इट्रियम : धातुरूप रासायनिक मूलद्रव्य. चिन्ह Y. आवर्त सारणीच्या (मूलद्रव्यांच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या कोष्टकरूप मांडणीच्या) तिसऱ्या गटातील धातुरूप संक्रमणी मूलद्रव्य [दीर्घ आवर्ताच्या मध्यावरील मूलद्रव्य, → संक्रमणी मूलद्रव्ये]. अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ३९ अणुभार ८८·९०५ क्वथनांक (उकळबिंदू) सु. ३,२००० से. द्रवांक (वितळबिंदू) १,५०९० से. वि. गु. ४·४७८ (षट्कोणीय घट्ट संरचनेच्या स्फटिकाचे) संयुजा ३ [→ संयुजा]विद्युत् विन्यास (अणूतील इलेक्ट्रॉनांची मांडणी) २,८,१८,९,२. इट्रियम ही रुपेरी, तन्य (ताणून तार काढता येण्याजोगी) व अतिशय विक्रियाशील धातू आहे. ती हवेत चटकन गंजते. तिची पाण्याशी विक्रिया होऊन हायड्रोजन निर्माण होतो. इट्रियमाच्या व विरल मृत्तिका गटातील मूलद्रव्यांच्या [→ आवर्त सारणीतील अणुक्रमांक ५७ ते ७१ असलेल्या मूलद्रव्यांच्या, → विरल मृत्तिका] रासायनिक गुणधर्मांमध्ये खूप साम्य असल्यामुळे तिचा विरल मृत्तिका गटातच समावेश करतात. परंतु ती खरी विरल मृत्तिका नाही, कारण विद्युत् विन्यासाच्या बाबतीत इट्रियम व इतर विरल मृत्तिका यांच्यात भिन्नता आहे.
जे. गॅडोलिन यांनी १७९४ साली इट्रियमाचा शोध लावला. त्यांनी स्वीडनमधील इटर्बी येथे सापडलेल्या एका खनिजामधून एक नवीन मृत्तिका शोधून काढली. ती इट्रियम आहे अशी त्यांची समजूत झाली. पण प्रत्यक्षात ती मृत्तिका म्हणजे ऑक्साइडांचे मिश्रण होते. मात्र या नव्या मृत्तिकेपासून सी. जी. मूसांडर यांनी १८४२ मध्ये इट्रियम ऑक्साइड वेगळे काढले व १८४३ साली इट्रियम धातू जवळजवळ शुद्ध स्वरूपात मिळविली.
भारी विरल मृत्तिकांच्या धातुपाषाणात इट्रियम आढळते. त्यांच्यामधील तिचे प्रमाण विरल मृत्तिकांपैकी सिरियमाच्या खालोखाल असते. त्यांपैकी गॅडोलिनाइट, यूक्सेनाइट, झेनोटाइम व समर्स्काइट हे महत्त्वाचे धातुपाषाण होत. अणुकेंद्रीय भंजनाने (फुटण्यामुळे) निर्माण झालेल्या पदार्थांमध्येही इट्रियम आढळते. नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या इट्रियमाच्या एकमेव समस्थानिकाचा (तोच अणुक्रमांक पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकाराचा) वस्तुमान क्रमांक (समस्थानिकाचा अणुभार) ८९ आहे.
इट्रियमाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी आयन (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट) विनिमय तंत्राचा [→ आयनविनिमय]उपयोग करतात. तिच्या निर्जल हॅलाइडांचे, क्षारीय (अल्कलाइन) किंवा क्षारीय मृत्तिका धातूंच्या (कॅल्शियम, स्ट्राँशियम, बेरियम व रेडियम या धातूंच्या) द्वारे, ऊष्मीय ⇨ क्षपण करूनही ही धातू तयार करतात तिची Y2O3, Y2 (SO4)3, YCl3, Y2 (CO3)3 यांसारखी पांढरी लवणे आहेत. या लवणांच्या वर्णहीन विद्रावांमध्ये वर्णपटाच्या जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील), दृश्य किंवा अवरक्त (द्दश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील) भागांमध्ये एकमेकांपासून सुट्या अशा शोषणरेषा [→ वर्णपटविज्ञान] दिसत नाहीत. Y+3 हा आयन प्रतिचुंबकीय (निर्वातापेक्षा कमी चुंबकीय पार्यता असलेला) असतो.
मिश्रधातू तयार करण्यासाठी व धातुवैज्ञानिक क्रियांमध्ये इट्रियम धातुचा उपयोग होतो. शिवाय अणुकेंद्रीय विक्रियक (अणुभट्टी), रंगीत दूरचित्रवाणी, रडार, संदेशवहन पद्धती, कर्करोग चिकित्सा इत्यादींमध्ये तिचा व उत्प्रेरक (विक्रियेत स्वतः भाग न घेता तिची गती वाढविणारा पदार्थ) म्हणून तिच्या संयुगांचा उपयोग करतात.
संदर्भ : Hampel, C. A. Rare Metals Handbook, London, 1961.
ठाकूर, अ. ना.