इट्रुस्कन भाषा : इट्रुरिया या इटलीमधील प्राचीन राज्यातील रहिवाशांकडून बोलली जाणारी भाषा. इट्रुरिया राज्य सामान्यपणे आजच्या तस्कनी प्रांताच्या भागात होते.

इट्रुरियात येऊन स्थायिक झालेल्या लोकांना ‘इट्रुस्कन’ हे नाव दिले जाते. ते स्वतःला ‘रासेना’ म्हणवितात व लॅटिनमध्ये त्यांना ‘एत्रुस्की’ हे नाव आहे. त्यांनी अनेक नगरराज्ये स्थापून त्यांचा संघ बनविला. ही राज्ये समृद्ध व शक्तिशाली होती आणि अगदी प्रारंभापासूनच रोमवरही त्यांची सत्ता होती. राजसत्तेखाली असलेली ही नगरे ख्रि. पू. पाचव्या शतकाच्या आसपास बहुसत्ताक बनली आणि पुढे तीनशे वर्षांनी रोमचा उदय होताच त्याच्या वर्चस्वाखाली गेली.

इट्रुस्कन भाषा मात्र यानंतरही दीर्घकाळ चालू होती. तिचा एक अवशेष म्हणजे आजही तस्कन बोलीत लॅटिनोद्‌भव ‘क’ च्या जागी होणारा ‘ह’ हा उच्चार.

शब्दांवरील टीपा व काही प्राचीन लेखकांनी निर्दिष्ट केलेले शब्द सोडल्यास अगदी प्रारंभीचा पुरावा नाही. आज उपलब्ध असलेले या भाषेसंबंधीचे ज्ञान हे संशोधकांच्या दीर्घ परिश्रमाचे फळ आहे. इट्रुस्कनचे तीन सोडून सर्व लेख इट्रुरियातच सापडलेले आहेत. तिची अक्षरमाला मध्य ग्रीसच्या लेखनावर आधारलेली आहे.

जवळजवळ दहा हजार लेख आज उपलब्ध असून सर्वांत जुना ख्रि. पू. सातव्या शतकातील आहे. त्यात दहा शब्द आहेत. बहुतेक मजकूर थडग्यांवरला असून छोटा व एकाच प्रकारचा आहे. तरीही त्यात व्यक्तिनामे भरपूर सापडतात. इतर लेखन धार्मिक, करारासंबंधी, शापवाचक इ. स्वरूपाचे आहे. सर्वांत मोठा लेख तीनशे शब्दांचा आहे.

ध्वनिविचार : लेखनात केवळ अघोष स्फोटक व घर्षकच आढळतात. ते असे : प, त, क, फ, थ, ख. स्फोटकांचे घर्षक करण्याकडे प्रवृत्ती आहे. फ व ह यांचा घनिष्ठ संबंध आहे. ल, म, न, र, व, हे इतर ध्वनी आणि स, श, त्स हे घर्षक या भाषेत आहेत. स्वरात फक्त अ, इ, ए व उ सापडतात. ए ची इ करण्याकडे प्रवृत्ती आहे. शब्दाच्या शेवटी दोन, तीन किंवा चार व्यंजने आढळतात. पुढील काळातील लेखनात अइ चा ए झाला असून स्वर कमी होत जाऊन व्यंजने जवळजवळ येत चालली आहेत. पण हे केवळ एक लेखनवैशिष्ट्य असण्याची शक्यता आहे.

रूपविचार : या भाषेत मुळात लिंगभेद नाही. पुढे तो स्त्रीवाचक नामांच्या अंत्यवयवाच्या प्रभावाने आलेला दिसतो. अनेकवचनाला ‘आर’ हा प्रत्यय लागतो. उदा., ‘क्लान्’ (मुलगा)- ‘क्लेनार’ (मुलगे), ‘आइस्’ (देव)-‘आइसार’ (देल). चतुर्थी एकवचनात प्रत्यय ‘एरी’ आहे षष्ठीचे अनेक आहेत. ज्यांची खात्रीने ओळख पटली आहे, अशी सर्वनामे ‘मी’ (मी) व ‘एका’ (हा) ही आहेत.

क्रियापदांबाबत निश्चितपणे सांगता येईल, इतकी प्रगती झालेली नाही. खात्रीने माहीत झालेल्या भूतकाशळाचा ‘के’ हा प्रत्यय आहे. उदा., ‘आमके’ (होता), ‘तुरूके’ (दिला), ‘लुपुके’ (मेला). -क, -(ए)म्, -(उ) म् हे प्रत्यय ‘आणि’ या अर्थी वापरले जातात.

शब्दसंग्रह : शब्दसंग्रहात नातेवाचक शब्द अनेक मिळतात. उदा., ‘क्लान्’ (मुलगा), ‘सेख्’ (मुलगी), नेपत्स्’ (नातू), ‘पृम्त्स्’, (पणतू), ‘पुइआ’ (बायको), ‘राताक्स्अ (भाऊ) ‘लाउत्‍नी’ (मुक्त), ‘एतेरा’ (नोकर), ‘त्सिलाख’ (सर्वश्रेष्ठ न्यायाधीश). 

कालवाचक शब्द : ‘तिन्’ (दिवस), ‘तिव्’ (चंद्र, ‘तिव्र’ (महिना), ‘आविल्’ (वर्ष), ‘रिल्’ (वय). धर्मविषयक : ‘आइस्अ (देव), ‘थाउरा’ (थडगे), ‘तिन्श्‌क्विल्’ (आहुती). राज्यविषयक: ‘मेख्‍ल्’ (लोक), ‘स्पुर्’ (शहर), ‘तुलार’ (सरहद्दी).

संख्यावाचकांबाबतच वाद अजून संपलेला नाही. एक ते सहा हे अंक काहींच्या मते ‘थु’, ‘त्साल्’, ‘की’, ‘शा’, ‘माख्’, ‘हुथ्’ असे आहेत तर काहींच्या मते याच्या अगदी उलट म्हणजे अहुथ्’, ‘माख्’, … ‘थु’ असे आहेत.

या सर्व अडचणींमुळे इट्रुस्कनचे भाषिक वर्गीकरण करणे शक्य झालेले नाही.

संदर्भ : Meillet, Antoine Cohen, Marcel, Les Langues du Monde, Paris, 1954.

कालेलकर, ना. गो.