ऑरेंज नदी : दक्षिण आफ्रिकेतील पश्चिमवाहिनी नदी. लांबी सु. २,०९२ किमी. लेसोथो (बासूटोलँड) मध्ये ड्रेकन्सबर्गच्या माँटो सूर्स (सु. ३,३०० मी.) शिखराजवळ उगम पावून त्या राज्यातून पुढे दक्षिण आफ्रिका संघराज्याच्या ऑरेंज फ्री स्टेटच्या दक्षिण सरहद्दीवरून आणि केप ऑफ गुड होप प्रांताच्या मध्य व वायव्य भागांतून जाते पुढे दक्षिण आफ्रिका संघराज्य व नैर्ऋत्य आफ्रिका यांच्या सरहद्दीवरून जाऊन अटलांटिक महासागराच्या अलेक्झांडर उपसागरास मिळते. लेसोथोमधून लाव्हा खडकावरून वालुकाश्माच्या भागात आलिवाल नॉर्थपर्यंत येईतो तिचा वेग कमी होतो. वाटेत तिला सुंदर धबधबे आहेत. प्रीस्कापर्यंतच्या वरच्या टप्प्यात तिला कॅलेडॉन व व्हाल या प्रमुख उपनद्या मिळतात. या टप्प्यात ती वालुकाश्म, शेल, डॉलोराइट, चुनखडक इ. प्रकारच्या खडकांवरून वाहते. ओग्राबीस धबधब्यापर्यंतच्या मधल्या टप्प्यात ती आयर्नस्टोन, लाव्हा, क्वार्टझाइट या कठीण खडकांतून वाहते. धबधब्याच्या आधी १३५ किमी. अपिंग्टनपर्यंत ग्रॅनाइटच्या भागातून वाहताना नदीचे अनेक प्रवाह होऊन, त्यांची वेणीगुंफण होऊन, त्यांमधून अनेक लहानमोठी बेटे तयार झाली आहेत. ओग्राबीस धबधबा सु. ४२ मी. खड्या द्रुतवाहावरून व १४६ मी. सरळ खाली पडतो. येथून पुढच्या खालच्या टप्प्यात समुद्रापासून सु. ११३ किमी. रुंदीच्या किनारी मैदानी प्रदेशात येईपर्यंत ऑरेंज नदी सु. ३०० ते ९०० मी. खोल निदरी कोरीत येते. याच भागात तिला मिळणारी फिश ही उपनदीही अशाच खोल निदरीतून वाहात येते. दक्षिण आफ्रिका ते नैर्ऋत्य आफ्रिका रस्त्यावर एक व मुखाजवळच्या भागात किनारी रस्त्यावर एक, असे दोन महत्त्वाचे पूल नदीवर या भागात आहेत. नदीच्या मुखाशी वाळूचा बांध तयार झालेला आहे. नदीतून सागरगामी बोटी जाऊ शकत नाहीत. छोट्या बोटीतून सु. ५०-६० किमी. आत जाता येते. ऑरेंजचे खोरे कोरडे व रुक्ष आहे. ड्रेकन्सबर्गवर १०० सेंमी., व्हेल्डभागात ६० सेंमी., व्हाल संगमाजवळ ३० सेंमी. तर अपिंग्टन येथे फक्त १८ सेंमी. पाऊस पडतो. कालाहारीच्या भागातील काही प्रवाह वाटेतच लुप्त होतात व काही ठिकाणी उथळ सरोवरे तयार होतात त्यास पॅन म्हणतात. मुखाजवळचा भाग वाळवंटीच आहे. या नदीमुळे तेथे मरूद्यानासारखा प्रदेश दिसतो. मधल्या टप्प्यात प्रीस्कानंतर बुचुबर्ग येथे नदीला बंधारा घातलेला आहे. त्याचे पाणी अपिंग्टनपर्यंतच्या प्रदेशात नेऊन त्यावर बेदाण्याची सुलताना द्राक्षे, गहू, कापूस, बटाटा, घेवडा, गवत व फळे यांचे उत्पादन केले जाते. अपिंग्टन ते ओग्राबीसपर्यंतच्या भागात नदीच्या पाटांवर पिके काढली जातात. द्राक्षे, मुसुंबी, अंजीर इ. फळे व गहू, कापूस, तंबाखू, बटाटे, वाटाणा, भुईमूग इ. पिके पाणीपुरवठ्याच्या साहाय्याने देणारी नदी म्हणून द. आफ्रिका संघराज्याला तिचे महत्त्व आहे. १९६२ च्या ऑरेंज नदी प्रकल्पानुसार ३० वर्षांत अनेक धरणे व विद्युतगृहे व्हावयाची आहेत. रूइगेट खोऱ्यातील धरणाचे पाणी ८४ किमी. बोगद्यातून फिश व संडिझ नद्यांत नेले जाईल. बासूटोलँडमध्येही ऑरेंजच्या उगमप्रवाहाला बांध घालून वीजउत्पादन करण्याची योजना आहे. ऑरेंजच्या मुखाजवळच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर हिरे सापडण्याजोगे आहेत. व्हाल व इतर उपनद्यांवरही बंधारे, पूल बांधून ऑरेंजच्या खोऱ्यातील नैसर्गिक संपत्तीचा पुरेपूर फायदा घेण्याच्या योजना चालू आहेत.
१७६१ मध्ये कॅ. हेन्री हॉप याने मुखाजवळ नदी पार केली होती. १७७७ मध्ये गॉर्डन या डच अधिकाऱ्याने मधल्या टप्प्याचा प्रवास करून नदीला प्रिन्स ऑफ ऑरेंजच्या सन्मानार्थ ऑरेंज हे नाव दिले. पीटरसन, गॉर्डन व व्हायान यांनी मुखाजवळच्या भागाचे समन्वेषण केले. १८१३ मध्ये कँप्बेल या मिशनऱ्याने हार्ट्स व व्हाल नद्यांतून येऊन ऑरेंजच्या काठाकाठाने जाऊन ओग्राबीस धबधबा शोधून काढला. ऑरेंजच्या उगमाचा शोध आर्बूसे व डोमा या फ्रेंच मिशनऱ्यांनी १८३६ मध्ये लावला.
यार्दी, ह. व्यं.