत येण्यास अडथळा होत नाही.

बस वाहतुकीच्या मार्गापासून दूर अंतरावर असलेल्या खेड्यांतील प्रवाशांना बसची प्रतीक्षा करीत मुख्य रस्त्यावर उभे रहावे लागते. अशा मोक्याच्या ठिकाणी आच्छादित व तीन बाजूंनी बंद असलेले आसरे उभारतात. त्यांचे जोते रस्त्यापेक्षा २० ते ३० सेंमी. उंच ठेवून जागा फरसबंद करतात. मागील बाजूस उतरते असे पत्र्याचे छप्पर घालतात.

विमानतळ : विमानतळावरील इमारतींचे प्रकार पुढीलप्रमाणे पडतात : (१) शासकीय कामाकरिता इमारती, (२) विमानघरे, (३) आनुषंगिक इमारती, (४) धावपट्ट्या.

शासकीय विभागात महत्वाचा भाग म्हणजे नियंत्रण दालन व नियंत्रकाच्या टेहेळणीचा व मार्गदर्शनाचा आणि विमानतळावर सर्वत्र दृष्टी पोहोचेल असा मनोरा हे होत. नियंत्रणाकरिता स्वतंत्र इमारत ठेवतात पण बहुधा त्याची तरतूद वरच्या मजल्यावर करून तळमजल्यावर प्रतीक्षालये, उपाहारगृहे, निरनिराळ्या विमान कंपन्यांच्या कचेर्‍या, जकात व वैद्यकीय तपासणीच्या जागा, वैमानिक व त्यांचे सहकारी यांची विश्रांतीस्थाने, विक्रीकेंद्र, शौचमुखमार्जन इत्यादींच्या सोई करतात. पथिक उतारू जकात तपासणीतून वगळले जातील अशा ठिकाणी त्यांच्या आरामगृहाची स्वतंत्र सोय करतात. या इमारतीचा अभिकल्प (आराखडा) करताना त्यावर उभारावयाच्या रडारसारख्या अवजड व महत्त्वाच्या यंत्रांमुळे तसेच प्रकाशझोताच्या फिरत्या दिव्यांमुळे येणारे भार, याशिवाय इमारतीच्या परिसरात स्फोट होण्याची संभाव्यता लक्षात घेऊन त्यांच्या धक्क्यांच्या प्रेरणा, या अतिरिक्त प्रेरणांचाही विचार करावा लागतो. या मुख्य इमारतीच्या आसपास दुय्यम पण अत्यावश्यक बैठ्या इमारती असतात. त्यांत आगीचा बंब, आग निवारण साहित्य, तेल व पेट्रोलच्या मोटारी, रुग्णवाहक सामान व उतारू ने-आण करणारी वाहने यांचे तबेले तसेच विमानाच्या जुजबी दुरुस्तीची व साफ सफाईची अवजारे ठेवण्याकरिता, देखभाल करणाऱ्या कर्मचार्‍यांकरिता खोल्या यांचा समावेश होतो. विमानघर दूर अंतरावर असले तरी चालते. विमानघरास लागून भांडारगृह व कर्मशाळा बांधतात.

(अ)

विमानघर: हल्ली वापरात असलेल्या बोईंग जातीच्या विमानासारखी मोठी विमाने सुलभतेने आत शिरून सहज मावतील अशी विमानघरे बांधतात. विमानाच्या शेपटीखेरीज इतर भागांची उंची कमी असते म्हणून सर्वत्र विमानघराची उंची कमी ठेवून फक्त शेपटीकरिता पूर्ण उंची मिळेल असे विमानघर बांधतात. अमेरिकेत काही विमानघरांच्या छपरात शेपटीसाठी फट राखून कमी उंचीची विमानघरे बांधलेली आहेत. तरीसुद्धा उंच विमानघरे बांधण्याचीच प्रवृत्ती सर्वत्र आढळते. विमानघरे लोखंडी सांगाडे व कैच्यांची बनविता येतात. न्यूयॉर्क येथील विमानघराची ४० मी. ची कैची मध्यवर्ती ३०·२ मी. सांगाड्यावर तारेच्या दोरांनी पेलून धरली आहे, तर टेक्ससमधील विमानघराच्या ३६·६ मी. कैच्या पाठीमागील खांबावर पेलून धरल्या आहेत. विमानासारखा किंमती माल ठेवण्याकरिता मोठ्या खर्चाने बांधावयाचे विमानघर आगीपासून सुरक्षित असावे म्हणून लोखंडी विमानघरापेक्षा प्रबलित सिमेंट-काँक्रीटचे विमानघर बांधणे श्रेयस्कर असते. लोखंडी विमानघराचे सामान गंजू नये म्हणून त्यास रंगरंगोटी करावी लागते. तितका खर्च सिमेंटच्या विमानघरास लागत नाही. याचा विचार करून मितखर्ची ठरेल त्याप्रकारची विमानघरे बांधतात. ब्रुसेल्स येथे प्रबलित सिमेंट-काँक्रीटची विमानघरे बांधल्यानंतर नवीन अतिरिक्त विमानघर लोखंडी बांधले. त्यात दरवाजाच्या ७६·५ मी. गाळ्यावरील लोखंडी बहाल तारेच्या दोरांनी प्रतिबलित केले आहे. शिकागो येथील प्रचंड विमानघर एका कवची छप्पराने आच्छादले आहे. १९५९ मध्ये मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळावर पूर्वप्रतिबलित सिमेंट-काँक्रीटचे विमानघर बांधून पुरे झाले. ते दरवाजापासून आत ४५·८ मी. खोल असून ११ मी. लांबीत दोन बोईंग विमाने सामावू शकतात. या विमानघरास ४८·८ मी. गाळा असलेले दोन दरवाजे आहेत. उभारणीच्या दृष्टीने ही दोन स्वतंत्र विमानघरे आहेत. प्रत्येक विमानघरावर ४५·८ मी. लांब व ८·९ मी. गाळा व ६·३५ सेंमी. जाडी असलेल्या पाच कवचांचे छप्पर आहे.

(आ) आ.७. विमानघराचे दरवाजे : (अ) घडीच्या झडपा, (आ) सरकत्या झडपा.

विमानघराच्या दरवाजांच्या झडपा घडीच्या किंवा सरकत्या असतात व त्यांची उघड झाप यंत्राच्या साहाय्याने केली जाते. घडीच्या पद्धतीत २ ते ३ मी. रुंदीच्या पट्ट्या एकमेकीस बिजागरींनी जोडून झडप बनवितात. या पट्ट्यांच्या घड्या होत होत त्या बाजूला सरकविता येतात (आ. ७). सरकत्या पद्धतीत एकूण झडप ९ ते १२ मी. रुंदीच्या झडपांत

विभागून प्रत्येक विभाग सरकवून बाजूला करतात. सांताक्रूझ येथील विमानघराच्या प्रत्येक दरवाजाला १५·३५ मी. उंचीच्या व ९·९ मी. रुंदीच्या पाच सरकत्या झडपा असून, त्या एका मुद्दाम त्याकरिता बनविलेल्या खोबणीत सरकून बसतात. लोखंडी सांगाड्यावर नळीचे पत्रे बसवून झडपा तयार केलेल्या आहेत.

धावपट्टी : हा विमानतळाचा एक महत्त्वाचा भाग असून तिची रुंदी साधारणपणे ४५ मी. व लांबी एक किमी. पर्यंत असू शकते. धावपट्टीची मजबूती त्यावर उतरणाऱ्या विमानाच्या वजनावर व वेगावर अवलंबून असते. [→ विमानतळ].

वखारी व गोदामे : आयात कर व अबकारी कर यांची आकारणी व भरणा होण्यापूर्वी माल साठवून ठेवण्याकरिता जी घरे व इमारती बांधतात त्याला वखार म्हणण्याचा प्रघात आहे. याखेरीज अन्य सर्व प्रकारचा माल साठविण्याकरिता बांधलेल्या इमारती गोदाम या सदरात मोडतात. वखारीत साठवावयाचा माल बहुधा व्यवस्थित वेष्टनाने (उदा., पोती, खोकी) बंदिस्त केलेला असतो. त्याची साठवण फार काळ करून ठेवावी लागत नाही. गोदामात साठवण करावयाचा माल सुटाही असण्याचा संभव असतो व तो बराच काळ साठून राहण्याची शक्यता असते. या शक्यता विचारात घेऊन गोदामाच्या व वखारीच्या बांधणीत फार थोडा फरक करतात, अन्यथा दोहोंच्या बांधणीत फरक नाही.

सुटे धान्य साठविण्याकरिता बांबूचा तट्ट्या सारवून तो जमिनीवर गोलाकार उभा करून त्या कणगीत घरोघर धान्य साठविले जात असे. बिहारसारख्या एकेकाळच्या दुष्काळी प्रदेशात धान्य साठवून ठेवण्याकरिता पाटणा येथे १७८६ मध्ये गोलघर नावाचे एक कोठार बांधण्यात आले. याचे बांधकाम जोत्यापासून घुमटाच्या आकाराचे असून गोलाई सु. ४० मी. व्यासाची व उंची सु. ३४ मी. आहे. त्यास बाहेरील बाजूवर दोन जिने आहेत व वरून धान्य आत ओतण्याची पूर्वी सोय असावी. याच धर्तीवर धान्य, सिमेंट किंवा रसायने साठविण्याकरिता प्रबलित सिमेंट-काँक्रीटचे दंडगोलाकार उभट पेव हल्ली बांधतात.

गोदामात खांब, पायऱ्या वगैरे अडथळे नसलेली मोकळी जागा जितकी मिळेल तेवढे सोईचे असते. फार मोठ्या क्षेत्रफळाच्या गोदामात खांब देऊन छप्पराची अगर वरच्या मजल्यांची बांधणी करणे कमी खर्चाचे असते. ८ ते १२ मी. अंतरावर आधारखांब ठेवून सोय व मितखर्च यांचा समन्वय घातला येतो. यांत्रिक साधनांच्या साहाय्याशिवाय माल रचावयाचा असेल तर ४ मी. पेक्षा जास्त उंचीपर्यंत माल साठवीत नाहीत. यांत्रिक साधने असली, तर उंची याच्या दुप्पट ठेवतात. नेहमीच्या पद्धतीच्या त्रिकोणी कैच्यांवर छप्पर आधारल्यास कैचीच्या ताणपट्टीच्या वरील भागातील जागा माल साठविण्यास निरुपयोगी असते म्हणून गोलाकार छप्पर करतात व ते मितखर्ची असते. गोल छप्पराचा भार सहन करण्याइतक्या मजबुतीच्या बाजूच्या भिंती बांधतात. मोठ्या गोदामात भिंती बहुधा २ ते ३ मी. उंच घेतात. सिमेंट-काँक्रीटचे कवची प्रकारचे छप्पर गोदामांना अतिशय सोईस्कर असते व कायम स्वरूपाच्या गोदामावर ते घालतात. नानगल येथील खताच्या कारखान्यात खते साठविण्याकरिता ३१२ मी. लांबीचे गोदाम बांधले आहे. त्याचे छप्पर जमिनीपासून अन्वस्तीय आकाराचे [→ अन्वस्त] असून जमिनीजवळ ३३ मी. गाळा व मध्यावर २० मी. उंची आहे. त्या आकारांच्या पूर्वरचित तुळया उभारून त्या प्रतिबलित काँक्रीटने एकमेकांशी जोडून गोदाम बनविले आहे.

आ. ८. सिडनी येथील गोलाकार गगनचुंबी इमारतीचा आराखडा

गोदामाच्या जमिनीवर अवजड माल पडतो. त्याकरिता दगडी फरशीची जमीन करतात. त्याखाली डबराची माचण, काँक्रीट वगैरे घालून फरशीचा आधार भक्कम करावा लागतो. उंदीर-घुशींचा उपद्रव होऊ नये व ओल येऊ नये म्हणून अशा भरणीचा उपयोग होतो. गोदामाच्या जोत्याच्या बाहेर चौफेर एक मी. रुंदीची जागा फरसबंद करतात. या इमारती सहसा एक मजल्याच्या असतात.

गगनचुंबी इमारती : किंमती जागेचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने जास्त मजल्याच्या गगनचुंबी इमारती बांधणे हा एक पर्याय आहे.अमेरिकेत अशा इमारती बर्‍याच असून न्यूयॉर्क शहरातील एम्पायर स्टेट बिल्डिंग ही १०२ मजल्यांची ३८१ मी. उंचीची इमारत १९७२ पर्यंत जगात सर्वांत उंच होती. परंतु त्याच शहरात वर्ल्ड ट्रेड सेंटर ही ११० मजली ४११ मी. उंचीची इमारत १९७३ मध्ये पुरी झाली. तर त्यावरही मात करील अशा ११० मजल्यांच्या ४४१·५ मी. उंचीच्या इमारतीचा पोलादी सांगाडा, प्रत्येक आठवड्याला दोन मजले या वेगाने शिकागोमध्ये उभारला जात असून १९७४ मध्ये ती इमारत सर्व तर्‍हेने पूर्ण करण्यात येणार आहे. भारतातील गगनचुंबी इमारती म्हणजे मुंबईतील कार्मायकेल रस्त्यावरील २३ मजल्यांची उषाकिरण इमारत, महालक्ष्मीजवळील २१ मजल्यांची मीनाक्षी इमारत व कफ-परेड भागात ओबेरॉय शेरॅटन हॉटेलसाठी बांधण्यात आलेली ३५ मजली, १२४ मी. उंचीची इमारत वगैरे. या सर्व अमेरिकेतील गगनचुंबी इमारतींच्या मानाने अर्थातच खुज्या ठरतात.

आ. ९. शिकागो येथील गगनचुंबी इमारतीची रचना.

पोलादी खांब व तुळ्या यांचा सांगाडा बनवून बहुधा अशा इमारती बांधतात. फासळ्या, तीर, दाटण्या इ. बसवून सांगाडा मजबूत करतात. प्रत्येक मजल्यावर येणारे वजन, भिंती, तक्तपोशी यांचे वजन, वार्‍याचा दाब हे लक्षात घेऊन सांगाड्याच्या निरनिराळ्या अवयवांचे आकारमान, रचना व जोडणी ठरवितात. आगीपासून बचाव व्हावा म्हणून सर्व पोलादी बांधकामात अगर सिमेंटमध्ये लपेटतात. पोलादी सांगाड्याच्या इमारतीची उभारणी करण्याची एक नवीन पद्धत वापरण्यात येत आहे. या पद्धतीत प्रत्येक मजल्याची प्रबलित सिमेंट-काँक्रीटची लादी सांगाड्याच्या उभ्या खांबात प्रथम ओवून जमिनीवर तयार करतात. साध्या फरशा एकावर एक रचून जशी रास होते तशी रास या लाद्यांची तयार होते. नंतर प्रत्येक लादी द्रवीय स्तंभोद्धारकांनी उचलून त्या त्या मजल्याच्या उंचीवर नेऊन सांगाड्यात पक्क्या करतात. भिंतींचे व खिडक्यांचे काम मागाहून होते. ऑस्ट्रेलियात सिडनी येथे सु. १८० मी. उंचीची ५० मजली इमारत १९६८ मध्ये पुरी झाली (आ. ८). ती गोलाकार असून तिचा बाहेरील व्यास ४१ मी. आहे. मधल्या १०·५ मी. व्यासाच्या गाभ्यात मध्ये जिना व त्याच्या सभोवार १९ लिफ्ट, नळ इ. बसविले आहेत. एवढ्याच आकारमानाच्या चौकोनी आकाराच्या इमारतीवर जेवढ्या वार्‍याच्या प्रेरणा येतील त्यापेक्षा ६० टक्के कमी प्रेरणा गोलाकार इमारतीवर येतात. चौकोनी इमारतीत सुद्धा खालच्या मजल्यापेक्षा वरचे मजले कमी रुंद ठेवून निमुळती होणारी इमारत असेल तरीही वार्‍याचा दाब कमी येतो. गोल आकारामुळे वापरण्याच्या जागेला खिडक्या ठेवण्यास मुबलक जागा मिळते व आतील बाजूच्या लहान परिघामुळे ये-जा करण्याची जागा आटोपशीर राहते. सर्व इमारत सिमेंट-काँक्रीटची असून गाभ्यात लिफ्ट, नळ वगैरे बसविता यावे म्हणून पोलादी तुळया वापरल्या आहेत. मुद्दाम तयार केलेले, वजनाने हलक्या खडीचे काँक्रीट इतक्या उंच इमारतीत येथे प्रथमच वापरण्यात आले आहे व त्यामुळे बांधणीच्या दृष्टीने अनेक फायदे झाले आहेत.

शिकागो येथे बांधण्यात येत असलेल्या इमारतीकरिता पाया ३०-३१ मी. खोल घेतला आहे. त्या इमारतीच्या पोलादी चौकटीची रचना अभिनव पद्धतीची आहे (आ. ९). प्रत्येक ओळीत तीन अशा तीन ओळीत सु. २३ मी. × २३ मी. अशा नऊ चौकटी एकमेकांशी निगडीत करून उभारल्या जात आहेत. ५० मजले असे उभारल्यानंतर समोरासमोरच्या कोपर्‍यातील दोन चौकटींखेरीज इतर सातच चौकटी ६६ मजल्यापर्यंत गेल्यावर दुसरीकडील दोन कोपर्‍यांतील चौकटींची बांधणी थांबेल व त्यावरील २४ मजले चौफुली आकाराचे राहतील व फक्त दोनच चौकटी थेट वरपर्यंत न्यावयाच्या आहेत. अशा तर्‍हेने वरच्या मजल्यांची बांधणी टप्प्याटप्प्याने आत सरकविल्यामुळे वार्‍याच्या मार्‍याने इमारत डोलणार नाही. तरीही पण माथा ७५ सेंमी. पर्यंत डुलला तरी इमारतीस भय नाही असा त्या इमारतीच्या शिल्पज्ञांचा अंदाज आहे. या इमारतीच्या प्रतिकृतीवर वातविवरामध्ये (हवेचा कृत्रिम झोत निर्माण करण्याची सोय असलेल्या खोलीमध्ये) सर्व प्रकारच्या कठोर चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत [→ गगनचुंबी इमारती ].

कारखान्यांच्या इमारती : कारखान्यांच्या उत्पादनक्षमतेकरिता व उत्पादनातील क्रिया एकापुढे एक सुरळीत चालण्याकरिता कार्यक्षम यंत्रसामग्री व तिची व्यवस्थित मांडणी जितकी अवश्य आहे तितकीच आवश्यकता इमारतीच्या मांडणीत आहे. कारखान्याच्या इमारतींचे रचनेच्या दृष्टीने (१) व्यवस्थापन विभाग, (२) उत्पादन विभाग व (३) कामगारांच्या सुखसोईच्या जागा असे विभाग पडतात. व्यवस्थापन विभाग आवश्यकतेप्रमाणे एकापेक्षा जास्त मजली बांधतात. तळमजल्याचा वाहने उभी करण्याकरिता उपयोग होतो. वरच्या मजल्यावर कारखान्याच्या कचेर्‍या, संचालक मंडळाच्या बैठकीची खोली, सभागृह, फराळाच्या व शौचमुखमार्जनाच्या जागा, टपाल कचेरी इत्यादींची सोय करतात. ही इमारत बहुधा कारखान्याच्या तोंडाशी बांधतात, म्हणजे कामानिमित्त तेथे अनिर्बंधपणे येता-जाता येते. लहान कारखान्यात उत्पादन विभागाच्या तोंडाशी अगर पोटमाळ्यावर व्यवस्थापन विभाग ठेवतात. कारखान्याच्या इतर भागांत नियंत्रित प्रवेश ठेवावा लागतो म्हणून उत्पादन इमारतीच्या प्रवेशद्वाराशी एक मजली इमारत पहारा, नोंदणी, तपासणी या कामांकरिता बांधतात. उत्पादनाच्या इमारतीत संस्करण इमारत, शक्ती उत्पादन साहित्याची इमारत, रासायनिक उत्पादन इमारत, पाणी पुरवठा विभाग, कच्च्या व उत्पादनपूरक मालाचे गोदाम, तयार मालाची वखार, जकात आकारणीच्या जागा इत्यादींचा समावेश होतो. संस्करण क्रियेकरिता माल उंचावरून खाली सोडणे अवश्य वा विशेष सोईचे असेल तरच एकापेक्षा जास्त मजले बांधतात. अन्यथा एक मजली विस्तीर्ण इमारतीत यंत्रांची उभारणी व संस्करण क्रियेची एकापुढे एक क्रमश: मांडणी करणे सुलभ, सोईस्कर व मितखर्ची होते. कारखान्यातील मालाची हलवाहलव, मार्गाचा क्रम, यंत्राचे आकारमान व त्याच्याभोवती सोडावयाची जागा, ओघवती संस्करण क्रिया कशी असावी इत्यादींची माहिती व तरतूद व्यवस्थित होण्याकरिता यंत्रसामग्रीचा पुरवठा करणार्‍यांचा सल्ला इमारत बांधताना घेणे अवश्य असते. स्वयंचलित नियंत्रण असलेल्या यंत्रसामग्रीचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे व कारखान्यात वावरणाऱ्या माणसांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे आता कारखान्यांची उभारणी करताना कामगारांच्या अडीअडचणींपेक्षा यंत्रसामग्रीची कार्यक्षम उभारणी महत्त्वाची ठरत आहे. उत्पादन विभागाच्या एका टोकाला कच्च्या मालाच्या पुरवठ्यापासून आरंभ होऊन संस्करण व निर्मिती विभागानंतर दुसऱ्या टोकाला तयार झालेला माल बाहेर पडावा असा क्रम ठेवतात. उत्पादन विभागात दिनप्रकाश उत्तरेकडून घ्यावा असा निर्बंध असे, पण विजेच्या प्रकाशाच्या विविध साधनांच्या प्रसारानंतर व कारखाने अहोरात्र चालविता यावेत म्हणून तो निर्बंध आता राहिलेला नाही. तयार माल तपासण्यास, मोजण्यास व व्यवस्थित बांधणी करण्यास अवश्य तेवढी प्रशस्त जागा, माल साठविण्याचे भांडार, जकात अधिकारी कचेरी वगैरे उत्पादन विभागाच्या शेवटच्या टोकास ठेवतात. माल वाहनात सुलभतेने चढविता उतरविता येईल अशा सोयी कराव्या लागतात. शक्ती उत्पादन साहित्याच्या इमारतीत वीजनिर्मिती, वाफेचा पुरवठा, रसायनांची निर्मिती व पुरवठा, वातानुकूलनाच्या सामग्रीची जागा, पाणी शुद्धीकरणाची व कारखान्यातील अपशिष्टाचे संस्करण व विल्हेवाट यांचा समावेश होतो. कारखान्याच्या प्रकाराप्रमाणे यांपैकी एक अगर अधिक गोष्टींची उभारणी करावी लागते. कारखान्यात अवश्य त्या ठिकाणी त्याचा पुरवठा करता येईल इतक्या नजीक पण कमीत कमी उपद्रव होईल अशा जागा नियोजित कराव्या लागतात. सुरक्षिततेकरिता इमारतीच्या आकारावर व प्रकारावर शासनाने मर्यादा घातलेल्या असतात त्या लक्षात घ्याव्या लागतात. कामगारांच्या सुखसोईच्या जागांची उभारणी राहण्याच्या घरासारखीच असते. त्यात भोजनगृह, स्‍नानगृहे, संडास, मुतार्‍या, मोर्‍या, कपडे ठेवण्याचे कप्पे वगैरे सोई करतात. स्त्री कामगांराकरिता स्वतंत्र सोयी व शिशुगृहे असतात.

आ. १०. फ्रान्समधील र्वायाँ येथील बाजाराचे कवची छप्पर

घरबांधणीत सिमेंटचे कार्य : हल्ली शहरातून बांधकामाकरिता संयोजक म्हणून माती वापरण्यास क्वचितच परवानगी मिळते. मजूरवर्ग चुन्याचे काम करण्याचे टाळतो. सिमेंटचा संयोजक पाहिजे त्या दर्जाचा तात्काल तयार करून वापरता येतो. कमी खर्चाच्या घराच्या बाबतीत सिमेंट-काँक्रीट असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने संशोधन करून या बाबतीत विस्तृत माहिती प्रसिद्ध केली आहे. भिंती बांधण्याकरिता त्या रुंदीच्या पोकळ विटा पाडून त्या वापरल्यास रूढ पद्धतीपेक्षा १५ टक्के कमी खर्च येतो. बांधकामास संयोजक कमी लागतो व विटा कोरबंद असल्याकारणाने गिलाव्याचा खर्च कमी येतो. दारांच्या व खिडक्यांच्या चौकटी प्रबलित काँक्रीटच्या करता येतात. लाकडी चौकटीपेक्षा या चौकटीस खर्च कमी पडतो. दरवाजे खिडक्यांच्या चौकटीचे निरनिराळे भाग, त्यावरील छावण्या, कपाटातील फळ्या भिंतीवरील तुळया, पटईकरिता लाद्या इ. पूर्वनिर्मित काँक्रीटच्या बनवून जागेवर बसविल्यास त्या कामाच्या खर्चात बरीच कपात होते. कारखान्यात इमारतीचे निरनिराळे भाग मोठ्या प्रमाणात तयार करून जागेवर आणून जोडल्यास काम आणखी कमी खर्चात होते. लांबरुंद प्रशस्त गाळ्यावर मध्ये आधार दिल्याशिवाय आच्छादन घालणे प्रतिबलित काँक्रीटमुळे शक्य झाले आहे. फ्रान्समध्ये र्वायाँ (Royan) येथे १९५८ च्या सुमारास बांधलेल्या बाजारावर ८ सेंमी. जाडीचे उघडलेल्या छत्रीच्या आकाराचे प्रचंड कवची छप्पर घातले आहे (आ. १०). त्याचा व्यास ५२·४ मी. असून मधली उंची १०·५ मी. आहे. छप्परास मध्ये कोठेही आधार नाही. परीघ जमिनीवर सर्वत्र टेकलेला नसून उंचसखल असा नागमोडी आहे. सखल भाग जमिनीवर टेकलेले आहेत व तेथे त्यांची जाडी ७० सेंमी. आहे व तेरा आधारांवर हे प्रचंड छप्पर पेललेले आहे. परिघाच्या उंचावलेल्या भागाची मध्यावर उंची ६ मी. असून आत जाण्याचे तेरा मार्ग १२·५ मी. रुंदीचे आहेत.

इमारतीची अंगे उपांगे : सांगाड्याची घरे : इमारतीच्या मजल्याचे, छप्पराचे वगैरे सर्व भागांचे वजन भिंतीवर तोलून धरतात किंवा लोखंडी, लाकडी वा प्रबलित काँक्रीटच्या सांगाड्यावर पेलतात. सांगाडे स्वतंत्रपणे उभे करता येतात व ते स्थिर किंवा अचल राहू शकतात. भिंतीवर पेललेल्या बांधकामाला सबंध भिंत बांधून झाल्याशिवाय स्थैर्य येत नाही. लोखंडी सांगाड्याचे काम मोठमोठाल्या कारखान्यांकरिता कमी खर्चाचे व सोईचे होते. लोखंडी कैच्या २४·५० मी. पर्यंतच्या गाळ्याच्या करता येतात त्यामुळे भारी कारखान्याला लागणारी बरीच रुंद जागा मिळते. प्रबलित व प्रतिबलित काँक्रीट वापरात आल्यापासून जास्त मोठे गाळे ठेवता येतात.

जमिनी : तळमजल्याची व वरच्या मजल्याची जमीन करण्यात थोडा फार फरक असतो. तळमजल्याची जमीन जोत्यात थराथराने ०·१५ मी. जाडीची मुरुमाची भर करून त्यावर पाणी टाकून धुमसतात व शेणखळा टाकून चोपतात. कोणी सिंमेटचा शिडकावा देऊन मग चोपतात व वर शेणाने सारवून मुरुमाच्या जमिनी वापरतात. अगर जोत्याच्या उंचीखाली ०·१५ मी. जागा खोल ठेवून त्यावर ०·१० मी. जाडीचे चुन्याचे काँक्रीट करून त्यावर शहाबादी फरशा अगर सिंमेटच्या फरशा बसवितात. उंदीर-घुशींचा घरात उपद्रव होऊ नये किंवा ओल प्रतिबंधक म्हणून काही वेळा अगोदर डबराची ०·२५ मी. जाडीची माचण करून त्यावर चुन्याचे काँक्रीट व फरशा बसवितात. संडास व आंघोळीच्या खोलीत चिनी मातीच्या गुळगुळीत फरशा जोडतात. सिमेंटची फरशी जोडल्यानंतर त्यावर सिमेंटच्या पाण्याचा राळा ओतून तो एक दिवस ठेवतात व दुसरे दिवशी फरशी साफ करून यंत्राने गुळगुळीत करतात. तळमजला असो अगर वरचा मजला असो, फरशा जोडण्याची पद्धत एकच असते. फरशीऐवजी भाजलेल्या पक्क्या विटा कोडी अंथरून मधील दरजा भरून जमिनी करतात. हा प्रकार पंजाबात कमी महत्त्वाच्या जमिनींकरिता बराच प्रचारात आहे.

अस्फाल्टची जमीन : जमिनीवरचा धुरळा साफसुफ करून, अस्फाल्ट एक भाग, बिट्युमेन १·२३ भाग व दाणेदार वाळू अर्धा भाग यांच्या मिश्रणाचा ०·१५ मी. जाडीचा थर देऊन तो रंध्याने घोटून जमीन तयार करतात.

चुन्याची जमीन : चुना व विटकर यांचे अवश्य त्या जाडीचे काँक्रीट करून त्यावर ०·१५ मी. जाडीचा चुन्याचा अथवा सिमेंटचा गिलावा रंध्याने घोटून तयार करतात. चुन्याच्या काँक्रीटवर ४ सें.मी. जाडीचा वाळूमिश्रित सिमेंटचा थर देऊन त्यावर गिलावा करून जमिनी करतात. याला इंडियन पेटंट स्टोन हे नाव आहे.

लाकडी फळ्यांची जमीन : ही जमीन तळमजल्यावर करण्याची असल्यास जोत्यातील मुरुमाच्या भरीवर ८ सेंमी. जाडीचे चुन्याचे काँक्रीट करून त्यात ०·६० मी. अंतरावर लांबी-रुंदीत ओळीने ठोकळे बसवितात. नंतर त्यावर १० सेंमी. × १० सेंमी. आकाराच्या कड्या बसवून त्यावर ४ सेंमी. जाडीच्या फळ्या स्क्रूने पिळतात व मग अवश्य तर त्यांना पॉलीश करतात. अशाच प्रकारची जमीन वरच्या मजल्यावर असल्यास तुळयांवर कड्या ठोकतात.

कडीपाटाची मांडणी : वरच्या मजल्याच्या जमिनीकरिता तुळईवर ८ सेंमी. ते १० सेंमी. च्या कड्या ठोकून त्यावर रिपाड अगर फळ्या ठोकून मुरमाची जमीन सारवून करतात किंवा अवश्य तर त्यावर फरशी जोडतात.

लोखंडी कड्या व फरशा बसवून वरच्या मजल्यांच्या जमिनी करण्याची पद्धत पूर्वी होती. त्यात ०·३० मी. अंतरावर १० सेंमी × ५ सेंमी. मापाच्या इंग्रजी आय (I) आकाराच्या लोखंडी कड्या भिंतीवर अगर लोखंडी तुळईवर बसवून त्याच्या पोटात फरशी सरकवून फरशीवर भरणी करून त्यावर फरशी जोडतात किंवा पोटातील फरशी ऐवजी १·५० ते २·० मी. अंतरावर लोखंडी कड्या बसवून त्याच्या पोटात दोन कड्यांवर आधारून विटांची कमान मारतात व त्यावर मुरुमाची जमीन करतात अगर फरशा बसवितात. चुन्याच्या काँक्रीटच्याही कमानी मारतात व त्यावेळी लोखंडी कड्यांमधील अंतर ०·६० मी. पेक्षा जास्त ठेवीत नाहीत. वरच्या मजल्याच्या जमिनीकरिता प्रबलित काँक्रीटच्या एकसंध लादीवर फरशी बसविण्याची पद्धत हल्ली सरसहा प्रचारात आहे.

आ. ११ (अ), (आ). आधुनिक आतपनिवारकांचे प्रकार

छत : कौलारू अगर पत्र्याच्या छप्पराखाली उष्णता प्रतिबंधक म्हणून व शोभा म्हणून लाकडी फळ्यांचे, ॲस्बेस्टसच्या तक्त्यांचे अगर हार्डबोर्डचे छत जरूर ते लाकूडकाम करून करतात. कडीपाटाच्या जमिनीच्या खालच्या बाजूस लाकडी फळ्या बसवून सपाट छत करतात. पूर्वी मोठमोठ्या दिवाणखान्यास शोभेखातर कापडी छत ठोकण्याची प्रथा होती. काँक्रीटच्या जमिनीस खालच्या अंगावर कपलात करून शोभिवंत छत तयार होते.

आतपनिवारक : दुपारचे कडक ऊन आत शिरल्यामुळे किंवा उन्हाने बाहेरील अंगाच्या भिंती तापल्यामुळे अथवा बाहेरील प्रखर उन्हाच्या दीप्तीमुळे इमारतीत वावरणार्‍यांना त्रास होतो. हा त्रास कमी करण्याच्या विविध योजना म्हणजे आतपनिवारक रचना होय. उन्हापासून संरक्षण मिळून अवश्य त्यावेळी गरजेप्रमाणे खेळती हवा व उजेड उपलब्ध व्हावेत हे गुण आतपनिवारकात प्रामुख्याने असावे लागतात.

आ.११ (इ), (ई). आधुनिक आतपनिवारकांचे प्रकार

इमारत बांधताना तिचे योग्य दिशासाधन करण्याने थोड्याफार प्रमाणात आतपनिवारण होते. घरास ठेवलेले तळघर हेही आतपनिवारक असते. फार प्राचीन कालापासून घरांना सोपे व पडव्या ठेवण्याची पद्धत आहे. ते एका अर्थाने आतपनिवारकच होत. यामुळे दुपारच्या वेळी उन्हाचे निवारण होऊन इतर वेळी मोकळी हवा व उजेड मिळेल अशी वापरण्याजोगी जागा उपलब्ध होते. इमारतीस फार मोठ्या खिडक्या ठेवण्यापेक्षा लहान लहान खिडक्या आतपनिवारक ठरतात. दरवाजे खिडक्यांवर बाहेरील बाजूस सायवान अगर मंडपी उभारणे किंवा भिंतीच्या बाहेरील सर्व लांबीभर बराच झुकता पागोळा किंवा सज्‍जा ठेवणे हेही आतपनिवारक होत. खिडकीच्या झडपा खडखडीच्या ठेवणे किंवा माथ्याकडे बिजागरी असलेल्या झडपा बसविणे हेही काही अंशी आतपनिवारण करू शकतात. भिंतीच्या बाहेर अर्धा ते एक मीटर पुढे आलेल्या आडव्या-उभ्या पडद्या किंवा उभ्या पण कलत्या पडद्या अंतराअंतरावर उभारून दुपारचे ऊन त्यामागील भिंतीवर पडू न देणारे आधुनिक पद्धतीचे आतपनिवारक आहेत (आ. ११ अ आणि आ) किंवा बाहेरील भिंतीबाहेर सु. एक मीटर अंतरावर भिंतीशी समांतर जाळीदार आडोसे व छत उभारून बनविलेले आतपनिवारक काही जुन्या इमारतीत व चंडीगडमधील इमारतींना वापरलेले आढळतात (आ. ११ इ आणि ई ). भिंतीबाहेर काही अंतरावर उभ्या किंवा आडव्या लाकडी किंवा ॲस्बेस्टस सिमेंटच्या खडखड्या उभारून सूर्याच्या व वार्‍याच्या दिशेप्रमाणे त्या पाहिजे तितक्या कलत्या ठेवता येतील असे आतपनिवारक बनवितात.

कमानी : कमानींची योजना खिडक्या, दरवाजे, कपाटे अगर भिंतीत एखादी मोकळी जागा असल्यास त्या ठिकाणी छावणीऐवजी असते. पटईकरिता लोखंडी कड्यांच्या पोटांत, कमानी मारून त्यावर जमीन करतात.

छप्पर : छप्पर ढाळते अगर सपाट असते. ढाळते छप्पर एकांगी, दुपाखी अगर चौमोळी असते. इमारतीच्या ज्या भागावर हे करावयाचे असते त्याची लांबीरुंदी फार नसेल, तर आढे, तीर, पाखाड्या वगैरे लाकूडकाम करून कथिललेपित लोखंडी पत्र्याचे अगर ॲस्बेस्टसच्या पन्हळी पत्र्याचे छप्पर करतात. कौलाचे असल्यास पाखाड्यावर चौरस अगर गोल वासे ठोकून त्यावर रिफा मारून त्यावर मंगलोरी अगर साधी कौले बसवून छप्पर तयार करतात. छप्पराची झेप ५ मी. पेक्षा जास्त असेल तेथे लाकडी (आ. १२ अ आणि आ) अथवा लोखंडी  (आ. १२ इ आणि ई) कैच्या वापरतात. ७·५ मी. पर्यंतच्या झेपेला लाकडी एकखांबी व त्यापेक्षा झेप मोठी असेल, तर दुखांबी कैची वापरतात. लोखंडी कैची पुष्कळ लांबीच्या झेपेकरिता अभिकल्पित करता येते व तिचे आकार विविध प्रकारचे असू शकतात. चौमोळी छप्परात कोनवासे लागतात. दोन पाखी एकमेकांना जेथे कोनात मिळतात तेथे कोनवासा अथवा कुंद येतो. कुंदवाशास ठेपणाऱ्या दोन्ही बाजूंच्या वाशांवर प्रत्येक बाजूस अर्धा मीटरपर्यंत फळ्या ठोकून त्या आधारावर साधा कथिललेपित पत्रा मारून कुंदी गटार बनवितात. कोन वाशावर व आढ्यावर ढापे चुन्यात बसवितात.

पर्जन्यमान व आच्छादनाच्या साहित्याप्रमाणे छप्पराचा ढाळ कमीजास्त ठेवतात. बर्फ पडणाऱ्या प्रदेशात ढाळ पुष्कळ ठेवतात म्हणजे छपरावर बर्फ साठून रहात नाही व छप्पराला त्याचा भार सहन करावा लागत नाही. छप्पराची झेप मोठी असेल किंवा छप्पराचा ढाळ पुष्कळ असेल तेव्हा पोटमाळ्यात वापरण्यायोग्य दालन मिळू शकते.

आ. १२. विविध प्रकारच्या कैच्या

धाब्याच्या प्रकारच्या छप्पराकरिता तुळयांवर कड्या ठोकून त्यांवर लाकडी फळ्या ठोकतात, अगर बांबूच्या कामट्या ठोकतात. त्यावर डांबर दिलेली चटई आंथरून, जरूर तो ढाळ देऊन त्यावर मातीच्या वा विटांच्या जमिनी करतात. अशा तर्‍हेची धाब्याची घरे नगर, सोलापूर, विजापूर वगैरे कमी पावसाच्या प्रदेशात आढळतात. याचा सुधारलेला व जास्त पावसाच्या प्रदेशातही चालणारा प्रकार म्हणजे प्रबलित काँक्रीटच्या लादीचे काम. ज्या जागेवर हे काम करावयाचे आहे, त्या जागेवर लाकडी फळ्यांचे अगर लोखंडी तक्त्यांचे उपधारक वाशावर आधारून त्यावर पोलादी शिगांचे जाळे आंथरून त्यावर सिमेंट-काँक्रीट पसरतात. सिमेंट आळल्यावर उपधारक काढतात. काँक्रीटची लादी गळू नये म्हणून काँक्रीटच्या मिश्रणात जलरोधक पदार्थ मिसळतात किंवा लादीला ढाळ देणे, तिच्यावर कवडी फरशी घालणे, डांबरी तक्ते पसरणे, विटकराचे सिमेंट-काँक्रीट घालणे यांपैकी एखादा उपाय करतात.

इमारतींच्या बांधकामाचे उपनियम : १९६५ सालच्या नवीन नगररचनेच्या कायद्याप्रमाणे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने बांधकामासंबंधीचे आपले उपनियम करून त्यास सरकारी मंजुरी मिळवावयाची असते. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने इमारतीच्या निरनिराळ्या कामांबद्दल जे उपनियम सरकारने अगर स्थानिक स्वराज्य संस्थांनी दीर्घ अनुभवाने तयार केले आहेत, त्यांत फारसा बदल झालेला नाही.

कोणतीही इमारत बांधताना, दुरुस्त करताना अगर त्यात वाढ करताना स्थानिक संस्थेची त्यास अनुज्ञा घ्यावी लागते. त्याकरिता इमारतीचे नकाशे, कागदपत्रे व इतर माहिती कोणती द्यावयास पाहिजे ते उपनियमांत घातलेले असते. अनुज्ञा मिळाल्याशिवाय कामास प्रारंभ करता येत नाही. इमारत भिंतींवर किंवा लाकडी, लोखंडी अथवा प्रबलित काँक्रीटच्या सांगाड्यावर पेललेली असते. भिंतीची जाडी, लांबी व उंची तीवरील भाराप्रमाणे किती असावी किंवा सांगाड्याच्या विविध भागांचा आकार काय असावा, यांची किमान मापे उपनियमांत घातलेली असतात. लाकडी सांगाड्याच्या इमारती दोन किंवा तीन मजल्यांपेक्षा मोठ्या बांधण्यास अनुज्ञा देत नाहीत. प्रबलित काँक्रीटसंबंधीची आकडेमोड सादर करावी लागते. निरनिराळ्या उपयोगांच्या इमारतीवर किती बोजा गृहीत धरावा ते उपनियमांत घातलेले असते. ओल व आग प्रतिबंधक उपाय, धूर व आवाज यांच्या उपद्रवाचे नियमन यांकरिता उपनियमांत तरतूद असते. सार्वजनिक उपयोगाच्या इमारतीच्या बाबतीत जिन्यांचे व दरवाज्यांचे प्रकार व आकार, यांवर नियंत्रण असते.

गावठाणातील इमारतींच्या बाजूला आरोग्यदृष्ट्या किती जागा मोकळी सोडावयाची हे ठरविलेले आहे. घरासमोरच्या रस्त्याच्या रुंदीवर इमारतीची उंची नियमित केली जाते. एकाच मालकाच्या जागेत दोन इमारती असल्या, तर त्यात जी इमारत जास्त उंच होणार असेल तिच्या निम्म्याने खुली जागा सोडावी लागते. राहण्याच्या खोलीच्या रुंदीपैकी एका भिंतीचा निदान पाऊण भाग तरी मोकळ्या जागेकडे असावा लागतो. गावठाणात खोलीची कमीत कमी रुंदी २·७५ मी. असावी लागते, स्वयंपाकघर अगर कोठी २·४५ मी. रुंदीची व २·७५ मी. उंचीची चालते. खिडक्यांचे क्षेत्र खोलीच्या जमिनीच्या १५ टक्क्यांइतके असावे लागते. जाण्यायेण्याचा रस्ता किमान एक मी. रुंदीचा असावा लागतो. जिन्याची रुंदी कमीत कमी ०·९० मी. पाहिजे. जिन्याचा पायसर २० ते ३२ सेंमी. व चढ १५ ते २० सेंमी. ठेवतात. झाप बसवावे लागल्यास भिंतीबाहेर त्याचा झुकाव ०·७५ मी. पेक्षा जास्त ठेवता येत नाही. रस्त्यावर येणारा सज्‍जा असल्यास त्याची रुंदी १·२२ मी. पेक्षा जास्त नसावी व ती रस्त्यापासून ३·६५ मी. पेक्षा कमी उंचीवर नसावी तसेच अशा सज्ज्याच्या बांधकामाकरिता स्थानिक संस्थेची परवानगी लागते.

इमारत गावाशेजारी नगररचना क्षेत्रात असल्यास उपलब्ध जागेच्या तृतीयांश क्षेत्रावरच इमारत बांधता येते. इमारतीभोवती रस्त्याच्या बाजूस ४·५७ मी., मागे ६·१० मी. व बाजूस ३ मी. मोकळी जागा सोडावी लागते. खोल्यांची रुंदी कमीत कमी ३ मी. व लांबी ३·६६ मी. असावी लागते. या जागेत तळमजला व वर दोन मजल्यांपेक्षा जास्त मजले बांधता येत नाहीत. प्रत्येक मजल्यावर फक्त दोन गाळ्यांची परवानगी मिळते.

घराचा आराखडा : हा तयार करताना सामान्य गरजा, हवामान व प्रादेशिक परिस्थितीचा विचार करावा लागतो. घराच्या रचनेकरिता तयार केलेल्या आरेखात प्रत्येक मजल्यावरील प्रत्येक खोलीचा वापर कसा केला जाणार आहे, त्याचे वर्णन व मापे, जाण्या-येण्याच्या वाटा, सज्‍जा, जिना, घरासाठी उपलब्ध जागा व त्यांपैकी घराच्या पुढे-मागे व बाजूस मोकळी जागा किती सोडली आहे या सर्वांची मापे दिलेली असतात. त्याशिवाय इमारतीचा स्थलदर्शक नकाशा, प्रत्येक मजल्याचे अधोदर्शन, उन्नतदर्शने, अनुदैर्घ्य व काटछेद, खिडक्या दरवाज्यांचे सारणीबद्ध (कोष्टकरूप) विवरण व काही सविस्तर आरेख देतात [→ आरेखन, अभियांत्रिकीय]. प्रबलित काँक्रीटचे काम असल्यास पाया, खांब, तुळ्या, जिना व लादी यांत कोणत्या आकारमानाच्या लोखंडी शिगा किती व कशा वापरावयाच्या याची माहितीसुद्धा आरेख व सारणीबद्ध विवरणात देतात.

इमारतीची बांधणी : ही (१) मजबूत व टिकाऊ, (२) आरामशीर व सुखसोईयुक्त तसेच (३) उष्णता, आग, कृमिकीटक यांपासून संरक्षित असावी लागते.

(१) मजबूत बांधकाम : कोणत्याही परिस्थितीत घराच्या प्रत्येक भागावर येणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या प्रेरणा पेलण्याइतके बांधकाम भक्कम असावे लागते. बांधकामावर येणाऱ्या प्रेरणा पुढील प्रकारच्या असतात : (अ) बांधकामात वापरल्या गेलेल्या मालाचे वजन, (आ) सामानसुमान व माणसांची वर्दळ यांमुळे पटईवर येणाऱ्याप्रेरणा, (इ) वार्‍यामुळे येणारा दाब, (ई) थंड प्रदेशात छप्परावर येणारे बर्फाचे वजन. अन्यथाही घराच्या बाजूच्या भिंती सुरक्षिततेसाठी मजबूत असाव्या लागतात.

उत्तम दर्जाच्या मालाचा वापर, कसबी कारागिरांची कामावर नेमणूक, वापरण्यापूर्वी मालावर करावयाच्या संस्कारांची पूर्ती व काम पूर्ण होईतो काळजीपूर्वक कामावर देखरेख यांवर कामाची मजबूती अवलंबून असते. काही दोष उत्पन्न झाल्यास वारंवार दुरुस्ती करणे भाग पडते. नियतकालिक रंगसफेतीने व वेळच्या वेळी केलेल्या किरकोळ दुरुस्तीने घराचे आयुष्य वाढते.

(२) आराम व सुखसोयीची योजना : प्रत्येक खोली स्वतंत्रपणे व निर्वेध वापरता आली पाहिजे, वावरताना कमीत कमी चाल व्हावी. स्वयंपाकघरातील धूर व दर्प निघून जाण्याची उत्तम सोय असावी. घरातील सामान ठेवण्याकरिता पोटमाळे, फळ्या, कपाटे यांची तजवीज असावी. खिडक्यातून उन्हाची तिरीप व पावसाची झड लागू नये म्हणून बाहेरच्या बाजूस झाप असावेत.

(३) उष्णता, आग, कृमिकीटक प्रतिबंधक योजना : घरात उष्णतेचा प्रवेश, भिंती व छप्पर यांमधून होत असतो. तो टाळण्यासाठी भिंती जाड बांधणे आवश्यक असते अगर त्यापुढे पडव्या काढणे अथवा आतपनिवारक रचना करावी. ढाळाचे पत्र्याचे अगर कौलाचे छप्पर असेल, तर त्याखाली तक्तपोशी करावी लागते.

सर्वसाधारणपणे खिडक्या, दरवाजे, छप्पराचे लाकूडकाम व जिने यांस आगीचा धोका असतो. लोखंडी खिडक्या, दरवाजे व सर्व कामे काँक्रीटमध्ये अगर दगडविटात केल्याने धोका कमी होतो.

कृमिकीटकांच्या राहण्याच्या व वाढ होण्याच्या जागा म्हणजे भिंतीला गेलेले तडे व लाकडी पटई ह्या होत. भिंतींचे तडे सिमेंटचा उपयोग करून बुजविता येतात. पटईला तेलाचा रंग देतात. लाकडाचा भिंतींच्या बांधकामात जाणारा भाग तसेच खिडक्या, दरवाजे यांच्या बांधकामाला लागून असलेल्या भागांना बांधकामात हे भाग उभे करण्यापूर्वी त्यांच्यावर डांबराचे अथवा अन्य संरक्षक द्रव्यांचे दोन हात देतात. तसेच दरवाजे व खिडक्यांच्या दर्शनी भागांस तेलाचा रंग देतात. लाकडाच्या दर्शनी भागास वाळवी लागलेली आढळल्यास ती खरडून काढून त्याजागी वेळीच वाळवीनाशक रंग देतात.

इमारत बांधणीचा कार्यक्रम : बांधकामाची सुरुवात करण्यापूर्वी, प्रथम ज्या जागेवर इमारत बांधावयाची आहे, त्या जागेची स्थापत्य अभियंत्याकडून पाहणी केली जाते. जमीन खडकाळ अगर मुरमाड असल्यास पायाचा प्रश्न फारसा उद्‌भवत नाही. अन्यथा पाया मजबुतीकरिता विशेष खबरदारी घ्यावी लागते. इमारतीच्या जागेची व सभोवतालच्या परिस्थितीची पाहणी करून वास्तुशिल्पज्ञ इमारतीचे आरेख व तपशीलपत्रक तयार करून ठेकेदार निवडून अवश्य ते करारनामे तयार करतो. कामाची जागेवर आखणी करताना जोत्यावरील भिंतीच्या अगर सांगाड्याच्या मध्य रेषेच्या पक्क्या खुणा बांधकामाच्या चौफेर मुक्रर करतो. त्यावरून कामाच्या सर्व रेषा मोजून घेतात. आवश्यक तितकी पायाखोदाई झाल्याबद्दल वास्तुशिल्पज्ञाने मान्यता दिल्याशिवाय पाया भरीत नाहीत. पाया व जोत्याचे काम चालू असतानाच दरवाजे, खिडक्या, सांगाड्याचा माल वगैरे तयार करून ठेवतात. जोत्यावरील काम सुरू होण्यापूर्वी जोत्यातील मुरूम भरणी करून घेतात. बांधकाम उभारल्यानंतर नळ जोडाईचे काम करून घेतात. त्यानंतर गिलावा व फरशी झाल्यावर दाराखिडक्यांच्या झडपा व न्हाणी-संडासातील उपकरणे व विजेच्या साहित्याची जोडणी करतात. भिंतींना ताबडतोब चुना देतात. पक्के रंग व लाकूडसामानाचे रंग एका वर्षानंतर द्यावेत, असे काही तज्ञांचे मत आहे.

सर्व कामावर वास्तुशिल्पज्ञाची देखरेख असते व आरेख आणि तपशीलपत्रकाप्रमाणे काम करून घेण्याची त्याची जबाबदारी असते. काही विशिष्ट कामे वास्तुशिल्पज्ञाने पसंत केल्याशिवाय पुढील काम करता येत नाही. एका कामावर एकापेक्षा जास्त ठेकेदार असल्यास एकमेकांच्या कामात व्यत्यय येणार नाही याकडे वास्तुशिल्पज्ञाला विशेष लक्ष द्यावे लागते. झालेल्या कामाचे पैसे ठेकेदारास कराराप्रमाणे देण्याची शिफारस मालकाकडे वास्तुशिल्पज्ञ करतो. काम समाधानकारक झाल्याचा दाखला वास्तुशिल्पज्ञास द्यावा लागतो. कामपूर्तीचा नगरपालिकेकडून दाखला मिळेपर्यंत वास्तूचा वापर करता येत नाही.

पहा : आरेखन, अभियांत्रिकीय; काँक्रीट; गवंडीकाम; गृह; जिने; धुरांडी; पाया; बांधकाम तंत्र; बांधकाम, पोलादाचे; बांधकाम संरचना सिद्धांत व अभिकल्प; बांधकामाची सामग्री; बांधकामाचे दगड; विटा; संयोजक; सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य; स्थापत्य अभियांत्रिकी करार व अंदाजपत्रके.

संदर्भ : 1. Callendar. J. H. Time Saver Standards, New York, 1966.

2. Census of India, 1961, Vol. X; Maharashtra, Part IV, Report on Housing and Establishments.

3. Fry, M.; Drew, J. Tropical Architecture, London, 1964.

4. Govt. of Maharashtra, P.W.D. Handbooks, Vols. 2, 1960.

5. Mckay, W. B. Building Construction, Vol. I. London, 1963.

6. National Buildings Organization and U. N.Regional Housing Centre, Selected Papers from Symposium on Housing Finance, New Delhi, 1965.

7. National Council of Applied Economic Research, Technoeconomic Survey of Maharashtra, New Delhi, 1963.

8. Sane, Y. S. Construction Engineering. Vol. I, Bombay 1966.

९. देशपांडे, र. श्री. सुलभ वास्तुशास्त्र, पुणे, १९६१.

१०. महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, गृहनिर्माण, खंड पहिला, मुंबई, १९६६.

कान्हेरे, वि. प.; ओक, भ. प्र.